कुत्रा, डुकर, रासभ, कावळा, कोहा, माकड, शूद्र, अत्यंज, बाटलेला, प्रेत, बाळंतीण, रजस्वला, विष्ठा, मूत्र, रेत, अश्रु, पू, श्लेष्मा, रक्त, अस्थि, मांस, इत्यादिकांचा अथवा इतर निंदित पदार्थांचा ज्या अरणीवर अग्निसमारोप केला असेल त्या अरणीला अथवा अग्नीला स्पर्श झाला असता अग्नीचा नाश होतो. अरणीवरील अग्नि नष्ट झाला असता पुनराधेय करावे. साक्षात अग्नीचा स्पर्श झाल्याने अग्निनाश होईल तर पुनराधान करावे. अथवा
"पुनस्त्वादित्यारुद्रावसवः समिन्धतांपुनर्ब्रह्माणोवसुनीथयज्ञैः । घृतेनत्वंतन्वंवर्धयस्वसत्याःसन्तुयजमानस्यकामाःस्वाहा । आदित्यरुद्रवसुब्रह्मभ्य इदंनमम"
या मंत्राने समिधाहोम करावा, अथवा स्रुवापात्राने आज्याहुति द्यावी. अग्नीमध्ये उदक पडेल तरी हेच प्रायश्चित्त जाणावे. स्वतः जिवंत असता स्वतःची मृत्युवार्ता ऐकल्यास सुरभिमान अग्नीच्या उद्देशाने चरु अथवा पूर्णाहुति द्यावी. प्रधानाहुतीचा स्विष्टकृताशी संसर्ग झाला तर सर्व प्रायश्चित्ताहुती द्यावी. पिंडपितृयज्ञामध्ये अतिप्रणीत नामक अग्नीचा नाश झाला असता त्या ठिकाणी होमपक्ष नसेल तर सर्वप्रायश्चित्ताहुति द्यावी. होमपक्ष असेल तर पुन्हा अग्नि नेऊन (प्रणयन) सर्वप्रायश्चित्ताहुती द्यावी. आपस्तंबाना प्रायश्चित्ताहुतीनंतर प्रणयनच नित्य आहे. पिंडपितृयज्ञाचा लोप झाला असता वैश्वानरचरु करावा. अथवा
"सप्तहोत्राख्यमहाहविर्होता"
इत्यादि मंत्रांनी पूर्णाहुति करावी. श्रवणाकर्म, सर्पबलि, आश्वयुजीकर्म, आग्रयण, प्रत्यवरोहण, यापैकी कोणत्याही एका कर्माचा लोप होईल तर प्राजापत्यकृच्छ्र प्रायश्चित्त करावे. आग्रयण करण्याच्या पूर्वी नवान्न भक्षण केले असता वैश्वानर नामक अग्नीला चरु द्यावा. अष्टकाश्राद्धाचा लोप झाला असता उपवास करावा. पूर्वेद्युःश्राद्धाचा लोप झाला असताही उपवास करावा. अथवा उपवासाचा प्रतिनिधि म्हणून एका ब्राह्मणाला भोजन द्यावे. अन्वष्टक्य श्राद्धाचा लोप झाला तर
"एभिर्द्युभिः सुमना एभिरिन्दुभि०"
या ऋचेचा शंभर वेळा जप करावा. सर्वत्र चरु द्यावा असे सांगितले असेल तेथे दर्शपूर्ण मासाला आरंभ केला नसेल तर पूर्णाहुति द्यावी. आवस, इत्यादिकांमुळे पूर्णाहुति करणे असेल तर यागाला पुरे इतके तांदूळ व आज्य यांचे दान करावे, असे गृह्याग्निसागरामध्ये सांगितले आहे. निषिद्ध तिथि इत्यादिकांचे ठिकाणी स्वभार्येशी गमन, याग करण्यास अयोग्य त्याच्या घरी याग करणे, लसूण अथवा गणिकेच्या घरचे अन्न या भोजनास अयोग्य पदार्थांचे भोजन, निषिद्ध दानाचा स्वीकार (प्रतिग्रह) इत्यादि घडली असता,
"पुनर्मामैत्विंद्रिय०, इमे ये धिष्ण्यासः०"
या दोन ऋचांनी आज्यहोम करावा अथवा समिधाहोम करावा अथवा जप करावा. गृहाचे वर कपोत बसेल तर
"देवाः कपोत०"
इत्यादि पांच ऋचांचे सूक्ताचा जप करावा. अथवा पाकयज्ञतन्त्राने या प्रत्येक ऋचेला आज्यहोम करावा. दुष्ट स्वप्न पडले असता
"यो मे राजन्युज्यो वा०"
या ऋचेने सूर्याचे उपस्थान करावे. रोगाचा नाश होण्याकरिता
"मुञ्चामि त्वा०"
या सूक्ताने प्रत्येक ऋचेला चरूचा होम करावा.
"यक्ष्मनाशायेदं न मम"
याप्रमाणे पाचही ऋचांचे ठिकाणी त्याग करावा. सहावी स्विष्टकृत आहुति द्यावी. प्रोक्षणी व प्रणीता या पात्रातील उदकांचा बिंदु अथवा उदक खाली पडेल तर
"आपो हि ष्ठा०"
या तीन ऋचांनी पुन्हा उदक भरावे आणि
"ततं मे अपस्तदुताय ते०"
या ऋचेने आज्याची आहुति द्यावी. इध्माधानाचा लोप झाला असेल व आज्यभाग झाल्यानंतर त्याचे स्मरण होईल तर विपर्यास झाल्याबद्दल प्रायश्चित्त करून इध्माधान करावे व नंतर प्रधानयाग करावा. प्रधानयाग केल्यानंतर स्मरण होईल तर अग्निसमिन्धनरूप द्वाराचा अभाव असल्यामुळे तो लोपच होतो व त्याची प्रायश्चित्तानेच सिद्धि होते. इतर अंगांविषयीही याप्रमाणेच निर्णय जाणावा.