॥ श्रीगणेशाय नमः ॥
ऎका सभाग्य श्रोते सज्जन । देव भक्त नव्हेचि भिन्न ।
एकमेकांत असती संलग्न । दृष्टांत वचन अवधारा ॥१॥
जैसे शीतळत्व आणि निशापती । अभेदपणें एकत्र असती ।
तैसे निजभक्त आणि वैकुंठपती । अभिन्न असती सर्वदा ॥२॥
कीं सूर्य आणि रथींचा अरुण । हीं नामाभिधानें असती भिन्न ।
परी तेज दोहींचे समसमान । मंडळे दोन न दिसती ॥३॥
पंख नसलें जरी निश्चिती । तरी कैसा उडेल खगपतीं ।
तेवीं भक्तावांचोनि देवाची कीर्ती । नव्हेचि जगती सर्वदा ॥४॥
तारा निर्माण नसत्या जाणा । तरी कैसेनि वाजता ब्रह्मविणा ।
तेवीं देव भक्तांच्या नामाभिधाना । अद्वैतता जाणा या रीतीं ॥५॥
मागिलें अध्यायीं कथा सुरस । प्रेमल भक्त माधवदास ।
त्याचें रूप धरोनि जगन्निवासें । महापंडितास जिंकलें ॥६॥
त्यानें सांडोनि विद्याभिमान । माधवदासासि आला शरण ।
त्याचा संप्रदायी होऊन । सप्रेम भजन करीतसें ॥७॥
जेवी तिचें जाहले भक्त वैष्णव । त्यांचा अभिमान धरीतसे देव ।
लाघव दाखवोनि अपूर्व । भक्त वैष्णव तो केला ॥८॥
आतां हरीव्यास तो प्रेमळ भक्त । राहत होता मथुरेंत ।
भजन करीत प्रेमयुक्त । सगुण मूर्ती उपासी ॥९॥
ज्यासि सर्वभूतीं दया पूर्ण । आत्मवत मानी अवघे जन ।
परम खळ त्याच्या दर्शनें । द्रवतसे मन तयाचें ॥१०॥
कांहीं दिवस लोटतां तेथ । यात्रेसि निघाले अकस्मात ।
दृष्टींसी पहावया जगन्नाथ । चित्तीं हेत धरियेला ॥११॥
मार्गी चालतां नित्य नित्य । एक स्थळ रम्य देखिलें अद्भुत ।
उपवनीं वृक्ष लागले बहुत । निर्मळ दिसत जीवन तेथें ॥१२॥
मग संप्रदायांसि बोलती काय । अपूर्व स्थळ हें दिसत आहे ।
तेथें स्नान संध्या करूनि पाहे । गमन लवलाहीं करावें ॥१३॥
ऎसी आज्ञा होतांचि पाहीं । बिर्हाड उतरलें ये ठायीं ।
ते स्थळीं जागृत होती देवी । दर्शनासि सर्वही लोक येती ॥१४॥
तंव एक शूद्रें येऊनियां तेथ । पशु मारिला अकस्मात ।
हरि व्यासावि कळतां वृत्तांत । कंटाळलें चित्त तयाचें ॥१५॥
म्हणे कांहीं दुरित होतें पदरीं । यास्तव उतरलों ये अवसरीं ।
देशीचे लोक दुराचारी । भूतदया अंतरीं असेना ॥१६॥
दोष आचरतां दृष्टीसि पाहत । त्यासीही दुरिताचा विभाग लागत ।
ऎसें म्हणवोनि वैष्णव भक्त । येथूनि त्वरित निघाले ॥१७॥
स्वयंपाकाचें साहित्य सकळीं । अग्नि टाकोनि पेटविल्या थाळी ।
कणीक मळोनि सिजल्या डाळी । अवघें ते स्थळीं टाकिलें ॥१८॥
उदास होऊनि वैष्णव भक्त । उपवासी चालिले अनुताप युक्त ।
हा देवीसीं कळतां वृत्तांत । मग भयभीत ते झाले ॥१९॥
म्हणे मज ऎशाचे महाविष्णुसी । अनंत शक्ती असती दासी ।
हरिव्यास परम आवडता त्यासी । तो जातसे उपवासी तेथुनियां ॥२०॥
तयासि समजावोनि आणावें आतां । तरीच आपुली चालेल सत्ता ।
ऎसा विचार करोनि चित्ता । निघे आदिमाता सत्वर ॥२१॥
मार्गी हरिव्यास उदास मन । करीत चालिला हरिभजन ।
तों महाशक्ति आडवी येऊन । साष्टांग नमस्कार करीतसें ॥२२॥
म्हणे माझ्या आश्रमाहूनि । तुम्हीं जातसां उपवासी ।
तरी महाविष्णु कोपेल मजसी । भय मानसीं तयाचें ॥२३॥
तूं साक्षात्कारी वैष्णवभक्त । ऎसें निश्चित कळलें मातें ।
परी आतां परतोनि चलावें त्वरित । करितसे ग्लांत भवानी ॥२४॥
हरिव्यास म्हणतसे ते अवसरीं । पशु मारिला तुझें द्वारीं ।
तेथें अन्न घेतां निर्धारीं । नरक अघोरी भोगणें ॥२५॥
आम्हीं निधडे वैष्णवीर । तरीच तुझें ऎकों उत्तर ।
हिंसा कर्म वर्जिसील जर । तरी भोजन साचार करूं तेथें ॥२६॥
नाहींतरी उदास होऊन । जातसों तुझ्या आश्रमांतूनि ।
ऎकोनि विष्णुभक्ताची वाणी । अवश्य भवानी म्हणतसे ॥२७॥
मग हरिव्यासासि धरोनि हाती । आश्रमासि घेऊनि येतसे शक्ती ।
देशाधिकारी राजा निश्चिती । तयासि स्वप्न रात्रीं दाखविलें ॥२८॥
तूं सर्व देशांत ताकीद करी । हिंसा न करावी माझें द्वारीं ।
हरिव्यास वैष्णव निर्धारीं । शरण सत्वरी यासि यावें ॥२९॥
यासि अन्यथा करिशील जर । तरी तुझें राज्य बुडेल समग्र ।
देवीचा दृष्टांत होतांचि थोर । भय नृपवर पावला ॥३०॥
प्रातःकाळ होतांचि त्याणें । मग प्रधानासि सांगितलें स्वप्न ।
मग शक्तीच्या देउळासि येऊन । वैष्णवासि नमन करितसे ॥३१॥
हरिव्यासासि कर जोडून । म्हणे मी अनन्यभावें स्वामीसि शरण ।
अनुग्रह द्यावा मज कारणें । म्हणवोनि चरण धरियेले ॥३२॥
सद्गुरु म्हणती ते अवसरीं । तूं आज पासोनि हिंसा न करीं ।
आणि आपुल्या राज्यांत आज्ञा करी । कीं पशु निर्धारीं न मारावा ॥३४॥
षण्मास पर्यंत पाहीं । हरिव्यास राहिले तये ठायीं ।
करोनि बहुत संप्रदायी । विष्णुभक्त सर्वही ते केले ॥३५॥
एकादशी हरिजागर । हरिकीर्तनाचा घोष थोर ।
नामस्मरण करोनि सर्वत्र । प्रेमभरें करोनियां ॥३६॥
देवीसि यात्रा येतसे दुरोनी । परी तेथें पशु न मारिती कोणी ।
रात्रीमाजी येऊनि स्वप्नीं । दृष्टांत भवानी सांगे तयां ॥३७॥
निर्दय लोक होते खळ । ते अवघेचि जाहले भक्त प्रेमळ ।
ऎसें संतसज्जन कृपाळ । विश्वसकळ उध्दरिलें ॥३८॥
लोक अर्चित होते शक्ती । तयांसि लाविली विष्णुभक्ती ।
मठ स्थापूनि तये क्षितीं । शिष्य ठेविती ते ठायीं ॥३९॥
ऎसा करोनि जगदुध्दार । मग जगन्नाथासि गेले सत्वर ।
भवसिंधु हा सखोल थोर । परी संत पैलपार पावती ॥४०॥
आणिक चरित्र रसाळ गहन । सादर ऎका भाविक जन ।
एक त्रिपुरदास म्हणवोन । होता प्रधान रायाचा ॥४१॥
सद्गुरु कृपा होतांचि निश्चिती । तयासि चित्तीं बाणली विरक्ती ।
मग लुटवोनि सर्व धनसंपत्तीं । उदास वृत्ती धरियेली ॥४२॥
कांताही परम सुलक्षणी । तत्पर असें विष्णुस्मरणीं ।
उभयतां दंपती येवोनि । वृंदावनीं राहिलीं ॥४३॥
त्रिकाळ पूजा होतांचि जाणा । येती श्रीहरीच्या दर्शना ।
भक्तीचा भुकेला वैकुंठ राणा । साक्षात्कार नाना देतसे ॥४४॥
येथें येऊनि नृपवर । त्याणें धन वाटिलें फार ।
वैष्णव अयाचित द्विजवर । पूजिलें समग्र क्षेत्रवासी ॥४५॥
ऎसा सर्व खर्च करोनि त्याणें । मग स्वस्थानासि गेला त्वरेनें ।
परी महापूजा न केली त्याणें । पडिलें विस्मरण देवाचें ॥४६॥
हा त्रिपुरदासासि समाचार । कळतां क्षीत वाटली फार ।
म्हणती तो अज्ञान नृपवर । इंदिरावर न पूजिली ॥४७॥
जैसें वृक्षाचें मूळ सांडोनी । डहाळियावरींच लाविलें पाणी ।
तैसीच रायें केली करणी । मजलागोनी वाटतें ॥४८॥
मातेसि जेववितां पोटभर । तान्हयास दुध येतसे फार ।
जननी उपवासीं ठेविली जर । तरी पोट न भरे बाळकाचें ॥४९॥
ऎसें म्हणवोनि त्रिपुरदास । काय बोले निजकांतेस ।
मज इच्छा ऎसीं वाटतसे । वस्त्रें श्रीहरीस करावी ॥५०॥
मग कांता म्हणे ते समयीं । घरीं तो ऎवज किंचित नाहीं ।
अयाचित वृत्तीनें येतां कांहीं । अव्हेरून तेहीं टाकितसां ॥५१॥
ऎसें असतां प्राणनाथा । वस्त्रें कशाची करावीं आतां ।
त्या देवाधिदेवा वैकुंठनाथा । उणें सर्वथा नसेची ॥५२॥
सपूर वस्त्रें भरजरी । उदंड असती देवावरी ।
तुम्हीं कासया ये अवसरीं । चिंता अंतरीं वाहतसां ॥५३॥
त्रिपुरदास म्हने यथार्थ । परी माझें चित्तीं उपजला हेत ।
मग घरीं होती दौत । ती बाजारांत विकियेली ॥५४॥
मोल मागतांचि तियेचें । सोळा आणे आले साचें ।
घोंगडेसें छीट घेतलें त्याचें । पुजन श्रीहरीचें करावया ॥५५॥
मग पुजारियांसि सांगतसे तेव्हां । हें वस्त्र घेतलें असे दावा ।
हें पांघरवोनि केशवा । हेत पुरवा दीनाचा ॥५६॥
ऎसी ऎकोनि वचनोक्ती । मग पंडे तयासि उत्तर देती ।
हें देवा योग्य वस्त्र नाहीं म्हणती । लज्जा चित्तीं तुज नये ॥५७॥
महावस्त्रपाटां वास । रकट्यांचें थिगळ साजेल कैसें ।
काय उणें आमुच्या देवास । ऎसें तयासि बोलिले ॥५८॥
त्रिपुरदास म्हणे मागुती । देवासि सांगा माझी विनंती ।
हें अनाथाचें वस्त्र निश्चिती । तरी अंगीकार प्रीतीं करावा ॥५९॥
ऎसें बोलोनि तये वेळे । देउळी छीट धाडिलें बळें ।
पुजारी होता परम खळ । त्याणें तत्काळ आंथरिले ॥६०॥
पाखळ पूजा होतांचि सत्वर । आश्चर्य देखिलें त्या अवसरा ।
हींव वाजतसे इंदिरावर । मूर्ती थरथरां कांपत ॥६१॥
ऎसे विपरीत देखोनि तेथें । देवळीं मिळाले वैष्णवभक्त ।
देवासि वस्त्रें पांघरली बहुत । सगडी ठेवित पेटवूनि पुढे ॥६२॥
परी मूर्ती कांपत ते न राहे । म्हणे उपाय करावा काय ।
तों छिटावरी भांडारी निजला आहे । त्याणें दृष्टांत काय देखिला ॥६३॥
त्रिपुरदासानें भक्तिभावें । आम्हांसि छीट दीधलें नवें ।
तरी तें सत्वर पांघरावें । राहिल हींव तरीच ॥६४॥
ऎसा दृष्टांत चक्रपाणी । देताचि विस्मित जाहले मनीं ।
मग छिट पांघरवितां ते क्षणीं । चमत्कार नयनीं देखिला ॥६५॥
शीतें कांपत होता घननीळ । तो तत्काळचि राहे निश्चळ ।
आपुल्या दासाची दीनदयाळ । सत्कीर्ती प्रबळ वाढवित ॥६६॥
सकळ वैष्णव आश्चर्य करिती । म्हणती भक्तीचा भुकेला वैकुंठपती ।
त्रिपुरदासासि वृत्तांत सांगती । नमस्कार करिती सद्भावें ॥६७॥
ऎकोनि द्रवला वैष्णववीर । गहिवरें करोनि कंठभरे ।
नेत्रीं प्रेमाचे आले नीर । म्हणे तो दीनोध्दार जगद्गुरु ॥६८॥
तो अनाथबंधु करुणाघन । द्रौपदीनें वाढिलें भाजीपान ।
तें प्रीतीनें भक्षितांचि श्रीकृष्ण । तृप्तीनें त्रिभुवन भरलें कीं ॥६९॥
त्रिपुरदासें ऎशारीतीं । स्वमुखें केली श्रीहरीची स्तुती ।
चढती वाढती देवेभक्ती । सप्रेम चित्तीं सर्वदा ॥७०॥
आणिक कथा असे गोमटी । सादर ऎकतां कर्णसंपुटीं ।
दुरित पळे उठाउठी । वैराग्य पोटीं ठसावे ॥७१॥
एकला लहान खोजी भक्त चतुर । सद्गुरु भक्तीसि असे तत्पर ।
संत साधु वैष्णववीर । त्यांचाही आदर करीतसे ॥७२॥
अनुताप युक्त करोनि निश्चित । श्रीहरिस्मरणीं सावचित्त ।
त्याचा गुरु तो भोळा भक्त । एकदा बोलत लोकांसी ॥७३॥
आमुच्या अंतसमयीं प्रसिध्द । आकाशीं होईल घंटानाद ।
मग तुम्हां समस्तांसि होईल बोध । सप्रेम छंद भक्तीचा ॥७४॥
ऎसा पण बोलिला पाहीं । परी जनासि सर्वथा विश्वास नाहीं ।
विकल्पें करोनि नाडिलें कांहीं । स्वहित जीवीं न विचारिती ॥७५॥
तंव लाल्हानखोजी एके दिवशी । जातसे कोण्या गांवासी ।
चार दिवस जाहले त्यासि । सद्गुरु मानसीं चिंतातुर ॥७६॥
म्हणे सच्छिष्य माझा नसे जवळ । सन्निध पातला अंतकाळ ।
ऎसें म्हणोनि ते वेळ । प्राण तत्काळ सोडिले ॥७७॥
तेव्हां गांवींचे लोक मिळोनी । देहनिर्वाह केला त्याणीं ।
तो लाल्हानखोजी सद्गुरु स्थानि । तिसरें दिनीं पातला ॥७८॥
सद्गुरु गेले निजधामासि । हें श्रुत होताण्चि खोजीयासीं ।
परम खेद वाटला मानसीं । म्हणे मी सेवेसी अंतरलों ॥७९॥
अंतकाळमाजी निश्चित । स्वामींसि लागले नाहींत हात ।
मग ज्ञानें करोनि स्वस्थ चित्त । असे करीत तेधवां ॥८०॥
गावींचे लोक कुटिळ पाहीं । सद्गुरुसि निंदिती ते समयीं ।
म्हणती पण केला होता तिहीं । तो घंटानाद नाहीं ऎकिला ॥८१॥
खोजी म्हणतसे ते अवसरीं । मजला दृष्टांत जाहला रात्रीं ।
सद्गुरु बोलिले स्वप्नांतरीं । कीं वैकुंठपुरीं आम्ही जातों ॥८२॥
घंटानाद तुजकारणें । मागें ठेविला असे जाण ।
ऎसें स्वामींनीं मज सांगोन । मग वैकुंठभुवन पावले ॥८३॥
इतुकें बोलिले ते अवसरीं । परी कोणासि विश्वास नये अंतरी ।
मग लाल्हानखोजी स्नान करी । आसनावरी बैसला ॥८४॥
ध्यानांत आणुनि सद्गुरुमूर्ती । लाविलीं दोन्ही नेत्रपातीं ।
तेव्हा घंटानाद आकाशीं होती । लोक ऎकती सर्वत्र ॥८५॥
रामनाम ध्वनि मुखांतून । निघतां तत्काळ सोडिले प्राण ।
देखोनि आश्चर्य करिती जन । धन्य धन्य म्हणताती ॥८६॥
सद्गुरुवचन करूनि साचें । सार्थक केलें निजदेहाचे ।
येणे केलें वैकुंठींचें । राम राम वाचे बोलोनि ॥८७॥
आणिक लाडू म्हणवोनि वैष्णवभक्त । जोतपुरांत होते राहत ।
आत्मवत अवघें विश्व पाहत । चित्तीं विरक्त सर्वदा ॥८८॥
नाहीं आपुलें आणि परावें । सर्वभूतीं सारिखा भाव ।
जयासि रंक आणि राव । एकत्र जीव सारिखे ॥८९॥
सर्वदा नैराश्य असे चित्तीं । भजन करीतसे प्रेमयुक्ती ।
ध्यानासि आणूनि विष्णुमूर्ती । बैसे एकांतीं निरंतर ॥९०॥
तयासि वैराग्य जाहलेया जाणा । एकटा चालिला तीर्थाटणा ।
श्रीहरीची जे विश्वरचना । कौतुकें नाना पाहतसे ॥९१॥
क्षेत्रें तीर्थे आणि दैवतें । पुराणप्रसिध्द नामांकित ।
तये ठायीं असती संत । दृष्टीसीं पहात नीज प्रीतीं ॥९२॥
ऎसीं स्थळें पाहूनि बहूत । मग काउर देशासि आला त्वरित ।
तेथिंचे लोक निर्दय बहुत । अर्चन करीत शक्तीचें ॥९३॥
मद्य मांस नानारीतीं । देवीसि नैवेद्य अर्पिती ।
तेथें पुरुषाची बळी देती । उन्मत्त चित्तीं विषयांध ॥९४॥
लाडू प्रेमळ विष्णुभक्त । तेथें पातला अकस्मात ।
तंव ते बळीसि मनुष्य पाहत । तों वैष्णव भक्त सांपडला ॥९५॥
मग चवघ्यांनीं धरोनि ते वेळीं । नेला अंबिकेचें देउळीं ।
देह लोभ सांडोनि ते वेळीं । चित्तीं वनमाळी आठविला ॥९६॥
विश्वात्मा एक जगज्जीवन । मारिता तारिता नसेचि आन ।
श्रीविष्णुमुर्ति ध्यानांत आणून । निश्चय मनीं दृढ केला ॥९७॥
तंव त्याणीं देउळांत आणूनि सत्वर । तिघांनीं धरिला साचार ।
एकानें उपसिली तरवार । तों काय चरित्र वर्तलें ॥९८॥
विक्राळरूप धरोनि देवी । चौघासि मारिलें ते समयीं ।
मग वैष्णव भक्ताचे लागतसे पायीं । म्हणे अपराध सर्वही क्षमा कीजे ॥९९॥
ऎशापरी करोनि ग्लांती । मग सान रूप धरीत भगवती ।
अष्टभुजा सगुण मूर्ती । पोत खेळती तयापुढें ॥१००॥
मन प्रसन्न होऊनि वैष्णवभक्ता । म्हणे इच्छित वर माग आतां ।
कांहीं संकोच न धरोनि चित्ता । ऎसें आदिमाता बोलतसे ॥१०१॥
ऎकोनि म्हणे वैष्णवभक्त । तूं मनुष्याची बळी मागसी सत्य ।
तें आज पासोनि वर्जावें निश्चित । हिंसा येथ न करावी ॥२॥
तुझे देशींचे लोक सर्वही । व्हावे वैष्णवाचे संप्रदायी ।
ऎसें बोलतां ते समयी । अवश्य देवी म्हणतसे ॥३॥
तये देशींचा भूपती । तयासि दृष्टांत सांगीतला रात्रीं ।
दैवयोगें वैष्णव पातला क्षितीं । तरी शरण याप्रती तूं होई ॥४॥
आजपासोनि माझिये द्वारीं । हिंसा कर्म सर्वथा न करी ।
नाहीं तरी क्षोभेन तुजवरी । आपदा संसारीं मग होय ॥५॥
ऎसा दृष्टांत देखोनि त्वरित । मग चमत्कारला नृपनाथ ।
येऊनि अंबिकेच्या देवळांत । विष्णुभक्तातें नमस्कारी ॥६॥
लाडु वैष्णव प्रेमळभक्त । यासि धरूनि जे मारीत होते ।
त्यांचींही देऊळीं पडिलीं प्रेतें । राजा विस्मित जाहला ॥७॥
चित्तीं अनुताप धरूनि साचा । अनुग्रह घेतला संताचा ।
मग सकळ देशचि लाडणाचा । संप्रदायी साचा होतसे ॥८॥
विष्णुस्मरण हरिकीर्तन । एकादशी व्रताचरण ।
सर्वभुतीं दया पुर्ण । संत सेवन लोक करिती ॥९॥
करावया विश्वोध्दार । क्षितीं अवतरले वैष्णववीर ।
आणिक संत चरित्र थोर । ऎका सादर भाविकहो ॥११०॥
एक त्रिलोक नामें सोनार निश्चित । होता परम भाविक भक्त ।
तो संतसेवा सद्भावे करीत । असे विरक्त संसारीं ॥११॥
नगाचें घडीत करितसे जाण । तरी कष्टार्जित द्रव्य मागूनि येणें ।
न चोरी रुपें आणि सोनें । निश्चय पूर्ण तयाचा ॥१२॥
तंव कोणे एके अवसरीं । लग्न मांडिलें रायाचें घरीं ।
त्रिलोकासि बोलावूनि सत्वरी । आज्ञा करी नृपनाथ ॥१३॥
म्हणे जेहगीर जोडा रत्नजडित । सत्वर करोनि देयी आम्हातें ।
तुज ऎसा सोनार निश्चित । चतुर नगरांत नसे कीं ॥१४॥
ऎसें बोलोनि नरनायक । आणूनि देत सुवर्ण माणिकें ।
तीं त्रिलोकें घेऊनियां देख । तात्काळिक घरासि ये ॥१५॥
मंदिरीं प्रवेशतां तये वेळां । तों दृष्टीसीं देखिला वैष्णव मेळा ।
चित्तीं परमहर्ष वाटला । म्हणे उदय जाहला भाग्यासी ॥१६॥
मग सुंदर स्वयंपाक करवून । केलें संतांचे पूजन ।
पात्रीं वाढोनियां अन्न । करवीत भोजन सकळांसी ॥१७॥
दोन दिवस त्याचे घरीं । वैष्णव राहिले ते अवसरीं ।
जेहगीर जोडा करावया सत्वरी । तों विसर अंतरीं पडियेला ॥१८॥
तिसरे दिवसी राजयानें । बोलावूनि नेलें त्याज कारणें ।
म्हणे अलंकार देयी त्वरेनें । मग भयभीत मनी होतसे ॥१९॥
हात जोडोनि ते अवसरीं । म्हणे उदईक आणूनि देईन सत्वरी ।
राजा म्हणे चुकसील जरी । तरी शिक्षा निर्धारीं पावसी ॥१२०॥
मग घरासि येऊनि वैष्णववीर । मनांत जाहला चिंतातुर ।
म्हणे हें अवघड काम साचार । यासि दिवस चार लागती ॥२१॥
उदईक देईन म्हणवोन । राजासी करार केला जाण ।
तरी जवळीच आले मरण । संत सेवन अंतरलें ॥२२॥
ऎसें म्हणोनि चित्तांत । मग पळोनि गेला अरण्यांत ।
तेथें एकाग्र करुनि चित्त । श्रीरुक्मिणीकांत आठविला ॥२३॥
ऎशापरी क्रमिली राती । तों उदयासि पावला गभस्ती ।
संकट जाणूनि वैकुंठपती । कौतुक करिती काय तेव्हां ॥२४॥
त्रिलोकाचें रूप धरोनि सत्वर । घडीत बैसले दुकानावर ।
जेहागीर जोडा केला सत्वर । तो बोलावी नृपवर तयासी ॥२५॥
मग तेथें सत्वर जाऊनियां । मुजरा करीत असे राया ।
अलंकार दाखवितांचि तया । म्हणे तुझ्या चातुर्या अंत नाहीं ॥२६॥
बैसविलें रत्नाचें कोंदण । त्याच्या प्रकाशें झांकती नयन ।
मग संतुष्ट होऊनि नृपनंदन । बहुत धन देत असे ॥२७॥
तें पदरीं घेऊनि श्रीहरी । पातलें निजभक्ताचें घरीं ।
घरस्वामीनी पासीं देत सत्वरीं । मग आज्ञा करी तिजलागीं ॥२८॥
आज उत्साह आहे आपुलें मंदिरीं । साधु संत येतील घरीं ।
तरी सत्वर मिष्टान्नें निर्माण करी । ते आज्ञा शिरीं वंदितसे ॥२९॥
स्वयंपाक जाहलिया निश्चित । घरासि आले वैष्णवभक्त ।
त्रिलोकाच्या रूपें निश्चित । तयांशि पुजित जगदात्मा ॥१३०॥
साधू तृप्त जाहलिया पाहीं । आपणही जेविले त्या ठायीं ।
पदरीं प्रसाद बांधोनि पाहीं । मग अरण्यांत लवलाहीं जातसे ॥३१॥
साधुरूप धरूनि निश्चिती । त्रिलोकासि काय बोलती ।
मज तो बहुत पडिली भ्रांती । तरी सांग मजप्रती मार्ग कोठें ॥३२॥
बैरागी देखोनि समोर । नमस्कारितसे वैष्णववीर ।
म्हणे स्वामी कां अरण्यांत आलां दूर । वाट समग्र चुकलां ॥३३॥
ऎसें पुसतां भक्त चतुरा । काय म्हणती सारंगधर ।
या गावांत त्रिलोक सोनार । मी जेविलों पोटभर त्याचें घरी ॥३४॥
त्याणें वैष्णव बोलावूनि मंदिरीं । उत्साह केला आपुलें घरीं ।
बहुत पक्वानें वाढिली पात्रीं । तेणें सुस्त अंतरीं जाहलों ॥३५॥
निद्रा येतसे क्षण क्षण । यास्तव पंथ चुकला जाण ।
प्रसाद आणिला तुजकारणें । हा भक्षी त्वरेनें ये समयीं ॥३६॥
ऎसी संपादणी करूनियां । मग भोजनासि बैसविलें तया ।
पूर्ण कृपेची केली छाया । येतसे दया दीनाची ॥३७॥
महाप्रसाद सेविलिया जाण । त्रिलोक पुसे साधू कारणें ।
त्याणें कशास्तव उत्साह केला जाण । खर्चिलें धन कोठुनी ॥३८॥
यावरी म्हणे रुक्मिणीकांत । त्याणें जेहागीर जोडा रत्न जडित ।
नेऊनि दीधला राजयातें । तेणें नृपनाथ संतोषला ॥३९॥
धन वित्त दीधलें ते अवसरा । यास्तव उत्साह केला बरा ।
ऎकोनि साधूच्या उत्तरा । मग विस्मित अंतरी होतसे ॥१४०॥
तयासि घेऊनि वैष्णव भक्त । घरासि आला भीत भीत ।
कांतेसि पुसतां वृत्तांत । तो बैरागी तेथे गुप्त झाला ॥४१॥
तो कांता तयासि म्हणताहे । वेड घेऊनि पुसतां काय ।
तुम्हीं जेहगीर जोडा घडिता पाहे । दीधलें रायें धन वित्त ॥४२॥
मग वैष्णव बोलावूनि निजमंदिरीं । तुम्हींच उत्साह केला घरीं ।
त्रिलोकासि समजलें अंतरीं । म्हणे शिणला हरी मजसाठीं ॥४३॥
जो ब्रह्मयाच तात सुंदर । वैकुंठवासी जगदुध्दार ।
तो निजांगें होऊनि सोनार । तोषविला नृपवर वाटतें ॥४४॥
जनासि कळतांचि हे मात । प्रतिष्ठा महंती वाढेल बहूत ।
मग आपुलें चित्तीं होऊनि विस्मित । राहे पुर्ववत उगाची ॥४५॥
श्रीहरी कृपेनें निर्धारीं । सर्व सिध्दि अनुकूळ झाल्या घरीं ।
मग उत्साह धरोनि निजअंतरी । सद्भावें करी संतसेवा ॥४६॥
आतां सजण कसाई वैष्णव भक्त । संसारीं असे परम विरक्त ।
प्रपंच धंदा करितां निश्चित । काळक्षेप करित आपुला ॥४७॥
स्वयातीपासीं बाजारांत । आयतेंच मांस विकत घेत ।
त्याचा विक्रय करोनि निश्चित । भजन करित आपुला ॥४८॥
परी हिंसाकर्म न करीच जाण । असत्य सर्वथा न बोले वचन ।
वैष्णव भक्त दृष्टीसीं देखोन । तयासि नमन करीतसे ॥४९॥
शिधा साहित्य यथास्थिती । देऊनि तृप्त करी अतिथी ।
दया संपूर्ण सर्वांभूतीं । शूचिर्भूत सबाह्य ॥१५०॥
वस्त्रें पात्रें शुचिर्भूत । तुळसी वृंदावन लखलखीत ।
स्नान करी नित्य नित्य । वैकुंठनाथ आठवी ॥५१॥
कांताही परम पतिव्रता । अनुकूळ असे परमार्थ हिता ।
जाणोनि पतीच्या मनोगता । साधु-संतां भजतसे ॥५२॥
तों मांस विकावया कारणें । शाळग्रामाचें केलें वजन ।
त्याचा भक्तिभाव देखोन । जगज्जीवन सुरवाडलें ॥५३॥
एके दिवसीं वैष्णव भक्त । दुकानीं बैसें बाजारांत ।
तों एक ब्राह्मण येऊनि तेथ । त्याणें शाळग्राम निश्चित ओळखिला ॥५४॥
मग सजणासि येतसे काकुलती । म्हणे हे तों आहे विष्णुमूर्ती ।
तुझें घरी ठेवूं नये निश्चिती । तरी देई मजप्रती सत्वर ॥५५॥
याचें काहीं मोल मागसील जर । तरीं तें तुझ्या हातीं देतो सत्वर ।
ऎसें विनवितांचि द्विजवर । मग शाळग्राम सत्वर दिधला ॥५६॥
घरासि नेऊनि त्या ब्राह्मणें । महा उत्साह मांडिला त्याणें ।
वैदिक ब्राह्मण बोलावुन । करीतसे पूजन विष्णूचें ॥५७॥
अभिषेक करोनियां ओजा । षोडशोपचारें केली पूजा ।
परी ते न मानें अधोक्षजा । म्हणे निजभक्त काजा अंतरलों ॥५८॥
ब्राह्मणें शाळग्रामसि पूजून । केलें ब्राह्मण संतर्पण ।
तों रात्रीं येऊनि जगज्जीवन। दाविलें स्वप्न काय त्यासी ॥५९॥
मी सजाण कसयाचे घरीं । सुरवाडें राहिलों होतों नरहरी ।
तुं कां घेऊनि आलासि सत्वरी । मज निर्धारीं कंठेना ॥१६०॥
आतां प्रातःकाळीं उठोनि निश्चित । नेऊन घाली जेथील तेथ ।
नाइकशील जरी त्वरीत । तरी होईल घात क्षणमात्रें ॥६१॥
ब्राह्मण भयभीत होउनी । जागृतीसि आला तये क्षणीं ।
तो कसाई न घेचि अन्नपाणी । शाळग्रामावांचोनी सर्वथा ॥६२॥
एक रात्र एक दिवस । सजणासि घडला उपवास ।
दिनकर येतांचि उदयास । तों ब्राह्मण घरास पातला ॥६३॥
स्वप्नींचा वृत्तांत सांगूनि सर्व । म्हणे तूं तरी परम भक्तवैष्णव ।
सुखें पूजावा आपुला देव । सप्रेमभाव धरोनियां ॥६४॥
ऎकोनि द्विजवराची वाणी । सजण कसाई संतोषे मनीं ।
मग विष्णुमूर्तीची पूजा करोनि । तेव्हां अन्न पाणी घेतलें ॥६५॥
सप्रेम भक्तीचा भुकेला हरीं । याती कुळ न विचारी ।
नीच काम अंगें करी । ऎश्वर्य अंतरीं नाठवितां ॥६६॥
कसायाची देखोनि भक्ती । सुरवाडें राहे श्रीविष्णुमूर्ती ।
मग जगन्नाथासि जावया निश्चित । हेत चित्तीं उपजला ॥६७॥
देशिंची यात्रा निघाली फार । त्यासवें चालिला वैष्णववीर ।
शाळग्राम घेतला बरोबर । पूजितसे आदरें तयासी ॥६८॥
नित्य स्नान करोनि जाण । द्वादश टिळे गोपीचंदन ।
कंठीं तुळसी भूषणें । वैष्णव पूर्ण शोभतसें ॥६९॥
नित्य नेम सारोनि ऎशा रीतीं । मग पूजितसे शाळाग्राममूर्ती ।
यात्रेंत भिक्षा मागोनि निश्चिती । उदरवृत्ती चालवित ॥१७०॥
रात्रिसमयीं साचार । यात्रेपासोनि उतरतसे दूर ।
ऎसा पंथ क्रमितां साचार । तॊं वाटेसि नगर लागलें ॥७१॥
भिक्षा मागावया लागोनि । गावांत प्रवेशे एके सदनीं ।
तों घरस्वामीण होती व्यभिचारिणी । कामातुर देखोनि ते झाली ॥७२॥
भोग इच्छा धरोनि अंतरीं । तयासि राहविलें आपुलें घरीं ।
शिधा साहित्य देऊनि सत्वरीं । आदर करी बहु त्याचा ॥७३॥
अंतरीचा कपटभाव । सर्वथा नेणें भक्तवैष्णव ।
बाहेर आदरासि भुलोनि भावें । वस्तीसि ठाव तो धरिला ॥७४॥
अर्ध रात्र लोटतां सत्वर । घरस्वामीण सन्निध येतसें त्वरें ।
सजाणासि बोले मधुरोत्तर । म्हणे तुझ्याबरोबर मी येतें ॥७५॥
ऎसे बोलतां व्यभिचारिणी । उत्तर देतसे तिजलागुनी ।
तुझा भ्रतार निजला सदनीं । त्याजला टाकुनीं जाउं नये ॥७६॥
ऎसें सांगतां वैष्णववीर । मग घरांत गेली ते सुंदर ।
निजपतीचें कापोनि शिर । आणिलें सत्वर बाहेरी ॥७७॥
मग सजाणासि काय बोलत । पति मारिला म्यां आपुल्या हातें ।
आतां मज भोग देई त्वरित । परी नायकेंचि विष्णुभक्त सर्वथा ॥७८॥
व्यभिचारीण म्हणे तयाप्रती । तुजसाठीं म्यां मारिला पती ।
आतां नायकसी माझी वचनोक्ती । तरी करीन फजिती जनांत ॥७९॥
ऎसे म्हणवोनि ते भामिनी । बाहेर गेली तये क्षणी ।
बाजारीं करीत शंखध्वनी । तों लोक सदनीं मिळालें ॥१८०॥
तयासि सांगतसे वृत्तांत । हा तस्कर शिरला मंदिरांत ।
याणें माझा प्राणनाथ । मारिला निश्चित ये समयीं ॥८१॥
माळा मुद्रा घातल्यावरी । हा वैष्णव दिसतो दुराचारी ।
म्हणवोनि ठाव दीधला घरीं । घातक निर्धारीं मी नेणें ॥८२॥
ऎसें बोलतां ते जारिणी । लोक विस्मित झाले मनीं ।
मग वैष्णव भक्तासि घेउनी । दिवाणांत त्यांणीं त्यास नेलें ॥८३॥
वैष्णवासि पुसे ग्रामाधिकारी । हें तुवां अवटित केली परी ।
अन्न खावोनी याचे घरीं । घातावरीं टेंकसी ॥८४॥
मग आद्यंत यथार्थ वर्तमान । सजण सांगतसे त्याजलागुन ।
परीं सत्य न वाटे कोणाकारणें । दृष्टीसी खूण देखूनी ॥८५॥
एक म्हणती मैंदाचिया गळा । घातल्या उदंड तुळसी माळा ।
आणि घरधणीचा घात केला । हा कैसा भला म्हणावा ॥८६॥
एक बोलती यथार्थ वाणी । व्यर्थ कां निंदितां त्याजलागोनी ।
हेठायींची असे व्यभिचारिणी । भ्रतार मारोनी टाकिला ॥८७॥
इचें तों वचन न ऎकावें । ऎसाचि निश्चय वाटतो जीवें ।
यात्रेकरियासि सोडूनि द्यावें । सुकृत बरवें तरी घडे ॥८८॥
ऎसी धार्मिकाची वचनोक्ती । अधिकारियासि मानली चित्तीं ।
मग सजण कसाई सोडोनि देती । तंव जारिणी बोलत काय तेव्हां ॥८९॥
याणें मारिला माझा भ्रतार । तरी तोडोनि टाकावा याचा कर ।
जरी तुम्ही नायकाल माझें उत्तर । तरी रायासि सत्वर सांगेन मी ॥१९०॥
ऎसा तिचा निग्रह थोर । मग तिज हातीं सजणाचा तोडविला कर ।
खेद करीतसे वैष्णववीर । म्हणें कर्म दुस्तर पै माझें ॥९१॥
यात्रा निघोनि गेली दुरी । ते आटोपून गेल सत्वरीं ।
लोक पुसती ते अवसरीं । केली चोरी कोणे ठायीं ॥९२॥
यास्तव हात तोडिला जाण । ऎसा तर्क करिती मनें ।
सजण कसाई संतोषानें । श्रीहरी भजन करीतसे ॥९३॥
ऎसी त्याची असतां स्थित । पंथ क्रमीत नित्य ।
संनिध उरला जगन्नाथ । तों चरित्र अद्भुत वर्तलें ॥९४॥
पंड्यासि दृष्टांत सांगितला देवें । शिबिका घेऊनि तुम्ही जावें ।
सज्जण कसाई भक्त या नावें । बैसोनि आणावें तयासी ॥९५॥
ऎसें स्वप्न ते अवसरीं । देखोनि विस्मित झाले ते पुजारी ।
पालखी घेऊनि सत्वरी । यात्रेभीतरी प्रवेशलें ॥९६॥
मग स्वमुखें लोकांकारणें पुसत । सजन कसाब वैष्णव भक्त ।
कोणता आहे यात्रेंत । तरी तो आम्हातें दाखवा ॥९७॥
जगन्नाथें आज्ञापिलें आम्हांसि । शिबिकेंत बैसवोनि आणावें त्यासीं ।
ऎसें पुसतां पुजारीयासी । मग यात्रेकरी तयांसि दाखविती ॥९८॥
पंडे म्हणती वैष्णव भक्ता । तूं बहुत आवडसीं जगन्नाथा ।
तरी शिबिकेंत बैसोनि चाल आतां । मान वचनार्थ देउनि ॥९९॥
ऎसे सांगतां पुजारी । आश्चर्य करिती यात्रेकरी ।
म्हणती याणें वाटेवर करोनि चोरी । हात निर्धारीं तोडविला ॥२००॥
पतिताचा पावन श्रीहरी । हा साचचि प्रत्यय आला अंतरी ।
तस्करासि न्यावया निर्धारीं । शिबिका सत्वरी पाठविली ॥२०१॥
सज्ञान बोलती प्रतीवचन । ज्याचें अंतर तोचि जाणें ।
व्यर्थ कां निंदितां त्याजकारणें । नामस्मरण टाकोनियां ॥२॥
अंतरभाव शुध्द जाणूनिया । देवें पालखी पाठविली तया ।
ऎसी साक्ष पाहोनियां । निंदितसां वायां व्यर्थ त्यासी ॥३॥
असो त्रिविध जन नानापरी । करीत असती निंदा स्तुती ।
अनुभवें येतां कांही प्रचीती । संतासि मानिती मग तेव्हां ॥४॥
तंव पुजारी म्हणती वैष्णव भक्त । शिबिकेंत बैसोनि चाल आतां ।
तुझी खंती वाटते जगन्नाथा । सामोरा आतां आम्ही आलों ॥५॥
ऎकोनी म्हणे प्रेमळभक्त । मी सुखासनीं न बैसे निश्चित ।
कांहीं अपराध न होता किंचित । जगन्नाथें हात तोडविला ॥६॥
आधी नाक कापूनि जाण । मग ते पुसिलें पाटांवानें ।
तैसेंच देवाचे समजावणे । मजकारणे दिसतसे ॥७॥
ऎसें बोलोनि तें वेळां । पटापटा आसुवें आलीं डोळा ।
म्हणे हा अनाथबंधु घनसावळा । कशास्तव कोपला मजवरीं ॥८॥
संकटीं पावतो भक्ताकारणें । हें तीं पुराणप्रसिध्द वचने ।
तें असत्य वाटे मजकारणें । अनुभवे करून आपुल्या ॥९॥
ऎसेंच करणे होते तया । तरी पायी बिरुद बांधिले कासया ।
मनें वाचा आणि काया । मी त्याच्या पायां अनुसरलो ॥२१०॥
सजण कसाई ऎशापरी । क्षीत मानितसे नानापरी ।
तों सगुणरुपें ते अवसरी । तयासि श्रीहरी भेटले ॥११॥
चतुर्भुज सांवळी मूर्ती । दिव्य कुंडले कानी तळपती ।
शंख चक्र आयुधें हाती । पीतांबर दीप्ती झळकतसे ॥१२॥
लपवोनिया जनांचि दृष्टी । कसायासि भेटले जगजेठी ।
मग दृढपायीं घालोनि मिठी । आलिंगूनि भेटी घेतसे ॥१३॥
मग श्रीहरीसि पुसे प्रेमळभक्त । माझा कशास्तव तोडविला हात ।
कोणतें जन्मांतर होतें निश्चित । ते मज त्वरित सांग देवा ॥१४॥
यावरी म्हणे जगज्जीवन । तूं पूर्वजन्मीचा होतास ब्राह्मण ।
गंगातीरी करोनि स्नान । मांडिलें ध्यान विष्णूचे ॥१५॥
तों कसायापासोनि सुटली गाय । तें पळोनि गेली लवलाहें ।
मग हिंसक येऊनियां पाहे । पुसता होय तुजलागीं ॥१६॥
परी बोलिला नाहींस त्याजकारणें । हातें करोनि सांगीतली खूण ।
मग कसायानें धरोनि जाण । घेतले प्राण धेनूचे ॥१७॥
ऋण वैर हत्या जाण । तें तरी न सुटे दीधल्या विण ।
कसायाचें घ्यावया उणे । जन्म गाईनें घेतला ॥१८॥
हिंसक आणि गाय तत्त्वतां । तीं स्त्रीपुरुषें झाली उभयतां ।
खडाष्टक दोघांत असतां । गांजीतसें कांता नित्य त्यासी ॥१९॥
तुझें जन्मांतर होतें कांहीं । यास्तव गेलासि तिचें गृहीं ।
मग जवळ येऊनि रात्रि समयीं । तुज ते विषयी गोवूं पाहे ॥२२०॥
भ्रताराचें आयुष्य सरे । मग तिणें साधिलें पुर्ववैर ।
आपुल्या हाते कापून शिर । बांलट तुजवर घातलें ॥२१॥
ज्याहातें दाखविलें गाईप्रती । तो तिणे तोडविला सत्वरगती ।
ऎसी जन्मांतराची रीती । सजणासि श्रीपती सांगतसे ॥२२॥
तूं विष्णु अर्चन करितां मानसीं । दृष्टींसी पाहिलें कसायासी ।
म्हणवोनि जन्म याचे वंशीं । जाहला तुजसीं निश्चित ॥२३॥
आणि ब्राह्मण जन्मींचा आचार पाहीं । तुज तोचि आवडे ये समयीं ।
परी भक्ति भजनासि पालट नाहीं । मी शेषशायी भुललों ॥२४॥
मग प्रसन्न होऊनि जगन्नाथ । अघटित चरित्र काय करीत ।
तत्काळ फाटला त्याचा हात । लोक समस्त पाहाती ॥२५॥
जयजयकारें पिटोनि टाळी । आनंदली भक्त मंडळी ।
म्हणती भक्तासि पावला वनमाळी । हेतों नव्हाळी अनुपम ॥२६॥
अद्भुत चरित्रे देखोनि थोर । मग सकळ करिती नमस्कार ।
म्हणती धन्य हा वैष्णववीर । वैकुंठविहार वश केला ॥२७॥
नाना चरित्रें दाखवोनि श्रीपती । आपुल्या दासाची वाढवीत कीर्ती ।
सजण कसाई संतोषे चित्तीं । जगन्नाथीं मग जाय ॥२८॥
समुद्र तीरीं करोनि स्नान । घेतलें श्रीहरीचें दर्शन ।
चातुर्मास तेथें राहोन । त्रिकाळ घे दर्शन देवाचें ॥२९॥
विष्णुस्मरण हरिकीर्तन । सर्वदा आनंदयुक्त मन ।
जगन्नाथाची आज्ञा घेऊन । आपुलें स्वस्थान पावला ॥३०॥
अनेक संतांच्या अनेक स्थिती । यांचीं एकविध सप्रेम भक्ती ।
देखोनि भुलला रुक्मिणीपती । जगीं सत्कीर्ती वाढवित ॥३१॥
पुढिले अध्यायीं कथा सुंदर । वदविता श्रीरुक्मिणीवर ।
महीपतीसि देऊनि अभयवर । वसविलें अंतर निजकृपें ॥३२॥
स्वस्ति श्रीभक्तलीलामृत ग्रंथ । श्रवणेंचि पुरती मनोरथ ।
प्रेमळ परीसोत भाविक भक्त । पंचेचाळिसावा अध्याय गोड हा ॥२३३॥ ॥अ०॥४५॥ओव्या॥२३३॥