आपत्तिकाल येणारा असताना प्रतिपदेपासून चतुर्दशीपर्यंत चवदा दिवसांचे सायंप्रातर्होम अपकर्षाने करणे याचे नाव पक्षहोम. प्रतिपदेचे दिवशी
'अद्य सायमारभ्य चतुर्दशीसायमवधिकान पक्षहोमान तन्त्रेण करिष्ये"
असा संकल्प करून वृद्धि अथवा क्षय असेल त्याला अनुसरून चवदा अथवा पंधरा अथवा तेरा वेळा तांदूळ घेऊन होमकाली
'अग्नये स्वाहा'
या मंत्राने पूर्वी घेतलेल्या पात्रातील तांदूळ एककालीच हवन करावे. नंतर दुसर्या पात्रातील तांदुळाचे त्याप्रमाणेच
"प्रजापतये स्वाहा" म्हणून हवन करावे. याप्रमाणे द्वितीयेच्या दिवशी
"प्रातरद्यावधि पर्वप्रातरवधिकान पक्षहोम तन्त्रेण करिष्ये"
इत्यादि सायंहोमाप्रमाणे कर्म करावे. विशेश असा की, पहिल्या पात्रातील तांदूळ
"सूर्यायस्वाहा"
या मंत्राने हवन करावे व दुसर्या पात्रातील
"प्रजापतये स्वाहा"
या मंत्राचे हवन करावे; आणि दोन्ही दिवशी समिध एकेक वेळच द्यावी व उपस्थानही एकेक वेळच करावे. पक्षाचे मध्ये आपत्ति प्राप्त होईल तर त्या दिवसाच्या सायंकालापासून चतुर्दशीच्या सायंकालापर्यंत सर्व शेषहोम सायंपक्षहोमाप्रमाणे करून पर्वाच्या प्रातःकालीन होमापर्यंत होम प्रातःकाली करावा. पर्वाचा सायंहोम व प्रतिपदेचा प्रातर्होम हे सर्वथा भिन्नच होत हे अपकर्षाने केलेले पक्षहोम व शेषहोम पक्षामध्ये आपत्ति दूर होईल तर पुनः करावे. एकसारखे तीन पक्षहोम झाल्यास अग्निनाश होतो; याकरिता तिसरा पक्षहोम करण्याचा प्रसंग आल्यास प्रतिदिवशी होम करावा. सर्वथा आपत्तीची निवृत्ति होत नसेल तर यावज्जीव पक्षहोम करावे.