चौकोनी मंडल करुन त्यावर धुतलेलें पात्र ठेवावें व पंचमहायज्ञ करुन शेष राहिलेलें घृतासहित पात्रावर वाढलेलें अन्न आम्हांस निरंतर प्राप्त होवो असें म्हणून नमस्कार करावा व ग्रंथिरहित दर्भ पवित्र उजव्या हातांत घेऊन दोन्ही पायांनीं अथवा एका पायानें भूमीला स्पर्श करीत असतां व्याहृति व गायत्री या मंत्रांनीं पात्रावरील अन्नाचें अभिमंत्रन करावें आणि "सत्यंत्वर्तेन परिषिंचामि" ह्या मंत्रानें दिवसा व "ऋतंत्वासत्येन परिषिंचामि" ह्या मंत्रानें रात्रौ पात्राच्या भोंवतीं जलाचें सिंचन करावें. नंतर "अंतश्चरति भूतेषु गुहायां विश्वतोमुखः । त्वं यज्ञसत्वं वषट्कारस्त्वं विष्णुः पुरुषः परः ॥" हा मंत्र म्हणून पात्राच्या उजव्या बाजूस भूमीवर "भूपतये नमः भुवनपतये नमः" व "भूतानां पतये नमः" असें म्हणून तीन आहुती द्याव्या. अथवा "चित्राय०, चित्रगुप्ताय०, यमाय० यमधर्माय०, सर्वभूतेभ्य०" या मंत्रांनीं पांच आहुती द्याव्यात. अथवा व्यस्तसमस्त व्याहृति मंत्रांनीं चार आहुती द्याव्या. किंवा "धर्मराजाय०, चित्रगुप्ताय० अशा दोन आहुती द्याव्या. किंवा ’भूपत्यादि’ तीन आहुती व ’धर्मराजायनमः व चित्रगुप्तायनमः’ ह्या दोन आहुती मिळून पांच आहुती द्याव्या. नंतर हात, पाय व मुख हीं आर्द्र (भिजलेलीं) असतां आपोशनाकरितां हातांत उदक घ्यावें व "अन्नंब्रह्मरसो विष्णुर्भोक्ता०" , "अहं वैश्वानरो भूत्वा०" हे मंत्र म्हणून त्यांचा अर्थ मनांत आणावा व डाव्या हातानें पात्र धरुन "अमृतोपस्तरणमसि" असें म्हणून उदक प्राशन करावें. यावर मौन धारण करुन "ॐ प्राणायस्वाहा, ॐ अपानायस्वा०, ॐ व्यानायस्वा०, ॐ उदानायस्वा, ॐ समानायस्वा०, असें म्हणून प्रत्येक मंत्रानें एकेक अशा पांच घृतयुक्त किंवा दुग्धयुक्त आहुती सर्व अंगुलींनीं, सर्व ग्रास भक्षण करणार्या मुखांत हवन कराव्या. "ब्रह्मणेस्वाहा" ही सहावी आहुति कित्येक ग्रंथांत सांगितली आहे. प्राणाहुतीपर्यंत हातानें पात्र धरणें व मौन स्वीकारणें नित्य आहेत. प्राणाहुतीनंतर या दोन्ही गोष्टी ऐच्छिक आहेत. पूर्वाभिमुख किंवा पश्चिमाभिमुख भोजन करणें प्रशस्त आहे. दक्षिणाभिमुख भोजन करणें काम्य आहे. त्याचें फल यश. उत्तराभिमुख भोजन करणें निंद्य आहे. विदिशांस मुख करुन भोजन करणें निषिद्ध आहे. संपूर्ण ग्रासाचें भक्षण करीत असतां नियमित असे बत्तीस ग्रास अथवा यथेच्छ ग्रास भोजन करुन "अमृतापिधानमसि" असें म्हणून अर्धे उदक प्राशन करावें व बाकीचें शेष उदक भूमीवर टाकावें. नंतर हातांतील पवित्रकें टाकून तोंड व हात चांगले धुवावे तर्जनीनें तोंड धुवूं नये. कांहीं चुळा भरुन टाकल्यावर हात धुवावे. सोळा चुळी भरुन टाकल्यावर दोनदां आचमन करावें. पण भोजनगृहांत आचमन करुं नये. आचमन केल्याशिवाय मूत्रपुरीप कर्में करुं नये. उत्तरापोशन घेतल्याशिवाय उठल्यास स्नानावांचून शुद्धि नाहीं. हातांत पाणी घेऊन तें खालीं पाघळवावें व त्या पाण्यानें अंगुष्ठमात्रानें नेत्रांचें सिंचन करुन इष्ट देवतेचें स्मरण करावें. ओंजळीनें पाणी पिऊं नये. पळसाचा, दग्ध झालेला व लोखंडाच्या खिळ्यांचा पाट बसावयास घेऊं नये. बाल व वृद्ध यांना भोजन घातल्याशिवाय जेऊं नये. मांडीवर पाय चढवून, पायावर पाय ठेवून, पाय पसरुन अथवा विदिशेला तोंड करुन भोजन करुं नये. दुष्टाच्या पंक्तीला भोजन करुं नये. अग्निशून्य व पाकनिप्पत्तिशून्य गृहांत अथवा देवालयांत भोजन करुं नये. दिवस व रात्रि यांचे संध्यासमयीं व मध्य रात्रीं भोजन करुं नये. यज्ञोपवीत विरहित भोजन करुं नये. डाव्या हातानें भोजन करुं नये. शूद्रांनीं भोजन करुन राहिलेलें शेष अन्न सेवूं नये. आरंभीं मधुर पदार्थ मध्यें खारट व आंबट पदार्थ व शेवटीं कटु इत्यादि पदार्थांचें सेवन करावें. आरंभीं पातळ पदार्थ, मध्यें कठीण पदार्थ व शेवटीं पातळ पदार्थ यांचें सेवन करावें. संन्याशानें आठ ग्रास, गृहस्थाश्रमी पुरुषानें सोळा किंवा बत्तीस ग्रास, वानप्रस्थानें सोळा ग्रस व ब्रह्मचारी पुरुषानें यथेच्छ भोजन करावें. सर्व पदार्थांचा थोडा थोडा शेष ठेवून मग ते भक्षण करावे. पण तूप व दुधाचें पदार्थ निःशेष भक्षावेत. भोजनांत दूध, दहीं व मध हे पदार्थ सेवावेत. दिवसा व रात्रीं मिळून दोनच वेळ भोजन करावें. मध्यंतरीं तिसर्यानें भोजन करुं नये.