मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|घाटावरची लोकगीते|
११ ते २०

लग्नांतील गाणीं - ११ ते २०

हळदीचे घण भरतांना म्हणावयाचीं गाणीं


११
माझ्या मामाची एकासस ग ।
मामी करिती उठाबस ग । या बाई गौळणी ग ।
आडवा डोंगर कंगोर्‍याचा ग ।
संग नेतें मी गोरा भाऊ ग । या बाई गौळणी ग ॥

१२
अशी गेला कुण्या गांवा ग याचा घोर नाहीं मला ।
त्याच्या संगतीला देव मारवती गेला ॥
हिरवी चोळी उंच मोलाची मला ।
हिचा शिवणार येईल कधीं ग माझी मीच अंगीं भरली ग ।
ऐक रुख्मिणी तुला सांगतें गांठ सुटेना भिंग बसवली ठसून ।
चोळी घ्यावी ग सद्‍गुरुपासून ग बाई पासून ॥

१३
आला नागरपंचमीचा सण । झुलझुलण्या का नागरपंचमी का
वारुळाला जातो नरनारी आनंदाखालीं नाग पूजिती ॥
कोईपे नेसुनी सरसाडी । पोषाख करुनी न्यार न्यारी ।
सांगत्या हरणी चल चिमणबागेमधीं जाऊ गडे मैतरणी ॥

१४
माणिकसाहेब धुंद झाला । वारु सजविला ।झुंझाकड नेला ।
रजा दे मला लढाईला । रजा कशी देऊं मी तुम्हांला ?
तुमचा बापू मरणीं पावला । तुमच्या मातेला सवाल काय केला ?
पुस तिला सांग आम्हाला ॥

१५
अशी गेला कुण्या गांवा याचा घोर नाहीं मला ।
गांवा ग छपरीन्‍ बंगला ।
जीव माझा रमला माडीवर बंगला ।
दारी पाऊस थुई थुई रमला ग शिरीं रंग भिनला ।
याच्या अंबेलीखाली बाज फुलाची शेज ॥

१६
अशी गेला कोण्या गांवा याचा घोर नाहीं मला ॥
गांवा येग घडणी जाग घडणी म्होर डुलत ।
मुसुंब्या चोळीवरी चंद्र खुलतो ॥

१७
माडीवर माडी माडीवर बंगला ।
कुण्या नारीन वारुळ पुजला ? भाऊपण्याला अंतर पडला ॥१॥

१८
हरणी मूल बाई वाण्याची । डोईवर घागर पाण्याची ॥
पांच पिंजर्‍या डोलती । आंतमधीं मैना बोलती ॥

१९
भांडू नका तंडूं नका तुमची  तुम्हांला । पदरीचा पैसा देतें झेंडू फुलाला ।
खिडकींतून माडींतून कोण ग बघतो । जीवीचा प्राणसखा चंद्र  डोलतो ॥

२०
आवोजी भीमा आवोजी भीमा पाण्याला चला ।
शीतळ माझी गंगा चालली थिट जायाचं दूर ।
बारीक शेला वार्‍यानं गेला ।
नदर झाली त्याला पदर घाला पदर घाला ।

N/A

References : N/A
Last Updated : January 25, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP