आपसनाग्नि नष्ट झाला असता
"गृह्याग्नेरनुगमन प्रायश्चित्तं करिष्ये"
असा संकल्प करून कुंडातील भस्म काढून सारवल्यानंतर अग्नीची प्रतिष्ठापना करून आज्यसंस्कार करावा. "अयाश्च" या मंत्राने एक आज्याहुति व सर्व प्रायश्चित्त होम करून दंपतीपैकी एकाने दुसर्या होमकालापर्यंत उपवास करावा. बारा रात्रीपर्यंत अग्नि नष्ट होईल तर हा निर्णय जाणावा. उपवास अथवा "अयाश्च०" या मंत्राने होम या दोहोपैकी एक करावे. दोन्ही करू नयेत असे कोणी ग्रंथकार म्हणतात. हे वृत्तिकाराचे मत आहे. कोणी ग्रंथकार, अग्निनाशानंतर दोन होमांच्या कालाचा अतिक्रम होईल तर नष्ट अग्नीचे संधान करावे, तीन दिवस अग्निनाश होईल तर शंभर प्राणायाम करावे, तेथून, वीस दिवसपर्यंत अग्निनाश होईल तर एक दिवस उपवास करावा, तेथून दोन महिनेपर्यंत तीन दिवस उपवास करावा, तेथून एक वर्षपर्यंत प्राजापत्य कृच्छ्र प्रायश्चित्त करावे. तेथून पुढे दर वर्षाबद्दल एकेक प्राजापत्यकृच्छ्र करावे. याप्रमाणे प्रायश्चित्त करून अग्नीच्या आधानाची सामुग्री तयार केल्यावर
"नष्टस्य गृह्याग्नेः प्रायश्चित्त करिष्ये"
असा संकल्प करून "अयाश्च०" या मंत्राने आज्याने स्रुवाहुति देणे, पत्नीने उपवास करणे, वगैरे पूर्वी सांगितल्याप्रमाणे करावी, अथवा लाजाहोमादिक करावे, याप्रमाणे बारा रात्रीपर्यंत अग्नीची उत्पत्ति करावी, असे म्हणतात. बारांहून अधिक दिवस असतील तर विच्छेदाचे प्रायश्चित्त व होमादि द्रव्याचे दान ही करून विवाह होमादिक विधीने आपापल्या गृह्यसूत्रानुसार पुनःसंधान करावे.