दिवसाच्या दुसर्या भागामध्ये वेद व शास्त्रे यांचा अभ्यास करावा. ब्राह्मणाने वेदांचे पठन व अध्यापन करावे, जप करावा, मनन करावे, धर्मशास्त्र व इतर शास्त्रे यांचे अवलोकन करावे. त्याचप्रमाणे देवार्चन करावे. ते प्रातर्होमानंतर अथवा चवथ्या भागी ब्रह्मयज्ञानंतर करावे. प्रातर्होमानंतर देवतेची पूजा करावी अथवा ब्रह्मयज्ञानंतर करावी इत्यादि विविध स्मृतिवचने आहेत. "त्रिकाल यथाक्रम देवार्चन करीत जावे. त्रिकाल करण्यास असमर्थ असेल त्याने प्रातःकाली अथवा मध्यान्हकाली गंध इत्यादि उपचारांनी विस्ताराने पूजा करावी. सायंकाली आरती करावी. त्रिकाल तुलसीदल वहावे. त्रिकाल संध्येप्रमाणेच त्रिकाल पूजा मोक्ष देणारी आहे. असे स्मृतिवचन आहे." असे कमलाकराने सांगितले आहे. ही पूजा विष्णु, शिव, ब्रह्मा, सूर्य, देवी, गणपती इत्यादिकांपैकी अभिमत देवतेची करावी. त्यामध्ये कलियुगात विष्णु व शिव यांची पूजा प्रशस्त आहे. "विष्णूच्या आराधनेपेक्षा जास्त पुण्यकारक असे वैदिक कर्म नाही. याकरिता आदि, मध्य व अंत यांनी रहित अशा हरीचे नित्य आराधन करावे. अथवा भगवान सनातन महादेवाची आराधना प्रणवमंत्राने अथवा रुद्रगायत्रीने अथवा त्र्यंबकमंत्राने अथवा "ॐ नमः शिवाय" या मंत्राने करावी. यामध्ये प्रतिमा, स्थंडिल इत्यादिकांपेक्षा शालिग्राम व बाणलिंग यांची पूजा करणे प्रशस्त आहे. कारण यांचे ठिकाणी आवाहन इत्यादिक केल्यावाचून देवतेचे सान्निध्य नित्य आहे. श्रीमद्भागवतामध्ये सांगितले आहे, "हे उद्धवा, स्थिर प्रतिमेची पूजा करताना आवाहन व विसर्जन ही करावी. अस्थिर प्रतिमेचे ठिकाणी यांचा विकल्प आहे. स्थंडिलाचे ठिकाणी मात्र ही दोन्ही केली पाहिजेत."