वेदस्तुति - श्लोक ४०
' हरिवरदा ’ ग्रंथातील वेदस्तुती भागाची ही रसाळ प्राकृत भाषेत स्वामी श्रीकृष्णदयार्णव स्वामींनी लिहीलेली टीका आहे.
त्वदवगमी न वेत्ति भवदुत्त्थशुभाशुभयोर्गुणविगुणान्वयांस्तर्हि देहभृतां च गिर: ॥
अनुउयगम्मच्वहं सगुणगीतपरंपरया श्रवणभॄतो यतस्तवमपवर्ग गतिर्मनुजै: ॥४०॥ (२७)
॥ टीका ॥
श्रुति म्हणति अगा ये सगुणा ॥
षड्गुणैश्वर्यसंपन्ना ॥
श्रीभगवंता नारायणा ॥
सचिद्घना जगदीशा ॥४९॥
तूं जो सर्वभूतीं अनुस्यूत ॥
उपादानत्वें संतत ॥
त्या तुझें ज्ञान ज्या निश्चित ॥
तो बोलिजे त्वदवगमी ॥५०॥
ऎसा स्वानुभवें तव ज्ञानवान ॥
अभेद आत्मावबोधें पूर्ण ॥
त्या प्रवृत्तिबोध होय शून्य ॥
तेचि लक्षण परिसावें ॥५१॥
तूं कर्मफ़ळाचा दाता ॥
भूतमात्रांचा नियंता ॥
तुज ईश्वरापासूनि तत्त्वता ॥
आविर्भूत कर्मफ़ळें ॥५२॥
पूर्वजन्मीं जीं अर्जिलीं ॥
कर्में पुण्य पापाथिलीं ॥
तत्फ़ळभूतें जीं बोलिलीं ॥
सुखदु:खें भलीं अनेकथा ॥५३॥
तया सुखदु:खांचे सबंध ॥
जरी होताती अगाध ॥
तथापि ज्ञानी केवळ शुध्द ॥
नेणेचि प्रसिध्द तयांतें ॥५४॥
तव स्वरुपानुभवीं निमग्न ॥
देहभावीं उदासीन ॥
म्हणोनि न करीच अनुसंधान ॥
सुखदु:खाख्यसंबंधीं ॥५५॥
सुखदु:खसंबंध जडती कैसे ॥
तरी इन्द्रिविषयसंयोगवशें ॥
प्रारब्धवशात् देहाध्यासे ॥
तें संक्षिप्तसें कथिजेल ॥५६॥
मानापमान निन्दास्तुती ॥
शीतोष्णमृद्वादि स्पर्शोत्पत्ति ॥
सुन्दरभीकररुपप्रतिती ॥
होतां उमटती सुखद:खें ॥५७॥
सुरसविरस अन्नें पानें ॥
कीं सुगंध-दुर्गध अवघाणे ॥
हें कांहींही ज्ञानी नेणे ॥
पूर्णज्ञानें आथिला ॥५८॥
देहप्रारब्धें अनायासीं ॥
सुखदु:खसंबंध निश्चयेंसी ॥
इत्यादि होती परी तयासी ॥
न कळे विशेषी स्वानुभवीं ॥५९॥
अंत:करणादि वृत्ति परम ॥
अधिष्ठिती इन्द्रियग्राम ॥
तैं देहाध्यासें विषयभ्रम ॥
होय निस्प्तीम प्रत्यक्ष ॥६०॥
त्या वृत्ति झालिया स्वरुपींलीन ॥
कोण सांभाळी इन्द्रियगण ॥
तेव्हां बाह्य विपरीत ज्ञान ॥
सहज संपूर्ण मावळलें ॥६१॥
यास्तव ज्ञानी द्वंद्वरहित ॥
न होय सुखदु:खें मोहित ॥
आत्मा नुचिन्तनें संतत ॥
अक्षय आनंद भोगीतसे ॥६२॥
जरी अदृष्टें भद्रासनीं ॥
महत्वें बैसविला ज्ञानी ॥
तरी तेथींचेनि श्लाघा न मनी ॥
कीं रंकपणीं नाभिभवे ॥६३॥
अथवा ईश्वर माननि स्तविला ॥
किंवा निन्द्यत्वें निखंदिला ॥
तोषरोषा न पवे भला ॥
कीं अभेद बाणला प्रत्यय ॥६४॥
प्रारब्धें नानाविलास ॥
सहज प्राप्त झाले विशेष ॥
कीं वरपडला त्रितापास ॥
तरी सुखदु:खास नाठवी ॥६५॥
देहतादात्म्य गेलियावरी ॥
द्वंद्वभावना निरसली पुरी ॥
चित्मुख पावला अंतरी ॥
अक्षय निर्धारीं पूर्णत्वें ॥६६॥
जेंवि अमॄत प्राशूनि धाला ॥
तो षड्सां न स्मरे वहिला ॥
तत्प्राप्तीस्तव तोषला ॥
कीं न होतां दुखावला हें न घडे ॥६७॥
कामधेनु जयासि प्राप्त ॥
तो कैं अजेसि आठवीत ॥
मा लाभालाभीं तयेच्या होत ॥
खेदमोदमय ह्नदयीं ॥६८॥
असो श्रुति म्हणती भगवंता ॥
ऎसा तव रुपाभिज्ञ तत्त्वता ॥
नि:शेष नेणें प्रारब्धजनिता ॥
सहज प्राप्तां सुखदुखां ॥६९॥
तरी देहाभिमानी जे नर ॥
नेणती आत्मा परात्पर ॥
तयांच्या ज्या सधर ॥
संसारपर साकांक्ष ॥७०॥
त्या प्रवृत्तिनिवॄत्तिकारका ॥
केवळ विधिनिषेधात्मका ॥
विगत-देहाभिमानें नेटका ॥
नेणे अशेखा कदापि तो ॥७१॥
अमुकें बोलावें न बोलावें ॥
अमुकें करावें न करावें ॥
अमुकें स्पर्शावें न स्पर्शावें ॥
कीं न देखावें देखावें ॥७२॥
अमुकें भक्षावें न भक्षावें ॥
अमुकें त्यागावें अवश्य ध्यावें ॥
ऎसे विधिनिषेध बरवे ॥
वदती सत्यवें देहभृत ॥७३॥
या सुकृतदुष्कृतजनका वाणी ॥
सुखदु:खें फ़ळती निदानीं ॥
ज्ञानी नेणेचि निपटूनी ॥
देहाभिमान गेलिया ॥७४॥
जेव्हां देहाभिमानाचा विलय ॥
शुध्द बाणला आत्मप्रत्यय ॥
सबाह्य कोंदलें चिन्मय ॥
नाठवे कार्य कांही ही ॥७५॥
जेंवि पेटिके वरी खंडेराय ॥
जवळी म्हाळसा सारमेय ॥
पूजकातें स्पर्शसंशय ॥
कळतां स्वर्णमय न होय कीं ॥७६॥
व्याघ्रसिंहादि वाताशक ॥
कामधेन-अश्व अनेक ॥
चित्रींव भित्तीवरी सम्यक ॥
देखतां भय तोख न उपजे ॥७७॥
कारणत्वें आघवी भिंती ॥
भासते मृषा भासती ॥
तेंवि ज्ञातया जगत्प्रतीती ॥
नाहींच निश्चित ब्रह्यत्वें ॥७८॥
वस्तु अद्वितीय कारण ॥
मिथ्याअ विवर्तप्रपंचभान ॥
तें वास्तव बोधें उडालें पूर्ण ॥
विधिनिषेध म्हणोन अनोळख ॥७९॥
एवं हाचि इत्यर्थ येथ ॥
विधिनिषेधीं सज्ज न होत ॥
जगद्वोधाभाव निश्चित ॥
त्या जाला संतत तव बोधें ॥८०॥
ऎसें ज्ञात्याचीं लक्षण ॥
जे सबाह्य विकारहीन ॥
हें त्यांसी युक्तचि पूर्ण ॥
येथ विलक्षण कोण म्हणे ॥८१॥
ज्या कारणास्तव जिहीं मनुजीं ॥
तव प्राप्तसाधक विवेकपुत्र्जीं ॥
अनुदिनीं श्रवणें करुनि सहजीं ॥
चितामाजिं तूं धरिलासी ॥८२॥
तयासी मोक्षरुपा गति ॥
तूं निश्चयें होसी जगत्पति ॥
जरी म्हणसी ते कवणे रीति ॥
श्रवणें चित्तीं मज धरिती ॥८३॥
तरी युगानुयुगीं जे परंपरा ॥
ब्रह्यनिष्ठाची ज्ञानपरा ॥
उपदेश संतति ते निरंतरा ॥
शिष्योपशिष्यीं विस्तॄत ॥८४॥
तो संतांचा संप्रदाय ॥
जेणें सम्यक ज्ञान होय ॥
तदनुसार साधनोपाय ॥
करुनि प्रत्यय अवगमिती ॥८५॥
अनन्यभावें सदगुरु शरण ॥
होऊनि इच्छिती तत्त्वज्ञान ॥
तैं परंपरागत उपलभ्यमान ॥
देशिक आपण उपदेशी ॥८६॥
तें देशिकोपदेशें निजसार ॥
तव रुप केवळ परात्पर ॥
श्रवण करुनि अति तत्पर ॥
चित्तीं सादर धरिताती ॥८७॥
तत्त्वमस्यादि महावाक्यांवरुन ॥
आपण अभेद तुजसीं पूर्ण ॥
जाणोनि टाकिती देहाभिमान ॥
तव चिन्तन दॄढ करिती ॥८८॥
एवं सत्यंप्रदायें श्रवणभृत ॥
अपवर्गगति तूं इत्त्थंभूत ॥
त्यांसी होसी हे निश्वत ॥
असे युक्त यथार्थ पैं ॥८९॥
इतुक्या कथनाचा इत्यर्थ ॥
हाचि येथें यथातथ्य ॥
कीं तत्त्वज्ञानी जे यथार्थ ॥
त्यां नाहीं किंचित दैहिक हें ॥९०॥
दैहिक जो हा कर्माधिकार ॥
याची शंका ही किंचिन्मात्र ॥
न वर्ते त्यांसि कीं प्रबोध प्रचुर ॥
सबाह्य अंतर जयांचें ॥९१॥
हें आश्र्चर्य नव्हे कीं फ़ार ॥
जी सगुण तव भक्तितत्पर ॥
तव कथाश्रवणादि निष्ठासार ॥
धरिती निरंतर मानसीं ॥९२॥
तव पदाची ज्यां जवळिक ॥
सप्रेमयोगें जे नि:शंक ॥
त्यांसी ही विधिनिषेध बाधक ॥
न होती निष्टंक कदापि हे ॥९३॥
मा वास्तव बोधे संकल्परहित ॥
त्यां कें विधिनिषेध बाधित ॥
जेंवि स्वप्नींचे विविधा आचरित ॥
झालिया जागृत मॄषा गमे ॥९४॥
श्रोते शंका करिती येथ ॥
संत विशेषें स्वधर्मपथ ॥
आचरत असतां येथ हें उक्त ॥
हा निश्चितार्थ केंवि असे ॥९५॥
तरी ऎका जी सुनिश्चित ॥
संतांच्या दोनी कोटी येथ ॥
संप्रज्ञात असंप्रज्ञात ॥
हे उभयता मुक्त सम जाणा ॥९६॥
त्यांमाजी केवळ कल्पनातीत ॥
परमंहस दीक्षामंत ॥
ते जाणावे असंप्रज्ञात ॥
विधिनिषेध त्यां नाहीं ॥९७॥
आणि संप्रज्ञात समाधिस्त ॥
केवळ लोक संप्रहार्थ ॥
कामनाशून्य अभिमानरहित ॥
आचरती संतत सहजास्थिति ॥९८॥
जनाकारणें तदनुकार ॥
करुनि दाविती बाह्याकार ॥
अंतरी नि:शंक आत्माकार ॥
वृत्ति निरंतर जयांच्या ॥९९॥
हे त्यांहूनि महंत अधिक ॥
जगदुद्वारी जे सम्यक ॥
सदाचारणें शिक्षिती लोक ॥
प्रबोधें तारक जड जीवां ॥१३००॥
यद्यदाचरति श्रेष्ठ: । तदनुसार स्पष्ट ॥
परि अंतरी विधिनिषेध पोचट ॥
जाणती चोखट आत्मज्ञान ॥१॥
आणि इतर जे कपट योगी ॥
केवळ अज्ञान भोगानुरागी ॥
तें इहामुत्रीं दु:खभोगी ॥
होती सोंगी उभयभ्रष्ट ॥२॥
ऎसा येथींचा इत्यर्थ ॥
वदूनि वक्ता समर्थ ॥
आशंकोनि पुन्हा बोलत ॥
तें सुनिश्रित परिसिजे ॥३॥
म्हणे त्वदवगमी न जाणे ॥
सुखदु:खाख्य लक्षणें ॥
आणि विधिनिषेधाकारणें ॥
हें बोलणें विस्तरिलें ॥४॥
तरी वितर्के पाहतां येथ ॥
तत्व जाणावया इत्थंभूत ॥
केंवि शक्य न कळे मात ॥
दुरवमत्व कथिलेंसे ॥५॥
यास्तव हें सत्यचि विचारितां ॥
जें अनवगाह्यमहिम्न तत्वता ॥
जयाची वाड्मना अगोचरता ॥
अवषयें पाहतां तज्ज्ञान ॥६॥
म्हणिजे साक्षित्वें परिच्छिन्न ॥
जाणिजे तें विषयत्वें ज्ञान ॥
तैसें नोहे अभेद पूर्ण ॥
जाणणें ग्रासून सन्मात्र ॥७॥
ऎसें दर्शवीत होत्साता ॥
श्रुतिसंमत जाला बोलता ॥
जें याज्ञवल्क्य तत्त्वता ॥
प्रबोध वनिता ब्रह्यष्ठा ॥८॥
अवो ये गार्गि तत्त्व तें जाण ॥
जें उर्ध्व असे स्वर्गाहून ॥
पॄथ्वीहून खालें सघन ॥
हे द्यावाभूमी ज्यामाजीं ॥९॥
जें होवोनि गेलें होत ॥
होणार तें ज्यामाजी निश्चित इत्यादि श्रुतिप्रतिपादित ॥
अपरिमित महिमान प्रतिपादी ॥१०॥
तें संनदनोक्त भाषण ॥
विशद श्रुतीचें स्तवन ॥
प्रबोधी नारदा नारायण ॥
शुक भगवान म्हणे नृपा ॥११॥
N/A
References : N/A
Last Updated : December 23, 2017
TOP