ज्याचा अग्नि असेल त्याने अरणीमध्ये किंवा समिधेमध्ये अग्नि आला अशी भावना करणे याचे नाव अग्निसमारोप. त्याचा प्रकार असा-
"अयंतेयोनिरित्यस्यविश्वामित्रोग्निरनुष्टुप अग्निसमारोपेवि०"
या मंत्राने होम केल्यानंतर अरणी अथवा अश्वत्याची समिध तापवून त्या अरणीवर अथवा समिधेवर अग्नि आला अशी भावना करावी. पुनः होम वगैरे करण्याच्या काळी अरणीचे मंथन करून "प्रत्यवरोह०"
या मंत्राने स्थंडिलावर अग्नीची स्थापना करावी. समिधेचे ठिकाणी समारोप केला असेल तर श्रोत्रियाचे घरातील अग्नि आणून त्याची स्थापना करावी आणि
"प्रत्यवरोह०"
या मंत्राने ती समिध अग्नीमध्ये टाकावी. दुसर्या सूत्रामध्ये
"आजुहान०, उब्दुध्यस्व०"
या दोन मंत्रांनी प्रत्यवरोहण करावे असे सांगितले आहे. दररोज समारोप करावयाचा तो बारा दिवसपर्यंतच करावा. पर्वदिवशी सायंहोमकालापर्यंत प्रत्यवरोहण नसेल तर अग्निनाश होतो असे कोणी ग्रंथकार म्हणतात. समारोप व प्रत्यवरोह, हे यजमानानेच करावे. म्हणून समारोप केल्यावर पर्वदिवशी आशौच प्राप्त होईल तर प्रत्यवरोहाचा असंभव होतो व त्यामुळे अग्निनाश होतो; पण हा आपस्तंबादिकाविषयी निर्णय आहे; आश्वलायनांच्या अग्नीचा, बारा दिवसांमध्ये पर्वदिवशी प्रत्यवरोहाचा अभाव होईल तरी, नाश होत नाही. बारा दिवसांनंतर होमलोपच होतो. असे दुसरे ग्रंथकार म्हणतात. राज्यक्रांति, इत्यादि संकटकालामध्ये ऋत्विजाकडूनही समारोपादि कर्म करावे. ऋत्विज वगैरे नसल्याने अनन्यगति होईल तर आशौच प्राप्त होण्याच्या पूर्वी पर्वहोमासहित होमांचा अपकर्ष करून अथवा न करून समारोप करावा व सूतकानंतर प्रत्यवरोह करावा. याविषयी पर्वाचे उल्लंघनाचा दोष नाही, असे कोणी ग्रंथकार म्हणतात.