इतर शाखांसंबंधाचें मत नीट पाहिल्यावांचून मीं आपल्या धाष्टर्यानें त्यांचें आह्निक सांगितले आहे; करितां त्यांनीं आपापलें आह्निक शोधून पहावें. ऊंस, उदक, फल, मूल तांबूल, दुध, औषध हीं भक्षण केलीं असतील तरी त्यानंतर स्नानदानादिक क्रिया कराव्या. पंचमहायज्ञांपैकीं एखाद्याचा लोप झाला असेल तर उपवास करावा. धनिक व आतुर यांनीं प्रत्येक यज्ञाबद्दल अर्धकृच्छ्र प्राशश्चित्त करावें. दुसरे ग्रंथकार, एक दिवस लोप झाल्यास ’मनस्वति०’ आहुति दोन अथवा तीन दिवस लोप झाल्यास तीन "तंतुमती०" आहुति यांनीं होम करावा व वरुणाच्या चार ऋचांचा जप करावा; बारा दिवस लोप होईल तर तंतुमतीस्थालीपाक व वरुण ऋचांनीं आज्यहोम करावा, असें सांगतात.