मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|गज्जलाञ्जलि|
“पुरे गडे ! किति सङकोच ? ...

गज्जलाञ्जलि - “पुरे गडे ! किति सङकोच ? ...

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


“पुरे गडे ! किति सङकोच ? ये अशी जवळी !
मुखावगुण्ठन सारूनि हृज्जगत ऊजळी !”

- परन्तु दर्शन घ्यावें गमे दुरूनिच मी,
दुरूनि गुञ्जन ऊकेन मी कळी कवळी.

तुम्हांस दावुनि हृद्रङग द्यावया मधुही
असूनि आतुर मी आंत दाबितें कुकळी,

प्रफुल्ल होऊनि होणें पुढे विशीर्णच ना ?
करी मला न पहा भीति ही परी दुबळी.

जगत कृतघ्न असो हें लबाड पोटभरू,
असे पतङगहि, सारेच का अली कमळीं ?

परी मला भय वाटे, दुरूनि रम्य दिसे
दिसेल काय तसें रम्य पोचतां जवळी ?

मला दुरूनि तुम्ही घ्येयमूर्ति की गमतां,
करी बहार जगीं हीच भावना सगळी.

असो कसेंहि जगत, घ्येय त्या परी न दिसो !
जिवास जाळिल नैराश्य वा सदा अनळीं.

हृदीं परन्तु सख्या, हीहि पोखरी चिन्ता -
जिवन्त राहिल कैशी मिटूनि नित्य कळी ?

ऊद्या दिसेल मला तें भलें ऊद्याच दिसो.
लुटूनि घ्या अजि ऐश्वर्य हें सहस्रदळी.

११ सप्टेम्बर १९३०


Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP