गज्जलाञ्जलि - फिरायला हवाशीर थण्ड या प्...
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
फिरायला हवाशीर थण्ड या प्रहरीं
सजूनि ये कुणि तन्वी - जणू ऊषा हसरी !
सफेत पातळ, बेतीव पोलकें गहिरें,
अखूड नाजुक छत्री, नि बूट ते रबरी,
भिजूनि सौम्य ऊन्हाने हसे सरित्तट हा,
फुलूनि येऊनि रङ्गांत तेरडा - तगरी.
पडूनि चादर बान्धावरूनि पाण्याची
गभीर घोष धडाडूनि कातळास करी.
अखण्ड घालिति फेर्या हवेंत पाकोळ्या
तशी सलील हिची वृत्ति नाचरी लहरी.
बसे ऐथे क्षण तेथूनि जाय ही ऊठुनी,
खुडनि पुष्प जशी घे तशीच चित्त हरी.
गतींत मोहक चाञ्चल्य, काय हा नखरा !
म्हणूं कबूतर हीते, पतङ्ग का भ्रमरी ?
चुणींत माणिक का प्रेमि - रक्तबिन्दु म्हणूं ?
स्वत:स वेष्टुनि घे ऐकपेड ही कबरी,
निसर्गसिद्धच सौन्दर्य हें हिचें आधी,
तशांत साहय तर्हा या नव्या कलाकुसरी.
दिसे मुखावर ही बेगुमान ऐट किती !
नवीन शिक्षण, सम्पत्ति अन हवा शहरी,
चलाख बेडर डोळ्यांत ऐन्द्रजाल पहा !
स्मितांत लाघव जिज्ञासु, गूढ ही जबरी,
खुआल लाडिक हास्यास या दुजा भाळो,
हवेंत जीव तरङगो फुगूनि हावभरी,
बघेन रूप दुरूनीच मी तुझें बिजली,
तुझा प्रसाद कळे गे असे कसा जहरी.
जिवास विन्धुनि ठेवी जिवन्त द्दग्शर हा -
न ये रुजूनि तुझा घाव लागतां कहरी.
पुसेल कोण मला ? ख्याल भावमन्थर मी !
हळूच हृत्सुमनीं नाच तू परी ठुमरी !
९ ऑगस्ट १९२३
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP