मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|भक्त लीलामृत|

भक्त लीलामृत - अध्याय ३२

महिपतिबोवांच्या वाचेला सिद्धी होती, म्हणूनच हा ग्रंथ जो भक्तिभावाने व एकाग्रतेने वाचील त्याला फलश्रुतीचा अनुभव खचितच येणार.


श्रीगणेशाय नमः ।

अज्ञान बाळक लडिवाळ साच । बोबडे बोल बोलतां वाचे ।

मायबापांसि कवतुक त्याचें । पुसती तेंच पडताळोनी ॥१॥

श्रीमंतांचे घरी जाण । पक्वान्नाची कायशी बाण ।

परी ते पालटासाठीं कदन्न । निजप्रीतीनें सेविती ॥२॥

जेवीं क्षीराब्धि पुढें साचार । नैवेद्यासि ठेविलें वक्र ।

तैसीं माझीं आर्ष उत्तरें । संतां समोर दीसती ॥३॥

नातरी उजळोनि काडवाती । अर्चनीं ओवाळि जे गमस्ती ।

कीं शीतळ व्हावया निशापती । विंझणा हातीं पालविजे ॥४॥

नातरी कनकाद्रीसि साचार । केले बेगडाचे अळंकार ।

तैसीं माझीं आर्ष उत्तरें । संतां समोर दिसती ॥५॥

मागील अध्यायाचे शेवटींल कथन । तुकयाच्या स्वरुपें जगज्जीवन ।

सर्व साहित्य घरीं आणून । पितर संपूर्ण जेवविले ॥६॥

मग घरासि येतां वैष्णवभक्त । कांतेनें सांगितला समस्त वृत्तांत ।

म्हणे आम्हां निमित्त रुक्मिणीकांत । श्रमला बहुत निजांगे ॥७॥

मग प्रातःकाळ होताचि जाण । इंद्रायणीसि केलें स्नान ।

श्री मूर्तीचें करोनि पूजन । सप्रेम स्तवन करीतसे ॥८॥

म्हणे कृपासागर पंढरीनाथा । तुवां मागें तारिलें शरणागतां ।

यातिकुळ न विचारितां । संकटीं अनंता रक्षिसी ॥९॥

नामयाचीं उपवासि भरतां पोरें । राजाई कष्टी होतसे थोर ।

तूं केशवशेट होऊनी सारंगधर । होन गोणीभर आणिले ॥१०॥

चोखामेळा जातीचा महार । त्याचीं निजांगे ओढिलीं ढोरें ।

देखोनि त्याची प्रीति थोर । त्याच्याबरोबर जेविसी ॥११॥

ज्ञानदेवाचिये प्रीती । तुवां निजांगें चालविली भिंती ।

तुझे पवाडे रुक्मिणीपती । वर्णिले संती बहु फार ॥१२॥

दामाजीपंत भक्त उदार । त्यानें लुटविलें धान्य अपार ।

मग होऊनि विठयानामक महार । रसद सत्वर भरली त्वां ॥१३॥

मिराबाईसाठीं निश्चित । तुवां विष घेतलें अनंतें ।

तिची लज्जा रक्षोनि तेथें । जगीं सत्कीर्तीतें वाढविलें ॥१४॥

नरसीमेहता भक्तवैष्णव । त्याची हुंदी भरिली देवें ।

निजांगें होउनि सावळ साह । अपूर्व लाघव दाखविलें ॥१५॥

ऐसे तूझे भक्त श्रीपती । वैष्णव गाती त्यांची कीर्ती ।

माझी तों अल्प मूढमती । प्रेम चित्तीं इच्छितसें ॥१६॥

ऐसी स्तुति ऐकोनि कानीं । संतुष्ट जाहले चक्रपाणी ।

म्हणे तुका वदेल प्रसादवाणी । तें उचित देउनि गौरवू ॥१७॥

कायिक वाचिक मानसिक जाण । तुकयासि तपें घडलीं तीन ।

परोपकाराचें महापुण्य । तेथें शक्‍ति धरोनियां ॥१९॥

अश्व वहनीं न बैसेचि देखा । आन्हवणी पंढरीसी जाय तुका ।

कीर्तन गजर ऐकोनि निका । सप्रेम सुखा भोगीतसे ॥२०॥

संतसेवा परोपकार । आन्हवणी यात्रा केल्या फार ।

हेंचि कायिक तप साचार । वैष्णवीर करितसे ॥२१॥

आतां वाचिक तप कैशा रीती । असत्य न बोले वचनोक्‍ती ।

नामस्मरण अहोरातीं । विसर चित्तीं पडेना ॥२२॥

आतां मानस तपाचें लक्षण । पांडुरंग चरणीं स्थिरावलें मन ।

जैसे कां चातक जीवन । मेघा वांचोन न घेती ॥२३॥

कीं तान्हें बाळक रडतां पाहे । तें माते वांचोनि समजेल काय ।

तैसा तुकयाचा निश्चय । पंढरीराय उपासिला ॥२४॥

ऐकोनि आशंका वाटेल भाविकां । पांडुरंगावीण नेणेचि तुका ।

तरी परोपकारि कां भजतसे लोकां । उत्तर ऐका येविषयीं ॥२५॥

एक श्रीहरीच्या सत्तेनें । चराचरवर्ततसे जाण ।

त्याचे मनोगत रक्षावया पूर्ण । करीतसे नमन सर्वाभूतीं ॥२६॥

जैसी सासुरवासिण पतिव्रता । तिच्या चित्तीं आवडे भर्ता ।

जाणोनि पतीच्या मनोगता । परिवारा समस्ता आर्जवी ॥२७॥

सासू सासरा नणंद दीर । हे बोलती नाना दुरुत्तर ।

तरी त्यांचे कष्ट करीतसे फार । जाणोनि अंतर पतीचें ॥२८॥

तरी प्राणनाथावीण साचार । प्रीति नसेचि आणिकांवर ।

तैसें तुकयाचें मन स्थिर । पांडुरंगीं मुरे निजप्रीतीं ॥२९॥

एक न धरितां उपासना । साधकें प्रयत्‍न केले नाना ।

तरी साक्षात्कार नव्हेचि जाणा । बहुतांचा पाहुणा उपवासी ॥३०॥

तैसें तुकयाचें नव्हेचि मन । कर्म उपासना आणि ज्ञान ।

तिहीं कांडांत असें निपुण । दाखवी वरतून जनासि ॥३१॥

कायिक तप तें कर्मकांड जाण । वाचिक उपासना वर्णावे गुण ।

पांडुरंगावीण कांहींच नेणें । पूर्ण आत्मज्ञान नव्हेचि कीं ॥३२॥

हे तिन्ही तपांचे अलंकार जाण । तुकयाच्या अंगीं बाणले लेणें ।

देव तुकाशी येईल जेणें । तें सात्विक पुण्य जोडलें ॥३३॥

ऐसें जाणूनि पांडुरंगमूर्ती । विचार करीत आपुलें चित्तीं ।

म्हणे तुका वदेल माझी कीर्ती । ते कवित्व स्फूर्ति त्यासि द्यावी ॥३४॥

मग नामदेवाचा धरोनि हात । देहूसि आले पंढरीनाथ ।

तुका रात्रीं असतां निद्रित । दृष्टांत दाखवित जगदात्मा ॥३५॥

निजकरें थापटोनि पाठी । सावध करितसे जगजेठी ।

म्हणे रे तुक्या वेगीं उठी । सांगतो गोष्टी ते ऐक ॥३६॥

हा नामा माझा निजभक्‍त पूर्ण । मागें संकल्प केला यानें ।

कीं शतकोटि ग्रंथ प्राकृत करीन । इतुका पण बोलिला ॥३७॥

मग म्यां त्यासि दीधली स्फूर्ती । कवित्व लिहिलें आपुल्या हातीं ।

संख्या मोजितां झाली किती । हेही तुजप्रती सांगतो ॥३८॥

चाळीस लक्ष चवर्‍याणव कोटी । नव लक्ष ललित आलें शेवटीं ।

बाकी प्रेमा राहिला पोटीं । मग अशा वैकुंठीं स्वइच्छे ॥३९॥

एकावन्न लक्ष पांचकोटि जाण । शेष राहिलें याचें बोलणें ।

तें तूं वदे प्रसाद वचन । सप्रेम दान मी देतों ॥४०॥

तुझेनी योगें करोनि साचा । उद्धार होईल जगताचा ।

आतां व्यर्थ वाउगी न वेंची वाचा । प्रारंभ कवित्वाचा करी कां ॥४१॥

इतुका दृष्टांत दाखवोनि जाण । देव पावले अंतर्धान ।

जागृतीं येऊनि वैष्णवजन । म्हणे चमत्कार पूर्ण दाखविला ॥४२॥

देवभक्‍त देखिलें स्वप्नीं । तें ध्यान सर्व आठवे मनीं ।

म्हणे प्रेमाचें उचित चक्रपाणी । गेले देऊनि मज आतां ॥४३॥

तुकयाचे अल्प संतोषी मन । पाठांतर इच्छित संतवचन ।

मग आज्ञा केली जगज्जीवनें । प्रासादिक वचनें बोलावीं ॥४४॥

मग तुकयासि आनंद चित्तीं । वाटला तेव्हां कैशा रीतीं ।

जैसा दिवटीचा प्रकाश इच्छितां रातीं । तों तेथें गभस्ती उगवला ॥४५॥

कीं औषधवल्ली धुंडितां वनीं । तों अमृतकुंड देखिलें नयनीं ।

कां ध्रुवराज्य इच्छिता मनीं । तो अढळपदीं नेउनी बैसविला ॥४६॥

नातरी उपमन्यु ब्राह्मणकुमर । दूध मागतां वाटीभर ।

मग प्रसन्न होऊनि लक्ष्मीवर । क्षीरसागरी बैसविला ॥४७॥

तुकयासि उल्हास तैशाच रीती । जिव्हाग्री बैसली सरस्वती ।

कवित्वासि प्रारंभ केला प्रीती । सप्रेम मती आपुल्या ॥४८॥

वाळवद अक्षरें लिहावीं पाही । हा मागें अभ्यास नव्हता कांहीं ।

कोर्‍या कागदांची करोनि वही पाही । स्वमतीनें लिही आपुल्या ॥४९॥

वेद शास्त्रांचें निज मथित । व्यासें काढिलें श्रीभागवत ।

त्यांतही दशम हरिलीलामृत । गोकुळीं क्रीडत जगदात्मा ॥५०॥

ते बाळक्रिडा तुकयानें आपुले मती । प्रथमारंभीं लिहिली ग्रंथीं ।

नउशें ओव्या त्याच्या असती । स्वानुभवें जाणती संतसाधु ॥५१॥

कीर्तनामाजी साचार । चरित्र नसलें पाठांतर ।

त्याचा अभंग वरच्यावर । वैष्णवीर करीतसें ॥५२॥

प्रासादिक कविता ऐकूनि कानीं । श्रोते आश्चर्य करिती मनीं ।

कीर्तनीं रंग येतसे चौगुणी । वरद वाणी म्हणोनियां ॥५३॥

जैसा मेघ वर्षतां साचार । अगणित उठती तृणांकुर ।

कां सागरीं तरंग येती अपार । संख्या न करवे तयांची ॥५४॥

तैशाच परी तुकयाप्रती । कीर्तनीं अनेक शब्द स्फूर्ती ।

संशय न राहे कोणाप्रती । खळ तेही होती भाविक ॥५५॥

पांडुरंगाच्या देऊळीं नित्य । दोन प्रहर कीर्तन होत ।

जवळील गांवचे भाविक भक्‍त । श्रवणासि येत नित्यकाळीं ॥५६॥

एकादशीसि हरिजागर । कीर्तन होय चारी प्रहर ।

कीर्ति प्रगटली दुरिच्यादुर । प्रतिष्ठा थोर वाढली ॥५७॥

तो मंबाजी बाबा ब्राह्मण पाहीं । चिंचवडीं होता दिवस कांहीं ।

मग तो महापुरुष होऊनि गोसावी । देहू गांवीं राहिला ॥५८॥

मठ बांधोनि ते ठायी । कुटुंब आणिलें तेथें सर्वही ।

शिष्य शाखा असती कांहीं । योगक्षेम तेही चालविती ॥५९॥

तुकयाची प्रतिष्ठा वाढतां तेथ । त्याचे मनीं द्वेष उपजत ।

म्हणे एका मेण्यांत दोन सुर्‍या निश्चित । सामावत कैशापरी ॥६०॥

यानें आम्हां देखतां साचार । वह्या केल्या पाठांतर ।

याची प्रतिष्ठा वाढली फार । विप्र नमस्कार करिताती ॥६१॥

तुका तो शुद्ध जातीचा वाणी । मी प्रतिष्ठित महंत ये ठिकाणीं ।

याची कीर्ति प्रगटली जनीं । मजला कोणी न पुसती ॥६२॥

जैसी निरपेक्षाची सांगतां स्थिती । आशाबद्ध ते मनीं जल्पती ।

कां सहदेव मतासि हेळसिती । ज्योतिषी जैसे निजद्वेषें ॥६३॥

केतु म्हणे हा वासरमणी । गांठ पडतां टाकीन वदनीं ।

कीं संपुर्ण चंद्र देखोनि नयनीं । राहु निजमनीं जल्पतसे ॥६४॥

तैशाच परी तुकयाचा । मंबाजी द्वेष करीतसे साचा ।

म्हणे एकदां अपमान करोनि याचा । सूड साचा घेईन मी ॥६५॥

इतुका द्वेष वागवीत मनीं । परी लौकिकार्थ येऊनि बैसे कीर्तनीं ।

तुकयासि तों शत्रु-मित्र मनीं । समसमान दोन्ही सारिखे ॥६६॥

देवालयामागें दक्षिणेसि जाण । झाडें लाविलीं असती त्याणें ।

त्यांजपासी सर्वदा मन । कूड रक्षण सभोंवता ॥६७॥

तों अवली तुकयाची निज कांता । अमाजी गुळव्या तिचा पिता ।

त्यानें लेकीची धरुनि ममता । म्हैस तत्वतां दीधली ॥६८॥

ते पाण्यावर सोडितां निश्चित । मंबाजीच्या बागांत शिरत ।

कूड रेटूनि गेली आंत । झाडें बहुत खादलीं ॥६९॥

हें दृष्टीत देखोनि साचार । चित्तीं विक्षेप वाटला थोर ।

अपशब्द बोलोनि नाना प्रकार । मग निवांत स्थिर राहिला ॥७०॥

कांहीं दिवस लोटतां यांसी । तों आली हरिदिनी एकादशी ।

यात्रा आली देवदर्शनासी । अस्तमानासी सूर्य जातां ॥७१॥

प्रदक्षिणेच्या विटेवरी जाण । कांटया रोंविल्या मंबाजीनें ।

त्या निजकरें उपडिल्या तुकयानें । मार्गा कारणें ते समयीं ॥७२॥

हें वेषधारियानें देखोनि नयनीं । क्रोधें पेटला जैसा वन्हीं ।

आधींच द्वेष होता मनी । त्यावरी पुरवणी ही झाली ॥७३॥

जैसा महा सर्पे धरिला डाव । त्याच्या शेंपटीं पडिला पाय ।

तो धुधुक्कार टाकित धांवें । घ्यावया जीव तयाचा ॥७४॥

तैशापरी तो द्विजवर । अपशब्द बोलत नाना प्रकार ।

तुकयापासीं येऊनि सत्वर । कांटी निजकरें घेतली ॥७५॥

प्रेमळ तुकयाच्या आंगावरी । निकरें मारीत ते अवसरीं ।

परी क्षमा शांति धरोनि अंतरीं । प्रत्युत्तरीं न बोले ॥७६॥

निकरें मारितां सत्वर गती । कांटी पिंज होऊनि जाती ।

मग दुसरी उपटोनि घेतली हातीं । परी दया चित्तीं उपजेना ॥७७॥

निकरें मारितां साचार । दहा वीस कांटया मोडल्यावर ।

परी तेथूनि न ढळेची वैष्णववीर । सप्रेम गजरें नाम जपे ॥७८॥

तुकयाची क्षमा वर्णितां साचार । तरी दुजा न दिसे पृथ्वीवर ।

दुसरा दृष्टांत योजितां न सरे । कुंठित अंतर कवीचें ॥७९॥

निर्दयासि नाहीं भूतदया । मांस खायिर्‍यासीं कैंची माया ।

ब्राह्मणाची वर दिसतसे काया । परी अनामिक तया म्हणावें ॥८०॥

जैसा कुणबी विरवड झोडित । तैसा मारिला वैष्णवभक्त ।

त्याचे हात दुखतां निश्चित । मग निवांत राहिला ॥८१॥

दुर्जन मठासि गेला तेव्हां । तुका देउळासि येतसे तेव्हां ।

गार्‍हाणें सांगे रुख्मिणीधवा । मार बरवा देवविला ॥८२॥

आणि शिव्या गाळ्यांसि नाहीं मिती । हें तुझेंचि कर्तृत्व लक्ष्मीपती ।

आतां नको दुर्जनाची संगती । विक्षेप चित्तीं होय तेणें ॥८३॥

ऐशा रीतीं अभंग देख । निजमुखें तुका वदला एक ।

कांटे मोडिले जे सकळिक । ते पाहती लोक दृष्टीसीं ॥८४॥

सदयहृदयीं ज्यांच्या कळवळा । दृष्टीसीं तुकयाची देखिलीं अवकळा ।

आंसुवें आलीं त्यांच्या डोळां । म्हणती भक्त प्रेमळा गांजिलें ॥८५॥

मग अवलीनें नाचकंड घेऊनिक । कांटे उपटिले ते अवसरीं ।

म्हणे काळ्यानें पाठ घेतली बरी । केली संसारीं फजीती ॥८६॥

मग कृपादृष्टी पंढरीनाथें । तुकयाकडे पाहिलें त्वरित ।

तों कांटयांचीं क्षतें मिळालीं समस्त । आराम वाटत शरीरासी ॥८७॥

एकादशीस हरिजागर । यात्रा मिळाली असे फार ।

कीर्तनीं बैसले लोक समग्र । मग वैष्णववीर काय म्हणे ॥८८॥

मंबाजी बावा महापुरुष । अखंड येताती कीर्तनास ।

आजि कां उशीर लागला त्यांस । मग बोलावयास पाठविलें ॥८९॥
त्यानें तुकयासि धाडिलें उत्तर । माझें अंग दुखतें फार ।

ऐसे ऐकोनि वैष्णववीर । जात सत्वर त्यापासी ॥९०॥

साष्टांग दंडवत घालूनी जाण । आंग रगडीत बैसे आपण ।

म्हणे निजांगें झोडितां कांटवण । आला क्षीण स्वामीसी ॥९१॥

म्यां झाडांसि उपद्रव दीधला नसता । तरी तुमचा विक्षेप कायसा होता ।

हा अपराध क्षमा करुनि तत्त्वतां । कीर्तनासि आतां चलावें ॥९२॥

ऐसें म्हणोनि वैष्णववीर । रगडित बैसे घटिका चार ।

मंबाजीचें लज्जित अंतर । मग कीर्तनासि सत्वर चालला ॥९३॥

जैसा समुद्रें झांकिला वडवानळ । त्यातें वेष्टीत अवघेंचि जळ ।

परी तो न विझेचि अळुमाळ । शोकीन सकळ म्हणतसे ॥९४॥

तैसाचि तुका शांतिसागर । मंबाजी तयासि वैश्वानर ।

शीतळ दिसतो बाह्याकार । परी द्वेषें झुरे निज अंतरीं ॥९५॥

संतीं चमत्कार दाखविले फार । परी खळाचें शुद्ध नव्हेचि अंतर ।

यें विषयीं दृष्टांत सार । ऐका चतुर निजकर्णी ॥९६॥

घ्यावया पांडवांचा कैवार । देवें चरित्र दाखविलें फार ।

परी दुर्योधनाचें कपटीं अंतर । तें साचार पालटेना ॥९७॥

तैसा कुचर बैसला करीत श्रवण । परी दोषांवरी त्याचें मन ।

कीं तुकाचें शुद्ध ध्यान । कैंचें पुण्य तें ठायीं ॥९८॥

सर्प न खाय अन्नासी । तरी त्यासि काय घडली एकादशी ।

जरी चित्त शुद्ध नसतां मानसीं । तरी साधन तयासि घडेना ॥९९॥

दगड बोलत नाहीं कोणा । तरी तो काय योगी अबोलपणा ।

राखेंत गाढवें लोळती जाणा । परी अनुताप मना न होय ॥१००॥

उंदीर बिळांत बैसला परी । तो सर्वदा आंत उकरी ।

तैसा कीर्तनीं बैसला कुचर जरी । परी द्रवेना अंतरीं सर्वथा ॥१॥

परी तुकयाची समता जाण । शत्रु मित्र समसमान ।

चित्तीं सर्वथा न धरीच कुडेपण । सप्रेम कीर्तन करीतसे ॥२॥

नामरुपीं जडलें चित्त । म्हणोनि जाहला देहातीत ।

कीर्तनामाजीं बैसले श्रोते संत । प्रेमभरीत ते झाले ॥३॥

कृष्ण-विष्णु हरि-गोविंदा । अच्युता माधवा आनंदकंदा ।

परम पुरुषा सच्चिदानंदा । सोडवी भवबंधनापासुनी ॥४॥

अनाथ रक्षका पांडुरंगा । मदनताता रुक्मिणीरंगा ।

कर्म कर्दंम न लिंपे अंगा । ऐसें श्रीरंगा करावें ॥५॥

काळचक्रामाजीं निश्चिती । जीव भ्रमतो निजकर्म गतीं ।

येथूनी सोडवी सत्वर गती । रुक्मिणीपति श्री विठ्ठला ॥६॥

ऐसी करुणा भाकोनि फार । कीर्तना नाचे सप्रेम गजर ।

टाळ विणे वाजती सुस्वर । नादें अंबर कोंदलें ॥७॥

टाळ्या चुटक्याची घायी । निद्रा आळस कोणासी नाहीं ।

कीर्तनी श्रोते जाहले विदेही । हेचि नवायी अगाध ॥८॥

संतचरित्रें रसाळपूर्ण । हेंचि साधिलें अनुसंधान ।

श्रवण करिती भाविकजन । वेधलें मन तयाचें ॥९॥

असो तुका कीर्तन करित । कांता निद्रित मंदिरांत ।

तों दोघे तस्कर येऊनि तेथ । काय करित तें ऐका ॥११०॥

दुभती म्हैस होती घरीं । ते सोडूनि नेली ते अवसरीं ।

पुढें एक मोहर की धरी । मागुनि सत्वरी एक हाकी ॥११॥

ग्रामांपासोनि पश्चिमेस । बोडक्याची वाडी पाव कोस ।

तेथवरी जातां तस्करांस । हें देवास श्रुत झालें ॥१२॥

म्हणे तुका तों रत झाला असे कीर्तनीं । अवली निद्रित जाहलीं सदनीं ।

म्हैस नेली तस्करांनीं । ते सोडोनि आणावी ॥१३॥

आम्हीं न जातां ये अवसरीं । तुकयासि गांजील नानापरी ।

ऐसें म्हणवोनि भक्‍तकैवारी । कौतुक काय करी तेधवां ॥१४॥

महाविक्राळ पुरुष श्रीपती । रुप नटला सहज स्थितीं ।

थोर टोणपा घेतला हातीं । तस्करांप्रती मारावया ॥१५॥

चोर पुढें जाती सत्वर । तों विक्राळ पुरुष वाटेवर ।

हातीं मुसळ घेतलें थोर । मस्तकावर मारावया ॥१६॥

एकमेकांसी बोलती उत्तर । थोर हा कोण पुरुष वाटेवर ।

नेणो महद्भुत दिसे थोर । कैसा विचार करावा ॥१७॥

गाऊल लागलें होतें हातीं । परी हे नाहीं आपुलें संचितीं ।

प्रारब्धाचि विचित्र गती । नेणो संचितीं काय आहे ॥१८॥

ऐसें म्हणोनि ते तस्कर । दुसर्‍या पंथें चालिले सत्वर ।

तों तीकडेही टोणपा घेऊनि थोर । सारंगधर उभा असे ॥१९॥

परम भय वाटलें चित्तीं । म्हणती कैसी करावी गती ।

अष्टदिशा विलोकूनि पाहती । तों दिसे श्रीपती चहूंकडे ॥१२०॥

म्हणती काळपुरुष हा धटिंगण । आडवा येतो आम्हाकारणें ।

ब्रह्मराक्षस कीं पिशाच जाण । घ्यावया प्राण पातला ॥२१॥

पहांटे जाहली उगवे दिन । मग भलताचि धरील आम्हांकारणे ।

आतां उपाय करावा कवण । उद्विग्न मन यासाठी ॥२२॥

मग एकमेकांसी विचार करित । तुका विठोबाचा म्हणवितो भक्त ।

त्याची म्हैस नेतों निश्चित । यास्तव भूत पुढें आलें ॥२३॥

नेणों देवाची माव अघटित । आपणासि अपराध पडला सत्य ।

आतां म्हैस बांधावी जेथील तेथ । तरीच आघात चुकेल हा ॥२४॥

ऐसें म्हणवोनि ते तस्कर । गांवाकडे धरिली मोहर ।

मागूनि येतसे रुक्मिणीवर । टोणपा निज करें घेउनी ॥२५॥

तस्कारांसि भय वाटे चित्ता । म्हणती मागूनि हाणील काय अवचितां ।

ऐशा रीतीं धाके घालितां । गांवांत तत्वतां प्रवेशले ॥२६॥

मग जावोनि तुकयाच्या वाडियांत । म्हैस बांधिली आपुल्या हातें ।

लगबगां गांवाबाहेर जात । तेथें जगन्नाथ उभा असे ॥२७॥

विक्राळरुप भयानक । हातीं मुसळ घेतलें देख ।

तस्करीं मार्ग धरिला आणिक । तो वैकुंठनायक उभा तेथें ॥२८॥

गांवांत खिंडि ठायीं ठायीं । निघों पाहती लवलाहीं ।

तो काळपुरुष सर्वांठायीं । एकही नाहीं स्थळ रितें ॥२९॥

तस्करांसि भय वाटलें फार । म्हणती तुका करितो कीर्तनगजर ।

तेथें जाऊनियां सत्वर । त्यासि हा विचार सांगावा ॥१३०॥

ऐसें म्हणवोनि ते अवसरीं । कीर्तनामाजी आले सत्वरीं ।

लज्जा भय न धरोनि अंतरीं । मधुरोत्तरीं बोलती ॥३१॥

हात जोडूनि ते चोर । उभे तुकया समोर ।

म्हणती आम्ही दोघे तस्कर । अपराध थोर आचरलों ॥३२॥

तुमची म्हैस सोडोनि देख । नेत होतों तात्काळिक ।

तों वाटेस काळपुरुष एक । आडवा सम्यक देखिला ॥३३॥

टोणपा घेतलासे निजकरीं । जिकडे जातों तिकडे समोरी ।

तेव्हां म्हैस आणोनि सत्वरी । तुमचे घरीं बांधिली ॥३४॥

मग सत्वर पळोनि जातां पाहे । तों गांवद्वारीं बैसलाच आहे ।

जिकडे जातों तिकडेचि होय । यासि उपाय कोणता ॥३५॥

तूं विष्णुभक्त अद्वेष्टापूर्ण । शत्रु मित्र समसमान ।

आतां आमुची सुटका होईल जेणें । तो उपाय करणें समर्था ॥३६॥

ऐसी तस्करांची वाणी । सरळ लोक ऐकती श्रवणी ।

ते विस्मित झाले आपुले मनीं । चरित्र ऐकोनि अद्भुत ॥३७॥

तुकयासि आश्चर्य वाटलें चित्तीं । मग ध्यानांत आणी पांडुरंगमूर्ती ।

तों कीर्तनांत नाहीं रुक्मिणीपती । म्हणे यथार्थ सांगती तस्कर ॥३८॥

नेत्र झांकूनियां तेव्हां । पांडुरंगाचा मांडिला धांवा ।

म्हणे पंढरीनाथा देवाधिदेवा । गेलासि केव्हां येथूनी ॥३९॥

आम्ही करितो हरिजागरण । तूं तरी फिरतोस रानोरान ।

ढोरें राखावयाची सवें जाण । पहिल्या पासोन लागली ॥१४०॥

आम्हीं सद्भावें वर्णितों गुण । येथें न रंजेचि तुझें मन ।

आणि वेडेंवांकडे रुप धरोन । देशी दर्शन तस्करांसी ॥४१॥

आतां प्रभात समय जाहला पाहीं । आरतीचे समयीं तरी येयीं ।

कृपासागर शेषशायी । उचित नाहीं हें तुज ॥४२॥

आमच्या नावडती सप्रेम गोष्टी । पळोनि गेलासि उठाउठी ।

हातीं घेऊनि थोर काठी । धांवसी पाठीं चोरांच्या ॥४३॥

तूं सखा नसतां प्रेमळांचा । कीर्तनीं रंग न भरे साचा ।

ऐकोनि धांवा तूकयाचा । आला देवांचा देव हरी ॥४४॥

तुका नाचतसे कीर्तनांत । तों मागुनि आले पंढरीनाथ ।

हातीं टोणपा घेतला निश्चित । लोक पहात सभोंवतें ॥४५॥

तस्करासि विक्राळ दिसे मोठा । इतर लोकांस साधारण गाठा ।

तुका तस्कारांसि म्हणतसे उठा । आपुल्या वाटा क्रमावें ॥४६॥

म्हैस लागेल तुम्हांकारणें । तरी आतांचि सत्वर न्यावी सोडून ।

तस्कर म्हणती वांचला प्राण । हेंचि तुझें देणें आम्हांसी ॥४७॥

ऐसें म्हणवोनियां ते चोर । पळोनि गेले वरच्यावर ।

अद्भुत चरित्र देखोनि थोर । करिती गजर नामघोषें ॥४८॥

चरित्र देखिलें ऐकिलें कानीं । मंबाजी विस्मित झाला मनीं ।

म्हणे यांची प्रतिष्ठा वाढेल जनीं । ऐसी करणी दिसताहे ॥४९॥

ऐसें म्हणूनियां मानसीं । आपुल्या जागीं उगाच मुसमुसी ।

विष्णुभक्ताची महिमा कैसी । द्वेषबुद्धीसी कळेना ॥१५०॥

असो या अभक्‍ताची कथा । वारंवार येतसे दृष्टांता ।

तेणें वाग्देवी श्रमते वृथा । उबग श्रोता न मानिजे ॥५१॥

अभक्‍त निर्माण होतसे क्षितीं । यास्तव भक्‍ताची वाढली कीर्तीं ।

जरी खोटीं नाणीं निर्मिलीं नसती । तरी खरें म्हणती मग कोणा ॥५२॥

जरी निर्मिली नसती यमपुरी । तरी स्वर्गाची आशा कोण धरी ।

हिंडणें नसतें चौर्‍यांयशी फेरी । तरी मोक्षाचि धरी कोण आस्था ॥५३॥

साचच देहासि मरण नसतें । तरी मग अमृतासि कोण पुसतें ।

तेवीं अभक्‍ताच्या योगें निश्चित । भक्‍त प्रख्यात जाहले कीं ॥५४॥

महा अंधकार नसतां रात्रीं । तरी कैसी झळकती दीपक ज्योति ।

रावणाच्या योगें निश्चिती । श्रीराम सत्कीर्ती पावला ॥५५॥

असोत हीं भाषणें बहुवस । तस्करांनीं गेली नसती म्हैस ।

मग कैसा दाखविता जगन्निवास । चरित्र विशेष संताचें ॥५६॥

मग वैष्णव तुका ते अवसरीं । चरित्र गातसे नानापरी ।

म्हणे भक्‍तासि पावला श्रीहरी । कैशा परी तें ऐका ॥५७॥

विष्णूची कीर्ति नायके कानीं । म्हणोनि हिरण्यकशिपु जल्पे मनीं ।

प्रल्हादाचा धांवा ऐकोनि । खांबांत चक्रपाणी प्रगटला ॥५८॥

अपाय करितां निजभक्‍तास । अधिकचि वाढे कीर्ति घोष ।

दुर्योधनें गांजितां द्रौपदीस । तों चरित्र विशेष वाढलें ॥५९॥

निजभक्‍ताचें न साहे उणें । यास्तव धांवला श्रीकृष्ण ।

अनंत वस्त्रें नेसविलीं जाण । मग सकळ दुर्जन लाजले ॥१६०॥

पवित्र साधूंचा प्रतिपाळ । स्वधर्म स्थापावे निजांगे सकळ ।

म्हणोनि न पाहतां काळवेळ । अवतरे घननीळ निजांगें ॥६१॥

मजला भासे ऐशा रीतीं । कलियुगाची तों अद्भुत ख्याती ।

भक्‍तासाठीं नाना विपत्ती । रुक्मिणीपती सोसीतसे ॥६२॥

सांवतामाळी भक्‍त प्रेमळ । त्याजपासी जाय घननीळ ।

लपावयासि मागतां स्थळ । उदर तत्काळ चिरियलें ॥६३॥

ज्याच्या रोमरंध्रीं सकळ सृष्टी । तो निज भक्‍ताच्या समावें पोटीं ।

सांवत्या पासी गुजगोष्ट । बोले जगजेठी प्रीतीनें ॥६४॥

तो नामा आला विलापत । तों सांवत्यानें गिळिला रुक्मिणीकांत ।

पीतांबराची दशी दिसत । मग ओढोनि काढित निजहस्त ॥६५॥

उदरांतूनि निघे घननीळ । तरी तो सांवत्याचा पोटिंचा बाळ ।

ऐसें तुकयानें ते वेळे । चरित्र प्रेमळ गाइले ॥६६॥

श्रोतयांसि म्हणे वैष्णवभक्‍त । संसार अवघा अशाश्वत ।

जो श्रीहरी भजनीं होईल रत । तरी कळिकाळ अंकित होय त्याच्या ॥६७॥

ऐसा उपदेश होतां कीर्तनीं । तों उदयासि पातला वासरमणी ।

जयजयकारें टाळ्या पिटोनी । विठ्ठल स्मरणीं गर्जती ॥६८॥

मग उजळोनी मंगळारती । ओवाळिला श्रीरुक्मिणीपती ।

पुढिलें अध्यायी रसोत्पत्ती । तरी सादर श्रोतीं परिसिजे ॥६९॥

अहो भक्‍तलीलामृत ग्रंथ सार । वदविता श्रीरुक्मिणीवर ।

महीपति निमित्तासि आधार । हें सर्वज्ञ चतुर जाणती ॥१७०॥

स्वस्ति श्रीभक्‍तलीलामृत ग्रंथ । श्रवणेंचि पुरती मनोरथ ।

प्रेमळ परिसोत भाविक भक्‍त । बत्तिसावा अध्याय रसाळ हा ॥१७१॥

अध्याय ॥३२॥ ओव्या ॥१७१॥

N/A

References : N/A
Last Updated : September 03, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP