गज्जलाञ्जलि - विद्युल्लतेप्रमाणे हासूनि...
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
विद्युल्लतेप्रमाणे हासूनि साजणी,
अन्धार गर्दवूनी जाशी पुन्हा झणी.
रस्ता पुढे दिसेना अन्दाज होऊना,
हा जीव पाठलागीं मी लाविला पणीं.
मागे न येऊनीही जाणार मी कुठे ?
खेचूनि ने, न सोडी तूझी भुलावणी.
ठेचाळातां कुठूनी जाऊंच मी पुढे.
रात्रीहि पापणीला लागे न पापणी.
घेऊं कुठे विसावा ? रस्ता अनन्त हा,
थाम्बूं तरी कसा मी ? अक्षय्य लागणी !
अशी लपालपी तू खेळूं नको गडे.
राहीं ध्रुवापरी तू - ही ऐक मागणी.
१० मे १९२१
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP