दुसर्या भागांतून अन्न घेऊन शुद्ध भूमीचे ठिकाणीं "सूर्याय स्वाहा सूर्यायेदं नमम०" याप्रमाणें दहा आहुति पूर्वेकडे एकीच्या पुढें दुसरी अशा घालाव्या. मध्यें जागा सोडून पुनः पूर्वेकडे "अद्भयः स्वाहा ओषधिवनस्पतिभ्यः० गृहाय० गृहदेवताभ्यः० वास्तुदेव०" अशा आहुति घालाव्या."अद्भयः०" या आहुतीच्या पश्चिमेस ’इन्द्राय स्वाहा’ व हिच्या उत्तरेस इन्द्रपुरुषेभ्यः स्वाहा’ अशा आहुति द्याव्या. मध्यंतरीं सोडलेल्या जागेच्या दक्षिणेस ’यमाय०’ व हित्या उत्तरेस ’यमपुरुषेभ्यः०’ अशा आहुति द्याव्या. ’ब्रह्मणेस्वाहा’ या आहुतीच्या पूर्वेस ’वरुणाय०’ व हिच्या उत्तरेस ’वरुणपुरुषेभ्यः०’ याप्रमाणें आहुति द्याव्या. मध्यभागीं सोडलल्या जागेच्या उत्तरेस ’सोमाय०’ व हिच्या उत्तरेस ’सोमपुरुषेभ्यः०’ याप्रमाणें आहुति द्याव्या. मध्यभागीं सोडलेल्या जागेंत "ब्रह्मणे० ब्रह्मपुरुषेभ्यः० विश्वेभ्योदेवेभ्यः० सर्वेभ्योभूतेभ्यः० दिवाचारिभ्यः०" अशा आहुति देऊन ’सोमपुरुषेभ्यः०’ या आहुतीच्या उत्तरेस ’रक्षोभ्यः०’ अशी आहुति द्यावी. याप्रमाणेंच सायंकालीन वैश्वदेव करावा. मात्र प्रथम सूर्याचे ठिकाणीं अग्नीला आहुति देऊन ’प्रजापतये०’ वगैरे पूर्वीप्रमाणेंच देऊन सायंकालचें बलिहरण करावें. ’दिवाचारिभ्यः०’ या ठिकाणीं ’नक्तंचारिभ्यः०’ अशी आहुति द्यावी. हा विशेष जाणावा. याप्रमाणें भूतयज्ञ सांगितला.
नंतर प्राचीनावीती करुन अन्नाच्या तिसर्या भागांतून अन्न घेऊन यमाचे आहुतीचे दक्षिणभागीं "स्वधा पितृभ्यः पितृभ्य इदं नमम" अशी आहुति द्यावी. दुसर्या दक्षिणभागीं दुसरा पितृयज्ञच करावा.
दुसरे गंथकार वर्तुलाकार बलिदान करावें असें सांगतात. बलिहरण काढून टाकल्यावांचून भोजन करुं नये व तें बलिहरण स्वतः काढूं नये. नंतर घराच्या अंगणांत भूमीचें उदक शिंपडून "ऐन्द्रवारुणवायव्यां याम्यां नैऋतिकाश्च ये । ते काकाः प्रतिगृह्णन्तु भूम्यां पिण्डं मयोज्झितम् ॥" अशी आहुति पितृयज्ञशेष असेल त्याची देऊन "वैवस्वतकुले जातौ द्वौ श्यामशबलौ शुनौ । ताभ्यां पिण्डो मया दत्तो रक्षेतां पथिमां सदा ॥ ये भूताः प्रचरन्ति०" हे दोन मंत्र म्हणून भूतयज्ञशेष असेल त्याची आहुति द्यावी. दोन्ही वेळेचा प्रयोग एकतंत्रानें करावयाचा असेल तेव्हां " ये भूताः०" या मंत्रामध्यें ’दिवानक्तं बलिमिच्छन्तः’ असा पाठ ह्मणावा. दिवसाचा व रात्रीचा वैश्वदेव प्रयोग पृथक् करावयाचा असेल तेव्हां ’दिवा बलिमिच्छन्तः’ ’नक्तं बलिमिच्छन्तः’ असे वेगळे पाठ ह्मणावे. नंतर हस्त व पाद प्रक्षालन करुन आचमन केल्यावर घरांत प्रवेश करावा. ’शान्ता पृथिवी’ इत्यादि मंत्रांचा जप करुन विष्णूचें स्मरण करावें व त्याला कर्म अर्पण करावें.