पत्नी मृत झाली असता तिला दहन करण्याकरिता अर्धा अग्नि देऊन अवशिष्ट अग्नीवर सायंप्रातर्होम, स्थालीपाक व आग्रयण ही करावी. कौस्तुभामध्ये अर्धा अग्नि पत्नीच्या दहनाकरिता द्यावा व विधुराने अपूर्वाधान करावे. त्याचा प्रकार व अग्नीचा विच्छेद झाल असता पुनराधान करण्याचा प्रकार हे सांगितले आहेत. हा आधानाचा प्रकार अवशिष्ट अग्नीचा होमाच्या पूर्वी नाश होईल तर त्यासंबंधाने जाणावा. अथवा श्रौताग्नीपैकी भार्येच्या दहनाला अर्धे अग्नि देऊन उत्सर्गेष्टि करून पूर्वीच्या अग्नीचा त्याग करावा व पुनराधान करून अग्निहोत्र करावे असे सांगितले आहे. त्याप्रमाणे या ठिकाणीही उत्सर्गेष्टीने पूर्वीच्या अग्नीचा त्याग केल्यानंतर अपूर्वाधान करण्याविषयी कौस्तुभात जे सांगितले त्याची योजना करावी असे मला वाटते.
अरणी, स्रुवा, इत्यादि पात्रांची लक्षणे व ती कोणत्या वृक्षांची करावी. यासंबंधाचा विचार इतर ग्रंथामध्ये पहावा. या विधीचे संकल्पासहित विस्तारपूर्वक प्रयोग गृह्याग्निसागरामध्ये पहावे. प्रायश्चित्त वगैरे विधि बहुधा सर्व सूत्रांमध्ये सारखेच आहेत. क्वचित ठिकाई आपापल्या गृह्यसूत्रामध्ये विशेष सांगितले असतील ते पहावे. विवाहहोम गृहप्रवेशनीय होमासह एक तंत्राने करणे हे ऋग्वेदीयाचे पुनराधान होय. इतरांनी पुनराधान विवाहहोमाहून निराळेच करावे, याप्रमाणे विशेष जाणावा.