प्रातर्होम झाल्यानंतर अथवा मध्यान्हसंध्येनंतर अथवा वैश्वदेवानंतर ब्रह्मयज्ञ करावा. हा ब्रह्मयज्ञ दररोज एकदांच करावा. भट्टोजी दीक्षितांच्या ग्रंथामध्यें प्रातर्होमानंतरचा ब्रह्मयज्ञाचा काल हा इतर शाखीयांविषयीं आहे; आश्वलायनांनीं मध्यान्हसंध्येनंतरच ब्रह्मयज्ञ करावा, असें सांगितलें आहे. कोरडें वस्त्र, अथव तें न मिळाल्यास ओलें वस्त्र तीन वेळां झाडून परिधान करावें. नंतर आचमन करुन प्राणायाम केल्यावर "श्रीपरमेश्वरप्रीत्यर्थं ब्रह्मयज्ञं करिष्ये तद्ङ्तयादेवऋष्याचार्यतर्पणं करिष्ये" असें म्हणावें. दर्भासनावर बसून हातांत दर्भांचीं पवित्रकें घालून पूर्वाभिमुख बसावें. डाव्या मांडीवर मूलस्थानीं उजवा पाय ठेवावा अथवा डाव्या पायाच्या अंगुष्ठावर उजव्या पायाचा अंगुष्ठ ठेवावा. याप्रमाणें उपस्थ केल्यानंतर उजव्या गुडघ्यावर उताणा ठेवलेल्या व ज्याचीं बोटें पूर्वेकडे आहेत अशा डाव्या हातावर पूर्वेकडे अग्रें केलेलीं दोन पवित्रकें धारण करुन त्यावर उजवा हात ठेवावा. क्षितिजाकडे दृष्टि लावावी अथवा नेत्र मिटावे. ॐकार व व्याहृतिमंत्र एकदां म्हणून गायत्रीमंत्राचा पादशः, अर्धशः व सर्व असा तीन वेळां जप करावा. नंतर "अग्निमीळे०" हें सूक्त पठन करुन संहिता, ब्राह्मण आणि षडंगें (शिक्षा, कल्प, व्याक, रण, निरुक्त, छन्द, ज्योतिष) हीं एक संपल्यावर दुसरें याप्रमाणें याप्रमाणें एक अध्याय अथवा एक सूक्त अथवा एक ऋचा अशीं क्रमानें पठन करावीं. मंत्र, ब्राह्मण इत्यादि सर्व भागशः यथाशक्ति दररोज पठन करावीं, असें कोणी ग्रंथकार म्हणतात. याप्रमाणें चतुर्वेदाध्यायी असेल त्यानें चारी वेद भागशः अथवा सर्व ऋग्वेदापासून आरंभ करुन पठन करावे. एकेक शाखाध्यायी असेल त्यानें आपल्या शाखेचाच पाठ करावा. शाखेचें अध्ययन झालें नसेल तर सूक्त अथवा ऋचा तरी पठन करावी. नंतर यजुर्वेद, सामवेद, यांचा एकेक मंत्र, एक उपनिषद, इतिहास, पुराणें वगैरे पठन करावीं. नंतर पुरुषसूक्ताचा जप केल्यानंतर "नमो ब्रह्मणे नमो अस्त्वग्नय०" ही ऋचा त्रिवार म्हणावी. यामध्यें ऋषि इत्यादिकांचें स्मरन करुं नये. "विद्युदसि" हा मंत्र तैत्तिरीयांनीं प्रारंभीं व शेवटीं म्हणावा. बसून पाठ म्हणण्यास असमर्थ असेल त्यानें उभें राहून, फिरत असतां अथवा आडवें पडून देखील पाठ म्हणावा. असें आश्वलायन सांगतो. अनध्यायाचे दिवशीं अल्प पाठ करावा.