दिवसाच्या तिसर्या भागामध्यें पोष्यवर्गाकरितां द्रव्यार्जन करावें. पोष्यवर्ग म्हणजे माता, पिता, गुरु, वृद्ध, भार्या पुत्रादि, अनाथ, आश्रित, पूर्वी न आलेला पाहुणा, एक रात्र रहाणारा पाहुणा आणि गृह्याग्नि हे होत. वेदशास्त्रांचें अध्ययन, दान देणें व ह्यामध्यें ऋत्विक् कर्म करणें वेदादिकांचें अध्यापन करविणें आणि दान घेणें (पतिग्रह) हीं सहा ब्राह्मणाचीं कर्मे आहेत. या सहा कर्मांपैकीं यज्ञामध्यें ऋत्विक् कर्म करणें, वेद्शास्त्रांचें अध्यापन करविणें आणि शुद्धकर्मी यजमानापासून प्रतिग्रह घेणें या तीन कर्मांनीं ब्राह्मणानें उपजीविका करावी. श्रीभागवतामध्यें सांगितलें आहे----"तप, तेज व यश यांचा नाश प्रतिग्रह करतो असें मानणारानें इतर दोन कर्मांनीं उपजीविका करावी. इतर दोन कर्मांनीं उपजीविका करण्यामध्येंही दोष आहे, असें समजणारानें शेतांत राहिलेले दाणे वेंचून आणून त्यावर उपजीविका करावी." त्याचप्रमाणें वार्ताविचित्रा, शालीन, यायावर आणि शिलोंछन यांनींही उपजीविका करावी. वार्ताविचित्रा म्हणजे कृषिकम वगैरे; शालीन म्हणजे याचना केल्यावांचून कोणी कांहीं दिल्यास ग्रहण करणें; यायावर म्हणजे दररोज धान्याची याचना करणें; आणि शिलोंछन म्हणजे शेतांतून कणसें अथवा धान्याचे दाणे वेंचणें. यापैकीं शिलोंछन हें कलियुगामध्यें निषिद्ध आहे. ब्राह्मणानें कुसूलधान्य, कुंभीधान्य, त्र्याहिक अथवा श्वस्तन असें असावें. कुटुंबपोषणासाठीं बारा दिवसपर्यंत पुरेल इतकें धान्य ज्याच्याजवळ आहे तो कुसूलधान्य; सहा दिवसपर्यंत पुरेल इतकें आहे तों कुंभीधान्य; तीन दिवसपर्यंत पुरेल इतकें आहे तो त्र्याहिक आणि दुसर्या दिवसापुरतेंच आहे तो श्वस्तन. "कृषिकर्म, वाणिज्य आणि सेवावृत्ति हीं ब्राह्मणानें करुं नयेत. हीं केल्यानें ब्राह्मण्यापासून भ्रष्टता येते, करितां हीं वर्ज करावीं." असें वचन आहे. याकरितां कृषिकर्मवृत्ति ही आपत्कालविषयकच जाणावी. "राजापासून प्रतिग्रह घेण्यापेक्षां पुत्राचे मांस भक्षण करणें बरें" हें वचन अधर्मानें चालणारा राजा असेल त्यासंबंधानें होय. वृद्ध अशीं माता व पिता, साध्वी भार्या व लहान बालक यांचें पोषण, याग करण्यास अयोग्य अशा यजमानाचे घरीं याग करणें, शूद्रापासून प्रतिग्रह घेणें इत्यादि करुनही करावें. हें देखिळ अपत्कालाविषयींच जाणावें. शाक, दूध, दहीं, पुष्प, उदक, दर्भ व जमीन हीं याचनेवांचून मिळतील तर कुलटा, षण्ढ व पतित यांखेरीज इतर नीच माणसापासून देखील घ्यावीं. "ब्रह्मचारी, संन्यासी, विद्यार्थी, गुरुचें पोषण करणारा, प्रवासी आणि उपजीविकेचें साधन गेलेला हे सहा पक्व अन्नाचे भिक्षुक होत. द्विजांची (म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य यांची) सेवा करणें ही शूद्राची वृत्ति होय. अपत्काल असेल तर कृषिकर्म वगैरे करावें.