फुगडी गीते
लोकगीते ही लोकांची गाणी आहेत. जी कोणी एक व्यक्ति नाहीं तर पूर्ण समाज गात असतो. सामान्यतः लोकांत प्रचलित, लोकांद्वारे रचित आणि लोकांसाठी लिहीलेली गाणी यांनाच लोकगीते म्हणतात.
१
लिंबळगांव नगरी भोंवतानं डगरी ।
सोन्याची कुलपं मोत्याची झुलप ।
आम्ही लेकी थोराच्या लिंबाळकराच्या ।
२
वाकडीतिकडी बाभळ त्याच्यावर बसला होला ।
इकडुन दिला टोला गंगेला गेला ।
गंगेची माणसं मक्याची कणसं ।
आम्ही लेकी थोराच्या वाकरीकराच्या ।
३
चहाबाई चहा गवती चहा ।
बहिणी- बहिणींचीं फुगडी पहा ।
पहा तर पहा नाहींतर उठुन जा ।
आमच्या फुगडीला जागा द्या ।
४
माझा मेव्हणा मक्यांत ग मक्यांत ग ।
सोळा कणसं काखेंत ग काखेंत ग ।
म्होरं चाललाय झुकत ग झुकत ग ।
मागनं कुत्रीं भुकत ग भुकत ग ।
माझा मेव्हणा विहिरींत ग विहिरींत ग ।
धोतर फाटलंय टिरींत ग टिरीत ग ।
म्होरं चाललाय झुकत ग झुकत ग !
मागनं कुत्री भुकत ग भुकत ग !
माझा मेव्हणा असातसा असातसा ।
हातांत कुंचा मांग जसा मांग जसा ।
म्होरं चाललाय झुकत ग झुकत ग ।
मागनं कुत्रीं भुकत ग भुकत ग ।
५
कोथमिरिची काडी लवते कशी ।
दादाला बायको शोभते कशी ।
आम्हाला वहिनी लागते कशी ?
६
अंगारा म्हणा अंगारा सांधी कुंधी अंगारा ।
दादा गेला चुलीम्होरं वहिनी मारी गुंगारा ।
७
फुगडी फुल्लदार भाऊ शिल्लेदार ।
भावाच्या हातीं खोबर्याची वाटी ।
फोडून पहाती खापरखोटी ।
मार बर मार ।
दारीं बसलाय हवालदार ।
चोळ्या शिवतोय हिरव्या गार ।
टिपा टाकतोय आणीवार ॥
८
झग्याची फुगडी झक मारिती ।
शिंप्याची पोरगी हाक मारिती ।
बंध माझा नेणता ।
त्याला शिवला घोनता ।
आसूड केला दुमता ।
आसूड झाला म्हातारा ॥
त्याला दाखवला सातारा ॥
९
असा भाऊ भोळा बायका केल्या सोळा ।
केल्याती केल्या पळूं पळूं गेल्या ।
पळतां पळतां मोडला कांटा ।
शंभर रुपयाला आला तोटा ।
१०
असा कसा अंगठीवरला ठसा ।
अंगठी गेली मोडून ।
अशी लेक साळ्याची भाकरी खाईना राळ्याची ।
पाणी पिईना शाडूचं काम करीना कवडीचं ।
कांदा खाईना पातीचा नवरा मागते जातीचा ।
फू बाई फू.........
११
आडाव म्हण आडाव ।
माझ्यासंग फुगडी खेळतय म्हातारं गाढव ।
१२
तुमच्या घोड्याचा मोड्ला पाय ।
खुर्चीवर बसुन खोबरं खाय ।
१३
हातांत शेला झळकत गेला ।
हातपायाचीं बोटं ग ।
इडणीकराची स्वारी निघाली ।
तगारीवाणी पोट ग ।
१४
फुगडी फुलती दोघे बोलती ।
चावडीखाली साप गेला चावडी डुलती ।
१५
अडयाल भिंत पडयाल भिंत ।
मधल्या भिंतीला लिंपावं किती?
ठेवलेल्या रांडेला जपावं किती ?
१६
डाळ म्हणा डाळ हरबर्याची डाळ ।
ठेवलेल्या रांडेला पुतळ्याची माळ ।
१७
काडी म्हणा काडी गुलाबी काडी ।
ठेवलेल्या रांडेला गुलाबी साडी ।
१८
इसाची चोळी तिसाच्य वेळा ।
खडीच्या लुगडयावर पुतळ्याच्या माळा ।
N/A
References : N/A
Last Updated : January 25, 2018
TOP