गज्जलाञ्जलि - अगोट लागुनि ही तर्त जाहली...
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
अगोट लागुनि ही तर्त जाहली धरणी.
सजे जशी हिरवा शालु नेसली सजणी.
नदी कषायित धुन्दींत चालली फुगुनी -
नव्या वयांतील ही ओढ, ही कशास गणी ?
पडूनि झिमझिम पाऊस धुंदतात दिशा,
मलाहि होय कसंसेंच लागुनी झुरणी.
हलूं नयेच ऊथूनी, भिजे, भिजो तनु ही !
करूनि धीर रिघावें कुणाचिया शरणीं ?
कितीक साठवणी पूर्वसौख्यदुक्खाच्या,
खुल्या करूनि कथाव्या कुणास आठवणी ?
असा निमग्न विचारांत कातळावर मी
पुढूनि आलिस तों तू चडूनिया चढणी.
चपापलों तुज देखुनि, लाजलोंहि जरा,
पुढे मनीं भय - ऐकान्त आणि तू रमणी !
विभागवी स्मित अव्याज ओठ हे चिमणे,
लघाळ द्दष्टि करी हाय जादुची करणी !
विशाळ निर्मळ ऐन्दीवरें तुझ्या नयनीं,
गुलाब - गाल फुलूनी बहार मैतरणी !
सुरेख अन्नत सङगीन गुच्छ हे असुनी
न नम्रता तनुला ये, न मन्दता चरणीं.
तनूंत राजस तारुण्य मुस्मुसूनि निघे,
परन्तु तू हरिणी जी ऊडे खुल्या कुरणीं,
तुझें स्मित क्षण विश्रान्तिचें गमे स्थळ हें,
जसें जिवन्त हरिद - द्वीप रूक्ष शून्य रणीं.
बघूनि हें स्मित मी दङग होय जसा
श्रवूनि मञ्जुळ पुङगी डुले रसज्ञ फणी,
तथापि रोख कळेना तुझा, कळेल कसा ?
कशास लाविशी माया जिवास या गडणी ?
कुठे भणङग खुळा मी, कुठे रमा ललिता,
अमोल पाचच तू मी भिकार काचमणी.
स्मितांत निर्मळ तूज्या असें बुडूं मज दे,
तरूनि जाऊन वेगें भवाब्धिवैतरणी
तुझ्या स्मितांत मला स्वर्ग भूवरी दिसतो.
परी अशा कुणग्याचा कळे न कोण धणी ?
तुझ्या स्मितास कसें आज देऊं ऊत्तर मी ?
पटेल काय तुला तें पडूनिही श्रवणीं ?
असाच लोभ असूं दे ! कधी तरी पुढती
कथीन हृद्रत माझें करीत आळवणी.
२८ जुलै १९२३
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP