भोजन करीत असता दिवा विझला तर भोजनपात्र हातात घेऊन सूर्याचे स्मरण करावे व पुनः दिवा लागला म्हणजे तो पाहून पानावरील अन्न भक्षावे; दुसरे अन्न भक्षू नये. श्राद्धदिन व श्राद्धदिनाच्या पूर्वीचा दिवस, व्यतीपात, वैधृति, व संक्रांत इत्यादि दिवशी रात्री भोजन करू नये. रात्रीचा चवथा व पहिला प्रहर विद्याभ्यासात घालवावा. मधल्या दोन प्रहरपर्यंत निद्रा करणारा ब्रह्मत्वाला योग्य होतो. पूर्व, पश्चिम किंवा दक्षिण यापैकी कोणत्याहि दिशेस उसे करून निजावे; उत्तरेस उसे करून कधीही निजू नये. रात्रिसूक्ताचा जप केल्यावर सुखशायीचे स्मरण करावे व विष्णूला नमस्कार करून निद्रा करावी. "अगस्ति, माधव, मुचुकुंद, महामुनि कपिल, अस्तिक हे पाच मुनि सुखशायी होत." निजतेवेळी यांचे स्मरण केल्यास निद्रा सुखकारक होते.