रुखवत
लोकगीते ही लोकांची गाणी आहेत. जी कोणी एक व्यक्ति नाहीं तर पूर्ण समाज गात असतो. सामान्यतः लोकांत प्रचलित, लोकांद्वारे रचित आणि लोकांसाठी लिहीलेली गाणी यांनाच लोकगीते म्हणतात.
१
रुखवत आलं रुखवत आलं रुखवतांत केळीची फणी ।
उघडुन पहाती रायरुक्मिणी ॥
२
रुखवत आलं रुखवत आलं त्यांत होता जाम ।
रुखवत उघडायला आला फलटणीचा राम ॥
३
रुखवत आलं रुखवत आलं त्यांत होतं रताळ ।
उघडुन बघतात त्यांत पंढरीचा येताळ ।
४
आलं आलं रुखवत रुखवतावर डबा ।
उघडुन पाहती तो राम लक्ष्मण उभा ।
५
आलं आलं रुखवत रुखवतावर झुबा ।
उघडुन पाहती तो पांची पांडवाची सभा ।
६
आलं आलं रुखवत रुखवतावर जाई ।
उघडून पाहती तो जानकी सीतामाई ।
७
आलं आलं रुखवत अर्जुन गर्जुन ।
उघडुन पाहती तो भीमार्जुन ।
८
आलं आलं रुखवत मांडवाच्या दारीं उभा ।
उघडुन पाहती तो भरली इंद्रसभा ।
९
आलां आलां रुखवत रुखवताचें भ्यव ।
उघडुन पाहते तो गोकुळचें कृष्णदेव ॥
१०
आलं आलं रुखवत रुखवतावर सहाण ।
उघडुन पाहते अंजनीचे हनुमान ॥
११
आलं आलं रुखवत दणाणलं हेळ ।
उघडुन पाहतें राम लक्ष्मणाचा खेळ ॥
१२
आलं आलं रुखवत दणाणलं पुणं ।
उघडुन बघतें सुपभर सोनं ॥
१३
आलं आलं रुखवत दणाणली बारामती ।
उघडुन बघतें सुपभर मोती ॥
१४
आलं आलं रुखवत दणाणलं मंमई ।
उघडुन बघतें सोन्याची समई ॥
१५
आलं आलं रुखवत दणाणलं जोतं ।
उघडुन बघतें साखरेचं पोतं ॥
१६
आलं आलं रुखवत आंत होता आंबा ।
रुखवत उघडते कुणाची रंभा ॥
१७
सुकून वड घाली गंगा । भागीरथीशीं जाऊन सांगा ॥
यमुनासी परत मागा । तिंबायाशी ॥
काशी घेउनी घागर । शिंपर शिंपीती नागर ॥
नका जाऊं वनारशीं । दिवा ठेवायाशीं ।
यश्वदीनं धरली वाट । गुजाई भाजी लाही पीठ ।
कासई म्हणती आणा सुठ । पाही वाट ॥
यश्वदीनं केली करंजी । भिमानें केली पातळ सोजी ।
नखुल वळीत बसली राधी । दरवाजाशीं ॥
बायजा पापड लाटिती । चिमा वळणावं घालिती ॥
आणि अणारस तळी । रखमाई ॥
कुठं दिली माझी सई । मला अजून ठावं नाहीं ॥
सखु बहिणी करावं काय ? सांगा आम्हांसी ॥
झुरळ्या पाडी वर सगुणा । रुसून बसली ग चांगुणा ॥
समजाविती ग मैना । तळतळ गे बाई ॥
तुळजा आलीया धावून । हातीं लाटण घेऊन ॥
रंगी बोल धमकाउनि । बुंदी बांध ग बाई ॥
गुळाचा पाक करी राधा । निराई म्हणती गोळी बांधा ।
जाळ घालुन सुंदर सौदा । झारा फिरवुनि ॥
खिसका दळी सतीभामा । ठिवला भरुनि ॥
कांडीत होती नार साळो । तिकडनं आली बया बाळो ॥
गंगी म्हणती भिस्की दळो । कितीक माणसें ॥
लाडू मोडित बसली आका । तिकडनं आला मामा सखा ।
कांग लाडू झाला फिका । पाही उचलोनी ॥
साती दुरड्या रुखवत । ओल्या वरातीला जात ।
गलोगली मिरवत । जिमनी नेल्या मांडवांत ॥
रुखपताच्या सात दुरडया -
पहिली दुरडी रुखवत । जिमनी नेल्या मांडवांत ॥
विहिणी उघडुन पहात । पानसुपारी ॥
दुसरी दुरडी रुखवत । जिमनी नेल्या मांडवांत ।
काठो सपेटाची । विहीण झाली विठ्ठलाची ॥
तिसरी दुरडी रुखवत ।जिमनी नेल्या मांडवांत ॥
काठोकाठ गुलालाची । विहीण झाली दलालाची ॥
चौथी दुरडी रुखवत । जिमनी नेल्या मांडवांत ॥
काठोकाठ अबीराची । विहीण झाली कबीराची ॥
पांचवी दुरडी रुखवत । जिमनी नेल्या मांडवांत ॥
नाहीं झाली माझी नेहरी । नवर्या देवाला गोत भारी ॥
सहावी दुरडी रुखवत । जिमनी नेल्य मांडवांत ॥
तुपाची म्यां केळी दिली । नणंदही विहीण केली ॥
सातवी दुरडी रुखवत । जिमनी नेल्या मांडवांत ॥
खालीं सोजाची काकर । विहीण झाली एका मातेची लेंकरं ॥
१८
रुखवत आलं रुखवत आलं दणाणली आळी ।
उघडुन पहाती दीडच पोळी ॥
१९
मांडवाच्या दारीं । रुखवत आलं भारी । आंत काय काय परी ॥
शेवया साजुक । तेलच्या नाजूक । हळदीच्या वाट्या।
कुंकवाचं कुडं । उडदान वड । शेंदी सकट पांच नारळ ।
देठासकट जायफळ । असं नाव घ्या खडाखडी ।
वर ठेवा पातळाची घडी ॥
२०
आलं आलं रुसवत । त्यांत होतं बक्षी गहू ।
नवर्याच भाऊ तिरशिंगराव । त्याला समजावितो सारा गांव
समजून घॆईना घरीं । वरमायची आली नेहरी ।
घालतो सोन्याची सरी । समजून घेतो घरीं ॥
२१
ईवाई करिती चांदी चुंदीचा । आखुड बांध्याचा । टिकल्या लेइना गंधाच्या ।
अंग भरलं ठायींठायीं । दारी बसलं दादाभाई ।
नवरा आला थोराचा । कमरीं करगोटा मोराचा ।
दिठ झाली लालाला । काळँ लावा गालाला ।
दिठ झाली नागणीला । मिरच्या टाका आगणीला ॥
२२
आलं आलं रुखवत रुखवतांत पोव्हा ।
विहीण म्हणते मला चोळी नको लुगडें नको अन टकुचं पोलकं शिवा ॥
आलं आलं रुखवत मांडवाच्या दारीं पडली पांचाची नोट ।
विहीण म्हणते मला साडी नको चोळी नको मला विजार अन् कोट ।
आलं आलं रुखवत आंत होती चंची ।
भाडयाच्या दागिन्याची नवर्याची वरमाई कोणची ?
आलं आलं रुखवत रुखवतांत नथीचा आकडा ।
इवायदांदा मेला फाकडा इवाय म्हणतो बाई तुमचा एक दांत कांहो वाकडा ?॥
२३
आलं आलं रुखवत रुखवतांत जाई ।
विहीणीच्या वात्यावर उभं राहून पाही पंढरपूर पाही ॥
२४
मांडवाच्या दारीं पडलं बेल ।
देव कारव्याला बकरं आणलेलं वाटेनच मेलं ।
बसाया पटकरा आणलेलं पुण्याला गेलं ।
इवाय करुन केला दलाल ।
नाहीं भांगांत मिळाला दमडीचा गुलाल ॥
खाल्या आळीला वरल्या आळीला ।
कशाचा गलबला बाई जावईबा जलमला ।
बारा हो गावचा खालता होता एक मळा ।
नांगारुन डोंगरुन केला काला । त्यांत पेरलं जोंधळ ।
त्याच्या झाल्या पिशा पिशा ॥
जावईबोवाच्या भरल्या गोणी मिशा ॥
२५
विहीणबाई विहीणबाई हांका मारतो बाळ्या ।
तुमच्या कां हीं मोठाल्या वळ्या?॥
२६
मांडवाच्या दारीं पडलं टिपरं । विहीणीला पोर झालं झिपरं ।
ईवाय म्हणतो पोर कां हो झिपरं ?
असूं द्या दादा रात्रीं निजाया गेली होती तेव्हां नवर्या आलं फेंफर
तेव्हां पोर झालं झिपरं ॥
२७
आडभितीला पडभीत पडभितीला कमान ।
आंत सर्त्र्या रंगाची विहीण मिळाली ढोंगाची । चटी पटी भांगाची ।
भांगभर मोती । इवायानं विहीण नेली पलंगावर रातीं ।
आम्हांला तरी काय माहिती ? पण सभेची लोक बोलत होती ॥
२८
व्याह्यानं विहीण होकारली कशासाठीं?
व्याह्यानं विहीण होकारली गोठासाठी ।
हिचे गोठ दिले हातीं हिला खोलींत नेली राती ।
न्हाई म्हणाल ग बायांनो खरं सांगा रे पोरांनो ।
खोली खोल ग मैना रात्रीं केवढा धिंगाणा ।
व्याह्यानं विहीण होकारली कशासाठी ?
व्याह्यानं विहीण होकारली पुतळ्यासाठी ।
२९
नथ ल्या वैनी नथ ल्या ।
तुमच्या नथीवरनं उडतीं पाखरं । उडती पांखरं मान देशीचीं ।
मानदेशीचा हरी सोनार । हरी सोनार खरीद करणार ।
खरीद करणार बैल भरणार ।
बैल भरणार खोलीत जाणारणी । खोलींत जाणारणी दणकं देणारणी ।
खोली खोल ग मैना रात्रीं केवढा धिंगाणा ।
बोली बोल मैना तुझी कानडी येईना?
येळा ल्या वैनी येळा ल्या .....
३०
मांडवाच्या दारीं विहीण बसली मैना ।
अंगावर नऊशे रुपयांवा गहेना । लेई म्हणतो लेईना
उंबर म्हणती डेर दिलं । चाल म्हणतो चालना ।
पांचीं पक्वान्न केलं । जेव म्हणतो जेवना ।
बाई बाई करतो भोसडी वर पाहीना ।
बरं पटतं कां देऊं बटाट?
३१
पांच रुपयांचा घेतलाय कोंबडा । पांच रुपयांचा घेतलाय कोंबडा ।
हळुंच शिगवरी येंग र तूं । भल्या माझ्या कोंबड्या कुकु च कू । पांच ......
हळूंच दादर येंगव तूं । भल्या माझ्या कोंबड्या कुकु च कू । पांच .......
हळूंच पलंग येंग र तूं । भल्या माझ्या कोंबडया कुकु च कू। पांच ......
हळूंच मिर्या वार र तूं । भल्या माझ्या कोबडया कुकु च कू । पांच.....
हळूंच टोच मार र तू । भल्या माझ्या कोंबड्या कुकु च कू । पांच .......
हळूंच दाणा येच र तू । भल्या माझ्या कोंबडया कुकु च कू ।
३२
तूं हळुं हळुं ये ग माझी सौदागरणी । तूं कशी कशी ये ग माझी सौदागरणी ।
तुझ्या पायांत मोडला कांटा माझी सौदागरणी । ते कांटा कोण काढील माझी सौदागरणी?
इवायदादा काढील माझी सौदागरणी । तो कसा कसा काढील माझी सौदागरणी ?
तो शोधून शोधून काढील माझी सौदागरणी ।
एक ना मोडी दोन नाय मोडी । तिसर्यानं लवंगा खोडी ।
३३
अर दुरडीच्या दुरडया । आणल्या ग तेलच्या । व्याही म्हणे कालच्या विहीणीला ।
विहिणीचं लफडं । पोटाची धाय । सखे ग बाय । खोलीची सुध यांनी केलीच नाय ।
परातीच्या पराती । आणल्या पोळ्या । व्याही घेती चोळ्या विहिणीला ।
विहिणीचं लफडं । पोटाची घाय । सखे ग बाय ।खोलीची सुध यांनी केलीच नाय ।
परातीच्यापराती । आणल्या ग शेवया । व्याही देतो जेवाया विहिणीला ।
विहिणीचं लफडं । पोटांची धाय । सखेग बाय । खोलीची सुध यांनीं केलीच नाय ।
तबकंच्या तबकं । आणलीं पानं । व्याही धरी थानं । विहिणीचीं ।
विहिणीचं लफडं । पोटाची धाय । सखे ग बाय । खोलीची सुध यांनी केलीच नाय ।
तबकंच्या तबकं । आणल्या सुपार्या । व्याही म्हणे दुपार्यान् । विहिणीला ।
विहिणीचं लफडं । पोटाची धाय । सखे ग बाय । खोलीची सुध यांनी केलीच नाय ।
तबकंच्या तबकं । आणला चुना । व्याही म्हणं पुन्हां । विहिणीला ।
विहिणीचं लफडं । पोटाची धाय । सखे ग बाय । खोलीची सुध यांनी केलीच नाय ।
३४
रुखवत आलं रुखवतांत होतीं मक्याचीं कणस ।
इचकट आणा घालूं नका आम्ही मरजीची माणसं ॥
३५
रुखवत आलं रुखवत रुखवतावर लव्हाळा ।
विचकट आणा नका घालूं आपण चहुकून जिव्हाळा ॥
३६
आलं आलं रुखवत रुख्वतावर मोर ।
विचकट आणा घालूं नका तुमच्या झिपरीला दोर ॥
३७
विहीण बसली न्हायाला । पाणी आणा गंगाचं । मखर बांधा भिंगाचं ।
फुल जडा हारोहार । दूध प्यायला दोन म्हशी । दोन म्हशीला दोन टोणगे ।
दोन टोणग्यावर बारा मण गहूं । बारा मण गव्हांत चार मण हुलगे ।
इहीण म्हणती दादा इतकं कशाला ?
बाई तुझ्या लेकीला अन् माझ्या लेकाला ।
बाबा एवढं बसून खाऊं । झालझेंडा घ्यायला मांडवांत जाऊं ॥
३८
उभी होते मेण्यांत । काचोळी अंगांत । गुलाल भांगांत ।
जायफळ ओटींत । लवंगा मुठींत । सोड ग सोड ढवळा पितांबर ।
कचेरीला उभे । सोन्याची किल्ली । हातीं दिली । उघडली
खोली । खोलींत होती चुला । चुलीवर होती परात । परातींत
होता भात । भातावर होतं तूप । तुपासारखं रुप । रुपासारखा
जोडा । चंद्र्भागेला पडला वेढा । रंगीत दुरडी । रंगीत सुपली ।
आडभीत पडभीत । पडभितीला होते गहूं । जलमले पांचजण
भाऊ । एक जलमला तिरशिंगराव । एक म्हणतो बांधा भाकरा
जाऊं नगराला । गाडी घेतली तासाची । बैल घेतले अणजापूर ।
अनजापूरवा लेहेंजा । (कामाची झाली लेंडी । गार दौंडेंत
घेतली बंडी ।) करमळ्यांत घेतला जोडा । अशी माय वरी तर
भाकर लागली बरी । पाडाचा अंबा महादेवाला वाहिला ।
व्याह्यासाठीं विहीणीसाठीं खानदेश पाहिला ।
३९
ऐका आणा सांगती । लेक शिंद्याची । भाची दिवटयाची ।
मेहुणी सावळ्याची । खाल्लं पेडगांव । वरलं पेडगांव । मधीं
चाललं भीमाचं नावं । पागाचं पारगावं । शिंदेकरांच आडळगांव ।
दाभाड्याचं तळेगाव । चिंचपूर माझं माहेर । नाना सखा महादु
माझं भाव । विडसांगीं माझं गांव । जिजाबाई माझं नाव । जिल
आणा येईना तिनं टाळी ठोकून दाव । बर पटतं कां देऊं बटाट?
४०
झालुबाई झालु । झालुंत होती जाई । नको रडूं नवरीच्या
आई । ज्याची होती त्यानं नेली । आपली माया व्यर्थ गेली ।
झालूबाई झालू झालूंत होता चाफा । नको रडूं नवरीच्या बापा ।
ज्याची होती त्यानं नेली । आपली माया व्यर्थ गेली ।
झालूबाई झालू झालूंत होती येणी । नको रडूं नवरीच्या बहिणी ।
ज्याची होती त्यानं नेली । आपली माया व्यर्थ गेली ।
झालूबाई झालू झालूंत होता ओवा । नको रडूं नवरीच्या भावा ।
ज्याची होती त्यानं नेली । आपली माया व्यर्थ गेली ।
झालूबाई झालू झालूंत होती बोरं । मायबाप झाली चोर ।
ज्याची होती त्यानं नेली । आपली माया व्यर्थ गेली ।
परसदारीं होती बोरं । तिजवर बसला जावई चोर ।
ज्याची होती त्यानं नेली । आपली माया व्यर्थ गेली ।
४१
सोन्याचा वस्तरा । न्हावीदादा तूं चतुरा । हळुंच चुचकारा ।
लक्ष्मीआई धरी घडी । तेलणीची विडी ।
सोन्याचा वस्तरा । न्हावीदादा तूं चतुरा । हळूंच चुचकारा ।
खंडोबा धरी घडी । तेलणीची विडी ।
४२
सोन्याचा नांगुर । रुप्याचा फाळा । नंदीजी जुपिला ।
सरीजी सोडिली । वाखुरी सोडिली ।
रुप्या़चा जी नाडा । सोन्याच्या जी मोटा । नंदीजी जुपिला ।
मोटाजी हाणील्या । हळदाई लावील्या ।
हळदाईच्या उगविली । हळदाई आली एक पान । मग आलीं दोन पानं ।
मग आलीं तीन पानं ।
चौथ्या पांचव्या पानाला । हळदाई मोडिली । हळदाई वेचिली ।
सोन्याची चुलवण । रुप्याच्या काहिली । हळदाई शिजविली । हळदाई वाळविली ।
सोन्याचा वरवंटा । रुप्याचा पाऽटा । हळदाई वाढली ।
लाविली आधीं । पंढरीच्या देवा ।
आधीं मान कोणायाचा । नवर्यानवरीचा ।
दुसरा मान कोणाचा । वरमाईबाईचा ।
तिसरा मान कोणाचा । कुरवल्याबाईचा ।
चौथा मान कोणाचा । वर्हाड्या बायांचा ।
पांचवा मान कोणाचा । परटिणीबाईचा ।
४३
नवर्या पेहराव कशायाचा ? नवर्या पेहराव कडयायाचा
करंड सोलीला कुसरीचा ।
नवर्या पेहराव कशायाचा ? नवर्या पेहराव तोड्यायाचा ।
करंड खोलीला कुसरीचा ।
४४
ताग ताग तागून ये । बारीक सूत पाजून ये ।
कांकणाचा दोर आवळ करावा ।
४५
नवर्या नवरीचं कौतिक पहाता । दावी घेत्याती एकमेकां
४६
नवर्या नवरी कशी नेशील ?
नवर्या बाप । नवर्याचा बाप । गेला फलटण शहरांत ।
गेला फलटण शहरांत ।
केली मेण्याची किंमत । नवरी बसविली मेण्यांत ।
आणली नवर्याच्या शिवेवर । शिव धरली शिवार्यानं ।
नवरीकडील माणसें म्हणतात : -
"नवर्या, नवरी कशी नेशील? "
नवरा: - चोळी पातळ देईन । नवरी जितून नेईन ।
तिथनं नवरा निघाला । आला येशीच्या जवळीं ।
येस धरली येसकरांनी ।
" नवर्या नवरी कशी नेशील?"
"पांच पानं विडा मी देईन । नवरी जितून नेईन ।"
तिथनं नवरा निघाला । आला मांडवाजवळीं ।
मांडव धरला वर्हाड्यांनी ।
"नवर्या नवरी कशी नेशील?"
"वर्हाड जेवण मी घालीन । नवरी जितून नेईन ।"
तिथनं नवरा निघाला । आला बोहल्याजवळीं ।
बाहेलं धरलं मेहुण्यांनी ।
"नवर्या, नवरी कशी नेशील ?"
"तुमचा कान मी धरीन । तुम्हांला पटका मी देईन । नवरी जितून नेईन ।"
तिथनं नवरा निघाला । गेला बोहला चढूनी ।
बसला नवरीच्या बाजूला । नवरीची बाजू धरली बहिणींनीं
"नवर्या , नवरी कशी नेशील?"
"तुम्हाला चोळी मी देईन ।नवरी जितुनी नेईन ।"
तिथनं नवरा निघाला । गेला उंबर्याजवळीं ।
उंबरा धरला वरमाईनं ।
"नवर्या, नवरी कशी नेशील?"
"वरमाय साडी मी देईन । नवरी जितुनी नेईन ।"
तिथनं नवरा निघाला । गेला देव्हार्याजवळीं ।
देव्हारा धरला देवानं ।
"नवर्या , नवरी कशी नेशील?"
"देवा गोंधळ घालीन । तुझा गजर करीन । नवरी जितुनी नेईन ।"
४७
नवरी जितुनी नेईन
भाऊ:- "गहूं पेरला गव्हाळींत ।
गव्हासारखी तिची लोंबी । दार धरुन कां ग उभी? "
बहीण : - " दादा ,लेकी मागण आलें ।"
भाऊ : - " तुझ्या लेकीचं लेणं काय ?"
बहीण: - "घालीन साखळ्याचा जोड । नवरी जितुनी नेईन ।"
४८
नवरी जितुनी नेईन
भाऊ :- "सोन्याचा करदोडा । लवत खवत । कोण पाव्हणी येतीया ।"
बहीण :- "दादा , नव्ह मी पाहुणी । दादा , तुमची बहिणाई ।"
भाऊ :- "कां हो अक्का ,येणं केलं ?"
बहीण :- "दादा, लेकी मागण आलें ।"
भाऊ :- "आक्का दुरुलाग पला । लेकी पायच दुखत्याल ।"
बहीण :- " मी मेणाच करीन । नवरी जितुनी नेईन"॥
भाऊ: - "सोन्याचा करदोडा । लवत खवत । कोण पाव्हाणी येतीया ?"
बहीण:- "दादा, नव्ह मी पाहुणी । दादा, तुमची बहिणाई ।"
भाऊ: - "कां हो आका , येणं केलं ?"
बहीण:- "सडक झाडं मी लावीन । नवरी जितुनी नेईन ।"
भाऊ:- " सोन्याचा करदोडा लवत खवत । कोण पाव्हणी येतीया?"
बहीण:- "दादा नव्ह मी पाहुणी । दादा, तुमची बहिणाई ।"
भाऊ :- "कां हो आका, येणं केलं ?"
बहीण :- "दादा , लेकी मागण आलें ।"
भाऊ:- " आका , दुरुलाग पला । लेकी तहान्च लागल ।"
बहीण: - "आडवी बारव खंदीन । नवरी जितुनी नेईन ।"
४९
आका लेक मागते
बहीण: -
दारीं होती जाई । तिला बांधली गाई । दादा लेक देतो तिला हातच नाहीं ।
दारीं होती जाई तिला बांधली गाई । दादा लेक देतो तिला पायच नाहीं ।
भाऊ : -
"आका लेक मागते । कसं करावं ग? ।"
बायको : -
" होईन सातोदरी । मग देईन होंजीच्या घरीं ।"
N/A
References : N/A
Last Updated : January 25, 2018
TOP