गर्भाधान, पुंसवन, अनवलोभन, सीमंतोन्नयन्न, जातकर्म, नामकर, निष्क्रमण, अन्नप्राशन, चौल, मौजी, महानाम्न्यादि चार व्रते, समावर्तन (सोडमुंज) व विवाह असे ब्राह्मणांचे सोळा संस्कार आहेत. जातकर्म, नामकर्म, निष्क्रमण, चौल, अन्नप्राशन व विवाह असे ब्राह्मणांच्या स्त्रियांचे सहा संस्कार आहेत. या सहापैकी विवाहसंस्कार समंत्रक करावा, इतर संस्कार मंत्राशिवाय करावेत. गर्भाधान व सीमंतोन्नयन हे संस्कार स्त्रीपुरुषांचे साधारण आहेत. गर्भाधान, पुंसवन अनवलोभन, सीमंतोन्नयन, जातकर्म, नामकर्म, निष्क्रमण व अन्नप्राशन हे नऊ व विवाह असे दहा संस्कार शूद्रांचे अमंत्रक असावेत असे बहुमत आहे. पण शूद्रकमलाकर ग्रंथात शूद्रांना पंचमहायज्ञ सुद्धा सांगितले आहेत. वेदरहित म्हणजे पुराणोक्त मंत्रांनी शूद्रांचे उपनयन सुद्धा करावे असे कित्येक ग्रंथकार म्हणतात. "शूद्रांचा विवाहसंस्कार मात्र करावा" अस ब्रह्मपुराणात सांगितले आहे. तेव्हा सच्छूद्र किंवा असच्छूद्र याचा विचार करून अथवा परंपरेने चालत आलेल्या प्रकाराने व्यवस्था करावी. शूद्राची वृत्ति द्विजसेवा ही होय. आपत्काली व्यापार, शिल्प इत्यादिकांनी आपली वृत्ति करावी. शूद्राने लवणादि (मीठ, तेल इ०) पदार्थ विकावेत पण मद्य व मांस यांचा विक्रय करू नये. "कपिला गाईचे दुग्धपान, ब्राह्मणस्त्रीच्या ठिकाणी गमन व वेदांच्या अक्षरांचा विचार ह्या गोष्टी केल्याने शूद्र चांडाल होतो." शूद्रवर्ण चवथा असला तरी तो मुख्य वर्णातील असल्यामुळे वेदमंत्र, स्वधाकार, स्वाहाकार व वषटकार इत्यादि वर्ज्य करून इतर धर्माचरणास तो योग्य आहे." स्त्रिया व शूद्र यांच्या व्रतादि धर्मकर्मात ब्राह्मणाने सर्वत्र पुराणोक्त मंत्र म्हणावेत. भारत व पुराणे ही श्रवण करण्याचा अधिकार स्त्रिया व शूद्र यांस आहे. पण त्यांना अध्ययनाचा अधिकार नाही. ब्राह्मणाला पुढे बसवून चार्ही वर्णाकडून वक्त्याने पुराणश्रवण करवावे. शूद्राचे पंचमहायज्ञ व श्राद्धादि कर्मे कातीयसूत्राप्रमाणे होतात असे मयूरवात सांगितले आहे. आगमात (विशिष्टग्रंथात) सांगितलेले व अंती 'नमः' शब्द असलेले विष्णु शिव इत्यादि देवतांचे मंत्र प्रणव (ॐ) रहित असे शूद्रांनी पठण करावेत. स्त्रिया व शूद्र यांनी पुराणादि साधनांनी श्रवण, मनन, निदिध्यास इत्यादिक करून ब्रह्मज्ञान सुद्धा संपादन करावे. उपनिषदांचे श्रवण करण्यास यांस अधिकार नाही; कारण 'तदनादरश्रवणात' ह्या अधिकरणात शूद्रांस उपनिषदांचे आदरे करून श्रवण नाही असे सांगितले आहे. शूद्राने सर्व श्राद्धे आमान्ने करूनच करावीत. सर्व प्रजा कश्यपाची असल्यामुळे सर्व शूद्रांचे काश्यपगोत्र आहे. तेव्हा या काश्यप गोत्राचा उच्चार शूद्रांनी श्राद्धकर्मातच करावा. अन्य कर्मात करू नये असे कित्येक ग्रंथकार म्हणतात. याप्रमाणे शूद्राला शांति इत्यादि कर्मे करण्याविषयी सांगितलेला अधिकार ब्राह्मणद्वाराच आहे, असे समजावे. शूद्रापासून दक्षिणा घेऊन वैदिकमंत्रांनी त्या शूद्राची होम, अभिषेक इत्यादि कर्मे जर ब्राह्मण करील तर त्या कर्माच्या पुण्याचा फलभागी शूद्र होतो. पण ब्राह्मण महादोषी होतो असे माधवग्रंथात सांगितले आहे.
हिंसा न करणे, सत्यभाषण करणे,चोरी न करणे, शुचीर्भूतपणा राखणे, इंद्रियनिग्रह करणे, दान, शम, दम, क्षमा, इत्यादि शूद्र व इतर सर्व लोकांचे साधारण धर्म असून ते परमेश्वरपदाची प्राप्ति करून देणारे आहेत. पुण्याहवाचन इत्यादि शूद्रांचे कर्माचे प्रयोग पहावयाचे असल्यास शूद्रकमलाकर ग्रंथात पहावे.