दररोज करावयाचे आवश्यक आह्निक कर्म सांगितल्यावर याचेच शेष राहिलेले काम्य व नैतिक कर्म बहुधा निर्णयसिंधूच्या क्रमाने सांगतो.
आधान कोणत्या नक्षत्री व कोणत्या काली करावे इत्यादि निर्णय पहिल्या परिच्छेदात सांगितला आहे. गृह्याग्नीचे आधान करणे असेल तर विवाहकाली अथवा पिता इत्यादिकांपासून प्राप्त होणार्या धनाच्या विभागकाली करावे. "प्रमाद (असावधपणा) इत्यादि कारणांनी ज्याने विवाहाग्नि (गृह्याग्नि) धारण केला नाही त्याने पिता मेल्यानंतर कितीही संकटे प्राप्त झाली तरी ती सहन करून मोठ्या प्रयत्नाने गृह्याग्नि धारण करावा." गृह्याग्निशून्य पुरुषाचे अन्न कोणी भक्षू नये. पिता किंवा वडील भाऊ जर साग्निक असेल व धाकटा भाऊ विभक्त नसेल तर त्या धाकट्या भावास अग्नि धारण न केल्याचा दोष नाही. याप्रमाणे ज्ञान अध्ययन इत्यादिकांविषयी नैष्टिक असलेल्या गृहस्थासही अग्नि धारण न केल्याचा दोष नाही. कारण गृहस्थानेही वेदाध्ययन करावे असे वचन आहे. वडील भावाने जर आधान केले नसेल तर धाकट्या भावानेही स्मार्ताग्नीचे आधान करू नये असे निर्णयसिंधु इत्यादि ग्रंथात गर्गऋषीचे वचन आहे. याविषयी मला असा निर्णय वाटतो. जेव्हा वडील भावाने दायाचा पहिला पक्ष स्वीकारून विवाहकाली "यावज्जीवमौपासनं करिष्ये" असा संकल्प करून विवाहाग्नि घेतला नसेल्तर त्या संबंधी हा धाकट्या भावाला आधानाचा निषेध सांगितला आहे. ज्या वडील भावाने विवाहकाली असा संकल्प करून विवाहाग्नि घेतला पण पुढे अग्निधारण न केल्यामुळे जो अविद्यमानाग्निक (अग्नि जवळ नसलेला) झाला, तो उच्छिन्नाग्निच (अग्नि नष्ट झालेला) होतो; ज्याने अग्नीचे आधान केले नाही असा होत नाही. म्हणून अशा ठिकाणी धाकट्या भावाने आधान केले असता दोष नाही. या आधानाला जरि कनिष्ठ भाऊ अधिकारी असला तरी त्याने वडील भावाची आज्ञा घेऊन आधान करावे. पण वडील भावाची आज्ञा असली तरी धाकट्या भावाचा विवाह होणार नाही. याप्रमाणे पित्याची आज्ञा घेऊनही पुत्राने आधान करावे. "पिता किंवा वडील भाऊ संन्यासी, हात तुटलेला किंवा नपुंसकत्व इत्यादि दोषयुक्त असेल तर सर्व कर्मे कनिष्ठानेच करावीत;" इत्यादि विशेष निर्णय विवाहप्रकरणी परिवेत्त्याच्या प्रसंगात सांगितला आहे.