मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|भक्त लीलामृत|

भक्त लीलामृत - अध्याय ५१

महिपतिबोवांच्या वाचेला सिद्धी होती, म्हणूनच हा ग्रंथ जो भक्तिभावाने व एकाग्रतेने वाचील त्याला फलश्रुतीचा अनुभव खचितच येणार.


॥ श्रीगणेशाय नमः ॥

जय अनाथबंधु पंढरीनाथा । कृपासागरा रुक्मिणीकांता ।

विश्वव्यापका कमळोद्भव ताता । तूं निजभक्त कथा वदविसी ॥१॥

तुवां अघटित केलें रुक्मिणीपती । ग्रंथ लिहविला मूढा हातीं ।

आपल्या दासांची सत्कीर्ती । प्रगट त्रिजगतीं व्हावया ॥२॥

वारियाच्या स्वमतें करोन । हाले तृणाचें बुजावणें ।

तेवीं मी बोलिलों पुरें उणें । हें तुझे सत्तेनें पांडुरंगा ॥३॥

दातियाच्या आश्रयें साचार । याचक कंठिती संसार ।

कां डोळसा धरोनियां कर । आंधळे सत्वर चालती ॥४॥

तेवीं तुझ्या कृपेनें श्रीहरी । मी बोलिलों आरुष उत्तरीं ।

आतां हीं वचनें सरतीं करी । सत्कीर्ती चराचरीं विख्यात ॥५॥

आतां सावधान असावें श्रोता । कळसाध्यायासि आली कथा ।

जैसें दधि मंथन करितां । मग नवनीत हातां येतसे ॥६॥

कां कृषीवळ कष्ट करी फार । अंबुधर वर्षला अपार ।

मग अठरा धान्यें पिकलियावर । रास थोर पूजिती ॥७॥

तेवीं पांडुरंगकृपेनें साचार । पिकलें भक्तलीलामृत क्षेत्र ।

हें तुमचे दैव असे थोर । यासि अंतर असेना ॥८॥

मागिले अध्यायीं चरित्रें निश्चिती । जन जसवंतासि पावला मारुती ।

आणि निरंजन स्वामीची देखोनि भक्ती । शाळग्रामासि अवचितीं सोंडफुटे ॥९॥

आणि कृष्णदास जयराम थोर । यानें सद्गुरुसेवा केलीं आदरें ।

शंकराचार्यासि चमत्कार । दाखविला साचार तयानें ॥१०॥

आतां धामणगांवामाजी निश्चित । माणकोजी पाटील प्रेमळ भक्त ।

प्रेमें पांडुरंगाचें भजन करीत । चित्तीं विरक्त होऊनियां ॥११॥

ममतायी त्याची निजकांता । परम भाविक पतिव्रता ।

वैराग्य होतांचि प्राणनाथा । अनुकूळ परमार्था ते असे ॥१२॥

ते प्रथम पुत्र प्रसवली जाण । लखमोजी पाटील नामाभिधान ।

परी पितयाचें सप्रेम भजन । त्याजकारणें नावडे ॥१३॥

म्हणे संसारासि घालोनि पाणी । पिता लागला नामस्मरणीं ।

पिशुन हांसती आम्हां लागूनि । लज्जा मनीं वाटतसें ॥१४॥

लखमोजी धाकुटा सुलक्षण । यमाजी तयाचें नामाभिधान ।

तिसरा पुत्र विठोबा जाण । असे लहान बालत्वें ॥१५॥

परी मधील यमाजी सर्वकाळ । असे बोधल्यसि अनुकूळ ।

कीर्तन करितां भक्तप्रेमळ । वाजवीत टाळ्या त्यामागें ॥१६॥

सांडोनि लज्जा मान लौकिक । सोडोनि आशापाश देख ।

ध्रुपद धरी सप्रेम सुखें । अति हरिखें निजप्रीतीं ॥१७॥

बोधल्याची स्थिती उदार । परम सुशीळ सत्वधीर ।

याचकासि न वंची अणुमात्र । लुटविलें समग्र शेत त्याणें ॥१८॥

मग प्रसन्न होऊनि हृषीकेशें । थोट्यां ताटासि आणिलीं कणसें ।

रीतीं पेवें तीं बहुवसें । धान्य विशेषें त्यांत भरलें ॥१९॥

तन मन आणि धन । पांडुरंगासि केलें अर्पण ।

तेणें सत्कीर्ती प्रकटली जाण । म्हणती श्रीहरी प्रसन्न यासि असे ॥२०॥

क्षुधितांसि घालीत अन्न । तृषाक्रांतासि पाजीत जीवन ।

कांता पुत्र अनुकूळ म्हणवून । सत्वासि हानी करीना ॥२१॥

यमाजी पुत्र त्याची पत्नी । परम भाविक सुलक्षणी ।

भागीरथी नाव तिजलागुनी । लावण्यखाणी पतिव्रता ॥२२॥

सासू सासर्‍यांचें मनोगत । राखोनि संसारीं वर्तत ।

जे जे काळीं याचक इच्छित । तें अनुकूळ करीत नसतांही ॥२३॥

सप्रेमभावें तये क्षणीं । नामस्मरणी रंगली वाणी ।

बोधराज उभे राहतां कीर्तनीं । एकाग्र श्रवणीं बैसत ॥२४॥

बोधल्याची सप्रेम स्थिती । आधीं देवासि करोनि आरती ।

ओवाळुनियां रुक्मिणीपती । मग कीर्तनासि करिती प्रारंभ ॥२५॥

आधींचें पाठांतर नसेचि जाण । प्रासादिक कविता बोले आपण ।

मागें पांडुरंग रुक्मिणीरमण । टाळ धरोनि उभा असे ॥२६॥

जें सकळ रंगाचें दैवत । कीर्तनामाजी धरी ध्रुपद ।

श्रोते मिळती असंख्यात । प्रेमभरित मग होती ॥२७॥

टाळविणा मृदंग सुस्वरें । नादब्रह्में कोंदाटलें अंबर ।

त्यावरी टाळियांचा गजर । ऎकतांचि विरे देहभान ॥२८॥

भागवत धर्म जे निश्चित । नाम महिमा अति अद्भुत ।

कीर्तन स्थापित भक्तीपंथ । सप्रेम संत ऎकती ॥२९॥

बोधल्याची सत्कीर्ती ऎकोनी श्रवणीं । अविंध राजा संतोषे मनीं ।

मग तत्काळ भृत्य पाठवोनि । गेला घेऊनि तयासीं ॥३०॥

बोधराजासि बोले उत्तर । तुवां कुफराणा वाढविला असे थोर ।

कैसा आहे तुझा पितर । तरी कांहीं चमत्कार दाखवीं ॥३१॥

मग मांसान्न रांधोनि जाण । झांकोनि आणिलें त्या दुर्जनें ।

म्हणे हें आतां भक्षुनि जाण । मुसलमान तूं होई ॥३२॥

ऎसें संकट पडतांचि तेव्हां । मग पांडुरंगाचा मांडिला धावां ।

म्हणे पंढरीनाथा देवाधिदेवा । पाव केशवा सत्वरी ॥३३॥

माता पिता बंधु चुलता । तुजवीण नसे पंढरीनाथा ।

तुवां जरी उपेक्षिलें आतां । तरी मज अनाथा कोण असे ॥३४॥

ऎसा धावां करितां निश्चित । नेत्रीं लोटले अश्रुपात ।

तों बोधल्यासि पावले रुक्मिणीकांत । तें ऎका निजभक्त भाविकहो ॥३५॥

मांस आणिलें भक्षावयासि । रुमाल उघडोनि दाखविती तयासी ।

तों गुलाबाचीं फुलें जैसीं । जाहलीं दृष्टीसीं दिसती ॥३६॥

ऎसें आश्चर्य देखोनि तेथें । रायासि नेऊनि दाखविती भृत्य ।

मांसाची पुष्पें जाहलीं म्हणत । धन्य धन्य बोलत बोधल्यासी ॥३७॥

पादशाह स्वमुखें काय बोलत । तूं तरी निधडा वैष्णवभक्त ।

संकटीं पावला रुक्मिणीकांत । चमत्कार अद्भुत दाखविला ॥३८॥

गांव इनाम मागशील कांहीं । तरी तो देतो ये समयीं ।

परी विष्णुदास निराश सर्वदाही । न घेचि कांहीं धनवित्त ॥३९॥

सप्रेम भजन करीत पाहीं । परतोनि येतसे धामणगांवीं ।

तों सत्व पाहावया एके समयीं । शेषशायीं पातलें ॥४०॥

मलंग फकीर पंढरीनाथ । होऊनि पातले मंदिरात

बोधला पुढें होऊनि त्वरित । म्हणे काय इच्छित तें मागा ॥४१॥

अन्न वस्त्र धनवित्त । काय अपेक्षित माग त्वरित ।

देखोनि बोधल्याचा भावार्थ । कसवटी लावित जगदात्मा ॥४२॥

तुझी सूनही भागीरथी । स्वरूपें सुंदर लावण्यवती ।

हे आज अर्पावी मजप्रती । ऎसें श्रीपती बोलिले ॥४३॥

ऎसें ऎकतांचि उत्तर । संकटीं पडिला सत्वधीर ।

मग जवळीं बोलावूनि निजपुत्र । तयासि विचार पुसतसे ॥४४॥

म्हणे अतिथि जातां विमुख ये क्षणीं । तरी निजसत्वासि होईल हानी ।

काय आहे तुझें मनीं । तें त्वरें करोनि सांग आतां ॥४५॥

यमाजी परम सत्पुत्र जाण । ऎसें ऎकोनि पितयाचें वचन ।

चरणावरी मस्तक ठेवून । अमृतवचन बोलतसे ॥४६॥

म्हणे जे वडिलांचें मनोगत । तेंचि आमुचें परम स्वहित ।

ते दासीदास मी निश्चित । असो विक्रीत सर्वस्वें ॥४७॥

ऎकोनि पुत्राची वचनोक्ती । बोधराज संतोषले चित्तीं ।

मग सुनेसि पुसती निजप्रीतीं । फकीरासि निश्चितीं तुज देतों ॥४८॥

ऎसीं ऎकोनियां वार्ता । भागीरथी चरणीं ठेवी माथा ।

म्हणे दासीस उजूर नसे सर्वथा । पुसणें वृथा कासयासी ॥४९॥

ऎकोनि सकळांचे मनोगत । फकीत बोधल्यासि काय बोलत ।

इसीं मंगलस्नान घालोनि त्वरित । पंचामृत भोजन दे आतां ॥५०॥

मी दूर घेऊनि जाईन मठीं । मग मोह उपजेल तुझ्या पोटीं ।

तरी मग विमुख जाईन शेवटीं । ऎसें जगजेठीं बोलिले ॥५१॥

ऎकोनि फकीराचें उत्तर । बोधला सत्वाचा पूर्ण सागर ।

विकल्प न येचि अणुमात्र | म्हणे स्वस्थ अंतर असों द्या ॥५२॥

भागीरथीसे मंगळ स्नान । नूतन वस्त्रें परिधान ।

हळदी कुंकुम देऊन । घातलें भोजन तेधवां ॥५३॥

फकीर उभा अंगणात । तयाच्या हातीं आणूनि देत ।

तुझें कल्याण हो ऎसें म्हणत । आशिर्वाद देत निजमुखें ॥५४॥

स्कंधीं बैसवोनि भागीरथी । फकीर चालिला सत्वरगती ।

बोधला आनंदयुक्त चित्तीं । अणुमात्र क्षिती असेना ॥५५॥

गांवांतूनि जातां फकीर । पाहती गांवींचे नारीनर ।

म्हणती बोधल्यासि वेड लागलें फार । मंत्रसाचार चळला कीं ॥५६॥

अतीतासि दान देणें जर । तरी अर्पावें अन्नवस्त्र ।

घरचें मनुष्य दीधलें सत्वर । निष्ठुर अंतर तयाचें ॥५७॥

ताटिची भाजी न देववे जाण । त्याणें तरी साक्षात दीधली सून ।

विठोबासि लावूनियां ध्यान । संसार हानी केली कीं ॥५८॥

ऎशा रीतीं नारीनर । निंदा करिती सर्वत्र ।

गावांत कोणी न म्हणती बरें । तों पुढे चरित्र काय झालें ॥५९॥

फकीराच्या रूपें जगज्जीवने । भागीरथीचें घेतलें दान ।

ग्रामशिवेसि जाऊनि त्याणें । काय विंदान करीतसे ॥६०॥

खाद्यां खालतीं उतरोनि सत्वरीं । तत्काळ चतुर्भुज धरी ।

शंखचक्र पितांबरधारी । पहातां नेत्रीं सुख वाटे ॥६१॥

भागीरथी सप्रेम मेळें । श्रीहरीच्या चरणावरी लोळे ।

हृदयीं धरोनि घननीळ । परब्रह्म सांवळें पाहतसे ॥६२॥

ऎशा रीतीं देऊनि भेटी । काय वदतसे जगजेठी ।

मी आतां येईन तुझिया पोटीं । अन्यथा गोष्टी नसे हे ॥६३॥

आतां एकदा परतोनि गांवाकडे । पाहे आपुल्या निजनिवाडें ।

लोकांसि तो फकीर दृष्टीपुढें । दुरोनि रोकडें विलोकिती ॥६४॥

बोधल्याचे चित्तीं आठावूनिं पाय । भागीरथी गांवाकडे पाहे ।

तोही जाहला अदृश्यगती होय । मग मोकलोनि धाय रडतसे ॥६५॥

म्हणे स्वामींनी दीधलें ज्याच्या हाती । तोही जाहला अदृश्यगती ।

आतां मज जावया न दिसे क्षिती । म्हणवोनि चित्तीं खेद करी ॥६६॥

आतां परतोनि जरी गेलें घरा । तरी मजवर कोपेल भ्रतारसासरा ।

काय करावें या अवसरा । जगदुध्दार पाव आतां ॥६७॥

प्रपंच परमार्थ हिता । दोहींकडे अंतरलें आतां ।

ऎशी रीतीं खेद करितां । तों लोकवार्ता ऎकती ॥६८॥

मग गावांत येऊनिया त्वरित । बोधल्यासि जन सांगती मात ।

तुझी सून दीधली फकीरातें । तो तरी गुप्त जाहला ॥६९॥

ग्रामशिंवेपासीं निश्चिती । शोक करीतसे भागीरथी ।

ऎसी ऎकोनियां वचनोक्ती । आनंद चित्तीं दाटला ॥७०॥

पुत्रासि म्हणे बोधराज । फकीररूपें गरुडध्वज ।

येतां सत्व राखिलें आज । तरी धर्मराज नाम तुझें ॥७१॥

यमाजी नाम पहिलें होतें । त्याचा पालट केला त्वरीत ।

धर्मराज सर्वत्र वाहती त्यातें । सत्वधीर निश्चित जाणोनि ॥७२॥

मग टाळ मृदंग बरोबर । सवें घेऊनि वैष्णववीर ।

सप्रेम करीत कीर्तन गजर । चालिलें सत्वर ते समयीं ॥७३॥

विठ्ठल नामाचा घोष । जन मिळाले बहुवस ।

आनंद वाटला सकळांस । म्हणती धन्य दिवस सुदिन हा ॥७४॥

कीर्तन करिती तये दिवसीं । बोधराज आले शिंवेपासी ।

भागीरथीनें देखोनि त्यांसी । सद्भावें चरणासी लागली ॥७५॥

तिजला उठवोनि वैष्णववीर । मस्तकीं ठेविला अभयकर ।

म्हणे धन्य माते तूं सत्वधीर । सारंगधर जोडला ॥७६॥

फकीर होवोनि पंढरीनाथ । सत्व पाहावयासी आले होते ।

तुज खांदा बैसवोनि आणिलें येथें । हें भाग्य अद्भुत वदवेना ॥७७॥

ऎसीं तिजला बोलोनि वचनें । स्थळीं केलें हरिकीर्तन ।

मग भागीरथीसि सवें घेऊन । आले परतोनि मंदिरा ॥७८॥

अरण्यामाजी एकांती । प्रसन्न होऊनि पांडुरंगमूर्ती ।

आश्वासुनी भागीरथी । वर तिजप्रती दीधला ॥७९॥

तिच्या पोटाशी जगज्जीवन । आले तेव्हां निजप्रीतीनें ।

भगवंत बावा नामाभिधान । त्याजकारणें ठेविलें ॥८०॥

त्या भगवंतबावाचा पुत्र पाहे । भोजबावा धामणगांवांत आहे ।

आषाढासि यात्रा भरत आहे । संत समुदाय मिळे तिथें ॥८१॥

आपुल्या दासाची सत्कीर्ती । स्वयें वाढवी रुक्मिणीपती ।

ते युगानुयुगांमाजी निश्चिती । भाविक ऎकती आदरें ॥८२॥

आणिक चरित्र रसाळ गहन । रसाळ ऎका भाविक जन ।

एक मध्वनाथ म्हणवोनि ब्राह्मण । जन स्थानामाजी तो होता ॥८३॥

गंगास्नान करोनि नित्य । नामस्मरणीं लाविली प्रीत ।

श्रीपांडुरंगातें उपासित । एकाग्र चित्त होऊनियां ॥८४॥

नामरूपीं जडतां वृत्ती । मग साक्षात भेटले वैकुंठपती ।

दृष्टांतीं आज्ञा करिती । माझी सत्कीर्ती वाखाणी ॥८५॥

तुझ्या जिव्हाग्रीं जाण । सरस्वतीचें बैसेल ठाणें ।

प्रेमें करावें माझें कीर्तन । जगज्जीवन आज्ञापी ॥८६॥

ऎसा वर देतांचि श्रीपती । तत्काळ जाहली कवित्व स्फूर्ती ।

आणिक ग्रंथ विलोकितांचि प्रीतीं । तें सत्वरगती पाठ होय ॥८७॥

टाळ विणा मृदंग निश्चिती । संगीत वाद्यें अनुकुळ होती ।

कीर्तन करितां सप्रेमयुक्ती । वेधतसे वृत्ती श्रोतयांची ॥८८॥

वरदवाणी पडतांचि श्रवणीं । श्रोतयांसि आनंद वाटे मनीं ।

देहभान जाती विसरोनि । नामस्मरणीं निमग्न ते ॥८९॥

तंव आज्ञा केली पंढरीनाथें । आतां देशावर जाइजे त्वरित ।

जे भागवतधर्म बोलिले सत्य । तरी स्वमुखें भक्तिपंथ स्थापावा ॥९०॥

पाखंडी कुतर्की छळितां पाहीं । मी तेथें रक्षिता शेषशायी ।

ऎसी आज्ञा होतांचि पाहीं । प्रयाण तिहीं आरंभिलें ॥९१॥

फिरत फिरत देशावर । मार्गी करिती कीर्तनगजर ।

सवें संप्रदायी दोनचार । मग शहरासि सत्वर ते आले ॥९२॥

औरंगाबादेंत भाविक प्रेमळ थोर । आणिक धनवंत सावकार ।

मध्वनाथाचा कीर्तन गजर । सप्रेम आदरें ऎकती ॥९३॥

बहुत सन्मानें करोनी । श्रीनाथजीसि राहविलें त्यांणीं ।

कुटुंब आणवावें या ठिकाणीं । ऎसा हेत मनीं सर्वांच्या ॥९४॥

त्यांचा सद्भाव देखोनि निश्चित । तये ठिकाणीं रमलें चित्त ।

मग अश्व मनुष्य पाठवोनि त्वरित । निज कांतेतें आणविलें ॥९५॥

अयाचित वृत्तीनें निर्धारीं । योगक्षेम चाले बरव्यापरी ।

शिष्यसंप्रदायीं नानापरी । सेवेसि निरंतरी सादर ॥९६॥

जे घरीं करिती हरिकीर्तन ।होतसे तेथें ब्राह्मण संतर्पण ।

नानापरीचीं मिष्टान्नें । द्विजांकारणें घालिती ॥९७॥

ऎसा आनंदें बहुवस । नित्य होतसे कीर्तनघोष ।

प्रसादिक कविता सुरस । लोक सायासें ऎकती ॥९८॥

मध्वनाथाची सत्कीर्ती जय । देशोदेशीम प्रख्यात होय ।

म्हणती ऎसें वक्तृत्व कोणासि नये । श्रीहरि साह्य असे तया ॥९९॥

तों कान्होजी अंगर्‍या मुंबईत । धर्मशीळ उदार बहुत ।

त्याजपासीं सज्ञानपंडित । चौदा शत मिळाले ॥१००॥

त्यांमाजी श्रेष्ठ मुख्य जाण । वादकांत श्रेष्ठ निपुण ।

भास्कराय नामाभिधान । पंडिताकारणें बोलती ॥१०१॥

त्याणें यनमानासि सांगीतलें जाण । कीं प्राकृत न ऎकावें हरिकीर्तन ।

ऎसें मत स्थापितांचि पुर्ण । मग तयासि यजमान बोलत ॥२॥

हरिदास वक्ते चतुरबहुत । उत्सवासि येती येथ ।

तयांसि वाद घालूनि निश्चिती । जिंता त्वरीत ये ठायीं ॥३॥

पंडित प्रतिज्ञा करोनि म्हणे । प्राकृत ग्रंथ आणि कीर्तन ।

आम्हीं वर्जू आजपासुन । हरिदास जिंतोन ये ठायीं ॥४॥

ऎसी प्रतिज्ञा करोनि तेथें । तों हरिदासही पातले बहुत ।

नित्य वादप्रतिवाद होत । परी तो नाटोपे पंडित तयांसी ॥५॥

इकडे स्वप्नीं येऊनि पंढरीनाथ । मध्वनाथासि आज्ञा करित ।

तुवां जावें त्या ठायांत । पुढील कार्यार्थ सांगितला ॥६॥

ऎसा दृष्टांत होताचि सत्वरा । नाथ चालिले देशावरा ।

कुटुंबासहित त्या अवसरा । समुदाय बरा घेऊनियां ॥७॥

टाळ विणे मृदंग सुस्वर । धृपदही घेतले बरोबर ।

स्वइच्छा क्रमितां पंथ साचार । आले सत्वर त्या ठायां ॥८॥

मध्वनाथाची सत्कीर्ती । जनांत आधींच प्रख्यात होती ।

यजमानासि कळतां निश्चिती । सामोरा प्रीती येतसे ॥९॥

सद्भावें साष्टांग करोनि नमन । प्रीतीनें दीधलें आलिंगन ।

मग बिर्‍हाडीं स्वयंपाक करोन । जाहलीं भोजनें यथास्थित ॥११०॥

भास्करराय पंडिताकारणें । वृत्तांत श्रुत जाहला पूर्ण ।

कीं मध्वनाथ आले शहराहून । हरिकीर्तन करावया ॥११॥

तो सकळ वक्तयांत श्रेष्ठपुर्ण । प्रसादिक कविता करितसे जाण ।

ऎसें कळतांचि वर्तमान । अहंता शतगुणें वाढें तया ॥१२॥

म्हणे येवढा जिंतिला जरी आतां । तरी अवघ्याच राहती प्राकृत कथा ।

ऎसी चित्तीं धरोनि अहंता । वैष्णववक्ता द्वेषित ॥१३॥

रात्रि समयीं यजमानें । सदरेसि घातलीं दिव्यासनें ।

हरिदास आणि पंडित ब्राह्मण । श्रवणासि येऊन बैसले ॥१४॥

भास्कर पंडित मुख्यासनीं । क्रोधें फुरफुरीत तयेक्षणीं ।

जैसा कां दुसरा जमदग्नी । तैसाच नयनीं दिसतसे ॥१५॥

मध्वनाथ वैष्णव निर्धारीं । कीर्तनासि आले ते अवसरीं ।

मग ब्रह्मसभेसि नमस्कार करी । सद्भाव अंतरीं धरोनी ॥१६॥

दृष्टीसीं देखोनियां महंत । सभानायक अभ्युत्थान देत ।

मग वाद्यें लावोनिया संगीत । कीर्तन मध्वनाथ आरंभिती ॥१७॥

प्रथमारंभीं मंगळाचरणीं । ज्ञानेशो भगवान म्हणतां वाणी ।

पंडितासि क्रोध उपजला मनीं । अधर चावोनी कांपत ॥१८॥

जैसें श्रीरामाचें करितां स्मरण । मनांत संतापे रावण ।

तैसेंच वाटले त्याज कारणें । मग वादासि जाण प्रवर्तला ॥१९॥

म्हणे हे संन्याश्याचे पुत्र । यांसि म्हणसी विष्णु अवतार ।

यासि कोणत्या शास्त्रीं आधार । सांग सत्वर ये समयीं ॥१२०॥

मध्वनाथ तयासि उत्तर देत । लीला विग्रही वैकुंठनाथ ।

तयासि कासया उत्तम यात । निजभक्त स्वहितार्थ अवतरे ॥२१॥

मत्स्य कच्छ वराह जाण । स्वयेंचि जाहला जगज्जीवन ।

परी प्रतापांत कांहीं नसे उणें । वर्णिलें द्वैपायनें भागवतीं ॥२२॥

निवृत्ति ज्ञानदेव सोपान । मुक्ताबाई गुणनिधान ।

हे यतीच्या पोटीं अवतरोन । अघटित विंदान दाविलें ॥२३॥

प्रतिष्ठानींचे द्विजवर । त्यांणीं छळणा केली फार ।

मग रेडिया हातीं घेती साचार । श्रुती अपार बोलविल्या ॥२४॥

देव आणि भक्तांप्रती । या दोहींस नाहीं कुळयाती ।

विश्व हितार्थ निश्चिती । अवतार घेती निजलीले ॥२५॥

नाम येवढें श्रेष्ठ साधन । कलियुगी आणिक नसेचि जाण ।

यासि भागवत प्रमाण । द्वैपायन साच बोलिले ॥२६॥

गीर्वाण श्लोक म्हणवोनि साचा । अर्थ बिंबवी अंतरींचा ।

त्यावरी अभंग तुकयाचा । उपनिषद्भागाचा अन्वय ॥२७॥

नाम प्रताप अति निर्मळ । यासि नसेचि काळवेळ ।

पुत्रमिषें जपतां अजामिळ । मुक्त तत्काळ तो झाला ॥२८॥

गणिका केवळ दुरीत खाणी । शुक मिषें राघव वदली वाणी ।

तिजला नेलें वैकुंठभुवनीं । हे ख्याती पुराणीं अद्भुत ॥२९॥

इतुका संवाद करोनि त्यास । विठ्ठलनामाचा मांडिला घोष ।

नादब्रह्मचि आलें मुसें । त्या सुखास पार नाहीं ॥१३०॥

ऎसें कीर्तन ऎकतां निश्चित । पंडित जाहले गर्व रहित ।

म्हणती हा तरी नोहे मध्वनाथ । ईश्वर साक्षात दिसतसे ॥३१॥

भास्कराय जो श्रेष्ठ पंडित । उभा ठाकोनि सद्भावें नमित ।

प्रेमें हृदयीं धरोनि नाथ । आलिंगन न देत निजप्रीतीं ॥३२॥

म्हणे नामविरहित श्रेष्ठ पंडित । सर्वथा आणिक नसेचि जाण ।

सुखें करावें हरिकीर्तन । तरणोपाय येणें होतसे ॥३३॥

आम्ही पुराणें सांगतों संस्कृत । परी अर्थ प्राकृत बोलणें लागत ।

तैशाच रीतीं बोलिले संत । समजलें चित्तांत आमुच्या ॥३४॥

शब्द बोलोनि ऎशा रितीं । मग परस्परें आलिंगन देती ।

नामघोषें हरिदास गर्जती । नाथासि म्हणती धन्य धन्य ॥३५॥

मग उजळोनि मंगळारती । ओवाळिला श्रीरुक्मिणीपती ।

नामघोषें वैष्णव नाचती । खिरापती वांटिल्या ॥३६॥

तेव्हां वस्त्र अलंकार आणि धन । यजमानासि देत प्रीतीनें ।

परी तें कांहीं न केले मान्य । म्हणती निराशमनें आम्हीं आलों ॥३७॥

पंडित आणि हरिदास ब्राह्मण । यांसि गौरवीं निजप्रीतीनें ।

तेणेंचि आमुचें संतोषें मन । सुख संपन्न असो कीं ॥३८॥

ऎसें बोलोनि ते अवसरीं । तेथोनि निघाले सहपरिवारीं ।

भक्तीपंथ स्थापोनि माघारीं । आले शहरीं परतोनियां ॥३९॥

तंव अवरंगपुरामाजी निश्चित । एक लक्ष्मणपंत नामें गृहस्थ ।

तो नाथासि होऊनि शरणागत । अनुग्रह त्वरित संपादिला ॥१४०॥

कुटुंब रक्षणा कारणें । चावडीवर रोजगार केला त्याणें ।

दिवसा प्रपंच धंदा सारून । मग स्वामींचे दर्शन घेतसे ॥४१॥

कीर्तन करितां मध्वनाथ । लक्ष्मणपंत धरी ध्रुपद ।

टाळ वाजवित आपुल्या हातें । न्यून किंचित पडेना ॥४२॥

स्वर अवसान यथास्थित । उभयतांचें एकचित्त ।

कीर्तनीं रंग येतसे अद्भुत । आश्चर्य समस्त लोक करिती ॥४३॥

लक्ष्मण सन्निध नसतां जाण । ते दिवसीं न होय हरिकीर्तन ।

तोही सहस्त्र कामें टाकून । समयीं धांवोनि येतसे ॥४४॥

प्रपंच धंदा सारोनि सत्वर । ध्रुपद धरितसे प्रेमादरें ।

सेवा ऋणी रुक्मिणीवर । जाहला साचार त्या पुण्यें ॥४५॥

तंव कोणे एके अवसरीं । मध्वनाथाच्या निजमंदिरीं ।

महाउत्साह आला सत्वरी । साहित्य लवकरी तें झालें ॥४६॥

तों लक्ष्मणपंताचा यजमान । विसाजीपंत नामाभिधान ।

त्याणें हिशोब पहातांचि जाण । अंतर दिसोन येतसे ॥४७॥

आणिक लेखकांच्या स्वमतें । द्रव्य निघालें सोळाशत ।

न देचि म्हणोनि कोपूनि त्यातें । बंदिखानियांत ठेविलें ॥४८॥

हाजी महंमद खान थोर । कोतवाल होता चावडीवर ।

तयांसि सांगोनि तो द्विजवर । कारागृहीं सत्वर घातला ॥४९॥

बहुत उद्विग्न होऊनि अंतरीं । रात्रंदिवस चिंता करी ।

म्हणे उत्सव मांडिला सद्गुरुवरीं । माझी तों परी हे झाली ॥१५०॥

कृपासागर पंढरीनाथा । तूं मज सोडवोनि नेई आतां ।

तुजवांचोनि अनाथनाथा । दीनासि रक्षिता कोण असे ॥५१॥

इकडे मध्वनाथासि ते समयीं । येऊनि सांगती संप्रदायी ।

म्हणती लक्ष्मणासि यजमानानेंही । कारागृही घातलें ॥५२॥

घरीं उत्साह मांडिला असे । कीर्तनाचें साहित्य होय कैसें ।

मग विसोजीपंताच्या मंदिरास । विष्णुदास चालिला ॥५३॥

कचेरीस बैसले थोर थोर । उभे राहिले त्यांसमोर ।

म्हणती लक्ष्मणपंतासि दिवस चार । करा साचार मज स्वाधीन ॥५४॥

महोत्सव झालिया निश्चिती । आणुनी देऊं तुमच्या हातीं ।

मग जैसी असेल धर्मनीती । तैशाच रीतीं वर्तावें ॥५५॥

ऎसें सांगती विष्णुभक्त । परी ते सर्वथा नायकती मात ।

म्हणती रुपये देऊनि सोळा शत । आपुल्या शिष्यातें घेऊनि जा ॥५६॥

मध्वनाथ म्हणती ते समयीं । उत्साहासि येतील संप्रदायी ।

तयांचि आज्ञा करोनि पाहीं । द्रव्य ते समयीं देववीन ॥५७॥

ऎसें स्वमुखें सांगतां जाण । परी विश्वास नये त्याजकारणें ।

नेणोनि विष्णुभक्तांचे महिमान । धनांधपणें वर्तती ॥५८॥

मान्य न करितां विष्णुभक्तास । मग परतोनि आले मंदिरास ।

तों कौतुज दाखविलें हृषीकेशें । तें सज्जनीं सावकाश ऎकीजे ॥५९॥

उत्साहासि प्रारंभ दुसरें दिनीं । वैष्णव पूजिले प्रीती करूनी ।

विप्रांसि मिष्टान्नें जेववोनी । दक्षिणा देऊनि तृप्त केलें ॥१६०॥

गरुडटके निशाण भेरी । वाद्यें वाजती अति गजरीं ।

कीर्तनासि प्रारंभ जाहला रात्रीं । श्रवणासी सत्वरी लोक आले ॥६१॥

आणिक हरिदास होते इतर । त्याणीं कीर्तन केलें एक प्रहर ।

परी सर्वांचें मनोगत साचार । कीं नाथाची उत्तरे ऎकावीं ॥६२॥

तयांसि म्हणे प्रेमळ भक्त । माझें साहित्य नसेचि किचिंत ।

तेव्हां लक्ष्मण आठवला मनांत । सद्गदित कंठ जाहला ॥६३॥

ऎसी अवस्था देखोनि तेथें । सदय हृदय कोणी होते ।

तयांच्या नेत्री अश्रुपात । प्रेम भरित पातले ॥६४॥

प्रेमळासि संकट पडतां भारी । काय लाघव करीत श्रीहरी ।

तें म्हणाल जरी कैशापरी । तरी सादर चतुरीं परिसिजे ॥६५॥

मध्वनाथाचें वचन निश्चित । ऎकिलें नाहीं त्या उन्मत्तें ।

मग फकीर वेष धरोनि त्यातें । शिक्षा करीत जगदात्मा ॥६६॥

आपुल्या दासाची करितां छळणा । ते सर्वथा न साहे जगज्जीवना ।

कोतवाल निद्रित असतां जाणा । तों वैकुंठ राणा काय करी ॥६७॥

काजीच्या रूपें श्रीकरधरें । तयासि स्वहस्तें दीधला मार ।

वळ उमटले पाठीवर । आंतुन रुधिर वाहतसे ॥६८॥

सक्रोध उत्तर बोलतसे कायी । लक्ष्मण रक्षिला कारागृहीं ।

तरी मध्वनाथ राहती जये ठायीं । नेऊनि लवलाहीं यासि घालीं ॥६९॥

अनमान करिशील साचार । तरी आणिक शिक्षा पावसील थोर ।

इतुका दाखवोनि चमत्कार । मग सारंगधर काय करी ॥१७०॥

विसाजीपंत निद्रीत मंदिरी । तों फकिराच्या रुपें पातलें हरी ।

तयासि शिक्षा लावोनि बरी । ऊठ लवकरी म्हणतसे ॥७१॥

इकडे हाजीमहंमद कोतवाल जाण । परम भयभीत होतसे मनें ।

लक्ष्मणपंतासि सवें घेऊन । सत्वर गमन करीतसे ॥७२॥

मशाल प्यादा बरोबरी । घेऊनि बैसला आश्वावरी ।

विसाजीपंताचियाजी मंदिरी । जुन्या बाजारी पातला ॥७३॥

रात्र जाहली दोन प्रहर । निद्रित अवघे चाकर ।

मग हांक मारोनि थोर । धन्यासि सत्वर उठविलें ॥७४॥

बाहेर येवोनि पाहे सत्वरीं । तों कोतवाल उभा असे द्वारीं ।

वळ उमटले पाठीवरी । ते दाखवित लवकरी तेधवां ॥७५॥

म्हणे तुम्हीं लक्ष्मण राखिला साचार । यास्तव खुदाने दीधला मार ।

तरी मी आतां न करी संसार । होतोम फकीर ये समयीं ॥७६॥

वस्त्रें भूषणें टाकूनि जाण । गळ्यांत कफनी घातली त्याणें ।

उदंड बुझाविला धनियानें । परी नायके वचन सर्वथा ॥७७॥

जे कां केवळ तामसी नर । त्यांचें एक वेळ पालटे अंतर ।

रजोगुणियांसि घडतां चमत्कार । परी संसार न सोडिती ॥७८॥

हाजी महंमद खान थोर । बैसोनि आला ज्या अश्वावर ।

लक्ष्मणासि बैसवोनि त्यावर । उत्साहासि सत्वर पाठविलें ॥७९॥

इकडे मध्वनाथ कीर्तनीं बैसतांचि देख । हांसोनि सांगती सकळ लोकां ।

आणिक लोटतां दोन घटिका । लक्ष्मण सखा येईल ॥१८०॥

शिष्य संप्रदायी ते समयीं । ऎकोनि आश्चर्य करिती जीवीं ।

तो तरी घातला कारागृहीं । यथार्थ कोणाही न वाटे ॥८१॥

तों दोन घटिका लोटतां सत्वर । बैसोनि आले अश्वावर ।

मशाल मनुष्य बरोबर । लोक सर्वत्र पाहती ॥८२॥

सद्भावें येवोनि लवलाहीं । मस्तक ठेविला सद्गुरु पायीं ।

वृत्तांत निवेदन केला सर्वही । आश्चर्य जीवीं लोक करिती ॥८३॥

मग मध्वनाथ त्या समयासी । उभे राहिले कीर्तनासी ।

आनंद वाटला सकळांसी । एकाग्र श्रवणासि ते झाले ॥८४॥

जयजयकार तये वेळी । आनंदली भक्तमंडळी ।

विठ्ठल नामें करटाळी । कीर्तन कल्लोळीं होतसे ॥८५॥

अरुणोदय होय तोंवर । कीर्तन जाहलें चार प्रहर ।

मग मंगळारती करोनि सत्वर । रुक्मिणीवर ओवाळिला ॥८६॥

क्षेत्रवासी लोक संपूर्ण । मध्वनाथाचें करिती स्तवन ।

अवघे म्हणती धन्य धन्य । चमत्कार दारुण दाखविला ॥८७॥

कोतवाल हाजीमहंमद खान । अनुतापें फकिरी घेतली त्याणेम ।

मग मध्वनाथाचें दर्शन घेऊन । रोजांत जाऊन बैसला ॥८८॥

कीर्तन गजरीं प्रेमभरित । नित्य नित्य अखंद होत ।

गोपाळ काला आणि लळित । महोत्साहांत नाथ करिती ॥८९॥

तों सेंदुरवाडे गृहस्थ कोणी । नाथासि विनंति केली त्याणी ।

आतां आमुच्या गांवास येऊनी । वास्तव्य ते स्थानीं करावें ॥१९०॥

पुढील भविष्य जाणोनि निश्चिती । त्याच्या वचनासि मान देती ।

मग कुटुंबासहित निज प्रीतीं । केली वस्ती तये ठायीं ॥९१॥

गांवासमोर नालियांत । म्हसोबा म्हणोनि दैवत होतें ।

गणपतीं नांव ठेविलें त्यातें । महोत्सव बहुत मग केला ॥९२॥

मध्वनाथाची देखोनि भक्ती । तेथे पातली भागीरथीं ।

तिचें कुंड बांधिलें निश्चिती । स्नान करिती जन लोक ॥९३॥

ऎसी महंती वाढतां निश्चित । दर्शनासि लोक दुरोनि येत ।

वृध्दत्व अंगासि आलिया बहुत । शरीर अशक्त जाहलें ॥९४॥

मनांत चिंता उद्भवली ऎसी । आतां न जाववें पंढरीसी ।

विठोबा सगुण दर्शन देसी । सुख जीवासि तैं होय ॥९५॥

ऎसी अवस्था पाहतां मनीं । तों दृष्टांति सांगे चक्रपाणी ।

उद्भवभट जोशियाच्या अंगणीं । तये ठिकाणी मी आहें ॥९६॥

तरी तुवां जाऊनि तया ठायास । भूमींत उकरी दीड पुरुष ।

ते स्थळीं माझीं मुर्ति असे । संशय मनास न धरावा ॥९७॥

तुझा भक्ती प्रेमा देखोनि । यास्तव आलों कैवल्यदानी ।

ऎसा दृष्टांत देखतां स्वप्नीं । आनंद मनीं वाटला ॥९८॥

दुसरें दिवशी मध्वनाथ । प्रातःस्मरण करोनि त्वरित ।

उद्भवभटाच्या वाडियांत येत । तयासि वृत्तांत सांगीतला ॥९९॥

म्हणती तुझें अंगणीं भूमी आंत । पांडुरंग मूर्ति असे निश्चित ।

खोरें कुदळी आपुल्या हातें । घेउनि उकरी तेधवां ॥२००॥

प्रथम हात लावला पाहीं । मग उदंड मिळाले संप्रदायीं ।

माती उकरितां ते समयीं । उल्हास जीवीं सकळांच्या ॥२०१॥

दीड पुरुष उकरितां जाण । देखिली पांडुरंग मूर्ति आणि रुक्मिण ।

सुंदर आकृती सुहास्य वदन । सुकुमार ठाण साजिरें ॥२॥

कौतुक देखोनि तये वेळीं । जयजयकारें पिटिली टाळी ।

आनंदली भक्तमंडळी । नामघोषें निराळी कोंदली ॥३॥

मग उद्धवभटाच्या वाडियांत । देवालय केलें मध्वनाथें ।

मूर्ति स्थापना केली तेथें । सुदिन मुहुर्त पाहुनियां ॥४॥

वेदोक्त मंत्रें करोनि जाण । अभिषेक करिताति ब्राह्मण ।

पंचामृत घालोनि स्नान । वस्त्रें भुषणें लेवविली ॥५॥

बुकासुमनें तुळसी हार । धूप दीप निरांजन कापूर ।

पक्वान्नांचे वाढोनि पात्र । नैवेद्य सत्वर आणिला ॥६॥

मंगळवाद्यें द्वारीं वाजती । टाळ मृदंग घोष होती ।

मग उजळोनि मंगळारती । रुक्मिणीपती ओंवाळिला ॥७॥

नानापरींचीं करोनि अन्नें । केलें ब्राह्मण संतर्पण ।

रात्रीं होतसे हरिकीर्तन । ऎकतां श्रवण सुखावती ॥८॥

गोपाळकाला आणि लळित । श्रीमध्वनाथें केलें निश्चित ।

अद्यापि उत्सव मार्गेश्वरांत । अद्भुत ते ठायीं ठायीं ॥९॥

मध्वनाथाचा शिष्य निश्चित । लक्ष्मणपंतानें धरिलें ध्रुपद ।

तयासि सोडविलें पंढरीनाथें । तें चरित्र समस्त ऎकिलें ॥२१०॥

दुसरें कावोपंत नगरकर । त्यांसही सेवा घडली थोर ।

द्रव्य खर्चोनियां फार । उत्सव थोर तिहीं केला ॥११॥

सद्गुरुकृपें करोनि निश्चिती । आत्मवत भासे त्रिजगती ।

श्रवण कीर्तनीं धरोनि आर्ती । मग पंढरींसि निश्चिती राहिला ॥१२॥

चतुर्थाश्रम घेऊनि पाहें । चंद्रभागेंत ठेविला देह ।

तिसरा शिष्य अमृतराय । प्रख्यात आहे जनांत ॥१३॥

तयासि लाधतां कविता शक्ती । अद्भुत वर्णिली भगवत् कीर्ती ।

ऎसी संतांची अद्भुत स्थिती । मी मंदमती काय वाणूं ॥१४॥

जैसी तैसीं अरुष उत्तरें । ग्रंथीं लिहिलीं साचार ।

केव्हां कैसें जाहले चरित्र । हा आठव अणुमात्र मज नाहीं ॥१५॥

हृदयीं बैसोनि रुक्मिणीपती । क्षणक्षणां आठव देतसे चित्तीं ।

अक्षरें लेहवीत माझ्या हातीं । तयासि आवडी भक्तकथा ॥१६॥

श्रीपांडुरंगाच्या कृपादानें । ग्रंथीं लिहिलीं प्रसादवचनें ।

त्यांचें पुढतीं का मनन । मग विसर तेणें पडेना ॥१७॥

प्रथम अध्यायामाजी जाण । गणेश सरस्वती संतस्तवन ।

मग सद्गुरु तुकारामाचें पुजन । वाक्पुष्पें जाण अर्पिलीं ॥१८॥

अग्रदासाच्या कृपें करोन । नाभाजीसि जाहलें पूर्ण ज्ञान ।

मग संतचरित्रें वर्णिलीं तेणें । हेंचि निरूपण प्रथमांत ॥१९॥

पुरंदरे शापितां मरुद्गणास । चांगदेव अवतार झाला असे ।

वाटीचा ईश्वर केला प्रत्यक्ष । द्वितीयांत सुरस हे कथा ॥२२०॥

वेद बोलविले रेडिया हातीं । ज्ञानदेवाची ऎकिली कीर्ती ।

चांगदेव भेटीसि जाऊं म्हणती । तृतीयांत निश्चिती हे कथा ॥२१॥

सर्पाचे चाबुक व्याघ्रांचीं वाहनें । भेटीसि येतां मरुद्गण ।

ज्ञानदेवें भिंती चालविली जाण । चतुर्थांत निरुपण हें असे ॥२२॥

पंचमाध्यायीं कथा निश्चित । लिखित पांसष्टीचा पुसतां अर्थ ।

शिष्यां मागतां बळिदानातें ।मग चौदाशत पळाले ॥२३॥

षष्ठाध्यायीं कथा पाहीं । पुढती अवतार नारायण डोहीं ।

मग पंढरीसि येऊनि लवलाहीं । श्रीपांडुरंग पायीं लागले ॥२४॥

अस्थि धुवोनि पाजितां निश्चित । विधवेसि जाहला तत्काळ सुत ।

भातवंड्या नांव ठेविलें त्यातें । हें सविस्तर सातव्यांत असे ॥२५॥

अष्टमाध्यायीं कथा जाण । कृष्णबाई होऊनि जगज्जीवन ।

यादवाच्या स्त्रीचें बाळंतपण । महीतीरीं संपूर्ण सारिलें ॥२६॥

नवमाध्यायीं कथा साजिरी । चांगदेव सत्वर गेले बेदरीं ।

यवनरायाची उठवोनि नारी । पंढरीसि सत्वरी मग आले ॥२७॥

पांडुरंगाचें देऊळ करोनि त्वरित । चांगदेव जाहलें समाधिस्थ ।

द्वादशवर्षी पुत्रांसि भेटत । चरित्र दशमांत हें झालें ॥२८॥

एकादशांत अनुसंधान । नानक सिध्दाचें निरूपण ।

कबीर रोहिदासाचें भांडण । द्वादशांत हें असें ॥२९॥

त्रयोदशांत कथासार । श्रीएकनाथ चरित्र लागलें थोर ।

जनार्दनासि शरण जातां सत्वर । दीधला वर दत्तात्रेयें ॥२३०॥

चौदाव्यांत कथा अद्भुत । तीर्थासि धाडिले एकनाथ ।

विठ्ठलरूप धरिले ध्रुपद । चरित्र पंधराव्यांत तें झालें ॥३२॥

सोळाव्यांत अनुसंधान । देवें उध्दवाचें रूप धरून ।

एकनाथाचें वारिलें ऋण । निश्चिय परिपूर्ण देखोनियां ॥३३॥

श्रीनाथाची देखोनि भक्ती । द्विजासि स्वप्न दर्शविलें रातीं ।

आली पांडुरंगाची सगुणमूर्ती । सतराव्यांत ख्याती हे झाली ॥३४॥

अठराव्यांत कथा निश्चित । पंढरीसि गेले एकनाथ ।

भानुदासाचें चरित्र समस्त । गाइलें कीर्तनांत निजप्रीतीं ॥३५॥

दंडवत्यासि समाधीं बैसविलें सत्वर । यास्तव ब्राह्मणीं छळिलें फार ।

नंदिनें कडबा भक्षिला सत्वर । एकुणिसाव्यात चरित्र हें झालें ॥३६॥

श्रीखंड्या ब्राह्मण होऊनि हरी । विसाव्यात पाणी वाहिलें घरीं ।

आणि बंदिवान महार येतां मंदिरीं । संरक्षण करी तयाचें ॥३७॥

दोन रूपें धरोनि एकनाथें । अनामिकाचें पुरविलें आर्त ।

आणि पंडितीं बुडविलें भागवत । एकविसाव्यांत मात हे झाली ॥३८॥

बेविसाव्यांत कथा निश्चित । एकनाथ वाचिता भागवत ।

स्त्रीचें रूप धरोनि तेथ । श्रवणासि येत विष्णुकन्या ॥३९॥

ब्राह्मणीचें घरीं वैष्णववीर । जेवितां निघालीं सहस्त्रपात्रें ।

पुत्रासि दाविला चमत्कार । तेविसाव्यात चरित्र हें झालें ॥२४०॥

गावजी मुका जन्मभर जाण । त्याहातीं करविलें रामायण ।

मग एकनाथ समाधिस्थ झाले आपण । चोविसाव्यांत निरुपण हें असे ॥४१॥

विश्वंभर आणि आमाबायी । त्यांची भक्तीं देखोनि पाहीं ।

पंढरीहून शेषशायी । पंचविसाव्यांत देहुगांवीं पातलें ॥४२॥

बोल्होबाची भक्ती देखोनि गोमटी । नामदेव अवतरलें त्याच्या पोटीं ।

तुका नाम ठेविलें शेवटीं । सव्विसाव्यांत गोष्टी हे झाली ॥४३॥

मिरच्या विकितां वैष्णवभक्त । देवें उधार उकळिला समस्त ।

खळाच्या द्वारीं गळफास देत । सत्ताविसाव्यांत मात हे असे ॥४४॥

तुक्याची कांता अन्नाविण । अठ्ठाविसाव्यांत पावली मरण ।

मग संसाराचा त्याग करोन । पर्वतीं जाऊन बैसले ॥४५॥

एकुणविसाव्यांत कथा निश्चित । तुका राखित बैसला शेत ।

तें पक्षियांनीं भक्षितां समस्त । मग पंढरीनाथ पावले ॥४६॥

आवलीसि कांटा मोडतां निश्चित । पांडुरंगें काढिला स्वहस्तें ।

देऊळही सिध्द झालें त्वरित । तिसाव्यांत मात हे झाली ॥४७॥

आवलीसि स्नान करितां सत्वर । देवें नेसविला पितांबर ।

साहित्य करोनि जेवविले पितर । एकतिसाव्यांत चरित्र हें झालें ॥४८॥

बत्तिसाव्यांत कथा निश्चिती । तुक्यासि जाहली कवित्वस्फूर्ती ।

म्हैस तस्करीं नेली अवचित्तीं । ते वैकुंठपती आणितसे ॥४९॥

तेहतिसाव्यांत अनुसंधानीं । तुकयासि उपदेश झाला स्वप्नीं ।

देवावर लेंकरू आपटितां राणी । तेव्हांच चक्रपाणी पावला ॥२५०॥

चवतिसाव्यांत कथा सुंदर । कांतेसि उपदेश केला सत्वर ।

मग द्विजांहातीं लुटविलें घर । उदास अंतर होऊनियां ॥५१॥

पस्तिसाव्यांत ऎसी मात । अभंग बुडविले उदकांत ।

ते निजांगें रक्षिता पंढरीनाथ । मग रामेश्वर येतसे शरण तेव्हां ॥५२॥

तुकयाची स्थिती देखोनि जाण । अनगड पावला समाधान ।

शिवाजीराजा आला शरण । छत्तिसाव्यांत कथन हें असे ॥५३॥

महादेवासि जातां भक्त वैष्णव । संन्याशाच्या रूपें जेविला शिव ।

पंढरीसि पत्र धाडिलें अपूर्व । सदतिसाव्यांत लाघव हें असें ॥५४॥

श्रीपाद दोघे संन्यासी । फिर्याद गेले पुणियासी ।

देवें चमत्कार दाखविला त्यांसी । अडतिसाव्यांत ऎसी कथा असे ॥५५॥

चर्म चिरोनि आपुल्या हातें । कापूस दाविला देवातें ।

अंगावर तुक्याच्या पक्षी बैसत । एकुणचाळिसाव्यांत हे कथा ॥५६॥

चाळिसाव्यांत लीला दाघविली जनीं । देहासहित गेले वैकुंठभुवनीं ।

देव वर्षले दिव्य सुमनें । देखती नयनीं संतसाधु ॥५७॥

एक्केचाळिसाव्या पासूनि साचार । अध्यांत चरित्रें आहेती फार ।

त्या संतांचीं नावें सविस्तर । ऎका सादर भाविकहो ॥५८॥

एकेचाळिसाव्यांत चरित्रें जाण । केशवस्वामी बाजीद पठाण ।

संतोबा पवार मालोपंताकारणें । जगज्जीवन भेटले ॥५९॥

नरपाळ राजा प्रेमाबायी । रामराय राजा शिळाबायी ।

रमाबाई पिलाबायी । बेचाळिसाव्यांत पाहीं वर्णिलीं ॥१६०॥

वोगरासा रामचंद्र भक्त । रामानुज सुहागशा निश्चित ।

जयमल्ल पन्हाजी रजपूत । त्रेचाळिसाव्यांत कथा यांची ॥६१॥

हरिपाळ जसु कुणबी निर्धारीं । धनाजाटांचें शेत पेरिलें भारी ।

सुखानंद माधवदासा रक्षी हरी । चव्वेचाळिसाव्यांत परी हें असे ॥६२॥

लाल्हन खोजी त्रिपुरदास । त्रिलोचन सोनार हरिव्यास ।

सजणकसाई भक्त विशेष । पंचेचाळिसाव्यांत हे कथा ॥६३॥

नरवाहन अगंदमाघौसिंग पाहीं । सेखावत राजा कुंवराबाई ।

गिरधरलालसि शेषशायी । शेचाळिसाव्या अध्यायीं भेटले ॥६४॥

काजीमहंमद शेखरीद जाण । बलखबुखारी राजा यवन ।

जयरामबाबा रामचंदभट्ट ब्राह्मण । सत्तेचाळिसाव्यांत निरुपण हें असे ॥६५॥

रत्नाकर ब्राह्मणें वोळली गोमती । सुरतेंत माधवदासें केली ख्याती ।

विठ्ठल पुरंदराची देखोनि भक्ती । अठ्ठेचाळिसाव्यांत रुक्मिणीपती पावला ॥६६॥

नरसिंहसरस्वतीचें चरित्र थोर । महा मुद्गलभट्ट वैष्णववीर ।

तयासि भेटले श्रीरामचंद्र । एकुणपन्नासाव्यंत चरित्र हें असे ॥६७॥

पन्नासाव्यांत चरित्रें तीन । जसवंत आणि निरंजन ।

कृष्णदास जयराम आख्यान । अद्भुत विंदान हें झालें ॥६८॥

एकावन्नाव्यांत हेचि ख्याती । बोधल्याचा निश्चय पाहतां श्रीपती ॥६९॥

मध्वनाथाची देखोनि भक्ती । सेंदुरवाड्यांत आलें वैकुंठपती ।

हा शेवटी अध्यय निश्चिती । सांप्रत संतीं ऎकिला ॥२७०॥

ऎसीं एकावन्न अध्यायांत सविस्तर । संतचरित्रें वर्णिलीं फार ।

शेवटील अध्यांयात साचार । अन्वय अणुमात्र सांगीतला ॥७१॥

आणिक निजभक्त उदंड असती । ते वर्णिले श्रीभक्तविजयग्रंथीं ।

कांहीं संतलीलामृतीं । त्यांची नावें निश्चिती अवधारा ॥७२॥

सकळ भक्तांत श्रेष्ठ थोर । नामदेव उध्दवाचा अवतार ।

सावंतामाळी नरहरि सोनार । कुबा कुंभार आणि गोरा ॥७३॥

जगमित्र नागखेचरविसा । साळ्या रसाळ भागवत परसा ।

सुरदास आणि बहिरापिसा । वैकुंठधीशा आवडती ॥७४॥

जयदेव स्वामी कर्माबायी । नरसीमहंत मिराबायी ।

आणि राजायी गोणायी । इहीं शेषशायी वश्य केला ॥७५॥

कमाल भक्त तुळसीदास । पिपाजी आणि सुरदास ।

मथुरेमाजी गोविंददास । जो खेळे श्रीहरीसी सर्वदा ॥७६॥

परमानंद जोगा विसोबाखेचर । पद्मनाभ ब्राह्मण चोखा महार ।

सुमती आणि कमळाकर । पद्माकर पुत्र त्याचा ॥७७॥

नारायण महादेव गोविंद जाण । धाकुटा विठ्ठल नामाभिधान ।

हें नामयाचे पुत्र चौघेजण । यांसि जगज्जीवन न विसंबे ॥७८॥

नरहरि आणि श्रीधरपंत । लाडुभक्त जोतिपुरांत ।

नारायणस्वामी परमहंस निश्चित । लीला अद्भुत जयांची ॥७९॥

निंबराज आणि रामदास । मदनमोहन सुरदास ।

गणेशनाथाचा कीर्तिघोष । आवडे देवास निजप्रीतीं ॥२८०॥

उध्दवचिद् घन भक्त थोर । ज्याणें संतचरित्रें वर्णिली फार ।

रंगास्वामी निगडीकर । वैष्णववीर पूर्णज्ञानी ॥८१॥

श्रीधरस्वामी सज्ञान देखा । ज्यांणीं भागवतावरी केली टिका ।

शंकराचार्य अवतार देखा । जो कर्ममार्ग निका प्रतिपादी ॥८२॥

हरी आनंद हस्तामळ । राघवनंद भक्तप्रेमळ ।

रा्घवनंदासीं सर्वकाळ । खेळे घननीळ सर्वदा ॥८३॥

विष्णुश्याम चतुराचार्य जाण । सनकादिक आनंदानंदन ।

निमानुज माधवनंदन । यांणीं जगज्जीवन आराधिला ॥८४॥

मत्स्येंद्र गोरक्षगैनी । जे योगियांमाजी शिरोमणी ।

गोपीनंद मैनावती राणी । जालंधरमुनी सिध्दपुरुष ॥८५॥

चर्पती आणि चौरंगी । हाळसी अवघड प्रसिध्द जगीं ।

मृत्युंजय तो महायोगी । मुध्यासंगीं देव वसे ॥८६॥

सेना न्हावी त्रिलोचन । ज्ञानदेव निवृत्ति सोपान ।

मुक्ताबाई गुणनिधान । ज्यांसि रुक्मिणीरमण न विसंबे ॥८७॥

धांगोचांभार कुंभार राका । बाका त्याचीं पत्नी देखा ।

कन्येचें नांव वंका । ज्याणीं वैकुंठनायका वश्य केलें ॥८८॥

मुकुंदराज जगविख्यात । ज्यांणीं विवेकसिंधु रचिला ग्रंथ ।

मुधोपंत दामाजीपंत । हे भक्त देवातें आवडती ॥८९॥

कान्होपात्रा पिंपळा बाळा । मिरा गिरधर दास भोळा ।

आलह योगानंदाची प्रेमळ । घननीळ जवळ तिष्ठतसे ॥२९०॥

कर्मनंद सारी रामदास । श्रीरंग आणि कीलकदास ।

भुवन आणि हरिव्यास । भक्त देवास आवडती ॥९१॥

कृष्णचैतन्य बनसीधर । कमळाकर्माळी भक्त थोर ।

नाम पाठक वैष्णववीर । मुक्तेश्वर महाकवी ॥९२॥

वल्लभाचार्य बाळकराम । उध्दवराज भक्त निःसीम ।

विमळानंदाचें देखोनि प्रेम । पुरुषोत्तम तेथें वसे ॥९३॥

चतुरा नागा लक्ष्मण । चिंतामणि चतुर्भुज नृपनंदन ।

सुखानंद आणि नारायण । करिती भजन सर्वदा ॥९४॥

दामोदर गंगा कवीश्वर जाण । प्रयागदास आनंद नंदन ।

माधवदास मधुसुदन । यांसि जगज्जीवन न विसंबे ॥९५॥

रमाबाई लासा गोमती । वेणूबाई गिरिजा सती ।

कूर्मदासाची देखोनि भक्ती । पांडुरंगमूर्ती येतसे ॥९६॥

केशव चैतन्य महाभक्त । राघव चैतन्य जगविख्यात ।

बावा चैतन्य प्रसिध्द संत । ज्यांणीं भक्तिपंथ स्थापिला ॥९७॥

हरिदास कान्हया निर्धारीं । ज्याचें वास्तव्य पंढरपुरीं ।

प्रल्हाद बडवियाच्या बरोबरी । वागे श्रीहरी सर्वदा ॥९८॥

विसोबा सराफ निंबसोडकर । जो परम उदार सत्वधीर ।

तयाचें ऋण साचार । रुक्मिणीवरें वारिलें ॥९९॥

रघुपति शेष कृपाज्ञानी । कृष्णदास लोल्याप्रसिध्द जनीं ।

उद्वोध प्रेमरसाची खाणी । रुद्राई योगिनी महापुरुष ॥३००॥

शिवराम गोसावी पैठणकर । नारायण निंबयाचा कुमर ।

निळोबा गोसावी वैष्णववीर । ज्यांणी पिंपळनेर वसविलें ॥३०१॥

ऎसी भक्त रत्नमाळा । गुंफोनि पांडुरंगें घातली गळा ।

तो ब्रह्मानंद परब्रह्म पुतळा । सुख सोहळा भोगीतसे ॥२॥

आणिकही संत बहुतारीतीं । गुप्त प्रगट आहेत क्षितीं ।

त्यांच्या चरणीं महीपती । मस्तक निजप्रीतीं ठेवितसे ॥३॥

एकनिष्ठा धरोनि अंतरी । जाहले पंढरीचें वारकरी ।

सप्रेम गर्जती कीर्तनगजरीं । नमस्कार निर्धारीं त्यांसि माझा ॥४॥

वैष्णवभक्त तों असंख्यांत । भविष्यमाण होणार बहुत ।

जाहले त्यांची नव्हेचि गणित । ऎका ते मात निजकर्णी ॥५॥

श्रीराम अवतार घेतला देवें । तेव्हांही निजभक्त होते सवें ।

अठरा पद्में संख्या वैभवें । कोठवर नांवें सांगावीं ॥६॥

मग कृष्ण अवतार धरी घननीळ । तेव्हां तेचि भक्त जाहले गोपाळ ।

गाई वत्स ते ऋषि गोपाळ । केला प्रतिपाळ तयांचा ॥७॥

छप्पन्न कोटी यादव देखा । नवलक्ष गोपाळ आणि गोपिका ।

यांच्या नावांचा व्यासादिकां । नव्हेचि लेखा निजमुखें ॥८॥

तेथें मी मशक महीपती । अल्पबुध्दी मंदमती ।

कोठवर नावांची घेऊ गणती । हा अपराध निश्चिती दिसतसे ॥९॥

प्रपंच धंदा नये निश्चित । काळ कंठावा कैशी रीतीं ।

म्हणवोनि संतचरित्रें निश्चिती । अल्पमती वाखाणी ॥३१०॥

सत्समागम नसेचि थोर । कुग्रामींचा वस्तीकर ।

अचूक लेखकाचा आधार । तोही साचार असेना ॥११॥

नाहीं अक्षर कळलें शुध्द । छप्पन्न भाषा नानाविध ।

बोलतां नये गीर्वाणशब्द । लोकप्रसिध्द जाणती ॥१२॥

परी हृदयस्थ होऊनि रुक्मिणीपती । ग्रंथ लेहविला मूढाहातीं ।

आतां तुम्हीं तुष्टोनि संतीं । वचनें सरतीं करावीं ॥१३॥

जैसा कोराट्यांचा तरुवर । त्यासि सर्वांगीं काटे असती फार ।

परी त्याचीं पुष्पें मृडानीवर । प्रीती पडिभारें भोगीतसे ॥१४॥

कां कस्तुरीचें काळें पान । ध्यानासि आणितां श्रीमंतजन ।

मुख्य सुगंधासी कारण । धरोनि जाण संरक्षिती ॥१५॥

तैसे आरुषशब्द म्हणवोनी । अव्हेर न करावा विचक्षणीं ।

जे बाळक बोले बोल बोबड्यावचनीं । तेंचि पडताळोनि पुसे माता ॥१६॥

या ग्रंथामाजी इतुकाची अर्थ । कीं भक्तासि पावला भगवंत ।

श्रोतया वक्तयांचे मनोरथ । रुक्मिणीकांत पुरवील ॥१७॥

ग्रंथसंग्रह करितां घरीं । त्याचीं विघ्नें पळतील दुरी ।

सुदर्शन घरटी करी । निश्चय अंतरीं असों द्या ॥१८॥

संतचरित्रें वाचितां आधी । तत्काळ होईल चित्त शुध्दी ।

कदापि न राहे द्वेषबुध्दी । तेणेंचि भवाब्धी पार होय ॥१९॥

ऎशा रीतीं ग्रंथासि वर । दीधला असे करुणाकरें ।

भीतरी निमित्तासि आधार । निरोप साचार सांगतो ॥३२०॥

आधील मागील कोणते संत । हें तरी मी नेणेंचि सत्य ।

जैसीं सागरीं मुक्ताफळें निपजत । तीं ओंविता निश्चित न कळती ॥२१॥

कीं चंपकहार ओवितां जाण । आधी कोणती उपजलीं सुमनें ।

हें गुंफणार नोळखतीच पूर्ण । दिसती दृष्टींनें सारिखीं ॥२२॥

तेवीं वाग्देवीचें घालोनि सत्र । संत ओविलें तुळसीपत्रें ।

सद्भावें पुजिला रुक्मिणीवर । पंढरपुर निवासी जो ॥२३॥

शके सोळाशें शाहाण्णव वर्षी । जय नाम संवत्सरासी ।

फाल्गुन कृष्ण चतुर्थीसी । ग्रंथ सिध्दीसी पावला ॥२४॥

प्रवरेपासूनि दक्षिणेस । ताहाराबाद गांव पांच कोस ।

भक्तलीलामृत अति सुरस । जाहला असे ते ठायीं ॥२५॥

जय देवाधिदेवा गरुडध्वजा । तुझी वाक्‍ पुष्पें केली पूजा ।

आतां मनोरथ पुरेल माझा । तो अधोक्षजा वर देई ॥२६॥

नलगे भुक्ति नलगे मुक्ती । मागत नाहीं धन संपत्ती ।

तुझ्या दासांची वर्णीन कीर्ती । ऎसें श्रीपती करावें ॥२७॥

म्हणशील संतचरित्रें झाली पूर्ण । आतां न करीं कवित्व लेखन ।

ऎसें बोलशील मजकारणें । तरी तें वचन नायकें मी ॥२८॥

हीं चरित्रें पडताळोनी । वारंवार गाईन कीर्तन ।

यावीण इच्छा असेल मनीं । तरी हे वाणी झडो माझी ॥२९॥

नावडेचि तुझें ब्रह्मज्ञान । नलगे तुझें योगसाधन ।

रूप दृष्टीसीं पाहीन सगुण । यावीण मागणें आन नसे ॥३३०॥

संतचरित्रें वर्णीन फार । सेवकपणें असावें दूर ।

तुजसी मिश्रित जाहलों जर । तरी अधिकार मग कैंचा ॥३१॥

रायाचे प्रधान पुत्र निश्चिती । यांची उदंड वाणिली कीर्ती ।

तरी तया भाटासि भूपती । सन्निध निजप्रीती बैसवीना ॥३२॥

म्हणवोनि मोक्ष घ्यावयासि पाहीं । मज सर्वथा अधिकार नाहीं ।

वाचेसि तुझी सत्कीर्ती द्यावी । आणि रूप हृदयीं सांठवीं ॥३३॥

भक्तीं वाणिलें तुज प्रीतीं । मी गाईन संतांची कीर्ती ।

ऎसा मनोरथ धरी महीपती । तरी पुरवी आर्ती पांडुरंगा ॥३४॥

इति श्रीभक्तलीलामृत ग्रंथ । श्रवणेंचि पुरती मनोरथ ।

परिसोत प्रेमळ भाविक भक्त । एकावन्नावा अध्याय रसाळ हा ॥३३५॥ अध्याय ॥५१॥ ओव्या ॥३३५॥ एकंदर ओव्या संख्या ॥१०७९४॥

N/A

References : N/A
Last Updated : September 03, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP