आतां सर्वांना साधारणपणें भोजनादिकांचा विधि सांगतों. सोन्याचे अगर रुप्याचे पात्रांत अथवा आंबा इत्यादिक वृक्षाच्या पानांवर भोजन करणें तें प्रशस्त होय. कांस्यपात्रांत भोजन करणें असेल तर ज्या कांस्यपात्रांत आपण भोजन करतों त्यांतच इतरांनीं करुं नये. दुसर्यानें भोजन केलेल्या कांस्यपात्रांत ते उच्छिष्ट झाल्यामुळें भोजन करुं नये. ’संन्यासी, ब्रह्मचारी व विधवा यांनीं तांबूल, तैलाभ्यंग व कांस्यपात्रांत भोजन हीं वर्ज्य करावीं.’ संन्यासी इत्यादिकांनीं पळसाच्या पानांवर भोजन करणें प्रशस्त होय. गृहस्थाश्रमीयांनीं पळसाचे पानांवर भोजन करुं नये, केलें असतां चांद्रायण करावें. चांद्रायण वल्लीरुप जो पळसाचा वृक्ष तद्विषयक होय असें स्मृत्यर्थसारांत सांगितलें आहे. कदली, कुडा, मोहाचा वृक्ष, जांभूल, फणस, आंबा, चांफा व उंबर यांचीं पानें भोजनाला प्रशस्त होत. रुई, पिंपळ, वड इत्यादिकांचीं पानें निषिद्ध आहेत.