मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|वेदस्तुति|
१६ ते २०

स्फ़ुट पदें व अभंग - १६ ते २०

' हरिवरदा ’ ग्रंथातील वेदस्तुती भागाची ही रसाळ प्राकृत भाषेत स्वामी श्रीकृष्णदयार्णव  स्वामींनी लिहीलेली टीका आहे.


१६ श्लोक ( शिखरिणी, श्रीगणपतिस्तवन)
नमो श्रीविघ्नेशा परशु-रद-पाशांकुशधरा ॥
धरापॄष्ठीं दुष्टां दमुनि करि निष्कंटक धरा ॥
कॄपादृष्टी दासांवरि करुनि तारी त्रिजगती ॥
गणाधीशा स्वामी तव चरणिं माझी निजगति ॥
गणाधीशा पायां भवतमशमाया नमितसें ॥
नसें मी कामार्थी, स्वरत, रतिकामा दमितसें ॥
नमीं पायां मायाजळनिधि तराया गणपती ॥
जसा सत्पत्नीचें परमगतिचें कारण पति ॥
कदा हेरबाचा वरदकर माथां जरि घडे ॥
तदा चित्सौख्याची ह्नदयभुवनीं खाणि उघडें ॥
विकल्पांच्या श्रेणीजनक तम अज्ञान विघडे ॥
अविद्येच्या नाशें तनुचरित दुष्कर्म न घडे ॥
तुझे पायीं दूर्वादळ-अमळचित्तार्पण करी ॥
तया बाधा क्रोधप्रमुख रिपुकंदर्प न करी ॥
दरिद्राच्या श्रेणी पळति करिं चिंतामणि धरी ॥
करंटा तो चिंतामणि त्यजुनि चिंता मनिं धरी ॥
तुझी चौथी भक्ती करिल तरि काळा न गवसे ॥
तसा तो ब्रहात्वीं निखिळ कनकांगी नग वसे ॥
दयाब्धीं तूं देवा सकळसुखठेवा प्रकट कीं ॥
भिकारी दुदैवें फ़िरति मनसा चित्रकटकीं ॥
न धुंडी धुंडीतें तनु मन समर्पूनि भजनीं ॥
नसे दुर्भाग्याचा अघगिरि तयासन्निभ जनीं ॥
करंटा कीं टाकी सुलभ परि चिंतामणि पुढें ॥
करी शुध्दात्मा तो स्तुति नमन चिंतामणिपुढें ॥
कटाक्षें विघ्नेशा वरिति विकटाक्षादि पदवी ॥
यश:श्री ब्रह्यंडीं धवळ मिरवी कीर्ति पदवी ॥
सुरश्रेणी मौळें न्यसिति पदिं नीराजनविधी ॥
करी कन्यादानें तव भजनिं आत्मार्पनविधी ॥
लघू तूं येकार्णा सबळ गुरु पंचाक्षरिं पडे ॥
लघू पंचास्यत्वें गुरु युगळदंपत्य रुपडें ॥
लघू त्रैविद्यांतीं परमगुरु सर्वा मुखरणी ॥
दयाब्धी चित्सत्ता अभिनव कवित्वीं शिखरिणीं ॥

१७ श्लोक ॥ (शिखरिणी, मल्लारिस्तवन)
नमो श्रीमललारी भवभय निवारीं झडकरी ॥
करीं घे खड्‍गातें मम अहित निकृन्तन करीं ॥
तुझा माझे माथां वरद कर होतां महिपती ॥
तदा मातें सन्मानिति बुध महेंद्रादि नॄपती ॥
तुझ्या नामोध्दाटें कळिमळ जळे अर्धघटिके ॥
टिके निष्ठा त्याला रिपुकॄत प्रयोगादि लटिके ॥
दया विद्या सत्ता विजय शुभकीर्ति प्रगटती ॥
जसे चंद्रासंगें पियुषरसरश्मी लगटती ॥
तुरंगाच्या स्वारा रिपुवनकुठारा मणिहरा ॥
हराया भूभारा उठति तव मायाब्धिलहरा ॥
नटें नाट्यें नाना सुरस कविता तूं शिकविता ॥
तुझ्या पादाब्जाचा स्तविल महिमा कोण कविता ॥
तुझा भंडारा जे उधळिति सदा भक्त शिरस । रसाळा शब्दांते वदति न सरी ते नवरसां ॥
यशस्वी ते होती नॄपसदनिं वादीरणमहीं । न बाधी त्यां दुष्टग्रह दुरित विघ्नादि यमही ॥
करी जो षष्ठीचें व्रत प्रतिपदेपासुनि बरें ॥
वरें त्या मल्लरी अचळ सुख देतो निज करें ॥
करी वारी यात्रा बहुविध सपर्या हरिकथा । कथा त्याची लोकत्रयभरित दाबी शिवपथा ॥
अहो, पांचै पद्यें स्तुति रचित मल्लारिचरणी । यथाज्ञानें पंचामॄत रसिकछदें शिखरिणी ॥
करी भक्तिप्रेमान्वित नरहरी रंक नमना ॥
गुरुच्या पादाब्जां.............दयाब्धी तनमना ॥

१८ श्लोक (शिखरिणी)
करावीं सत्कर्में इहपरफ़ळाशा न धरणें । स्वदीक्षेचें औपासन भजन सारांश करणे । गुरुप्रेमें संतां द्विजवरकुळां लागि नमिजे । दयाब्धीची आज्ञा रिपु दमुनि दुर्बुध्दि वमिजे ॥

१९ श्लोक (द्रुतविलंत्रित, कीर्तनमहिमा)
परिसतां निरसी भवघात रे । विवरितां भव हा अवघा तरे ॥
सहित पूर्वज वंश हि उध्दरे ।  कलियुगीं हरिकर्तन शुध्द रे ॥
कालिल कोटियुग्गार्जित फ़ार तें । हरिकथाश्रवणेंचि निवारते ॥
करिति साधन हें चि सुबुध्द रे । कलियुगीं०॥
न शकती श्रुति पावन ज्या करुं ॥
शकति ते भवपार कसा तरुं ॥
जड असे श्रवणेंचि विशुध्द रे ॥
कलियुगीं०॥
हरिकथा श्रवणें शिव डोलतो ॥
अझुनि घे शुकनारद डोल तो ॥
त्रिभुवनीं जपती सुर सिध्द रे ॥
कलियुगीं०॥
अमर ते मरणाप्रति मागती ॥
कलियुगीं घडताति शुभा गती ॥
म्हणुनि भागवतींच प्रसिध्द रे ॥
कलियुगीं०॥
सकळ भांडति शास्त्रजसंमतें ॥
परि न चालति एकविधा मतें ॥
परि तयांत कथा न विरुध्द रे ॥
कलियुगीं०॥
व्रत तपें जप होम समस्त कीं ॥
विषम पातक बैसल मस्तकीं ॥
भजनवांचुनि सर्व अशुद्ध रे ॥
कलियुगीं०॥
नर दयार्णव जो न भजेल कीं ॥
हरिकथाश्रवणीं उमजेल कीं ॥
तरि कदा मग तो जड नुध्दरे ॥
कलियुगीं०॥

२० कीर्तनसुधा (मालिनी, टाळी)
धन सकळसुखाचें कीर्तनीं वाटताहे । लुटिति करयुगें त्यां तुच्छ भू वातताहे ॥
धरिति मद तयांतें काळ देतो उटाळी । म्हणउनि हरिरंगीं वाजवा एक टाळी ॥
हरिजनवनशोभा कीर्तनीं वाढवावी ॥
कृपण कुटिलतेचीं कुश्चिळें झाडवावीं ॥
विकळ खळ निवारा ज्यांसि निंदा विटाळी । मग सकळ अनंदें वाजवा येकि टाळी ॥
अगणित गुण गाती कीर्तनीं नामघोषें । परिसत गजरानें श्रीषति पूर्ण तोषें ॥
स्मरण रघुपतीचें पातलें विघ्न टाळी ॥
म्हणउनि हरिरंगीं वाजवा एक टाळी ॥
कुटिळ खळ कुविद्या सांडिजे कर्म खोटें ॥
बटवट करितांही नातुडे सौख्य कोठें ॥
सकुळ यमपुरीतें नेत निंदा कुटाळी । हरहर मुखमंत्रें वाजवा एक टाळी ॥
नरहरी हरिरंगीं नाचतां नाम गा रे । विसरत हरि त्यांतें काळ देतो दगा रे ॥
क्षणभरी न करावी व्यर्थ चर्चा टवाळी ॥
स्मरत मुखिं दयाब्धी वाजवा एक टाळी ॥

N/A

References : N/A
Last Updated : December 23, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP