भात, श्यामाक (सांवे) यव यांचे तांदूळ घ्यावे. अथवा दूध, दही, घृत यव, भात, गहू, प्रियंगू (राळे) ही द्रव्ये स्वरूपानेही (तांदूळ केल्यावाचून) होमाला घ्यावी. तिल तर स्वरूपानेच घ्यावे. तांदूळ इत्यादि प्रत्येक आहुतीला शंभर शंभर घेऊन हाताने आहुति द्याव्या. दही इत्यादि पातळ द्रव्य स्रुवापात्राने हवन करावे. जेथे दोन आहुति सांगितल्या असतील तेथे पहिल्या आहुतीहुन दुसरी मोठी घ्यावी असे सर्वत्र जाणावे.
समिधा - रुई, पळस, खैर, आघाडा, पिंपळ, उंबर, शमी, दूर्वा, दर्भ यांच्या समिधा दहा अथवा बारा अंगुळे लांबीच्या सालीसकत घ्याव्या. वट, प्लक्ष, बेल यांच्याही घ्याव्या, असे हेमाद्रीमध्ये सांगितले आहे. होमाच्या दोन आहुतींचा संसर्ग होईल तर
"यत्रवेत्थ०"
या मंत्राने अग्नीच्या उद्देशाने समिधांचा होम करावा. नित्य होम टळेल तर आज्यसंस्कार करून ते आज्य चार वेळ घेऊन
"मनोज्योतिर्जुषतां०"
या मंत्राने हवन करावे. बारा दिवसपर्यंत होमाचा लोप होईल तर हेच प्रायश्चित्त जाणावे. बारा दिवसांपेक्षा जास्त दिवस होमलोप झाल्यास अग्नि नष्ट होतो. याप्रमाणे होमलोपाकरिता प्रायश्चित्त करून अतिक्रांत होमाकरिता द्रव्याचा संस्कार करून सायंकाळी व प्रातःकाळी क्रमाने दोन दोन आहुति अतिक्रांत दिवसाची संख्या मोजून तितके दिवस हवन कराव्या. अग्नि, सूर्य, प्रजापति यांचे उपस्थान करावे, अथवा हा होम करू नये. कारण प्रायश्चित्त केल्यानेही होमाचे फळ मिळते. सूतक इत्यादिकांमुळे होमाचा लोप होईल तेव्हाही असाच निर्णय जाणावा. हिरण्यकेशी यांचाही असाच निर्णय जाणावा. आपस्तंब इत्यादिकांच्या अग्नीचा तीन दिवसांनंतर नाश होतो. याकरिता त्यांनी सूतकामध्येही स्वतः होम करावा. अग्नीचा समारोप केल्यानंतर सुतक प्राप्त होईल तर प्रत्यवरोहाचा असंभव असल्यामुळे तीन दिवस होमलोप झाल्यावर पुनराधान करावे.