लोकगीत - गीत पहिले
लोकगीते ही लोकांची गाणी आहेत. जी कोणी एक व्यक्ति नाहीं तर पूर्ण समाज गात असतो. सामान्यतः लोकांत प्रचलित, लोकांद्वारे रचित आणि लोकांसाठी लिहीलेली गाणी यांनाच लोकगीते म्हणतात.
" माळ्यानं केला मळा, बंधुनीं केल्या केळीं ।
लिंबुणीला आळी करी, पलाणीला सीताफळी ।
उंच गेलीया नारळी ॥"
" सावळ्या सुरतीकडं नार बघती भरभरा ।
माझा बंधुराया कवळा राजीगरा ॥"
"संगत कर नारी शिण पाहुनी कवळी ।
माझा बंधुराया लिंबं झाडाला पिवळीं ॥"
"चालली गिरणबाई चाल तुझी अवखळ ।
माझ्या बंधवाची बाजुवाल्याची ताराबंळ ॥"
" आली आगीनगाडी दिसती काळीनिळी ।
बंधुनं ढासळली शिगनळा तुझी फळी ॥"
" चंचाळ नारीची हिची नजर चळली ।
बंधूला देखून डाळ दुधांत येळीली ॥"
" जातीची कळवातीण भल्याभल्याला होईना राजी ।
बंधूनं माझ्या जातां जातां कुठं केली ठकबाजी ?॥"
शेजीपाशीं गुज बोलून गेलं वाया ।
नाहीं माझी बया हुरदी साटवाया ॥
जातीयाची शीगा मोडूं नये ती बोटानं ।
तुझ्या पाठचा पठाण ॥
भावाच्या बहिणीनं काय आकरीत केलं ।
सोमवारीं नहाली पाणी बेलाच्या खालीं गेलं ॥
भावाच्या बहिणीनं वाकडी वाट केली ।
आपट्याखाली गेली गळाभरुन सोनं ल्याली ॥
माळ्याच्या मळ्यांत सर्प लोळे सावलीला ।
नको मारुं दादा गर्भ तुझ्या मावलीला ।
झाली तुला दॄष्ट, मीठमोहर्या रांधाच्या ।
आतां माझ्या बाळा माझ्या आखूड बांध्याच्या ।
माळ्याच्या मळ्यात ईसबंधाच्या आळशा ।
अशी झाली दॄष्ट तान्ह्या बाळाच्या बाळशा ॥
सकाळीं उठूनी मला लक्षा लाभ झाला ।
तुळशीच्या ओटयावरी करंडा कुंकवाचा सांपडला ॥
नाक तुझ डोळं न्याहाळीतें वजवज ।
माझ्या चंद्रभागे डोल्यावरलीं सारज ॥
मोठ मोठ डोळ तुझं बघणं टपाटपा ।
माझ्या बंधवा हरणीमागल्या काळवीटा ॥
"चैताच्या महिन्यांत चैती पालव फुटली ।
मावलीवांचून दुसर्या गोताला इतकी माया कोठली?"
"मावलीची माया सर्व्या बाळांवरी ।
चिमणी कोट करी जाईच्या कळ्यांवरी ॥"
" पिता माझा वड बया माझी करवंद ।
काशीला जाते वाट दोन्ही झाडांच्या मधून ॥"
"चंदन मौलागिरी नांव माझ्या पित्याईचं ।
असं गोड दुधु बया माझ्या नारळीचं ॥"
उगवला दिन जसा आगीचा भडका ।
सुवर्णाच्या तेजीं त्याला मोत्याच्या सडका ॥
उगवला दिन जशी शेंदराची पुडी ।
माझ्या बाळाला औक्ष मागतें वाढीदिडी ॥
उगवला दिन गगनी लावी ध्वजा ।
देव भगवान सार्या पॄथिमीचा राजा ॥
माझी अंगलट जशी कवाडाची फळी ।
माझी बयाबाई चोळी बेतून लाव कळी ।
माझ्या दंडभुजा जशा हिरीच्या बाजवा ।
बयाच्या दुधाला नाहीं लागला ताजवा ॥
मोठ मोठ डोळ बघण्याची रीत न्यारी ।
माझ्या बंधूराया चांद ढगांत गिरकी मारी ।
वाटॆनी कोण येतो निचाळ चालणीचा ।
माझा बंधुराया नवा जोंधळा पलाणीचा ।
गांवाला गेला कुण्या तिकडे माझा डोळा
माझा बंधुराया माझा नवतीचा पानमळा ।
गोरीचं गोरपण उसाच्या वाड्यावाणी ।
खेडचा राहणेवाला काय बघतो वेडयावाणी ॥
गोरीचं गोरपण जशी हरभर्याची डाळ ।
जीवीची मायाबहीण माझी पुतळ्याची माळ ॥
आम्ही तिघी बहिणी तीन गांवच्या तीन पेठा ।
माझा बंधुराया मला सातारा दिस मोठा ॥
तुझ्या जीवासाठीं होईन रानांतील हरण ।
माझ्या बंधुराया तुझ्या भोंवतालीं चरेन ॥
राम राम म्हणूं राम माझी साडी चोळी ।
उलटतें घडी सकाळीच्या प्रात: काळीं ॥
पुतळ्याची माळ माझ्या लोळती पाठीं पोटी ।
माझ्या बंधवाला चंद्रहाराला झाली दाटी ॥
गुज बोलायला मायलेकीचं गुज गोड ।
मावळाया गेली चांदणी सोप्या आड ॥
धनसंपत्तीला कुणी पुसना मालाला ।
किती महिने झाले तुझ्या कडच्या लालाला ?
सीतेला वधिली साक्ष आणिला तिचा हात ।
केगई सासू जेविली दूधभात ॥
सीतेला वधिली साक्ष आणिल तिच डोळ ।
राम धरणीला लोळ ॥
सीता चालली वनवासा कुकू कपाळ भरुनी ॥
तिचा अळींकार राम हेरीतो दूरुनी ॥
सीतेला घालवाया आयाबायांचा घोळका ।
संभाळा बायांनो राम भुकेचा आळका ॥
लक्षूमण दीरा सांग मनींचं कपट ।
नव्हं माहेराची वाट रान दिसतं अचाट ।
भयाण वनामधीं सीता रडते आईका ॥
तिला समजावया बोरीबाभळी बाईका ॥
सीता वनवासी दगडाची केली उशी ।
येवढया वनामधीं बाई झोप आली कशी ?
सीता नार बांळतीण तिला सुईण नाहीं कोणी ।
नेत्र झाकुयानी तातोबा घाली पाणी ॥
राई रुकमीण दोघी भांडती परसदारीं ।
विठ्ठलदेवाची तुळशी धाकलीनें पिर्त नेली सारी ।
रुकमीण बोल "माझ्या विठ्ठला पितींच्या ।
वाडयाला नका जाऊं तुळशी गरतीच्या " ॥
रुकमीण बोल " देवा पिरतीची कोण ?"
"काय सांगू रुकमीणी माझ्या तुळशीचं गुण ?"
रुकमीण बोल " जळो तुळशीचं जिणं ।
वर्षाच्या वर्षीं लावी देवाशीं लगीन "॥
सकाळीच्या पारी रुकमीण घालती रांगुळ ।
देव करीतो अंघोळ ॥
पंढरीच्या माळावरी उडती पिवळी माती ॥
रुकमीण सारवी रंगमहालाच्या आठ भिती ॥
पंढरीच्या वाट सांडला चुनाकात ।
विठ्ठल रुकमीण गेलीं जोडयानीं पान खात ॥
पंढरीची वाट कशानं झाली वली ?
रुकमीण न्हाली केस वाळवीत गेली ॥
N/A
References : N/A
Last Updated : January 23, 2018
TOP