याप्रमाणे नानाप्रकारच्या विधिनिषेधयुक्त स्नान, भोजन इत्यादि आह्निक कर्मात न्यूनाधिक दोष किंवा विधिनिषेधांचे उल्लंघन केल्याचा दोष असल्यास त्यांचा परिहार होण्यासाठी, प्रायश्चित्ताचे ज्ञान नसल्यास कर्माची व प्रायश्चित्ताची सांगता होण्यासाठी श्रीविष्णूच्या नावाचे उच्चारण इत्यादि करावे.
"तपोरूप व कर्मरूप अशा सर्व प्रायश्चित्तात श्रेष्ठ प्रायश्चित्त कृष्णस्मरण हे होय. तपश्चर्या व यज्ञयागादिक कर्मे यात असलेले न्यून ज्याच्या स्मरणमात्राने व नामोच्चारणमात्राने संपूर्णतेला पावते असा जो अच्युत त्याला मी नमस्कार करितो. पातकाचा नाश करण्याच्या कामी हरीच्या नामात जितके सामर्थ्य आहे तितके पाप पापी माणसाला करण्याचे सामर्थ्य नाही." लौकिक व वैदिक कर्म परमेश्वराला समर्पण करावे. कारण "हे अर्जुना तू जे कर्म करतोस, जे खातोस, जे हवन करितोस, जे देतोस व जे तप करितोस ते सर्व कर्म मला समर्पण कर" असे भगवान श्रीकृष्णाचे वचन आहे. एकदाच सर्व कर्मे ईश्वराला समर्पण करण्याचा मंत्र
"कामतोऽकामतो वापि यत्करोमि शुभाशुभं । तत्सर्वं त्वयि संन्यस्तं त्वत्प्रयुक्तः करोम्यहम्" असा आहे.
"अनेक प्रकारचे भेद असलेले हे अपार आह्निक कर्म गहन असल्यामुळे ते सर्व सांगण्याला अनंतोपाध्यायांचा पुत्र मी काशीनात पंडित असमर्थ आहे. परंतु यथामति थोडक्यात सांगितले आहे. त्याने भगवान श्रीरुक्मिणीपति प्रभु पांडुरंग संतुष्ट होवो.
" इत्यंनंतोपाध्यायसुनूकाशीनाथोपाध्यायविरचिते धर्मसिंधुसारे तृतीयपरिच्छेदे आह्निकाचार प्रकरणं समाप्तम ॥