वेदस्तुति - श्लोक २९
' हरिवरदा ’ ग्रंथातील वेदस्तुती भागाची ही रसाळ प्राकृत भाषेत स्वामी श्रीकृष्णदयार्णव स्वामींनी लिहीलेली टीका आहे.
स्थिरचरजातय: स्युरयोत्थनिमित्तयुजो विहर उदीक्षया यदि परस्य विमुक्ततत: ॥
नहि परमस्य कश्चिदपरो न परश्र्च भवेद्वियत इवापदस्य लव शृन्यतुलां दघत: ॥२९॥ (१६)
॥ टीका ॥
अगा ये नित्य-मुक्ता स्वामी ॥
मायायुक्त होवूनि तुम्ही ॥
क्रीडतां चराचरात्मक द्विनामीं ॥
भवसंभ्रमीं उद्ववती ॥१०॥
नित्यमुक्ताची त्र्कीडा कैसी ॥
म्हणतां ऎक येविशीं ॥
मायेपासूनि दूर अससी ॥
लिप्त न होसी असंगत्वें ॥११॥
कैसा असंगत्वें विहार ॥
तरी योगसत्ताबळ ईक्षणमात्र ॥
लाहोनि माया सर्व जगत्र ॥
रची स्थिरचर साकल्यें ॥१२॥
नॄपाज्ञेच्या सत्ताबळें ॥
अष्ट प्रकॄति ऎश्वर्य मेळें ॥
राज्यभार जेंवि चळे ॥
किंवा जळें नांव जैसी ॥१३॥
तेंवि तुझीया ईक्षणसत्ता ॥
माया प्रसवे स्थिरचर भूतां ॥
द्विविध जातींच्या देहवंतां ॥
जीवां समस्तां जगदीशा ॥१४॥
येथ शंका हे करिसी जरी ॥
जे महा प्रळ्याच्या अवसरीं ॥
मजमाजीं लीन झालियावरी ॥
जीवां माघारीं केंवि परती ॥१५॥
मेघमुखें निवडिला सिन्धु ॥
पवनें विभागिले जलबिन्दु ॥
पुन्हा स्वकारणीं मिनल्या भेदु ॥
उरे हा अनुवाद केंवि घडे ॥१६॥
ऎसें म्हणसी जरी परेशा ॥
तरी अविद्यावरणें जीवां अशेषां ॥
ते तुजमाजीं संस्कारलेशा ॥
सहित स्वकारणीं लीन होती ॥१७॥
अविद्या मायेमाजी लीन ॥
माया तुजमाजी सुलीन ॥
पुढती होतां तव ईक्षण ॥
करी उत्थान तव सत्ता ॥१८॥
लाहोनि सत्तायोगबळ ॥
माया प्रसवे ब्रह्यांडगोळ ॥
तैं अविद्यावरणाथिले सकळ ॥
जीव केवळ जन्मती पैं ॥१९॥
तुझिया ईक्षणें उत्थितें ॥
होती जीवांची निमित्तें ॥
तीं कमैं त्या जीवांते ॥
देती योनींतें उच्चावचा ॥२०॥
निमित्तें म्हणजे कर्मसंस्कार ॥
लहोनि तुझें ईक्षणमात्र ॥
उठती जीव तदनुसार ॥
गात्रां पात्रहोत्साते ॥२१॥
येथ शंका करिती श्रुति ॥
झणें तूं म्हणसी जगत्पति ॥
मज मीनल्या कर्मैं पुढती ॥
निमित्तें होतीं कां म्हणिजे ॥२२॥
माझिया ईक्षणमात्रें जीव ॥
उत्पन्न होती सर्वत्र सर्व ॥
तेथ निमित्ताचा भाव ॥
कां पां वाव कल्पावा ॥२३॥
ऎसें म्हणसी जरी जगदीशा ॥
तरी तुजपासूनि परम पुरुषा ॥
केंवि वैषम्यें जीवां अशेषां ॥
जन्म कैसा घडेल ॥२४॥
तूं तो परम कारुणिक ॥
तुजपासूनि जैं समस्त लोक ॥
समान सुखभोक्ते सम्यक ॥
अससी निष्टंक तैं देवां ॥२५॥
आकाशा परी सदा सम ॥
स्वपर-भेद नसे विषम ॥
श्रुतिप्रतिपाद तुझें साम्य ॥
तूं अगम्य वाडनसा ॥२६॥
असत् म्हणिजे अव्यक्त रुपें ॥
हें विश्व होतें पडपें ॥
तेथूनि पुढती सत्स्वरुपें ॥
होती ऎसें श्रुति बदती ॥२७॥
तस्मातु शून्यपूर्वक विश्व ॥
ऎसा श्रुतींचा अभिप्राव ॥
शून्या समान तूं वासुदेव ॥
वससी स्वयमेव पूर्णत्वें ॥२८॥
शून्य न होति शून्यासम ॥
तो तूं केवळ परब्रह्य ॥
न शकती प्रतिपादूं तव धाम ॥
वाड्यान अनाम अगोचर तें ॥२९॥
तस्मात् सम विषम हे जीव ॥
कर्मसंस्कारें होती सर्व ॥
तूं परमात्मा वासुदेव ॥
वससी स्वयमेव असंगत्वें ॥३०॥
अविद्योपाधि जीव ऎसे ॥
संसार पावती संस्कारवशें ॥
तेथही तव भजनाच्या लेशें ॥
निश्चयींसे आथिजती ॥३१॥
ऎसे वदोनिया श्रुति ॥
पुढती काय शंका करिती ॥
ती परिसावी सावध श्रोतीं ॥
अवतारणिके माजीवडी ॥३२॥
अविद्याकॄतकार्योपाधि ॥
तवांश जीव जरी त्रिशुध्दी ॥
तरी हे पडिले अविद्याबधीं ॥
कवणे विधी सुटती हे ॥३३॥
जरी अविद्याअ उपाधि एक ॥
तरी जीव कैसेनि अनेक ॥
एकत्व म्हणतां मुक्ति देख ॥
एका सरिसी सर्वातें ॥३४॥
वास्तवबोधें एक जीव ॥
अविद्या भ्रम हे जाणोनि माव ॥
स्वसंवेद्यता अनुभव ॥
लाहोनि स्वयमेव निर्मुक्त ॥३५॥
तयाचि सरिते सर्व मुक्त ॥
म्हणणें तुम्हांसि हें संमत ॥
कीं अनेक अविद्यांश येथ ॥
तध्दिम्बित एक जीव ॥३६॥
जरी म्हणाल जीव एक ॥
पंरतु अविद्याभेद अनेक ॥
तरी मग मोक्ष न घडे देख ॥
अविद्या पृथक उरलिया ॥३७॥
तस्मात् इत्यादि तर्कबळें ॥
अनेक जीव अविद्यामेळें ॥
प्रतिपादितां अबळां कळे ॥
निर्दोष मोकळें प्रमेय हें ॥३८॥
यावनाळांचा एक कण ॥
कणिशदशक त्यापासूम ॥
एक्या कणाची तयांतून ॥
कानीं होऊनि परिणमतां ॥३९॥
कणशदशक तया सरिसी ॥
कानी सहसा नोहे जैसी ॥
बीजभावें संसरणासी ॥
पावणें घडे कीं ना हो ॥४०॥
तेंवि एका अधिकारिया जीवा पाडें ॥
सर्व जीवांसि मुक्तता न घडे ॥
अविद्यादामनीं सुटे पेडें ॥
मोकळा पडे तोचि पशु ॥४१॥
आणि अंशरुपें म्हणतां जीव ॥
अगुणत्वपरिमाणें वास्तव ॥
कीं मध्यमपरिमाणें सावयव ॥
देहा एवढा म्हणतसां ॥४२॥
कीं महत्परिमाणें गगना ॥
समान जीवां बृहत्व माना ॥
तैं मग अंशरुपें नाना ॥
म्हणणें न घडे सर्वथा ॥४३॥
औट हात प्रमाण देह ॥
त्यामाजीं अणुमात्र जीव राहे ॥
तैं तो एक देशीं वसतां होय ॥
व्यापक नोहे सर्व देहीं ॥४४॥
म्हणाल देह सावयव ॥
तयामाजीं तैसाचि जीव ॥
तैं त्या आलें अनित्यत्व ॥
नव्हे यास्तव चिद्रुप ॥४५॥
गृहामाजी एकदेशीं ॥
दीप राहोनि गृहा प्रकाशी ॥
अणुत्वें जीव तेंवि देहासी ॥
व्याण्नि राहे म्हणाल ॥४६॥
तरी दीपासि लावितां स्निग्ध वाति ॥
तेथ उजळे तस्काळ ज्योति ॥
प्रकाशामाजीं धरितां हातीं ॥
नुजळे कल्पान्तीं वर्तिका ॥४७॥
जीव शरीरीं सर्वा ठायीं ॥
व्यापक चैतन्यरुपीं पाहीं ॥
केश ओढितां ठायींच्या ठायीं ॥
सुखदु:खांचा जाण असे ॥४८॥
तरी जितुके देह तितुके जीव ॥
म्हणतां भेदासि झाला ठाव ॥
अभेद अद्वय जें वास्तव ॥
तैं तें वाव श्रुतिवाक्य ॥४९॥
इत्यादि अनेक शंका श्रुति ॥
करुनि पुढती उपसंहारिती ॥
जीव नित्य सर्वग म्हणती ॥
कोणा एका ॠषिमतें ॥५०॥
जीव सर्वग नित्य म्हणतां ॥
पूर्वोत्त्क शंका नुधविती माथा ॥
अविद्याभेदें अनेकता ॥
जीवांसि वदतां दोष नसे ॥५१॥
म्हणोनि अविद्याभेदें करुन ॥
अथवा तच्छक्तिभेदें जाण ॥
बध्दमुक्तता संभवन ॥
मायिक घडे भ्रमास्तव ॥५२॥
भेद असाच जेव्हां होय ॥
तैं बध्दमुक्तताही तत्प्राय ॥
ईश्वरपदीं याची सोय ॥
कोण्या अंशें न स्पर्शे ॥५३॥
बध्दमुक्ततेची जैं हे परी ॥
तैं स्वत:सिध्द ऎक्य जीवेश्वरीं ॥ ।
त्रिशुध्दि नि:संशय निर्धारी ॥
श्रुतिवैखरी प्रतिपादी ॥५४॥
आणि पूर्वोक्त शंका बॄहदारण्यीं ॥
अंतर्यामीं नाम ब्राह्यणीं ॥
न साहोनि अद्वैत वाणी ॥
वास्तव म्हणोनि प्रतिपाद्य ॥५५॥
ते चि येथ आर्ष श्रुती ॥
सनंदनोक्त शुक भारती ॥
श्रवणीं सादर परीक्षिती ॥
तैशीच श्रुती परिसावी ॥५६॥
N/A
References : N/A
Last Updated : December 23, 2017
TOP