दिवसाच्या चवथ्या भागीं मध्याह्नस्नान करावें. प्रातःकालीं गोमयस्नान करावें. मध्यान्हीं मृत्तिकास्नान करावें. या स्नानाचा विधि प्रायश्चित्तप्रकरणीं सांगितला आहे. इतर विधि प्रातःस्नानाप्रमाणें जाणावा. ब्रह्मयज्ञाचें अंगभूत तर्पण करण्याच्या पूर्वी वस्त्र पिळूं नये हा विशेष जाणावा. नंतर पुंड्र धारण करुन मध्यान्हसंध्या करावी. दीड प्रहर दिवस आल्यापासून सायंकालपर्यंत मध्यान्हसंध्या करणें इष्ट आहे. त्यांचा विशेष "सूर्यश्च०" या ठिकाणीं "आपःपुनन्तु०" हा मंत्र म्हणून मंत्राचमन करावें.
"आपः पुनन्त्वित्यस्य नारायण याज्ञवल्क्य आपःपृथिवी ब्रह्मणस्पतिरष्टी मन्त्राचमने विनियोगः ॐआपः पुनन्तु पृथिवी पृथिवी पूता पुनातु माम् । पुनन्तु ब्रह्मणस्पतिर्ब्रह्मपूता पुनातु माम् ॥ यदुच्छिष्टमभोज्यं यद्वादुश्चरितं मम । सर्वं पुनन्तु मामापो सतांच प्रतिग्रह ॐ स्वाहा ॥"
असें म्हणून उदक प्राशन करावें. अधमर्षण झाल्यानंतर उभें राहून हंसः
" शुचिषदित्यस्य गौतमः सूर्यो जगती सूर्यार्घ्यदाने विनियोगः ॐ हंसःशुचिषः०"
हा मंत्र म्हणून एक अर्घ्य द्यावें. अर्घ्य दिल्यानंतर उपस्थान करावें. हात वर करुन
"उदुत्यमिति त्रयोदशर्चस्य प्रस्कण्वः सूर्योगायत्री अन्त्याश्चतस्त्रोऽनुष्टुभः सूर्योपस्थाने०"
असें उपस्थान करावें. "चित्रं देवानां०" या सहा ऋचांनीं देखील कोणी उपस्थान करतात. उपस्थानाखेरीज इतर सर्व कर्म प्रातः संध्येप्रमाणेंच करावें. रात्रीं मध्यान्हसंध्या कर्तव्य असेल तर "आकृष्णेन," या मंत्रानें अर्घ्य देऊन प्रायश्चित्त म्हणून गायत्रीमंत्रानें दुसरें अर्घ्य द्यावें आणि "हविष्पान्त०" या पांच ऋचांनीं उपस्थान करावें.