आहेस तू जागीं हें खोटें खरें न ठावें.
नाथा, तथापि तूतें मी बाहतें स्वभावें.
येशील का कुठूनी केव्हा कसा कळेना,
मी जागच्याच जागीं शोधीत तूज धावें.
स्वर्गांतुनी मनाच्या घे झोत भावगङगा,
अन ही सदाशिवाच्या शीर्षींच शान्ति पावे.
जाऊनि दूर राया, लोपे मनीं न माया,
काषायवेष का या हृत्सङिगनीस भावे ?
भाण्डार लूटवाया केले प्रयास वाया,
सौभाग्य अन्तरींचें वाढे तुझ्या प्रभावें !
प्रीतीच ज्योत ज्याची तो दीप जन्म माझ,अ
गाभारियांत तूझ्या नन्दादिपें जळावें.
काळीज धुग्धुगे तों कर्तव्य हें टळेना,
अन गात गात व्हावें हेंही तुझ्याच नावें.
जात्याच दुर्बला मी, मग्दूर काय माझा ?
स्वामी, धरूनि हातीं वेडीस चालवावें.
कोठे घरीं, वनीं वा दर्यावरी, रणीं वा,
सामीप्य गाढ तूझें चित्तीं सदा पटावें
येवो अथाङग पाणी, वारा असो तुफानी,
जावो पुढेच तारूं, बैसोत हेलकावे ?!
कान्ती तुझ्या स्मिताची सञ्जीवनीच माझी,
रे, मृत्युभीति चित्तीं प्रीतीसवें न मावें.
१० नोव्हेम्बर १९२०