मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|भक्त लीलामृत|

भक्त लीलामृत - अध्याय ४६

महिपतिबोवांच्या वाचेला सिद्धी होती, म्हणूनच हा ग्रंथ जो भक्तिभावाने व एकाग्रतेने वाचील त्याला फलश्रुतीचा अनुभव खचितच येणार.


॥ श्रीगणेशाय नमः ॥

जें सकळ मंगळांचें सार । कीं महा सिध्दीचें भांडार ।

कीं सायुज्य मुक्तीचें निज मंदिर । पावन चरित्र संतांचें ॥१॥

कीं पूर्णचेचीही आत्मस्थिती । मुक्तीवरील चौथी भक्ती ।

कीं प्रेमळाचीहे अंतर्ज्योती । धैर्य वृत्ती सात्त्विक ते ॥२॥

कें अमृताचा चमत्कार । नातरी वासरमणीचा प्रकाश थोर ।

कां नभाचा अवकाश साचार । सांठवे चराचर त्यामाजी ॥३॥

कां वैष्णवी मायेचें विसावणें । कां भागीरथीचें अधिष्ठान ।

नातरी वैकुंठीचें पेणें । सगुण ध्यान श्रीहरीचें ॥४॥

कां अवर्षणें गांजिली सृष्टी । मग त्याही वरील मेघवृष्टी ।

कीं सत्वधीराची प्रपंच रहाटी । पावन गोष्टी संतांची ॥५॥

मागिले अध्यायीं कथा अद्भुत । सजण कसाई प्रेमळ भक्त ।

त्यासि कृपा करितां जगन्नाथ । तत्काळ हात फूटला ॥६॥

आतां नर वाहन वैष्णवभक्त । संत सेवा असे करीत ।

राधाकृष्ण स्मरण सत्य । वाचेसीं जपत सर्वदा ॥७॥

महानदीचिये तीरीं । नावेवरी लोकांस उतरी ।

तेणें काळक्षेप आपुला करी । उदास अंतरीं सर्वदा ॥८॥

साधुसंत वैष्णववीर । तयांसि न मागे उतार ।

दीन अनाथांसि करितसे पार । परी द्रव्य साचार न लगे ॥९॥

धनवंत व्यवसायी देख । द्रव्य देतील आपुल्या सुखें ।

तें आपल्या संतोषें मानीत हरिखें। सात्विक विवेक त्यामाजी ॥१०॥

तंव कोणे एके अवसरीं । अवघे मिळोनि दुराचारी ।

रायापासीं नानापरी । भरीउभरी घातल्या ॥११॥

म्हणती नरवाहन गंगातीरीं । तुम्ही ठेविला नावेवरी ।

तो द्रव्य नेदीच राजद्वारीं । ठेवितो मंदिरीं आपुल्या ॥१२॥

ऎकोनि दुर्जनांचें वचन । राजा जाहला क्रोधायमान ।

म्हणे ऎस्स उन्मत्त नरवाहन । तरी घर लुटणें तयाचे ॥१३॥

ऎसी आज्ञा होतांची सत्वरी । मग भृत्य गेले त्याच्या घरीं ।

तों कांही द्रव्य न दिसे मंदिरीं । मग खणती सत्वरीं लाविली ॥१४॥

परी वस्तभाव अळंकार । द्रव्य न दिसे अणुमात्र ।

मग नरवाहनासि धरोनि सत्वर । राज किंकर ते नेती ॥१५॥

दुर्जन रायासि म्हणती पाहीं । याणें द्रव्य ठेविलें आणिके ठायीं ।

ऎकोनि नृपवर ते समयीं । बंदिखानीं ठेवि तयासी ॥१६॥

म्हणे कोठें लपविलें आपुलें धन । तें सत्वर आम्हांसि सांगणे ।

तरीच सोडूं तुज कारणें । नाहीं तरी प्राण घेऊं आतां ॥१७॥

अस्तमानापर्यंत ते दिवशीं । विष्णु भक्त राहिला उपवासी ।

तों अन्न घेऊनी त्याची दासी । बंदिशाळेसी पातली ॥१८॥

दासीसि पुसे तये क्षणीं । मी तरी पडिलों बंदिखानीं ।

सुटका होईल कैसेनी । उपाय मनीं सुचेना ॥१९॥

संतसेवेसि निश्चित । द्रव्य खर्चिलें नित्यनित्य ।

घरीं ऎवज नाहीं किंचित । काय रायातें दाखवूं ॥२०॥

दासी म्हणतसे ते अवसरीं । तुम्हीं चिंतातुर कासया अंतरीं ।

आपुल्यास संकट पडिलें जरी । चित्तीं श्रीहरी आठवावा ॥२१॥

दुष्काळीं उपवासी मरतां । मग ओळंगावा मिष्टान्न दाता ।

कीं तारक कवळिजे पूरीं बुडतां । तेवीं संकटी अनंता आळवावें ॥२२॥

कां देह व्यापिला रोगें करोनी । तरी मंत्र उच्चारावा संजीवनी ।

तेवीं संकट पडतां भक्तालागोनी । तरी श्रीहरी चिंतनी बैसावें ॥२३॥

ऎसी दासीची वचनोक्ती । नर वाहनासि मानली चित्तीं ।

मग तुळसी माळा घेऊनि हातीं। भजन एकांतीं करितसे ॥२४॥

राधा कृष्णाची उपासना । तें सगुणस्वरूप आणीतसे ध्याना ।

अहोरात्र नामस्मरणा । एकाग्र मनें करितसे ॥२५॥

झांकोनियां नेत्रपातीं । हृदयीं चिंतिला वैकुंठपती ।

चतुर्भुज सांवळीं मुर्ती । शंख चक्र हातीं मंडित ॥२६॥

ऎसें रूप आणोनि ध्यानीं । काय करितसे विनवणी ।

म्हणे देवाधिदेवा कैवल्यदानी । सोडवी भवभ्रमा पासूनियां ॥२७॥

ऎसां धावां ऎकोनि कानीं । तत्काळ पावले चक्रपाणी ।

बेडी तोडोनि तिसरे दिनीं । रायासी स्वप्नीं काय सांगे ॥२८॥

म्हने नरवाहन माझा निजभक्त । साधु सेवेसि सर्वदा रत ।

तयासि तुवां छळिलें व्यर्थ । हरिल सुकृत तेणेंची ॥२९॥

तूं राजमदें उन्मत्त चित्तीं । न विचारिसीच राजनीती ।

ऎकोनि दुर्जनांची कुमती । वैष्णवाप्रती छळियेलें ॥३०॥

तरी आतां सावध होऊनि सत्वर । नरवाहनासि करी नमस्कार ।

इतुका दृष्टांत देखोनि सत्वर । जागृत नृपवर जाहला ॥३१॥

मग परम भय पावोनि चित्तीं । बंदिशाळेसि आला नृपती ।

नरवाहनासि बोलावोनि प्रीतीं । करितसे ग्लांती तेधवां ॥३२॥

म्हणे माझा अपराध न गणोनि कांहीं । आतां आपुल्या मंदिरासि जायी ।

दुर्जनांची कुबुध्दी ऎकोनि पाहीं । तुज ये समयीं छळियेलें ॥३३॥

ऎकोनि रायाची विनवणी । नरवाहन संतोषला मनीं ।

म्हणे अनाथनाथा चक्रपाणी । तयाची करणी हे दिसे ॥३४॥

मग घरासि जातां तयाप्रती । कुटुंबासि आनंद झाला चित्तीं ।

संतसेवा करीतसे प्रीतीं । सिध्दि राबती सर्व घरी ॥३५॥

आणिक चरित्र रसाळ पुढती । सादर ऎकिजे सभाग्य श्रोतीं ।

रायसिंग आणि अंगद भूपती । बंधु असती उभयतां ॥३६॥

धाकट्या अंगदाची कांता । परम भाविक पतिव्रता ।

विष्णु अर्चन श्रीहरिकथा । आवडी चित्ता हे बहू ॥३७॥

एक विष्णुभक्त सत्पुरुष पाहून । त्याचा अनुग्रह घेतला तिणें ।

सर्वदा करीत नामस्मरण । सप्रेम मन सर्वदा ॥३८॥

तंव एके दिवशीं नगरांत । अवचित आले सद्गुरुनाथ ।

अंगदाचे स्त्रीस आनंद बहुत । मग मंदिरीं तयातें आणिलें ॥३९॥

मग सर्व उपचार आणोनि पूजेसी । बैसतसे सद्गुरु सेवेसी ।

वृत्तांत कळता अंगदासी । वर्जितसे तिसीं सक्रोध ॥४०॥

म्हणे गुरु दुरुमिथ्या विचार । कांतेचा देव तो भ्रतार ।

या विरहित दैवत थोर । असेल तर मज दावी ॥४१॥

ऎसें म्हणवोनि उन्मत्तपणें । करूं नेदी सद्गुरु पूजन ।

त्याच्या स्त्रीनें वर्जिलें अन्न । दिवस तीन लोटले ॥४२॥

तिच्य भक्तीस्तव श्रीहरी । अंगदासि भेटले स्वप्नांतरी ।

चतुर्भुज मुर्ति साजिरी । शंख चक्र करीं मंडित ॥४३॥

सांवळे श्रीमुख मनोहर । कांसेसि दिव्य पीतांबर ।

पायीं नेपुरें वांक्या तोडर । आणि मकराकार कुंडलें ॥४४॥

ऎसी मूर्ति भव्य वाणी । अंगदें साक्षात देखिली स्वप्नीं ।

मग सद्भावें माथा ठेविला चरणीं । सप्रेम मनीं निवाला ॥४५॥

प्रातःकाळीं येऊनि जागृती । मग समजावीतसे कांतेप्रती ।

म्हणे तुझ्या प्रसादें निश्चिती । मग वैकुंठपती भेटले ॥४६॥

मग तिच्या सद्गुरुसि आणोनि घरीं । पूजा केली सर्वोपचारीं ।

परम सद्भाव धरोनि अंतरीं । अनुग्रह सत्वरी घेतला ॥४७॥

कांता भ्रतार दोघे निश्चित । श्रीविष्णु भक्तीसी जाहली रत ।

सद्भावें साधु सेवा करीत । द्रव्य वेंचित सत्पात्रीं ॥४८॥

तंव वडील बंधु रायसिंग जाण । देशांतरा पाठवित अंगदाकारणें ।

सवें घेऊनि कांहीं सैन्य । एक राजा तेणें लुटिला ॥४९॥

तेथें शत हिरे सांपडले त्यासी । ते अवघे वांटिले वैष्णवांसी ।

एक ठेवित आपणापासी । म्हणे हा जगन्नाथासीं अर्पावा ॥५०॥

घरासि आलिया वैष्णव जन । द्रव्य दीधलें बंधू कारणें ।

परी अमुल्य हिरा ठेविला चोरून । तो सेवक जन सांगती ॥५१॥

रायसिंग मागतां आपण । परी अंगद सर्वथा नेदीच जाण ।

तेणें विकल्पें विटाळले मन । मग क्रोधायमान तो झाला ॥५२॥

मग स्वमुखें सांगें भगिनीसी । विष घालावे अंगदासी ।

अवश्य म्हणवोनि तयासी । मग भोजनासी पाचारिलें ॥५३॥

कृत्रिम भाव मनांत । हें अंगदासि नसेचि श्रुत ।

विष कालवोनि अन्नांत । भगिनी वाढित त्यालागीं ॥५४॥

मग ध्यानांत आणोनि वैकुंठपतीं । अंगदें नैवेद्य दाखविला प्रीतीं ।

मग निश्चय पाहोनि श्रीपती । कौतुक करिती काय तेव्हां ॥५५॥

भगिनीच्या हृदयस्थ होऊनि आपण । म्हणे त्वां सर्वथा न खावें अन्न ।

विष कालवोनि रांधिलें जाण । तुझ्या बंधूने सांगितलें ॥५६॥

वैष्णव भक्त म्हणतसे तेव्हां । म्यां नैवेद्य दाखविला प्रीतीं ।

तरी महा प्रसाद न टाकावा । अगत्य सेवावा प्रीतीनें ॥५७॥

श्रीहरी भोक्ता म्हणवोन । अंगद जेविला अवघेंचि अन्न ।

परी विष न बाधी तयाकारणें । जगज्जीवन रक्षिता ॥५८॥

जो प्रल्हादाचिया बोला । विषासगट आपण झाला ।

मीराबाईचा जीव रक्षिला । संकटीं पावला श्रीहरी ॥५९॥

अंगदें समजोनि ऎशा रीतीं । वृत्तांत सांगितला कांतेप्रती ।

म्हणे आतां न राहावे ये क्षितीं । उदासवृत्ती धरियेली ॥६०॥

कांतेसि घेऊनि बरोबरी । जगन्नाथासि चालिले सत्वरीं ।

तों रायसिंगासि क्रोध आला भारी । सैन्य वरी पाठविलें ॥६१॥

म्हणे अंगदासि धरोनि सत्वरीं । हिरा घेऊनि येइजे त्वरें ।

प्रधानें सैन्य घेवोनि फार । वेढिलें साचार त्यालागीं ॥६२॥

मग अंगदे हिरा घेऊनि हातीं । दाखविला सकळाप्रती ।

मग डोहांत टाकिला सत्वर गती । म्हणे पावो तुज प्रती जगन्नाथा ॥६३॥

देखोनि रायसिंगाचे भृत्य । शोध करिती जळांत ।

तों अंगदे म्हणतसे तयातें । शिणतां व्यर्थ कां तुम्हीं ॥६४॥

हिरा नेऊनि उठाउठी । जगन्नाथें घातला कंठीं ।

तुम्हांसि असत्य वाटेल पोटीं । तरी चला दृष्टीं दाखवितो ॥६५॥

ऎसें म्हणतां वैष्णवभक्त । प्रधान लोक आश्चर्य करीत ।

मग अंगदाच्या समागमे निश्चित । आलें समस्त जगन्नाथी ॥६६॥

देवदर्शनासि जातांचि त्याणीं । हिरा ओळखिला आपुलें नयनीं ।

मग पुजारियांसि पुसती तयें क्षणीं । हा कोणी आणोनि वाहिला ॥६७॥

पंडे बोलतीं साच उत्तर । दोन प्रहर येतां दिनकर ।

हिरा पडिला देवासमोर । यासि दिवस चार लोटले ॥६८॥

मग आम्ही ठेविला उचलोनी । तंव दृष्टांती सांगे चक्रपाणी ।

हिरा पदकांसि घालोनि । मजलागोनि समर्पी ॥६९॥

माझा निजभक्त अंगद नृपती । त्याणें समर्पिला मजप्रती ।

ऎसा दृष्टांत देखतां रातीं । मग पदकीं निश्चित जडियेला ॥७०॥

ऎसें ऎकोनि प्रधान जन । विस्मित जाहले आपुल्या मनें ।

मग रायसिंगासि वर्तमान । साकल्य लेहून पाठविलें ॥७१॥

ऎकोनि अनुताप जाहला तया । म्हणे म्यां बंधूसि छळिलें वायां ।

मग पत्रीं लेहोनि भाषक्रिया । म्हणे आपुल्या ठायां तुम्हीं यावें ॥७२॥

तूं साक्षात्कारी विष्णुदास । हे नेणेंचि मी बहुवस ।

नाशवंताची धरोनी आस । म्यां धरिला द्वेष अंतरीं ॥७३॥

आतां मागील चित्तीं न धरोनि कुन्हेम । ममता धरोनि भेटीस येणें ।

नायकसील तरी तुज आण । श्रीजगन्नाथाची जाणपां ॥७४॥

पत्र लेहोनि ऎशा रीतीं । पाठविलें वार्तिकाचे हातीं ।

तें आनंदानें ऎकोनि प्रीतीं । विस्मित चित्तीं होतसे ॥७५॥

म्हणे श्रीहरी कृपेनें तत्त्वतां । पाषाणासि फुटल्या गुल्मलता ।

कीं लोहासि आली सोज्ज्वळता । परीस नलगतां अंगासीं ॥७६॥

ऎसें बोलोनि उत्तर । जगन्नाथासि विनवी जोडोनि कर ।

म्हणे तुझी कृपा जाहलियावर । लोभापर शत्रु होती ॥७७॥

अनाथ बंधु करुणाघन । हा प्रत्यय आला मजकारणें ।

माझें तुळसीदळ अंगीकारून । आपुलें महिमान वाढविसी ॥७८॥

मग देवासी पुसोनि अंगद नृपती । घरासि आला सत्वर गती ।

रायसिंगासि लागली विष्णुभक्ती । सत्संगतीचेनि गुणें ॥७९॥

आणिक माधोसिंग म्हणवोनि नृपती । त्याची पत्नी परम गुणवंती ।

ती पृथुरायाची कन्या निश्चिती । तीस वैकुंठपती पावला ॥८०॥

तीं असतां आपुल्या भ्रतारापासी । तों सगुण पुत्र जाहला तिसी ।

भ्रतारानें एक दासी । दीधली सेवेसी तिजलागीं ॥८१॥

ती सर्वदा होंत हालविती । नामस्मरणीं लागली प्रीती ।

तंव ती राणी पुसतसे दासीप्रती । तूं काय जपतीस मज सांग ॥८२॥

तंव ती बोले प्रतिवचन । मी करितसें श्रीहरीचें स्मरण ।

नाशवंत देह जाईल जाण । लोटतां क्षण नासेल कीं ॥८३॥

गुणवंती तिजला करितसे ग्लांत । तरी मजला भजन सांगिजे त्वरित ।

देखोनि तिचा भावार्थ । अवश्य म्हणत ती दासी ॥८४॥

तिसी स्नान करवोनियां जाण । मग करविलें विष्णुपूजन ।

म्हणे व्रजवासी तो श्रीकृष्ण । त्याचें ध्यान करीत जा ॥८५॥

ऎकोनी दासीची वचनोक्ती । राणीसि बोध ठसावें चित्तीं ।

श्रीहरी कृष्णचरणीं जडली वृत्ती । अश्रुपात वाहती नेत्रांतून ॥८६॥

सकळ कामांचा पडिला विसर । नाठवे पुत्र आणि भ्रतार ।

तंव राजा जाहला चिंतातुर । म्हणे इसी संचार काय जाहला ॥८७॥

एके दिवसीं मांडलिक भूपती । स्वमुखें पुसे कांतेप्रती ।

तुझी कां जाहली विदेहवृत्तीं । तें मजप्रती सांगावें ॥८८॥

कांता भ्रतारासि म्हणताहे । वृथा तुम्हांसि सांगोनि काय ।

मज श्रीकृष्ण ध्यान लागलें आहे । परी दर्शन न होय तयाचें ॥८९॥

ऎसे म्हणोनि ते सुंदरी । अश्रुपात वाहती नेत्रीं ।

तंव राजा कोपला तिजवरीं । क्रूर नेत्रीं पाहतसे ॥९०॥

ऎसे देखोनि गुणवंती । भयभीत जाहली चित्तीं ।

नेत्र झांकतांचि ती सती । तो सगुणमूर्ती दिसे पुढें ॥९१॥

चतुर्भुज घनसांवळा । दिव्यपीतांबर कांसे पिवळा ।

मुगुट कुंडलें वनमाळा । पाहतांचि डोळां विश्रांती ॥९२॥

ऎसें रूप देखतांचि साचार । सद्भावे केला नमस्कार ।

तव देवें तिच्या मस्तकीं ठेवोनि कर । अभय उत्तर देतसे ॥९३॥

म्हणे मी साह्य असतां साचार । तूं भय न धरी अणुमात्र ।

ऎसें बोलिले रुक्मिणीवर । तों उघडीत नेत्र गुणवंती ॥९४॥

देवें दीधला साक्षात्कार । हें तों न जाणेचि नृपवर ।

मग कांतेसि क्रोधे बोले उत्तर । आतां वेडेचार न करावे ॥९५॥

आजपासोनि निर्धारीं । साधुसंत न आणावे घरीं ।

दासीसि भूपति आज्ञा करी । आठव अंतरीं असोंदें ॥९६॥

संती येऊनि मंदिरास । कांतेसि केला उपदेश ।

भजनीं लाविलें रात्रंदिवस । संसार नाश केला कीं ॥९७॥

तरी आजपासोनि तया चोरा । येऊं न द्यावें निजमंदिरा ।

ऎसें सांगोनि देशावरा । जाय सत्वर नृपनाथ ॥९८॥

मग दासी हातीं ते कामिनी । चोरूनि संताचें तीर्थ आणी ।

तें नित्य नेमें प्राशन करोनी । विष्णुस्मरणीं तत्पर ॥९९॥

रायाचा दिवाण अभक्त थोर । तयासि कळता समाचार ।

मग माधेसिंगासि सविस्तर । लिहून साचार पाठविलें ॥१००॥

म्हणे तुम्हीं सांगीतलें निश्चित । परी ही विष्णुस्मरण न टाकींच सत्य ।

चोरून संतांचें तीर्थ घेत । आपुल्यासि विदित असावें ॥१०१॥

भ्रतार क्षोभला परम चित्तीं । मग काय करीतसे गुणवंती ।

केश उतरविले नापिका हातीं । वैराग्य चित्तीं ठसावलें ॥२॥

कांकणें कांढोनियां जाण । ल्याली तुळसी मण्यांची भूषणें ।

ऊर्ध्वतिलक गोपीचंदन । बैरागीण ते झाली ॥३॥

साधुसंत आणोनि घरी । पूजा करीतसे सर्वोपचारीं ।

उदास होऊनि सर्वोपरी । चित्तीं श्रीहरी आठवित ॥४॥

हेंही वर्तमान प्रधानानें । मागून पाठविलें लेहून ।

मग गुणवंतीच्या पुत्राकारणें । राजा निवेदन करीतसे ॥५॥

तो पितयासारिखा ते अवसरीं । शब्द बोलतसे वरवरी ।

परी संतोष मानीत निजअंतरी । म्हणे सार्थक संसारीं जाहलें ॥६॥

कांतेचें वैराग्य ऎकोन । परम क्षोभला नृपनंदन ।

मग चार भृत्य पाठविले त्याणें । म्हणे जीवें मारून तीसीं टाका ॥७॥

इकडे विष्णुमंदिरीं ती गुणवंती । अर्चन करीतसे निजप्रीतीं ।

मारेकरी येऊनी दुर्मती । जपत बैसती ते ठायीं ॥८॥

बाहेर जाहले हें कृत्य । गुणवंतीस नाहीं श्रुत ।

मग देवाधिदेव वैकुंठनाथ । वेष धरित व्याघ्राचा ॥९॥

महाव्याघ्र पंचानन । देऊळीं प्रगटला नलगतां क्षण ।

गुणवंती देखोनि विस्मित मन । मग करितसे पूजन तयाचें ॥११०॥

गंधाक्षता सुमनहार । निजप्रीतीनें वाहे सुंदर ।

म्हणे कशास्तव देवा जाहलासि व्याघ्र । हें मज साचार कळेना ॥११॥

विष्णुअर्चन जाहलिया समस्त । मग संतसेवेसि बाहेर येत ।

मारेकरी तिसी धरूं पाहत । तों व्याघ्र अवचित धांवला ॥१२॥

महा भयानक पंचानन । चौघा जणांसि टाकिलें मारून ।

इतरांसि डांस केलें त्याणें । मग ते भिवून पळताती ॥१३॥

व्याघ्र येऊनि हरिमंदिरीं । अदृश्य जाहला ते अवसरीं ।

भक्त गर्जती जयजयकारीं । आश्चर्य अंतरीं त्या वाटे ॥१४॥

म्हणती निजभक्ताच्या संकटास्तव । आजि व्याघ्ररूप धरिलें देवें ।

जे मारावयासि आले होते जीवें । त्यांचाहि ठाव पूसिला ॥१५॥

ऎसा साकल्प वृत्तांत । माधोसिंगासि जाहला श्रुत ।

कीं व्याघ्ररूप धरोनि भगवंतें । चौघा जणांतें मारिलें ॥१६॥

मग परम अनुताप जाहला चित्तीं । म्हणती आम्हीच पापिष्ठ दुर्मती ।

मारेकरी पाठविले निश्चिती । परी तिसीं श्रीपती पावला ॥१७॥

मग प्रधानासि लिहोनि पाठविलें तेव्हां । गुणवंती करीतसे संतसेवा ।

तुम्ही खर्च लागेल तितुका द्यावा । अनमान न करावा चित्तांत ॥१८॥

मग सैन्य घेऊनि समस्त । उभयतां बंधु घरासि येत ।

वाटेसि महानदी भरोनि जात । मग ते नावेंत बैसले ॥१९॥

मध्यभागीं नौका येत । बुडों लागली जळांत ।

घाबरले लोक समस्त । उपाय तेथ सुचेना ॥१२०॥

गुणवंतीचें करितां स्मरण । नाव कडेस लागली जाण ।

मग आपुलें नगरीं प्रवेशोन । हरिमंदिरासि त्वरेनें पातले ॥२१॥

माधोसिंगाचा ज्येष्ठ सहोदर । गुणवंतीसि करी नमस्कार ।

म्हणे तुझें नाम घेतां साचार । नदी पार पावलों ॥२२॥

सत्संगाच्या योगें देख । उभयतां बंधु जाहले भाविक ।

संत सेवा करिती देख । वृत्ति सात्विक ठसावली ॥२३॥

आणिक कथा रसाळ गहन । सादर ऎका भाविक जन ।

एक राज उपाध्याय ब्राह्मण । कन्यारन्त त्यासि झालें ॥२४॥

तें लहानपणापासूनि निश्चिती । श्रीहरिभजनीं लावितसे प्रीती ।

कुंवराबाई नांव तिजप्रती । परीं विरक्त चित्तीं सर्वदा ॥२५॥

ती दिवसंदिवस जाहली थोर । मग न्यावयासि आला तिचा भ्रतार ।

तयासि देखोनि ते सुकुमार । चिंतातुर जाहली ॥२६॥

म्हणे अशाश्वत हें विषय सुख । भोगितां पुढें अनेक दुःखें ।

पुढें भोगणें त्रिविध नरक । मग आत्मसुख अंतरे ॥२७॥

भ्रतार संग करितां निश्चिती । पुढें पोटीं होईल संतती ।

मग मोहममतेनें पडेल भ्रांती । नव्हेचि प्राप्ती देवाची ॥२८॥

ऎसा विवेकें साचार । रात्र लोटली दोनप्रहर ।

मग उतरोनि सर्व अलंकार । गांवाबाहेर चालिली ॥२९॥

नंतर वेशी आडविल्या देखोन । मग केलें श्रीकृष्ण चिंतन ।

तों कपाटें मोकळीं करून । देवें काढोन दीधली ॥१३०॥

तंव गरीब अनाथ वाटेवर । तैसेंचि रूप धरीं कुंवर ।

नगाची गांठोडी होती थोर । ते पोटीं साचार खोंविली ॥३१॥

अनाथ रूप धरोनि जाणा । मग ते गेली वृंदावन ।

चीरघाटी करोनी स्नाना । श्रीकृष्ण दर्शन घेतलें ॥३२॥

हात जोडोनि कुंवराबायी । देवासि विनवी ते समयीं ।

आतां भवबंधनापासूनि सोडवी । म्हणवोनि पायीं लागली ॥३३॥

अलंकार होते जवळ । ते वैष्णवासी वाटिले तत्काळ ।

चित्तीं करीत हळहळ । ते वेल्हाळ बैसली ॥३४॥

म्हणे देवाधिदेवा जगजेठी । मज पहावें कृपादृष्टीं ।

सगुणरूपें देवोनि भेटी । तोडी फांसाटी भवबंध ॥३५॥

ऎशा रीतीं करितां चिंतन । जाहली तीन उपोषणें ।

मग सगुण रूपें जगज्जीवन । तिज कारणें भेटले ॥३६॥

अभयहस्त ठेवोनि शिरीं । म्हणे आतां सर्वथा चिंता न करी ।

मी सुदर्शन घेऊनि श्रीहरी । नानापरी रक्षीन ॥३७॥

कुंवरीसि म्हणे जगज्जीवन । अतां राधाकुंडी बैस जाऊन ।

इतुकें दृष्टींसि देखोन । मग समाधान पावली ॥३८॥

राधाकुंडी बैसली जाऊन । मग देवें तीस घातलें भोजन ।

तों पिता धुंडित आला त्वरेनें । मग संतोष मन देखतां ॥३९॥

कन्येसि तेव्हां उपदेशित । कैसी पळोनि आलीस येथ ।

कुळास बोल लाविला सत्य । लज्जा वाटत आम्हांसी ॥१४०॥

तंव कुंवरी म्हणतसे पितयासी । अझून संसाराची असोसि ।

साठी वर्षे जाहलीं तुजसी । परी वैराग्य मानसीं उपजेना ॥४१॥

नाशवंत देह मिथ्या माया । जैसी वोडंबरीची छाया ।

येथें आठवावें श्रीकृष्णराया । तरीच सत्क्रिया तयाची ॥४२॥

ऎसी कन्येची उपदेशवाणी । पितयासि मानली तयेक्षणी ।

मग कुंवरीसि बोले वचनीं । आपुलें सदनीं चाल आतां ॥४३॥

कांही संकोच न धरी चित्तीं । सुखें करी श्रीहरीची भक्ती ।

नको जाऊं सासर्‍याप्रती । मानी वचनोक्ती आमुची ॥४४॥

ऎसा पिता नानापरी । विनवितसे ते अवसरीं ।

तंव दृष्टांतीं सांगतसे श्रीहरी । याच्याबरोबरी जाय आतां ॥४५॥

माझा चित्तीं करितां आठव । महा संकटें निवारीन सर्व ।

आज्ञा करितां देवाधिदेव । पितयासवें ते आली ॥४६॥

घरीं करोनि ठाकुरद्वारा । विष्णु मूर्ति मांडीतसे देव्हारा ।

नित्य सर्वोपचारा । प्रेम अंतरा धरोनियां ॥४७॥

साधुसंत वैष्णवजन । यांचेंही सद्भावें करीतसे पूजन ।

रात्री होतसे हरीकीर्तन । वेधतसे मन ऎकतां ॥४८॥

कुंवराबाईचे संगती । बहुता जनासि लागली भक्ती ।

तंव सेखावत तेथील नृपती । त्यानें सत्कीर्ती ऎकिली ॥४९॥

पुरोहितासि म्हणे तये क्षणीं । तुमची कन्या सुलक्षणी ।

लागली श्रीहरीचें भजनीं । ऎसें श्रवणीं ऎकिलें ॥१५०॥

अपूर्व गायन करीतसे । परस्परें ऎकतों ऎसें ।

ऎसें म्हणवोनि धराधीश । आला घरास ते दिवसीं ॥५१॥

देव्हारीं विष्णुमूर्ती सुंदर । वस्त्रें भूषणें अळंकार ।

कुंवराबाई त्या समोर । कीर्तन गजर करीतसे ॥५२॥

हाळविणे मृदंग घोष । नादब्रह्मचि आलें मुसे ।

पायीं नेपुरें बांधुनि सुरस । नाचत असे निजप्रेमें ॥५३॥

गीतप्रबंध नृत्यकळा । दावोनि आळवित घननीळा ।

प्रेमें अश्रु वाहती डोळां । सद्गदित गळा होतसे ॥५४॥

भाविक लोक असती फार । मध्यें बैसला नृपवर ।

तंव राजा जाहला कामातुर । रूप सुंदर देखोनियां ॥५५॥

हृदयीं भेदला कामबाण । भगवद्गुणीं नसेनि मन ।

तेणें घूर्णित जाहले नयन । निद्रा क्षणक्षणा येतसे ॥५६॥

तंव स्वप्न अवस्थेमाजी जाण । कौतुक देखिलें काय त्याणें ।

एक महानदी जातसे भरोन । अगणित जीवनें करोनियां ॥५७॥

त्याच्या पैलतीरीं पाहीं । उभी असे कुंवराबायी ।

राजासि म्हणे ते समयीं । पापिष्ठा येयी मजपासी ॥५८॥

इतुका दृष्टांत देखोनि तेथ । सावध जाहला नृपनाथ ।

याचा अर्थ विचारी मनांत । मग पश्चात्तापातें पावला ॥५९॥

म्हणे भवनदीच्या पैलपार । कुंवराबाई असे साचार ।

मी तरी परम पापिष्ठ नर । उतरें भवपार कैशा रीतीं ॥१६०॥

ऎसा अनुताप धरोनि चित्तीं । मग सद्भावें नमस्कार करी नृपती ।

मग तिचा अनुग्रह घेवोनि निश्चिती । श्रीविष्णूची भक्ती करीतसे ॥६१॥

आतां गिरिधरलाल वृंदावनीं । परमभाविक सुलक्षणी ।

भक्तीज्ञान वैराग्यें करोनि । चक्रपाणी वश्य केला ॥६२॥

सर्वभुतीं दया पूर्ण । वाचेसि अखंड हरिस्मरण ।

संतसेवेसि असे लीन । देवा समान ते मानी ॥६३॥

पायीं नेपुरें बांधोनि निश्चित । कीर्तन करीतसे संगीत ।

राधाकृष्णांची सोंगें आणित । प्रेमभरीत सर्वदा ॥६४॥

एके दिवशीं करावया रास । पातला विष्णुमंदिरास ।

लोक मिळाले पाहावयास । म्हणती कीर्तनास उठावें ॥६५॥

मग श्रीकृष्णमुर्तीपासीं सत्वर । येऊनि केला नमस्कार ।

चित्तीं संकट पडिलें थोर । मग देवासि उत्तर बोलतसे ॥६६॥

म्हणे सोंगाचीं वस्त्रें निर्धारीं । विसरोनि आलो आपुलें घरीं ।

आतां आणावयासि गेलों जरी । तरी विलंब निर्धारी होईल ॥६७॥

ऎसें म्हणवोनि निजनिवाडें । पाहे देवाच्या मुखाकडे ।

तों भरजरी वस्त्रें पडिली पुढें । नवल रोकडें लोक पाहती ॥६८॥

म्हणती श्रीहरीसि रास आवडे याचा । म्हणोनि चमत्कार दाविला साचा ।

अंकित होऊनि निजदासाचा । महिमा संतांचा वाढवी ॥६९॥

ऎसें म्हणवोनि सत्वर । गिरिधरासि करिती नमस्कार ।

ते दिवसीं रंग आला अपार । तटस्थ सर्वत्र लोक झाले ॥१७०॥

म्हणती कृष्ण अवतारींची लीला । ते आम्ही साक्षात पाहतों डोळां ।

विदेहवृत्ती पातली सकळां । धन्य सोहळा सुदिन तो ॥७१॥

गिरिधराचीं प्रतिष्ठा फार । मानूं लागले थोर थोर ।

तों आणिक एक वर्तलें चरित्र । तें ऎका सादर भाविकहो ॥७२॥

कोण्या यातीचा वैष्णवभक्त । वेषधारी अथवा विरक्त ।

गिरिधर तयाचें घेत तीर्थ । चित्तीं निजप्रीत लावोनि ॥७३॥

संतसेवे परतें कांहीं । आणिक साधन श्रेष्ठ नाहीं ।

ऎसा निश्चय करोनि जीवीं । स्थिती विदेही धरितसे ॥७४॥

तंव एक बैरागी वैष्णव भक्त । तों अकस्मात पावला मृत्य ।

गिरिधर तयाच्या शवातें । स्वहस्तें पुजित तेधवां ॥७५॥

तुळसीमाळा गोपीचंदन । तया लावीत निज प्रीतीनें ।

मग तयाचे धुवोनिया चरण । तें तीर्थ प्राशन करीतसे ॥७६॥

हें ब्राह्मणीं देखोनि निश्चित । स्वमुखें तयासि निर्भर्त्सित ।

म्हणती प्रेताचें तीर्थ साक्षात । घातलें मुखांत कर्मभ्रष्टा ॥७७॥

सांडोनि वेदविधि आचार । तुवां मांडिला भ्रष्टाकार ।

तुझेनि योगें साचार । वर्णसंकर होईल कीं ॥७८॥

मृतप्रेत हीन याती । त्याचें तीर्थ घेतलें प्रीतीं ।

ऎकोनि ब्राह्मणांचि वचनोक्ती । गिरिधर त्यांजप्रती बोलतसे ॥७९॥

विश्वोध्दारार्थ अवतरले संत । हे तों जन्ममृत्य विरहित ।

चैतन्य व्यापक सर्वगत । नाहीं द्वैत सर्वथा ॥१८०॥

ऎकोनि म्हणती द्विजवर । तूं ब्रह्मज्ञान सांगतोसि फार ।

कांहीं दाखविसी चमत्कार । साच उत्तर तै मानूं ॥८१॥

संतांसि नाहीं जन्म मृत्य । तरी हें सजीव करावें प्रेत ।

नाहींतरी तुम्हांसि घालूं वाळींत । करूं अपंक्त ये समयी ॥८२॥

ऎसें बोलतां धरामर । गिरिधरासि संकट पडिलें थोर ।

मग एकाग्र मन करोनि स्थिर । झांकिले नेत्र तयानें ॥८३॥

हृदयीं चितितां श्रीकृष्णमूर्ती । त्यासि संकटीं पावला वैकुंठपती ।

प्रेत उठोनि बैसे अवचिती । विप्र पाहती समस्त ॥८४॥

गिरिधर भक्तासि नमस्कार । करिती सकळ धरामर ।

म्हणती तुम्हासि साह्य रुक्मिणीवर । अघटित चरित्र दाखविलें ॥८५॥

निजभक्ताची सत्कीर्ती । स्वयें वाढवीतसें वैकुंठपती ।

श्रवणमात्रें करोनी निश्चिती । भाविक तरती भवसिंधु ॥८६॥

आणिक चरित्र ऎका सुरस । एक नारायणस्वामी महापुरुष ।

त्याणीं आधीं घेऊनि संन्यास । षड् वैरियांस जिंतिलें ॥८७॥

भक्तिज्ञान वैराग्य पूर्ण । त्याचे अंगीं बाणली भूषणें ।

विदेह स्थितीं येतांचि जाण । मग परमहंस विचारती ॥८८॥

ब्रह्मस्थिती बाणली कैसी । आत्मवत विश्व भासे त्यासी ।

द्वैतकल्पना न ये मानसीं । देहभावासी विसरला ॥८९॥

राव रंक अणुरेणुवत । एकचि भासे चैतन्य नाथ ।

सकळ वर्णांची दीक्षा घेत । तों चरित्र अघटित वर्तले ॥१९०॥

नाशिक त्र्यंबकी साचार । सिंहस्थीं यात्रा मिळाली फार ।

आपणही नग्न दिगंबर । आले बरोबर तियेच्या ॥९१॥

तो गिरिपुरी भारती संन्यासी । मेळा जाहला त्र्यंबकासी ।

नारायणस्वामी त्यांच्या मठासीं । सहज भिक्षेसीं पातले ॥९२॥

परमहंस देखोनि महंतानें । चितीं वाटलें समाधान ।

जवळ बैसवोनि निजप्रीतीनें । म्हणे स्वामी भोजन करावें ॥९३॥

शिष्यासि म्हणतसे गोसावी । पात्र विस्तारा लवलाहीं ।

त्याणीं वाढितां अन्न सर्वही । भोजनास विदेही बैसला ॥९४॥

नग्न दिगंबर अवधूत । दिसे जैसा कैलासनाथ ।

स्वमुखें अन्न भक्षिलें बहुत । परी पुरे न म्हणतसे सर्वथा ॥९५॥

भंडार्‍याचा पाक सिध्द झाला । तितकेंही अन्न वाढिलें त्याला ।

अवघेचि भक्षुनि ढेंकर दिला । आश्चर्य त्यांजला वाटलें ॥९६॥

नारायण स्वामीची विदेहवृत्ती । उदक घ्यावयाची नाहीं आर्ती ।

गोसावी जीवन आणोनि देती । परी तें घेती सर्वथा ॥९७॥

मग सत्वर जावोनि अरण्यांत । वृक्षछायेसी जाहले निद्रित ।

महंत शिष्यांसि आज्ञा करीत । तुम्हीं रक्षणा तेथ बैसावें ॥९८॥

उदकाचा रांजण भरोनि निगुतीं । गोसावी सन्निध येवोनि बैसती ।

तीन दिवस तीन राती । नये जागृतीं समर्था ॥९९॥

चौथे दिवसीं होतां जागृत । उदक देतां पिती किंचित ।

मग जाऊनि क्षेत्रांत । काय कौतुक दाखविलें ॥२००॥

एक्या हवेलीची मोरी थोर । त्यांतील दुर्गंध येतसे नीर ।

ते पाणी प्राशिले पखालभर । लोक सर्वत्र पाहती ॥२०१॥

तों लघुरुद्र करावया साचार । देउळीं पातले द्विजवर ।

स्वमुखें बोलती वेदोक्त मंत्र । श्रीत्र्यंबकेश्वर पूजिती ॥२॥

तों नारायणस्वामी लवलाही । देउळीं पातले ते समयीं ।

ब्राह्मणांसी पुसती करितां कायी । ऎसें विदेही बोलिले ॥३॥

ऎकोनि म्हणती धरामर । अभिषेक करितो देवावर ।

नारायणस्वामी बोलिले उत्तर । तरी अभिषेकपात्र धरितों मी ॥४॥

मग शिश्न धरोनि निजकरें । पिंडींवरी सोडली धार ।

ऎसे आश्चर्य देखोनि थोर । लोक सर्वत्र हांसती ॥५॥

तंव क्रोधें बोलती धरामर । आमचा होईल लघुरुद्र ।

खंडणा न पडावी तोंवर । नाहींतर शिश्न कापूं ॥६॥

इतुका पण करूनि ते वेळ । बोलोनि मंत्र म्हणती निश्चळ ।

परि धार न खंडेचि अळुमाळ । लघुरुद्र सकळ सांग झाला ॥७॥

मग ब्राह्मण स्वमुखें करिती स्तुत । हा तरी साक्षात कैलासनाथ ।

देहभान नसेचि किंचित । विदेहस्थित सर्वदा ॥८॥

तों एक नाशिककर गृहस्थ सत्वरी । यात्रेसि आला त्र्यंबकेश्वरी ।

रोडकें अश्व बरोबरी । वाटेवरी तें मेलें ॥९॥

मुलें लेकरें सहपरिवारीं । गृहस्थ बैसला वाटेवरी ।

यात्रा निघोनि गेली दुरी । तस्कराचें अंतरीं भय वाटे ॥२१०॥

संकट पडिलें असे बहुत । ब्राह्मण देवाचें चिंतन करित ।

तों नारायणस्वामी आले तेथ । वृत्तांत सांगत विप्र तेव्हां ॥११॥

म्हणे अश्व तों मेलें वाटेवरी । रानांत पडिलों सहपरिवारीं ।

तंव कौतुक केलें ते अवसरीं । तें सादर चतुरीं परिसावें ॥१२॥

नारायणस्वामी ते अवसरीं । अश्वास म्हणती ऊठ सत्वरी ।

यासि पोंहचवी निजमंदिरीं । तों सजीव सत्वरी तें झालें ॥१३॥

कान झाडोनि उठे सत्वर । ब्राह्मण खोगीर घाली वर ।

ओझें लादोनि समग्र । निजमंदिर पावला ॥१४॥

ओझें उतरोनि ठेवतांचि जाण । अश्वानें तत्काळ सोडिले प्राण ।

ऎसें संताचें महिमान । देवासी भिन्न नसती ते ॥१५॥

जो देवाधिदेव रुक्मिणीकांत । पुढें वदवील ग्रंथार्थ ।

महिपती त्याचा मुद्रांकित । शरणागत संतांचा ॥१६॥

स्वस्ति श्रीभक्तलीलामृत ग्रंथ । श्रवणेंचि पुरती मनोरथ ।

प्रेमळ परिसोत भाविक भक्त । शेहेचाळिसावा अध्याय गोड हा ॥२१७॥ ॥ अध्याय॥ ॥ ४६ ॥ ओव्या॥ २१७ ॥ ६ ॥

N/A

References : N/A
Last Updated : September 03, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP