बायांचीं गाणीं
लोकगीते ही लोकांची गाणी आहेत. जी कोणी एक व्यक्ति नाहीं तर पूर्ण समाज गात असतो. सामान्यतः लोकांत प्रचलित, लोकांद्वारे रचित आणि लोकांसाठी लिहीलेली गाणी यांनाच लोकगीते म्हणतात.
१
सकाळी उठून आळं लाविलं कारलीचं । रामा लाविलं कारलीचं ।
लाविलं नारळीचं की रोप उगवलं फणशीचं ।
फणसा सर्व्या अंगी काट । रामा सर्व्या अंगी काट ।
सर्व्या अंगी काट कीं आंत अमृताचं साठ।
आमच्या बायांचा फराळ । रामा बायांचा फराळ ।
बाया फराळ करती । रामा फराळ करती ।
बाया फराळ करती । की बाया द्वारकेला जाती ।
सोन्याच्य आधल्या । की बाया गुलाल मापिती ।
२.
कुणीकडनी आला सातजणींचा मेळा ।
येऊन का माळी माळ्याला दिला ।
माळी काय दचकून जागा झाला ।
नाहीं बायांनो माझ्या मळ्यांत पानफुलं ।
जाई शेवंती मोगरा डौलविला ।
कानीं काप कापला बहु बाळ्या ।
नाकीं नथ नथीला बहु टीका ।
गळ्यांत साखळ्या पुतळ्याच्या माळा ।
डबल दंडी येळा येळावर बाजीबंद ।
हातांत गोठ्पाटल्या म्होर नागमोडया बांगड्या ।
पायीं पैंजण झांझुर वाळं वाजे ।
किती मी वर्णू या बायांचा सिनगार साजे ।
किती मी वर्णू या बायांचा साज किती मी वर्णू ।
३.
घाटावरनं आल्या बाया कुठं जाता ग या बायांनो ।
आम्ही जातों कोंकणांत श्रीरामाच्या मुलखांत ।
त्यानच्या मुलखांत कशाची मौजे त्यानच्या मुलखांत ।
भवजालीं फुलझाडी मधीं पाण्याचा हौद मधीं पाण्याचा हौद ।
रामाई जानकी गिन्यानवंती गिन्यानवंती ।
बाया ओवाळिती दोही दोही हातीं दोही दोही हातीं ।
४.
नित्य पाण्याचा गारवा उगवली दवण्याची काडी उगवली दवणाची काडी ।
बागेमधीं कौलारी माडी बागेमधीं कौलारी माडी ।
खालून चालली आगीनगाडी खालून चालली आगीनगाडी ।
काय त्या गाडीचा थाटा काय त्या गाडीचा थाट ।
डबा जोडून साठ डबा डबा जोडून साठ डबा ।
पुढं काय बायांचा मठ वो तिथं काय बायांचा मठ ।
बाया फराळ करीती बाया द्वारकेला जाती ।
हिरवी पिवळी पातळं बाया खरीदी करीती ।
सोन्याच्या आधोल्या बाया गुलाल मापिती ।
गुलाल मापिती बाया गोण्याजी भरीती ।
गोण्याजी भरीती बाया उधळीत येती ।
५.
सडक बांधली मातीची लोखंडाच्या कांबीची सडक बांधली मातीची ।
वर पसरलं रोळ चालली आगीनगाडी वर पसरलं रोळ ।
बाया बसवल्या डब्यांत बाया बसवल्या डब्यांत बाया ।
गाडी गेली भिवंडीवरी गाडी गेली भिवंडीवरी ।
भिंवडी शहर ग अखंड बाजीबंदरा बोंड ।
मुंबई शहर ग भिवदंड वारा लागतो थंड ।
६.
आलवणी मालवणी बायांनी छंद घेतला छंदकरणी ।
छंद घेतला बाई छंदकरणी ।
सोनारदादा अन सोनारीणबाई ।
बायांची नथ झाली की नाहीं ?
आतां देतों मग देतों उशीर झाला ।
लाडक्या बायांनी छंद घेतला ।
आलवणी मालवणी बायांनीं छंद घेतला छंदकरणी ।
सोनारदादा अन सोनारीणबाई ।
बायांच्या बुगड्या झाल्या कां नाहीं ?
७.
आमना जमना टवटवीत आल्या बाया ।
नाकांतल्या नथीसाठीं रडत्याल बाया ।
अमना जमना टवटवीत आल्या बाया ।
गळ्यांतल्या सरीसाठीं रडत्याल बाया ।
८.
बायांना तोंड कुठून आणावे । माहीमचा सोनार बोलवावा ।
अंगणीं ओसरीं बसवावा । चंदनाचा पाट टाकावा ।
मोरांनी समया उजळाव्या । कापसाच्या वातीरे बनवाव्या ।
समया चारी शिलगवाव्या । त्याच्या उजेडांनीं बनवाव्या ।
कापराच्या ज्योती लावाव्या । त्याच्या उजेडांनी चढवाव्या ।
आखाडी कातींकी च्ल गणराया । आल्या गुजरणी बाया ।
बायांना येळा कुठून आणाव्या ? पुण्याचा सोनार बोलवावा ।
९.
मोठ्या घरच्या बाया आमच्या पाण्याला निघाल्या ।
पाण्या निघाल्या बाया तिथंच खोळंबल्या ।
फुलांच्या बागंमधीं बाया फुलाला खोळंबल्या ।
दुधुनच्या तळ्यावरी बाया आंघोळ्या करीत्यात ।
अंघोळ करीत्यात वो पितांबर नेसत्यात ।
पीतांबर नेसत्या येशींत उभ्या राहात्यात ।
बाया पाताळाला पाणी वो पातळाला ।
पहाटच्या पार्यामधीं बायांचा ढोलकुट वाजतो ।
बायांचा छबीना मिरवीतो ।
माहीमच्या पेढीवर बायांना तोडे घडवीतो ।
१०.
पिकल्या उमराखालीं बायांनी डाव जो मांडीला डाव जो मांडीला
बायांचा चौरंग सोन्याचा चेंडू झुगारीला मोत्याचा ।
चेंडू कैलासाला गेला चेंडू परतुनी माघारी आला ।
करदोळीच्या जाळी करदोळीच्या जाळी तिथं जंभूसंभू माळी ।
११.
हिरवी लवंग इलायची पानाची जंजिरी हिरवी लवंग इलायची ।
विडा बनत ग सुंदरी दशरथाची नारी विडा बनव ग सुंदरी ।
विडा घेर घे मुखात काय तुझ्या मनांत
माझ्या मनांत ग जगजेठी राजपणाच्या गोठी ॥
१२ .
सातजणी बाया आठवा कान्हा ।
मळ्यांत जातो कळ्या तोडितो । हार गुफीतो ।
लाडक्या बायांना संग घेऊन जातो ॥
१३.
चोळी शिवली अंगणांत बाया झाल्यात रंगणांत ।
चोळी ठेविली खुटीला बाया आल्यात भेटीला ।
चोळी ठेवली वाटींत बाया आल्या मिठींत ॥
१४.
चैत्र वैशाखीं चाफीया फुलाचा गजर भारी ।
मी बाई फुलवा पालखी जायाची ।
पालखीतं बसणार रथ केला तैयार ।
सोळा चाकें त्या रथाला वाहन खिडक्या त्याला ।
रुळ टाकले दुहीरी वर चाले आगीनगाडी ।
बाया बसती काय ड्ब्यामधें नाद गेला पुण्यामधें ।
पुणे शहर हो अखंड आणा बायांना गोंड ।
गोडे आणले कौशी चे बायांच्या हौशीचे ।
चोळीला लावले ते गोडे चोळी बायांना दंडे ।
चोळी ठेविली दांडीवर बाया आणल्या मांडीवर ।
चोळी ठेविली अंगांत बाया आल्या रंगात ।
सवाखंडी उद बायांच्या घटाला उजळीला ।
त्या उदाचा वास गेला घाटाच्या माथ्याला ।
सासुसासरा बायांना पुसूशीं लागला ।
कोकणी जाउनी बायांनो काय काय बात केली ।
गरिबांची बाळ ग त्यांची त्यांना उतरुन दिलीं ।
१५.
पिवळ्या शेवंतीच्या फुलांची आमुच्या बायांची आवड
बाया दादाला सांगती पिवळी शेवती मागती ।
तेथूनी दादा निघाले गेले वसई बाजारी ।
तिथं एक माळीण होती दे मला पिवळी शेवती ।
अरे तू कुणाच्या मुला पिवळी शेवती कशाला ।
अग मी बायाचा गवळा पिवळी शेवती बायांना ।
अरे तुझ्या बाया कुठें आहेत रे चल जाऊ दाखवरे मजला ।
बाया आहेत पनवेली शहराला चला दाउं दाखवतो तुजला ।
माळीण आली बायापाशीं दिली पिवळी शेवती ।
बाया हातांमधें घेती बाया डोक्यामध्यें भरीती ।
बाया डोक्यांत घालती बाया आरशामध्यें पहाती ।
बाया आरशामधे पहाती मनीं संतोष होती ॥
N/A
References : N/A
Last Updated : January 25, 2018
TOP