तैत्तिरीयशाखी यांनीं श्राद्धदिवशीं निराळा पाक करुन श्राद्धाच्या पूर्वीं वैश्वदेव व देवयज्ञादिक चार यज्ञ करावेत. दुसरे गंथकार, पूर्वी वैश्वदेव केल्यानंतर पंचमहायज्ञ करावे असें म्हणतात. "याजुःशाखी व सामवेदी यांनीं श्राद्धाच्या पूर्वीं करावा, अथर्वणवेदी यांनीं श्राद्धाच्या मध्यें वैश्वदेव करावा, आणि ऋग्वेदी यांनीं श्राद्ध करुन श्राद्धशेषान्नानें करावा. त्यामध्येंहि जे साग्रिक ऋग्वेदी असतील त्यांनीं श्राद्धाच्या पूर्वी वैश्वदेव करावा." वैश्वदेवाचा संकल्प ---"स्वर्गपुष्टयर्थं आत्मसंस्कारार्थं प्रातःसायंवैश्वदवौ तंत्रेण करिष्ये," असा संकल्प करुन औपासनाग्नि किंवा स्थापना केलेला पचनाग्नि (ज्याच्यावर पाक केला तो) याला औपासनहोमाप्रमाणें परिसमूहन, परिषिंचन (उदकसंस्कार) करुन अन्न अग्नीवर थोडें उष्ण करुन त्यावर उदकानें प्रोक्षण करुन अग्नीवरुन उतरुन त्यावर आज्य घालून तें अन्न अग्नीच्या पश्चिमेस ठेवावें. नंतर अग्नीची पूजा करुन त्या अन्नाचे तीन विभाग करुन प्रथम भागांतील अन्नाचा हस्तानें होम करावा. होमाचे मंत्र असे---"अग्नयेस्वाहा, विश्वेभ्योदेवेभ्यः० ध्रुवायभूमाय० ध्रुवक्षितये० अच्युतक्षितये० अग्नये स्विष्टकृते०" याप्रमाणें होम करुन परिसमूहन , पर्युक्षण करुन अग्नीच्या पश्चिमेस एकाच प्रदेशीं विंजण्याच्या आकाराचें किंवा चक्राच्या आकाराचें बलिहरण घालावें. बलिहरणाच्या देवता अशा -- "धर्मायस्वाहा धर्मायेदंनमम, अधर्माय० अद्भयः० ओषधिवनस्पतिभ्यः० रक्षोदेवजनेभ्यः० गृह्याभ्यः० अवसानेभ्यः० अवसानपतिभ्यः० सर्वभूतेभ्यः० कामाय० अंतरिक्षाय० यदेजतिजगतियच्चचेष्टतिनाम्नोभागोयन्नाम्नेस्वाहा नाम्नइदंन०" या स्थानीं कोणी ग्रंथकार "वायवइदं०" असा त्याग म्हणावा असें सांगतात. "पृथिव्यै स्वाहा अंतरिक्षाय० दिवे० सूर्याय० चंद्रमसे० नक्षत्रेभ्यः० इंद्राय० बृहस्पतये० प्रजापतये० ब्रह्मणे०" याप्रमाणें आहुति देऊन सर्व आहुतींस उदकानें एकवार सिंचन करावें. निरनिराळें सिंचन करणें हा पक्ष गृहीत असेल तर ’धर्म व अधर्म’ ह्या दोन आहुति मिळून एक वेळ सिंचन; ’अद्भयः’ ह्या आहुतीस सिंचन; ’ओषधिवनस्पति व रक्षोदेवजन’ ह्या दोन आहुति मिळून सिंचन; ’ग्रुह्याभ्य० अवसान० अवसानपति० व सर्वभूत०’ ह्या चार आहुति मिळून सिंचन; ’काम० अंतरिक्ष०, यदेजति०’ , ह्या तीन आहुतींस पृथक् पृथक् सिंचन; व पृथिवीपासून ब्रह्मापर्यंत, दहा आहुति मिळून एकवार सिंचन, याच्या पुढच्या ज्या आहुति त्यांला प्रत्येकींस निरनिराळें सिंचन या क्रमानें उदकाचें सिंचन जाणावें. नंतर प्राचीनावीती होत्साता पृथिव्यादि दहा आहुतींच्या दक्षिणप्रदेशीं "स्वाधापितृभ्यः स्वाहा’ ही आहुती द्यावी, व हिच्या उत्तरप्रदेशीं उपवीति होत्साता "नमोरुद्राय पशुपतये स्वाहा" ही आहुति देऊन पितर व रुद्र यांच्या आहुतींवर निरनिराळें सिंचन करावें. याप्रमाणें वैश्वदेव सांगितला.