बह्वृचकारिकेमध्ये सांगितले आहे- "दररोजच्या पाकासाठी गृह्याग्नीमधील एका बाजूचे कोलीत नेऊन त्यावर स्वयंपाकघरात पाक करावा. वैश्वदेव गृह्याग्नीवर करवा; कारण पाकाकरिता नेलेला अग्नि हा लौकिकाग्नि आहे. श्राद्ध, उत्सव इत्यादि दिवशी जेव्हा मोठा पाक करणे असेल तेव्हा त्या पाकाग्नीवरच वैश्वदेव करावा. कारण कार्याच्या योगाने तो तेव्हा लौकिकाग्नि नसतो. दीप लावणे, धूप लावणे, तापविणे इत्यादिकांकरिता नेलेले अग्नि ते सर्व लौकिकाग्नि होत; कारण तेवढे कार्य झाले म्हणजे त्याचे गृह्याग्नित्व नष्ट होते. जेव्हा गृह्याग्नीमधून बहुत कार्यासाठी निरनिराळ्या वेळी अग्नि नेणे असेल तेव्हा एकदा नेलेल्या अग्नीपैकी काही तरी जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत पुन्हा गृह्याग्नीमधून अग्नि नेऊ नये. वैश्वदेव व होम करण्यापूर्वी गृह्याग्नीमधून अग्नि नेऊ नये. गृह्याग्नीमधून पाकाकरिता नेलेला जो पचनाग्नि त्यावर दिवसास पाक केला नाही तर पुनराधान करावे. अग्निसमारोप केलेल्या दोन अरणीमधून एक अथवा दोन्ही नष्ट होतील तर अग्नीचे आधान करावे अथवा पुनराधानच करावे. आग्निसमारोप न केलेल्या अरणी नष्ट होतील तर पुन्हा नव्या अरणी घ्याव्या. नव्या न मिळतील आणि अग्नि नष्ट होईल तर पुनराधान करावे. शूद्र, रजस्वला, अंत्य, पतित (बाटलेला), अपवित्र, रासभ यांचा स्पर्श समारोप न केलेल्या अरणींना झाला तर त्या टाकून दुसर्या घ्याव्या. समारोप केलेल्या अरणीला स्पर्श होईल तर पुनराधान करावे आणि दूषित अरणी "भवतंनः सम०" या मंत्राने उदकात टाकाव्या. एकच अरणी दूषित होईल तर तीच उदकात टाकावी. तिच्याबद्दल दुसरी अरणी मिळण्याच्या पूर्वी अग्नि नष्ट होईल तर पुनराधान करावे. अरणी नष्ट झाली असता, जोपर्यंत गृहामध्ये अग्नि असेल तोपर्यंत होमादिक करून त्या अग्नीचा नाश झाल्यावर पुनराधान करावे. या ठिकाणी एका अरणींचा नाश झाला असता दुसरी एक मंत्र म्हणून घेऊन दोन्ही अरणीचे मंथन करून अग्नि उत्पन्न करावा असे कोणी ग्रंथकार म्हणतात. अवशिष्ट राहिलेल्याच अरणीला छेद करून त्या दोन अरणीच्या मंथनाने अग्नि उत्पन्न करावा असे दुसरे ग्रंथकार म्हणतात. एक अरणी जरी दूषित झाली तरी दोन्ही अरणींचा त्याग करून दुसर्या दोन नवीन घ्याव्या असा नारायणवृत्तेचा आशय आहे. हा अरणीसंबंधाचा निर्णय श्रौत व स्मार्त या दोन्ही कर्मांना व सर्व शाखांना सारखाच आहे.