पंचसूना दूर होण्याकरितां गृहस्थानें वैश्वदेव करावा. कांडण, पेशण (दळणें वगैरे), चूल, जलकुंभ आणि मार्जनी (केरसुणी वगैरे) अशीं हीं पांच हिंसा होण्याचीं स्थानें आहेत यांना पंचसूना म्हणतात. वैश्वदेवाला प्रातःकालींच प्रारंभ करावा. अग्निहोत्रादिकांप्रमाणें सायंकालीं करुं नये. अर्थात् "प्रातःसायंवैश्वदेव०" इत्यादि संकल्प करावा. पंचमहायज्ञ दररोज करावे. ते हे :- ब्रह्मयज्ञ, देवयज्ञ, भूतयज्ञ, पितृयज्ञ आणि मनुष्ययज्ञ यांपैकीं ब्रह्मयज्ञ सांगितला. ऋग्वेदीयांचा वैश्वदेव देवयज्ञ, भूतयज्ञ व पितृयज्ञ हे तीन मिळून होतो. मनुष्ययज्ञ म्हणजे मनुष्यांना अन्न देणें, गृहांत पक्व केलेलीं हविष्यान्नें तैलक्षार इत्यादिकांनीं विरहित अशीं घृतानें मिश्रित करुन घेऊन गृह्याग्नीवर अथवा लौकिकाग्नीवर हवन करावें. ज्या अग्नीवर पाक केला असेल त्या अग्नीवर होम करावा. वैश्वदेवान्तर्गत जो पितृयज्ञ त्यानें नित्य श्राद्धाची सिद्धि होते. याकरितां नित्यश्राद्धाकरितां ब्राह्मणभोजन नको या पितृयज्ञानें दर्शश्राद्धाची देखील सिद्धि होते म्हणून दर्शश्राद्ध देखील असमर्थ असतील त्यांनीं वर्षांतून एकदांच करावें, असें भट्टोजीदीक्षितांच्या ग्रंथांमध्यें सांगितलें आहे. सूतकामध्यें पंचमहायज्ञाचा लोप करावा, असें सांगितलें आहे. हा वैश्वदेव आत्मसंस्काराकरितां व अन्नसंस्काराकरितां आहे. करितां विभक्त नसलेल्या बंधूंचा पाक एक असेल तर निराळा वैश्वदेव नको. विभक्त असल्यास एक पाक असेल तथापि दुसर्या हविष्यान्नानें निराळा वैश्वदेव नको. विभक्त असल्यास एक पाक असेल तथापि दुसर्या हविष्यान्नानें निराळा वैश्वदेव करावा. विभक्त नसून भिन्न पाक असेल तर निराळा वैश्वदेव करणें कृताकृत आहे, असें भट्टोजीदीक्षित म्हणतात. एकादशी इत्यादि दिवशीं पाकाचा असंभव असेल तर तांदळांनीं अथवा दूध, दहीं, घृत, फळ अथवा उदक यांनीं वैश्वदेव करावा. अन्न इत्यादिकांचा वैश्वदेव हस्तानें करावा, उदकानें अंजलीनें करावा. कोद्रु, चणे, उडीद, मसुरा, कुळीथ, क्षार, लवण हीं सर्व वैश्वदेवाला वर्ज करावीं. प्रवासामध्यें असेल त्यानें गृहामध्यें पुत्र, ऋत्विक् इत्यादिकांकडून वैश्वदेव करवावा. गृहामध्यें दुसरा करणारा नसेल तर प्रवासामध्यें स्वतः करावा. ऋग्वेदी व तैत्तिरीय यांनीं दिवसास व रात्रीं असा दोन वेळां वैश्वदेव करावा. दोन वेळां करण्यास असमर्थ असतील त्यांनीं एकदांच द्विरावृत्तीनें अथवा एकतंत्रानें करावा. ऋग्वेदी व तैत्तिरीय यांचा पाक व वैश्वदेव लौकिकाग्रीवरच करण्याचा प्रायः आचार आहे.