वैशाख, ज्येष्ठ व फाल्गुन या महिन्यात सर्व देवतांच्या मूर्तीची प्रतिष्ठा म्हणजे अर्चा करावी. चैत्र महिन्यात विकल्पाने प्रतिष्ठा होते. म्हणजे कित्येकांच्या मते होते कित्येकांच्या मते होत नाही. विष्णूच्या अर्चेवाचून इतर मूर्तीची अर्चा माघ महिन्यात करावी. उत्तरायणात अर्चा करणे शुभप्रद आहे, दक्षिणायनात निंद्य आहे. मातृका, भैरव, वाराह, नारसिंह, त्रिविक्रम आणि देवी यांची स्थापना दक्षिणायनातही करावी, असे कित्येक ग्रंथकार म्हणतात. चैत्र, आश्विन व श्रावण ह्या महिन्यात विष्णूची अर्चा करावी. माघ, फाल्गुन, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, मार्गशीर्ष, श्रावण आणि भाद्रपद या महिन्यात लिंगाची स्थापना करणे उत्तम. माघ व आश्विन या महिन्यात देवीची अर्चा करणे उत्तम. यामुळे सर्व मनोरथ परिपूर्ण होतात. अश्विनी, रोहिणी, तिन्ही उत्तरा, मृग, पुनर्वसु, पुष्य, हस्त, चित्रा, स्वाती, अनुराधा, श्रवण, धनिष्ठा, शततारका व रेवती या नक्षत्री, शनिवार व भौमवार वर्ज्य करून अन्य वारी; अमावास्या व रिक्ता (चतुर्थी, नवमी, चतुर्दशी) तिथी वर्ज्य करून अन्य तिथीस सर्व देवतांची अर्चा शुभकारक आहे. श्रवण, कृत्तिका, रोहिणी, मृग, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा, उत्तरा, हस्त, चित्रा, स्वाती, विशाखा व द्वादशी यांच्या ठायी विष्णूची अर्चा प्रशस्त होय. गणपतीच्या अर्चेस चतुर्थी चांगली. देवीच्या अर्चेस नवमी व मूळ नक्षत्र ही चांगली असे सांगितले आहे. शिवाची अर्चा आर्द्रा नक्षत्री, सूर्याची अर्चा हस्त नक्षत्री, याप्रमाणे ज्या देवतेचे जे नक्षत्र असेल त्या नक्षत्री त्या त्या देवतेची अर्चा करावी.