संध्याकाळी, धान्यावर, गाईच्या गोठ्यात, देव, ब्राह्मण व गुरु यांच्या उपरिप्रदेशी उच्छिष्टावस्थेत दिवसास नग्नावस्थेत निद्रा करू नये. निद्रेच्या काली मुखातील तांबूल, पलंगावरील स्त्री, मस्तकावरील गंधाचा तिलक व रतिकाली मस्तकावर धारण केलेली पुष्पे ही टाकून द्यावीत. गर्भाधान प्रकरणी सांगितलेल्या काली दीड प्रहर रात्रीनंतर दिवा असो अथवा नसो, यज्ञोपवीत गळ्याभोवते लोंबते करून स्त्रीप्रत गमन करावे. अष्टमी अथवा चतुर्दशी, दिवसा किंवा पर्वणी असता मैथुन केल्यास सचैल स्नान करून वारुणी ऋचांनी मार्जन करावे; व "पुनर्मामैत्वि०' या मंत्राचा जप करावा. तो पूर्वीच सांगितला आहे.