तुटलेली नखे, केस, कीटक, रक्त, अस्थि, विष्ठा, मूत्र, श्लेष्मा इत्यादि बीभत्स पदार्थ; मांजर, मुंगुस, कावळा, थुंकी, घाम, नाकातील अश्रु अथवा शेंबूड, कानातला मळ; बाळंतीण, रजस्वला, चांडाल, इत्यादिकांची दृष्टि यांचे संसर्ग हे सर्व दोष होत. देवता, हविर्द्रव्य आणि मंत्र यांचा विपर्यास झाल्यास
"यद्वो देवा०"
या मंत्राने मरुद्देवतांना आज्यहोम करावा. सर्व हर्विर्द्रव्य जळून जाइल तर ते हविर्द्रव्य पुन्हा उत्पन्न करून तोच याग करावा; पुन्हा दुसरा याग नाही. पूर्व इत्यादि चार दिशांचे ठिकाणी चरूचा उत्सेक होईल तर त्या दिशाचे ठिकाणी अनुक्रमे अग्नि, यम, वरुण व सोम यांना आहुति द्यावी; सर्व बाजूंना उत्सेक होईल तर या चारी देवतांना आहुति द्यावी, चार कोसांचे ठिकाणी उत्सेक होईल तर व्याह्रतिहोम करून
"आप्यायस्व०, संतेपयांसि०"
या दोन मंत्रांनी चरु आज्याने प्लुत करावा. हे करून अग्नीमध्ये दोन मिंदाहुति द्याव्या असे कोणी ग्रंथकार म्हणतात. आपल्या ग्रुह्याग्नीचा दुसर्याचे गृह्याग्नीशी संसर्ग होईल तर दोघा यजमानांनी एकदम अग्नीचा समारोप करून प्रत्यवरोहण करावे आणि विविचि नामक अग्नीच्या उद्देशाने चरु करावा. शवाग्नीशी संसर्ग होईल तर शुचिनामक अग्नीच्या उद्देशाने करावा. पाकाग्नीशी संसर्ग होईल तर संवर्ग नामक अग्नीच्या उद्देशाने चरु करावा. सर्वत्र संसर्ग होईल तर समारोप व प्रत्यवरोहण करून नंतर चरु करावा. आपोआप अग्नि प्रदीप्त होईल तर
"उद्दीप्य स्व जातवेदो० । मात्रे हिंसानोर्जातवेदो गामश्वं पुरुषं जगत । अबिभ्रदग्न आगहि श्रिया मा परिपातय ॥"
या दोन मंत्रांनी अग्नीला दोन समिधा हवन कराव्या. सर्वत्र विधीमध्येच दोष झाला असेल तर अनुष्ठानाची सांगता होण्याकरिता सर्वप्रायश्चित्ताहुती द्यावी. गृह दग्ध होईल तर क्षामवत नामक अग्नीच्या उद्देशाने चरु करावा. याप्रमाणे इतर दोषांची प्रायश्चित्ते ऋग्वेदाच्या ब्राह्मणांमध्ये सांगितली आहेत ती पहावी. ज्या ठिकाणी विशेष प्रायश्चित्त सांगितले नाही, त्या ठिकाणी सर्वप्रायश्चित्ताहुति द्यावी.
"भुर्भुवःस्वः०"
या मंत्राने आज्याहुति देणे याचे नाव सर्वप्रायश्चित्ताहुति.