घर किंवा गाव यांच्या आग्नेय, दक्षिण, नैऋत्य व वायव्य या दिशेस अथवा गावाच्या मध्यभागी असलेली विहीर दुष्ट फल देणारी होते. इतर दिशेस शुभदायक होय. उत्तरायणांत माघादि सहा महिन्यातील शुक्ल पक्षात विहिरी, आड, तलाव इत्यादिकांचा उत्सर्ग केला असता प्रशस्त ह्य. माघादि सहा महिन्यात विहिरी, कूप इत्यादिकातील पाणी आटून जाण्याचा संभव असेल तर कार्तिक व मार्गशीर्ष या महिन्यातही उत्सर्ग करावा. कारण "उत्सर्ग करण्यास कारण उदक आहे, याविषयी कालाचा नियम नाही" असे वचन आहे. तेव्हा कूपादिकांत उदक असेल त्या वेळी उत्सर्ग करावा. विष्णूच्या शयनाच्या चार मासात (आषाढ शुद्ध एकादशीपासून कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत) व शुक्राचा अस्त वगैरे असता उत्सर्ग करू नये.