दिवसाचा सहावा व सातवा भाग भारतादि इतिहास, पुराणे इत्यादिकांच्या वाचनात व त्यातील अर्थाचे मनन करण्यात घालवावा. दिवसाच्या आठव्या भागात आपले इष्टमित्र व आप्त इत्यादिकांस भेटणे, बोलणे वगैरे संसारसंबंधी कृत्ये करून गावाबाहेर नदी, तळे इत्यादि ठिकाणी सायंसंध्या करण्यास जावे. सायंसंध्या प्रातःसंध्येप्रमाणे करावी. प्रातःसंध्येत व सायंसंध्येत थोडा फरक आहे. तो असा
"अग्निश्च मामनुश्च० यदन्हा पापमकार्षं०, अहस्तदवलुंपतु०, सत्येज्योतिषि जुहोमि स्वाहा"
असा मंत्राचमनांत विशेष आहे. पश्चिमाभिमुख राहून अर्घ्य द्यावेत. गुडघेवर होतील अशा रीतीने पश्चिमाभिमुख बसून गायत्रीचा जप करावा. सायंकालचा होम पूर्वी सांगितला आहे, तसाच करावा. सायंकाली वैश्वदेव करणे असल्यास पुनः स्वयंपाक करावा. अतिथीची पूजा करून तीन घटिका रात्रीनंतर व दीडप्रहर रात्रीच्या पूर्वी भोजन करून निद्रा करावी.