"द्रव्यरहित अर्चा कर्त्याचा नाश करिते, मंत्रहीन अर्चा ऋत्विजाचा नाश करिते, लक्षणहीन अर्चा स्त्रियेचा नाश करिते, यावरून अर्चेसारखा दुसरा शत्रु नाही. गायत्रीसहित ब्रह्मवेदाची स्थापना ब्राह्मणांनी करावी. सुखाची इच्छा करणार्या सर्व वर्णांनी विष्णूची स्थापना करावी." "मातृका, भैरव इत्यादि देवतांची स्थापना सर्वांनी करावी. शिवलिंगाची स्थापना संन्याशानेही करावी. पुराणप्रसिद्ध अशा प्राचीन लिंगाची पूजा स्त्रिया व शूद्र यांनीही करावी. नवीन स्थापिलेल्या लिंगास स्त्रिया अथवा शूद्र यांनी स्पर्श करू नये." शिव इत्यादि देवतांची स्थापना करण्याचा अधिकार स्त्रिया अथवा शूद्र यांस नाही. "शूद्र अथवा मौजी न झालेला, स्त्रिया अथवा पतित यापैकी कोणीही विष्णु किंवा शिव यांस स्पर्श करील तर त्याला नरकवास भोगावा लागेल. पूर्वाभिमुख स्थिर मूर्तीची पूजा उत्तराभिमुख होऊन करावी. चल मूर्तीची पूजा पूर्वाभिमुख होऊन करावी. सोने, रुपे, तांबे अथवा मृत्तिका यांची मूर्ति करावी. अथवा पाषाण, धातु, मौक्तिक, कांसे व पितळ यापैकी कोणत्याही धातूची मूर्ति करावी. घरामध्ये पूजेसाठी मूर्ति करावयाची ती अंगुष्ठापासून एक वीत उंचीची करावी. एक वितीपेक्शा अधिक उंचीची मूर्ति करणे प्रशस्त नाही असे ज्ञाते सांगतात. मृत्तिका, काष्ठ, लाख, गोमेद मणि अथवा मेण यांची मूर्ति करावी असे कित्येक ग्रंथात सांगितले आहे. पाषाणमयी, दारुमयी, लौही, लेप्या (मृन्मयी) लेख्या (रंगाने काढलेली), वालुकामयी, मनोमयी व मणिमयी अशा आठ प्रकारच्या मुर्ति कराव्यात असे श्रीमद्भागवतात सांगितले आहे. लौही म्हणजे सौवर्णमयी. दारू (काष्ठ) घेणे ते मधुक (मोह) वृक्षाचेच घ्यावे. घरात पूजेला मूर्ति करणे ती सात अंगुळाहून अधिक-बारा अंगुळांइतक्या उंचीची करावी असे देवीपुराणात सांगितले आहे. "पूजा करणाराचे तप, पूजेचा भक्तिविशेष व मूर्तीचे सौंदर्य या तीन कारणांनी देवतेचे पूजाकाली सान्निध्य असते. मूर्ति, पट्ट व यंत्रे यांस नित्य स्नान घालू नये. पर्वणीच्या दिवशी किंवा मूर्ति मलिन झाल्या असता स्नान घालावे. पार्थिव लिंगाची पूजा इत्यादिकांचा विचार दुसर्या परिच्छेदात केला आहे.