प्रातःकालीन व सायंकालीन वैश्वदेव एकतंत्रानें करण्याचा प्रयोगः--वैष्णवांनीं भगवान् विष्णूला षोडशोपचारांपैकीं दीपापर्यंत उपचार अर्पण केल्यावर सर्व अन्न असेल त्यापैकीं एका पुरुषाला पुरेल इतक्या अन्नाचा नैवेद्य दाखवून शेष राहिलेल्या अन्नानें वैश्वदेव करावा. वैष्णव नसतील त्यांनीं अगोदर वैश्वदेव करुन त्यांतून शेष राहील त्या अन्नानें वैश्वदेव करावा. कारण विष्णूला अर्पण केलेल्या अन्नानें इतर देवतांचें यजन करावें; तें अन्न पितरांना देखील द्यावें; तेणेंकरुन अनंतफल प्राप्त होतें, इत्यादि वचनें वैष्णवासंबंधानें आहेत असें निबंधकारांनीं सांगितलें आहे. नारायणाचा अष्टाक्षर मंत्र इत्यादि वैष्णवमंत्रांच्या दीक्षेचा उपदेश ग्रहण करुन जप करणारे मुख्य वैष्णव होत. ’कलियुगामध्यें उपदेश घ्यावा’ या स्मृतिवचनानें केवळ उपदेश घेण्यानें दीक्षेप्रमाणें फल मिळतें. परंपरेनें प्राप्त असा अरुणोदयविद्ध एकादशीला उपवास न करितां शुक्ल, कृष्ण, इत्यादि एकादशीचा उपवास इत्यादि किंचित् धर्म करणारे व मंत्रोपदेशानें विरहित ते गौण वैष्णव होत. " पांचरात्र इत्यादि शास्त्रांमध्यें सांगितलेली दीक्षा ग्रहण केलेला तो वैष्णव" या वचनानें किंचित् धर्म करणारे ते वैष्णव कसे, अशी शंका घेतली असतां तिचें समाधान-गायत्री, अध्ययन इत्यादि क्षत्रिय, वैश्य इत्यादिकांना साधारण असणार्या धर्माचें आचरण करणारे; याजन, अध्यापन, प्रतिग्रह इत्यादि ब्राह्मणविशिष्ट धर्मानें विरहित असणारे; आणि पिता इत्यादिकांपासून परंपरेनें आलेल्या वैश्यवृत्तीचे (व्यापाराचे) ठिकाणीं तत्पर असलेले हे ज्याप्रमाणें समान गोत्र वगैरे किंचित् ब्राह्मणधर्मानें ब्राह्मणच समजले जातात व ब्राह्मणांना उचित असा आशौच इत्यादि पाळण्याचा आचारही आहे त्याप्रमाणें कलियुगामध्यें किंचित् धर्म आचरिला असतां वैष्णवत्व व वैष्णवांना युक्त असा आचार हीं योग्यच आहेत. पुरोहितांच्या गोत्रांच्या भेदानें क्षत्रियांचीं भिन्न गोत्रें होतात. तेणेंकरुन यदुवंशामध्येंही परस्पर विवाह झाले. याप्रमाणें ब्राह्मणांत होत नाहीं हें स्पष्ट आहे. याप्रमाणें श्राद्धामध्यें देखील नैवेद्य समर्पण करुन पितरांना अन्न अर्पण (वैश्वदेव) करावें असें जाणावें. वैश्वदेवाचा संकल्प----"ममात्मान्नसंस्कार पंचसूनाजनित दोषपरिहारद्वारा श्रीपरमेश्वरप्रीत्यर्थं प्रातर्वैश्वदेवं सायंवैश्वदेवं च सह तन्त्रेण करिष्ये" याप्रमाणें संकल्प केल्यावर कुंड अथवा स्थंडिल यांचे ठिकाणीं पंचनाग्नीची व्याहृति मंत्रांनीं पावकनामा अशी स्थापना करुन "चत्वारिशृंगा०" या मंत्रांनीं ध्यान करुन परिसमूहन व पर्युक्षण करावें. "विश्वानिनः०" या मंत्रांनीं अर्चन इत्यादि करुन घृतयुक्त अन्न अग्नीमध्यें शिजल्यासारखें करुन त्यावर प्रोक्षण केल्यावर तें उत्तरेकडून अग्नीच्या पश्चिमभागीं ठेवावें. त्याचे तीन विभाग करावे. ते असे ----- हृदयावर डावा हात ठेवून उजवा हस्त उताणा करुन त्यानें ":सूर्याय स्वाहा सूर्यायेदं नमम प्रजापतये० सोमायवनस्पतये० अग्नीषोमाभ्यां० इंद्राग्निभ्यां० द्यावापृथिवीभ्यां० धन्वन्तरये० इन्द्राय० विश्वेभ्योदेवेभ्यः ब्रह्मणे०" याप्रमाणें प्रातर्वैश्वदेवाच्या दहा आहुति द्याव्या.