मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|घाटावरची लोकगीते|
४१ ते ५३

लग्नांतील गाणीं - ४१ ते ५३

हळदीचे घण भरतांना म्हणावयाचीं गाणीं


४१
मूठ मूठ बुका कीं मूठ मूठ फेका । हरी बाई माझ्या सख्या वरी।
गांवाला गेला गांवधरी । माघारी पाहीना घराकडी ।
संपत माझी शेला पुरी । रानींवनीं मला लावूं नका ।
जिवलग माझा प्राणसखा ।

४२
सखु सजणी ग रावण घरीं नाहीं सुकली जाई मनमोहना ।
राज सगळा ग लंकेला लावी ध्वजा मारवती राजा ॥

४३
घणु बाई घणु साता पुडियाचा घणु ।
मरी आई घरीं सोंवळं । आयबा घेती वाण ।
घणु बाई घणु साता पुडियाचा घणु ।
बहिरोबा घरीं सोंवळं आयबा घेती वाण ।

४४
घणु बाई घणु आणती घणु बाई घणु ।
पांच सवाष्णींचा घणु आणती घणु बाई घणु ।
तेलवण पाडूं तेलवण पाडूं ।
मरीआई घरीं ग लगीन आणती घणु ।
लक्ष्मीआई घरीं ग लगीन आणती घणु ।
गोपीनाथ घरीं ग लगीन आणती घणु ।
तेलवण चढूं आधी नवरदेवला मग नवरबाईला ।
तेलवण चढूं आधी म्हसूबारायाला मग मांगीरसाहेबाला ।
तेलवण चढूं आधीं मांगीरसाहेबाला नवरदेवाला मग नवरीबाईला ।

४५
गांवाला ग गेला कुण्या गांवाला ग गेला ।
चंदाखाली बंदाखाली मखमली डेरा दिला ।
रात्रींच्या ग चांदण्याला सखा माझा बंधु गेला । चंदाखालीं बंदाखाली ।
गांवाला ग गेला कुण्या गांवाला ग गेला ।
माळ्याच्या मळ्यामधीं जाईचं झाड । कळ्याचा भार । तोडिती नार ।
गुफिती हार । याची नवती डौलदार । जानीचा भार ।
गांवाला ग गेला कुण्या गांवाला ग गेला ।
कडकडी कीं धोतरजोडी । काळी पगडी । हाती अंग्ठ्या दंडपेट्या ।
खाली काय घसाची भिकबाळी ।
गांवाला ग गेला कुण्या गांवाला ग गेला ।
हिरवी चोळी मला । टिका बसविल्या त्याला । भिंग बसविलीं ठासून ।
चोळी आणली ग सद्‍गुरुपासून ग हरी बसून ॥

४६
गांवाला ग गेला कुण्या गांवाला ग गेला ।
याच्या मैतरच्या जोडया... चंदाखालीं बंदाखालीं मखमली डेरा दिला ॥
नार नकदार कुकुलिली अनिवार चंदाखाली...
भरल्या बाजारांत मला हातानं पालविली ।
हातानं ग पालविली माझ्या बंधवानं चोळी घ्यायला बोलाविली चंदाखाली ....
चंदनाव पाट मी टाकिलें ठायीं ठायीं ।
पोथी वाचायला यावं माझी विठाबाई ... बंदाखाली बंदाखाली

४७
गांवाला ग गेला कुण्या दाजीबा दिरा मोत्याचा तुरा ।
शिपी गेल्यात रहिमतपुरा माघारी फिरा ।
गांवाला ग गेला कृण्या सातार्‍या गडावरी ।
राघोजा दारीं चोचीनं पाणी सारी दारकावरी ।
फुल पडलय चंदरपुरीं करिती धावा ।
बानुला नेती  केव्हां कानड्या देवा ।
गांवाला गेला कुण्या सोन सौगडीला ।
अजून पाणी येईना नेई नर्मदेला राजा तान्हा जरा ॥

४८
अशी गेला कुण्या गांवा याचा घोर नाहीं मला ।
त्याच्या संगतीला देव मारवती गेला ।
दाजीबा दिरा बाजारीं चला । लागली तहान खंदावा झिरा ।
ऐन वनामधीं माळयाचा मळा । जाईचं झाड कळयाचा भार ।
तोडीती नार गुफिती हार । सुरत अनिवार चंद्राची कोर । सईबाई जानीचा भर ।
हरी उभाच उभा वाटेवरी कसा जाऊं देईना हरी ॥

४९
अशी गेला कुण्या गांवा याचा घोर नाहीं मला ।
त्याच्या संगतीला देव मारवती गेला ।
चला जाऊं आळंदी गांव पाहूं दवणा वाहूं ।
दवण्याची काय हवा शंभुदेवा । शंभूच्या शिखरावर बोल रावा ।
वामनाची द्रुपदा जितली त्यांनी पांडवांनी
यम्ना जम्ना जम्नाचं लाल पाणी किल्यामधीं हरहर बोला ।
गंगेला पूर आला पाह्या गेला सांगते सांगड्याला पेटी घाला प्राण गेला ।

५०
गांवाला ग गेला कुण्या गांवाला गेला ।
घडी घाल घडी घालावी सोयर्‍यादादा चुडं लाल ।
तुझ्या चुडयाची काय र हवा शंभूदेवा ।
शंभूच्या शिखरावरीं नामनामी ।
द्रुपदा जितली त्यांनी पांड्वांनीं ।
नीट बसावं सारंगपाणी सोनार घडूघडी ।

५१
अशी गेला कुण्या गांवा याचा घोर नाहीं मला ।
त्याच्या संगतीला देव मारवती गेला ॥
साजणी साजणी चिंतामणी । हिरव्या बनातीचीं मी यजमानिणी
राजाचा सुटला घोडा दरव्याला पडला वेढा ।
यमुना का जमुना मधें टाकिला डोल ।
पाणी हलना कां खिलना हरणी चाल चाल ।
नवरत्नाचा हार त्याला मोती चार - चार ।
आमुचा मुलुख वाण्याचा आमची बामणी बोली ।
हाती सोन्याची झारी पाणी पाजवा नारी ॥

५२
इटल इटेवरी रुख्मीण रावळांत ।
तिथून कथा होती दोघांचं एक चित्त,
कडकडीत दडदडीत । वीज लावली शहापुरीं । शहापुरीं जम्नांगिरी ।
गाया चारितो । आला ग आला ग बाई गगनीं गर्जत ।
खिडकींतून माडीतून । कोण ग बघतो । लटका माझा सावकार चंद्र डुलतो ।
भांडू नका तंडूं नका तुमची तुम्हांला । पदरचा पैसा देतें झेंडू फुलाला ॥
एक पैसा दोन पैसा केसरी गुलाब ।
असा दर्या खोल याचं पाणी किती गोड ।
सभेला पाणी गेलं राजांनी नवल केलं ॥

५३
गांवाला ग गेला कुण्या हलहलकडी कावडिया चाल ।
चमकती गळ्या दुलडी विजपरी लाल । गोडे चुनडी दंड
किती बोल नापका फूल झपका । जांबजाभळी विचार करीती । नारंगीची करुं लग्न
अंजीर नवरा वर पाहिला । वनस्पतीला या घेओनी
वड म्हणे आम्ही मोठमोठाल्या आम्हाला नाहीं आली चिठी ।
नको ग जाऊस रामफळी उगच होशील खटी ।
हात हात दाढी लांब लांब मिशा ।
मनीं बांधून कंबर । मांडव्यांत येऊन बसलं हळुंहळूं तें उंबर ।
पन्नास आंबा म्हण नांदुकी । शिरस बसले सभेसी ।
भरुनी लेखणी लिहुनी पत्र पाठवा वनस्पतीला ।
अंजीराची लग्न काढिली जल्दी या तुम्ही लग्नाला ।
केकतड म्हणे जाग रांडानो मनी सोडिल्या लाजा ।
मी आलें असतें पण पति धाडना माझा ।
एकळ टाकळ भांडत होती संवदड समजावी प्रीतीनें ।
बोर कुरवली आली धावुनी कवठ बसली न्हायाला ।
नागील म्हणे जाग रांडांनो तुम्हांला पुसतय कोण ।
मांडवाच्या दारी आहे भाऊ माझा मान ।
पेरु गुलाबी येईल मुर्‍हाळी मग मी जाईन ।
गुल तुर्‍यानं तुरा गुफीला कण्हेर बेटा भिकारी ।
गुलतुर्‍यानं तुरा गुफीला झेंडूचं फुल बराबरी ।

N/A

References : N/A
Last Updated : January 25, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP