मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|गज्जलाञ्जलि|
प्रेम होऊना तुझ्याने, प्र...

गज्जलाञ्जलि - प्रेम होऊना तुझ्याने, प्र...

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


प्रेम होऊना तुझ्याने, प्रेम माझें राहुं दे !
आचरूं ये धर्म तूझा तू नि मी माझा मुदें.

प्रेम होऊना तुझ्याने, दोष हा नाही. तुझा,
स्वस्थ राही तू सुखें, ठेवी न चित्तीं किन्तु, जा.

प्रेम होऊना तुझ्याने, प्रेम होऊ का हटें ?
प्रेम द्या अन प्रेम घ्या काव्यींच हा सौद पटे.

प्रेम होऊना तुझाने, दैव ही क्रीडा करी;
वारि - भासाची मजा ती वालुकेच्या सागरीं !

प्रेम होऊना तुझ्याने, मी न दैवाला गणीं.
स्वप्नवत राहील चित्तीं गोड माझी लागणी.

प्रेम होऊना तुझ्याने, स्वर्ग थाम्बे स्व - स्थलीं,
भूतलींची सम्पदा नाही अजूनी सम्पली.

प्रेम होऊना तुझ्याने, राख कां घालूं शिरीं ?
काम श्मशानाची कळा आणूं मनाच्या मन्दिरीं ?

प्रेम होऊना तुझ्याने, जाऊं दे तें बापुडें !
मत्स्मृतीला माळ तू घालूं नको वाया पुढे !

१९ एप्रिल १९३३

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP