मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|भक्त लीलामृत|

भक्त लीलामृत - अध्याय ५०

महिपतिबोवांच्या वाचेला सिद्धी होती, म्हणूनच हा ग्रंथ जो भक्तिभावाने व एकाग्रतेने वाचील त्याला फलश्रुतीचा अनुभव खचितच येणार.


॥ श्रीगणेशाय नमः ॥

जय अनाथबंधु पंढरीराया । अनिवार वैष्णवी तुझी माया ।

ते नाममात्रेचि निरसोनिया । करिसी छाया कृपेनें ॥१॥

तुज न येतां अनन्यशरण । साधकीं केलें नाना प्रयत्न ।

तीं साधनेंचि त्यांसी होती बंधनें । तुझ्या स्मरणाविण पांडुरंगा ॥२॥

कैसाही पतित मुढपती । आणि तुझें नाम जपे अवचितीं ।

तयासि लावोनि आपुली भक्ती । करिशील भुक्ती त्या स्वाधीन ॥३॥

तुझे ऎश्वर्य देखोनि नयनी । इंदिरां लज्जित जाहलीं मनीं ।

मग ते निरंतर राहिली चरणीं । स्वरूप ध्यानीं लक्षूनियां ॥४॥

महिमा वर्णितां देवाधिदेव । जिवांगे शीणला चक्षुःश्रवा ।

ठक पडिलें कमळोद्भवां । आमुचा हेवा तो किती ॥५॥

तुझ्या प्राप्तीस्तव जगजेठी । शंकरें आर्ती धरिली पोटीं ।

मग नामस्मरतांचि उठाउठी । चित्तीं धुर्जटी निवाला ॥६॥

अष्टांग योग साधितां हटीं । परी लवकर न पडसी त्याच्या दृष्टीं ।

तो तुं करद्वय ठेवूनि कटीं । भीमातटीं उभा अससी ॥७॥

भाळीं भोळीं जीं अज्ञान । त्यांसि साक्षात देतो दर्शन ।

पुंडलीकें मागितलें वरदान । जगदुध्दार तेणें होतसे ॥८॥

तूं आपुल्या दासांची सत्कीर्ती । स्वयें वदविसी रुक्मिणीपती ।

येर्‍हवीं तरी मी मंदमती । हे साक्ष चित्तीं येतसे ॥९॥

तुझा आश्रय जाणोनि साचा । प्रारंभ केला ग्रंथाचा ।

आतां शेवट करणें याचा । हा अभिमान साचा असोंदे ॥१०॥

मागिले अध्यायीं अनुसंधान । महामुद्गलभट्ट सात्विक ब्राह्मण ।

त्यासि तस्कर आडवे येतांचि पुर्ण । श्रीराम लक्ष्मण रक्षिलें ॥११॥

यावरी आतां ऎका सज्जन । एकजन जसवंत वैष्णवपूर्ण ।

त्याणें भक्तिभावें करूनि जाण । श्रीरघुनंदन वश्य केला ॥१२॥

तापी तीरामाजी साचार । बरेट नाम पुण्यनगर ।

तेथें राहोनि वैष्णववीर । भजन साचार करितसे ॥१३॥

माध्यंदिन ब्राह्मण निश्चिती । परम सुशीळ पुण्यमूर्ती ।

नामस्मरण अहोरात्रीं । सप्रेमयुक्ती करितसे ॥१४॥

गृहस्थाश्रमीं असोनि त्यास । चित्तीं नसे आशापाश ।

अखंड विरक्त आणि उदास । सगुण भक्तीस विनटला ॥१५॥

अमानित्वादि सकळ लक्षणें । हीं त्याच्या अंगीं असती चिन्हें ।

श्रीराम सीता लक्ष्मण । या मूर्तीचें अर्चन नित्यकरी ॥१६॥

अयाचित वृत्ती करून । कांहीं येतसे वस्त्रअन्न ।

त्यांतही अतिथि संतोषवून । कुटुंब रक्षण करावें ॥१७॥

सर्वभूतीं दया केवळ । भजनशीळ आणि प्रेमळ ।

जिव्हेसि असत्याचा मळ । याचा विटाळ स्पर्शेना ॥१८॥

रात्रि समय येतांचि जाण । नित्य करीत हरिकीर्तन ।

ऎकावयासी येती भाविकजन । करिती श्रवण निजप्रीतीं ॥१९॥

करावया विश्वोध्दार । संतीं घेतलें अवतार ।

येर्‍हवीं तरीं तें निर्विकार । त्रिगुण विकार तो नाहीं ॥२०॥

जैसा जगदात्मा चैतन्यघन । तैशाच रीतीं भगवज्जन ।

परी पतितासि करावया पावन । मनुष्यपणे अवतार ॥२१॥

संत आणि देव जाण । दोघांत नाहीं भेदभान ।

सूर्य आणि त्याचे किरण । नामाभिधानें भिन्न जैसीं ॥२२॥

आपुली आपण पाहावी स्थिती । आपली आपण वाणावी कीर्ती ।

आपुली आपण करावी भक्ती । इच्छित श्रीपती चित्तांत ॥२३॥

यास्तव देवभक्त होऊनि अनंत । आपुलीच सत्कीर्ती आपण गात ।

ती श्रवणीं ऎकतां जड मूढ समस्त । तरी जीवन्मुक्त ते होती ॥२४॥

असो मागील अनुसंधान । जन जसवंत भाविक ब्राह्मण ।

नित्य करीतसे हरिकीर्तन । भक्तिसगुण वाखाणी ॥२५॥

गांवींचे भाविक प्रेमळभक्त । ब्राह्मण स्त्रिया शुद्र निश्चित ।

रात्रीं नित्य श्रवणासि येत । एकाग्र चित्तें ऎकती ॥२६॥

दिवसां प्रपंच धंदा करिती । रात्रीं हरी चरित्रें ऎकती ।

तेणें विसरोनि मोहभ्रांती । जीवासि विश्रांति होतसे ॥२७॥

ऎसें लोटतां दिवस बहुत । तों चरित्र वर्तलें एक अघटित ।

पर्जन्य लागला दिवस सात । अहोरात्र वर्षतसे ॥२८॥

तेणें पृथ्वी निववोनि समग्र । सरितेसि पातला महापूर ।

बरेट गांवींचे लोकसमग्र । हाहाकार करिताती ॥२९॥

गांवांत पाणी शिरलें पाहीं । मंदिरें पडलीं ठायीं ठायीं ।

लोक म्हणती ते समयीं । उपाय कांहीं चालेना ॥३०॥

एक म्हणती भाविक नर । जन जसवंत वैष्णववीर ।

तयासि प्रसन्न जानकीवर । असे साचार जाणपां ॥३१॥

श्रीरघुनाथ चरित्रें नित्य । गात असे कीर्तनांत ।

कीं संकट पडतां निजभक्तातें । वैकुंठनाथ रक्षी तया ॥३२॥

तरी आपण मिळोनी अवघे जण । तयासि ऎसें बोलें वचन ।

कीं आतां प्रार्थुनि रघुनंदन । अरिष्ट दारुण निरसावें ॥३३॥

ऎसें सांगता कोणी । हे मानलें सकळांचिये मनीं ।

मग अवघे ग्रामस्थ मिळोनी । पातले सदनीं तयाच्या ॥३४॥

श्रीराम भक्त तये दिनीं । बैसला असे सहजासनीं ।

हातीं घेऊनियां स्मरणी । सप्रेम भजनीं डुल्लत ॥३५॥

तंव ग्रामवासी घेऊनियां सद्भावें । अवघे लागती पाया ।

एक कुबुध्दि धरोनियां । शब्द शस्त्रें तया ताडिती ॥३६॥

म्हणती जनजसवंत वैष्णववीर । ग्रामांत असोनि निरंतर ।

नदीस पातलां महापूर । क्षेत्रांत नीर प्रवेशले ॥३७॥

तेणें भयें साचार । गांवांत जाहला हाहाकार ।

तरी आतां प्रार्थुनि श्रीरघुवीर । विघ्न साचार निरसावें ॥३८॥

देवाची कीर्ती गातसां नित्य । हे तेव्हांस आम्हीं मानूं सत्य ।

निंदक कुटिळ दुर्मत । ऎसें वदत तयासी ॥३९॥

ऎसें तयाचें ऎकोनि वचन । दुखवलें तेव्हां अंतःकरण ।

जन जसवंत सत्वर उठोन । देवघरीं जाण प्रवेशले ॥४०॥

कवाड आडकोनि सत्वरगती । लाविली दोन्ही नेत्रपातीं ।

मग एकाग्र होऊनियां चित्तीं । रघुनाथस्तुती करीतसे ॥४१॥

जयजयाजी अयोध्याधीशा । लीलावतारी जगन्निवासा ।

तूं निजभक्तांचा होसी कुंवसा । ऎसा ठसा त्रिभुवनीं ॥४२॥

देव बंदि पडिले जाण समग्र । यास्तव सूर्यवंशी अवतार ।

घेऊनि वधिला दशकंधर । मग विबुध सत्वर सोडविले ॥४३॥

तुझ्या नामें करूनि साचार । पाषाण तरले समुद्रावर ।

आणि आतां तापीसि आलें नीर । तेणें ग्राम समग्र बुडतो हा ॥४४॥

देवाधिदेवा जगज्जीवना । भीत नाहीं मी आपुल्या मरणा ।

परी दुःख होतांचि या जना । हें माझिया नयना न पाहवे ॥४५॥

ऎसें म्हणवोनि भक्तप्रेमळ । अश्रुपाते भरले डोळे ।

तंव ध्यानीं प्रगटोनि दीनदयाळ । म्हणे चिंता अणुमात्र न करावी ॥४६॥

तापीसि महापुर आला निश्चित । तरी तो पाशील वायुसुत ।

सरितेचे कांठी हा हनुमंत । नेऊनि त्वरित बैसवि ॥४७॥

ऎसें जसवंतासि बोलून वचन । अदृश्य जाहला रघुनंदन ।

कीं निजभक्ताचे हृदयभुवन । तेथेंच लपोन बैसले ॥४८॥

धातूची मुर्ती साचार । आदगज उंच असे थोर ।

ते जसवंतें उचलोनि सत्वर । तापी तीर पातले ॥४९॥

जेथवर पाणी चढलें पाहीं । मारूती मांडिला तये ठायीं ।

ग्रामवासी लोक सर्वही । येती लवलाहीं पाहावया ॥५०॥

मग काय केलें वायुसुतें । भुभुक्कार दीधला नेटें ।

तेणें शब्द आचाटें । कर्ण संपुटें बैसलीं ॥५१॥

विक्राळ रूप वायुसुतें । धरोनि सरिता प्राशिली समस्त ।

तत्काळ पोटीं जीवन येत । लोक समस्त देखती ॥५२॥

पात्र टाकोनियां सकळ । रानांत पसरलें होते जळ ।

एकाएकीं वोसरलें सकळ । लोक ते वेळे पाहती ॥५३॥

जयजयकारें तें वेळां । आनंदली भक्त मंडळी ।

म्हणती धन्य वैष्णव कळिकाळीं । भूमंडळी अवतरला ॥५४॥

बरेट गांवींचे नारीनर । येऊनि जसवंताच्या समोर ।

भावें करिती नमस्कार । म्हणती प्रसन्न रघुवीर तुज असे ॥५५॥

देखत देखत हनुमंतानें । नदीचें प्राशिले जीवन ।

धन्य संताचें महिमान । किती म्हणून वाखाणूं ॥५६॥

ऎशारिती भाविक बोलती । जसवंतासि वाखाणिती ।

म्हणती विप्रवेषें निश्चिती । साक्षात रघुपती अवतरला ॥५७॥

परी विकल्पी दुर्बुध्दि होते कोणी । सत्य न वाटे त्यांजलागुनी ।

म्हणती पाणी चढलें त्रयदिनी । सहज ओहोटोनि मग गेलें ॥५८॥

धातूची मूर्ती साचार । कैसे पाशील इतुकें नीर ।

होणार तैसें भविष्य पुरे । यश त्यावर कां देतां ॥५९॥

धातूचीं दैवते अपार । उदंड आहे घरोघर ।

तीं काय प्राशीत नीर । चित्तीं विचार करावा ॥६०॥

एक म्हणती टाणींटोणीं । जसवंत जाणे मंत्रमोहिनी ।

त्याणें भाविकांसि अनुग्रह करोनी । आपुले ध्यानीं लाविलें ॥६१॥

नदीचें प्राशन करावया नीर । त्यासी सामर्थ्य असते जर ।

तरी भिक्षा मागावया साचार । दारोदार हिंडता कां ॥६२॥

ऎसें विकल्पीत त्या अवसरा । बोलत असती येरयेरां ।

चित्तीं संशय बाणला पुरा । तें श्रीरामचंद्रा न साहे ॥६३॥

आधीं दुर्जनासिं पुढें करून । निजभक्ताचे करवीत छळण ।

मग अघटित चरित्र दाखवून । संत महिमान वाढवी ॥६४॥

प्रल्हाद भक्त प्रेमळ दास । सप्रेम भजन करीत विशेष ।

हिरण्यकशिपें छळितां त्यास । स्तंभीं हृषीकेश प्रगटला ॥६५॥

दुर्योधन राजा महादुर्मती । त्याणें छळिता द्रौपदी सती ।

वस्त्रें हरितां सत्वर गती । मग रुक्मिणीपती पावला ॥६६॥

असो मागील अनुसंधान । मारुतीनें प्राशितां तापीचें जीवन ।

विकल्पी असत्य मानिती जन । मग काय विंदान दाखवी ॥६७॥

हनुमंताची मूर्ती साजिरी । मांडिली होती तापी तीरीं ।

लोक पाहती ते अवसरीं । कौतुक नेत्रीं आपुल्या ॥६८॥

मूर्तीच्या नाभिस्थानीं साचार । लागली अखंड उदकाची धार ।

आणिकही छिद्रें पडिली चार । त्याजवाटे नीर वाहतसे ॥६९॥

चार दिवस अहोरात्र जाण । अखंड वाहों लागलें जीवन ।

गांवोंगांवींचे बहुत जन । कौतुक येवोन पाहतीं ॥७०॥

विकल्पी निंदक जे दुर्जन । त्यांचें द्रवलें अंतःकरण ।

मग जन जसवंताचे चरण । निजप्रीतीनें वंदिती ॥७१॥

म्हणती तूं निधडा वैष्णववीर । साक्षात ईश्वरी अवतार ।

तुमच्या योगें साचार । गांव समग्र वांचला ॥७२॥

मारुतीची मूर्ति सगुण । तिणें साक्षात प्राशिलें जीवन ।

अद्भुत दाखविलें विंदान । म्हणवोनि लोटांगण घालिती ॥७३॥

श्रीराम भजन करिती नित्य । रामरूप जाहला जसवंत ।

सत्कीर्ति प्रगटली जनांत । चरित्रें वर्णित संत साधु ॥७४॥

ज्या मूर्तीनें प्राशिलें नीर । तें स्थळ आहे अद्यापि वर ।

पोटासि तैसेंचि आहे छिद्र । लोक सर्वत्र पाहती ॥७५॥

नंदुरबार परगण्यामाजी पाहीं । त्याचे वंशिक आहेत संप्रदायीं ।

आतां निझव्यांत राहती । तये ठायीं मुर्ति असे ॥७६॥

आणिक चरित्र रसाळ फार । सादर ऎका भाविक नर ।

एक निरंजन स्वामी भक्त थोर । त्याणें लंबोदर आराधिला ॥७७॥

नारद बिंदु सुराकर्पुरा तीर । यांच्या संगमीं साचार ।

नामल ग्राम क्षेत्र थोर । वास्तव्य निरंतर तेथें असे ॥७८॥

निरंजन स्वामीची ऎसी स्थिती । अखंड उदास विरक्त चित्तीं ।

करुणा धरोनि सर्वांभुतीं । आत्मवत जगती मानीत ॥७९॥

स्नान संध्या करोनि नित्य । श्रीगणपतीची मूर्ति पूजित ।

त्याजवांचोनि आणिक दैवत । दृष्टीसीं निश्चित न पाहे ॥८०॥

चातक न घे भूमीचें जीवन । कां मातेवांचोनि न समजे तान्हें ।

चकोरासि चंद्राचि प्रमाण । इतर तारांगण नावडती ॥८१॥

कृपणासि काया वाचा मनें । चित्तातूनि आवडे धन ।

तैशाच रीतीं निरंजनें । गजानज आराधिला ॥८२॥

त्याची निष्ठा देखुनि बहुत । साक्षात्कार दीधला एकदंतें ।

तों विद्वान ब्राह्मण अकस्मात । आले त्वरित भेटिसी ॥८३॥

तेही स्नान करोनि सत्वरी । अर्चनासि बैसले ते अवसरीं ।

गणपतेची मुर्ति साजिरी । सर्वोपचारी पूजितसे ॥८४॥

तों ब्राह्मण म्हणती निरंजनास । एक शास्त्र विरुध्द आम्हांसि दिसे ।

अर्चनीं पुजिसी गणपतीस । परी शाळग्राम न दिसे ये ठायीं ॥८५॥

विष्णुमुर्तीविण थोर । आणिक दैवतें पूजिलीं फार ।

परी त्यांचें तीर्थ घ्यावया साचार । नसे अधिकार सर्वथा ॥८६॥

ऎसें म्हणवोनि त्याजकारणें । काय करिते जाहले ब्राह्मण ।

एक शाळग्राम शिळा काढोन । म्हणती याचें पूजन करावें ॥८७॥

मग निरंजनें शाळग्राम घेतला हातीं । परम संकोन वाटला चित्तीं ।

म्हणे एकनिष्ठ उपासना होती । आतां व्यभिचार निश्चितीं दिसतो ॥८८॥

ते वेळीं स्वमुखें करून । एक अभंग बोलिले वचन ।

तो ग्रंथीं लिहितों प्रीतीं करून । करा श्रवण भाविकहो ॥८९॥

अभंग

देहपात घडो तुज उपासीतां । तरी न सोडीं सर्वथा भक्ती तुझी ॥१॥

जितुकें जाचसील तितुके सोसीन । परी राहे माझें मन तुझे ठायीं ॥२॥

निष्ठुर मानस करिशील जरी । परी न सोडी अंतरीं ध्यान तुझें ॥३॥

ध्यानीं तुझें रूप न दिसे संपूर्ण । परी नामाचें चिंतन न सोडींगा ॥४॥

निरंजन स्वामी प्रभु एकदंता । न सोडी सर्वथा भक्तीं तुझी ॥५॥

इतुका अभंग म्हणवोन । आणिक श्लोक बोलिले दोन ।

त्यांचा अभिप्राय संपुर्ण । करा श्रवण निजप्रीती ॥९०॥

ऋषी तापसी थोर ब्राह्मण । आणिक तेहतीस कोटी गण ।

मजवर क्षोभिले संपूर्ण । परी न सोडीं ध्यान तुझें ॥९१॥

आकाश कडकडोनि पडो मजवरी । विरोनि जाय सकळ धरित्री ।

तरी भक्तीसि व्यभिचार मी न करीं । निश्चय अंतरीं दृढ केला ॥९२॥

निरंजनाची उपासना भक्ती । देखोनि तुष्टलें वैकुंठपती ।

शाळग्राम विष्णुमूर्ति होती । सोंड अवचितीं फुटली तया ॥९३॥

सन्निध साधु वैष्णवभक्त । आणि विद्वान विप्र जवळ होते ।

चरित्र देखोनि अत्यद्भुत । आश्चर्य वाटत तयांसि ॥९४॥

जयजयकारें पिटिली टाळी । आनंदली भक्त मंडळीं ।

निरंजन स्वामीसि ते वेळीं । नमस्कार सकळीं घातला ॥९५॥

म्हणती तुमची उपासना भक्ती । देखोनि तुष्टला लक्ष्मीपती ।

शाळग्रामाची शिळा होती । ते दिसे अवचितीं गजवदन ॥९६॥

जैसा एकनिष्ठ नरहरी । त्याणें आराधिला श्रीशंकर ।

मग पांडुरंगें मस्तकावर । लिंग साचार धरियेलें ॥९७॥

विश्वात्मा हा जगत्पती । जया चित्तीं जैसी आर्ती ।

रूप नटोनि तैशाच रीतीं । आपुल्या भक्तीसी लावितसे ॥९८॥

जाणोनि यशोदेची भावना । श्रीकृष्ण जाहला तिचा तान्हा ।

आणि अर्जुनाची होऊनि अंगना । इच्छा भोगदाना देतसे ॥९९॥

तो निज भक्ताची देखोनि आर्ती । धरितसे गजानज आकृति ।

मग निरंजन स्वामी धरोनि प्रीतीं । शाळग्राम मूर्ती पूजितसे ॥१००॥

उदंड आत्मज्ञानी पुरुष । देखिले ऎकिले बहुवस ।

परी नामदेवें फिरविलें देउळास । हे कळा नसेचि ते ठायीं ॥१०१॥

ब्रह्मज्ञान कथिती फार । करतळामळ विद्या सर्वत्र ।

परी धातूच्या हनुमंतें प्राशिलें नीर । अघटित विचार हा दिसे ॥२॥

एक उपासना भक्तिविण । साक्षात्कार न ये कोणाकारणें ।

जैसें बहुतां घरींचे पाहुणें । उपासी जाण मरतसे ॥३॥

म्हणवोनि उपासना सगुणभक्ती । स्थापिली असे सभाग्यसंतीं ।

चित्तीं धरितां उपपत्ती । साक्षात्कार पावती साधक ॥४॥

आणिक चरित्र रसाळ थोर । सादर परिसा भाविक चतुर ।

जयरामस्वामी वडगांवकर । त्यासि रुक्मिणीवर भेटले ॥५॥

ते म्हणाल जरी कैशारीतीं । कोण उपासना कैशी भक्ती ।

ते सांगतों यथामती । तरी सादर श्रोतीं परिसिजे ॥६॥

एक कृष्णदास म्हणवोनि ब्राह्मण । परम सुशीळ पुण्यवान ।

नित्य करीत विष्णुअर्चन । सप्रेम भजन सर्वदा ॥७॥

गृहस्थाश्रम तयासि असतां । तों अपूर्व वर्तली कर्मकथा ।

पहिली निवर्तोनि गेली कांता । म्हणे विवाह आतां करावा ॥८॥

व्यापार करावया निमित्त । कृष्ण दास सैन्यांत गेले होते ।

तों एक ग्राम लुटिला तेथें । थोर आकांत जाहला ॥९॥

नरनारी गुढेकरी ते समयीं । पळोनि गेले होते कांहीं ।

ते एक्या ब्राह्मणाच्या गृहीं । कुमारी त्यांहीं देखिली ॥११०॥

उपवर नोवरी सुंदरजाण । ब्राह्मणासि पुसोनि लाविलें लग्न ।

कृष्णदास नोवरी घेऊन । आले परतोन निजग्रामा ॥११॥

कांहीं दिवस लोटल्यावर । दिवसंदिवस जाहली थोर ।

ऋतु प्राप्त झालियावर । सर्व संस्कार घडेल कीं ॥१२॥

कांहीं दिवस लोटलियावरी । घागर घेतली खांद्यावरी ।

पाणवथा जातांचि ते नारी । तेथें मातुळ नेत्रीं देखिला ॥१३॥

तो तरी जातीचा नापिक । दृष्टी पडतां पुरली ओळख ।

न्याहाळून पाहे त्याचें मुख । गहिवर सुखें पातला ॥१४॥

तों तयांसिही बाणली खूण । अश्रुपातें भरले नयन ।

म्हणे तुज शोधितां बहुतदिन । वर्षे दोन लोटलीं ॥१५॥

आजि अकस्मात दृष्टादृष्टीं । उभयतांचि जाहली भेटी ।

माता रडतसे तुजसाठीं । प्राणकंठीं धरिला असे ॥१६॥

भाची म्हणे ते अवसरीं । परचक्र आलें गांवावरी ।

मग मी लपोनियां शेजारी । ब्राह्मण मंदिरीं बैसलें ॥१७॥

तेथें एक विप्र आला जाण । त्याणें आणिलें मजलागून ।

ब्राह्मण बोलावूनि त्याणें । लाविलें लग्न आपणासि ॥१८॥

ऎसी कर्माची विचित्र गती । विधात्यानें लिहिली संचिती ।

ऎसें सांगतां मातुळाप्रती । अश्रु वाहती नेत्रांतूनि ॥१९॥

इतुकें शब्द परस्परीं । उभयतां बोलिलें तें अवसरीं ।

तों डोईवर घेऊनि घागरीं । ऎकती नारी पाणवथा ॥१२०॥

गोष्ट ऎकोनि अघटित । गावांत जाऊनि कोणी सांगत ।

मात प्रगटली नगरांत । म्हणती विपरीत हें झालें ॥२१॥

नानापरीचें त्रिविध जन । अपशब्दें निंदिती बहुगुण ।

म्हणती कलियुगीचें ब्राह्मण । विषयांध जाण सर्वस्वें ॥२२॥

सैन्यांत जाऊनि दुराचारी । नापिकाची केली नोवरी ।

वर्ण संकर मांडिला घरीं । नरक अघोरी भोगावया ॥२३॥

आणिक यातीची असती जर । तरी शब्द ठेविते धरामर ।

वर्णामाजी छत्र चामर । भलतांचि विचार हे करिती ॥२४॥

ब्राह्मण मिळोनि विद्यावंत । कृष्णदासासि काय बोलत ।

तुज तरी आम्हीं घातलें वाळीस । तरी देहांत प्रायश्चित घे आतां ॥२५॥

नूतन व्यवहार असताम जर । तरी चालतां कांहीं शास्त्रविचार ।

त्यांसि दिवस लोटलें फार । सोळा संस्कार घडले कीं ॥२६॥

ऎसें बोलतां धरामर । पिशुन हांसती सर्वत्र ।

कोणीच तयांसि न म्हणे बरें । धरिलें दूर सर्वत्री ॥२७॥

इतुका अपवाद होतांचि जाण । अनुतापें द्रवलें अंतःकरण ।

अश्रुपातें भरलें लोचन । मग श्रीहरिस्मरण करीतसे ॥२८॥

म्हणे चौर्‍यासी लक्ष योनी हिंडतां । नरदेह लाधला अवाचितां ।

तेथें देहांत प्रायश्चित घेतां । तरी आत्महत्या घडेल कीं ॥२९॥

अनंत जन्मांच्या भोगिल्या कोटी । आतां नरदेह लाधला शेवटीं ।

आतां अनुताप धरोनि पोटीं । चित्तीं जगजेठी स्मरावा ॥१३०॥

ऎसा मानसीं करूनि विचार । ब्राह्मणांसि केला नमस्कार ।

म्हणे मी तुमचा सेवागार । होईन निरंतर सर्वस्वें ॥३१॥

विद्या वय कुळ याती । यांतुनि भ्रष्टलों निश्चितीं ।

आतां पतितपावन वैकुंठपती । तो उध्दरील निश्चिती मजलागीं ॥३२॥

इतुकें विप्रांसि बोलोनि वचन । प्रेमें करीत नामस्मरण ।

रात्रीं करावें हरीकीर्तन । पुस्तक पारायण ज्ञानेश्वरी ॥३३॥

आषाढीं कार्तिकी पंढरीसी । नेमें येतसे यात्रेसी ।

संत प्रेमळ महंत ऋषीं । सद्भावें तयांसी नमस्कारी ॥३४॥

भूतदया निरंतर । शरीरें करीत परोपकार ।

परी स्वयातीनें धरिलें दुर । हा खेद अणुमात्र असेना ॥३५॥

रात्रीं होतां कीर्तनगजर । श्रवणासि येतीं भाविक नर ।

स्त्रिया शुद्रयाती इतर । वेधलें अंतर तयाचें ॥३६॥

परी कृष्णदासासि धरामर । देखोनि बोलती दुरुत्तर ।

कृष्णा न्हावी हे साचार । नाम अवश्य म्हणती तयांसीं ॥३७॥

एक कुचेष्टा करूनि निश्चित । कृष्णदासाच्या गृहासि येत ।

म्हणे आमुची करावी हजामत । मग अवश्य म्हणती तयांसीं ॥३८॥

मग वस्तरा कातर ठेवूनि घरीं । मुखें ब्राह्मणाची सेवा करी ।

स्वयातीनें धरिलें दुरी । हा खेद अंतरीं त्या वाटे ॥३९॥

द्विजीं घातलें वाळीत । आप्तवर्गे सोडिलें निश्चित ।

म्हणे पूर्वजन्मींचे सुकृत । अभिमानाविरहित झालें कीं ॥१४०॥

टाळ विणा मृदंग सत्वर । नित्य होतसे कीर्तनगजर ।

स्नानसंध्या ब्राह्मण साचार । पूर्ववत साचार करीतसे ॥४१॥

ऎसी असतां तयाची स्थिती । तों पुढें बहुत जाहली सत्कीर्ती ।

ते म्हणाल जरी कैशारीतीं । तरी सादर श्रोतीं परिसिजे ॥४२॥

कांतेसहित एक ब्राह्मण । पंढरीसि आला निजप्रीतीनें ।

जयराम पुत्राचें नामाभिधान । तो परम सगुण सुलक्षणी ॥४३॥

चंद्रभागेसि करूनि स्नाना । घेतले पुंडलिकाचे दर्शना ।

मग करोनि क्षेत्रप्रदक्षिणा । माहाद्वारीं जाणा ती आलीं ॥४४॥

गरुडपारीं लोटांगण । घातलें तेव्हां निजप्रीतीनें ।

विठ्ठलरुक्मिणींचे घेतां दर्शन । रमले मन ते ठायीं ॥४५॥

संसारीं होऊनि उदास । आवडीनें केला क्षेत्रवास ।

कांहींएक लोटतां दिवस । सायुज्यपदास ते गेले ॥४६॥

मातापिता क्रमतां निश्चिती । जयरामासि बाणली विरक्ती ।

श्रीपांडुरंगाच्या चरणीं ठेवूनि प्रीती । पंढरीसि निश्चिती राहिला ॥४७॥

म्हणे देवाधिदेवा रुक्मिणी कांता । तूंचि माझी मातापिता ।

तुजविण कोणी बंधुचुलता । कुळदेवता आन नसे ॥४८॥

तूंचि माझें गणगोत । तूंचि माझा जिवलग आप्त ।

दुजा कैवारी त्रिभुवनांत । नाहीं निश्चित मज कोणी ॥४९॥

ऎसी करुणा भाकोनि जाण । त्रिकाळ घेतसे देवदर्शन ।

वैष्णव करिती हरिकीर्तन । तेथें श्रवण करीत निजप्रीतीं ॥१५०॥

तंव कोणे एकें दिवसीं जाण । ऎकत बैसला पुराणश्रवण ।

तेथें सद्गुरुसेवेचें महिमान । ऎकतांचि मन वेधलें ॥५१॥

म्हणे गुरुगीतेमाजी निश्चिती । जैसी बोलली सद्गुरुभक्ती ।

ते मज घडावी यथास्थिती । धिंवसा चित्तीं उपजला ॥५२॥

मग सदगुरुप्राप्तीस्तव जाण । तेणें मांडिलें अनुष्ठान ।

चंद्रभागेचें करोनि स्नान । पुंडलीक पूजन करीतसे ॥५३॥

यामिनी उरतां घटिका चार । तों क्षेत्रप्रदक्षिणा करी सत्वर ।

मग महाद्वारासि वैष्णववीर । येऊनि नमस्कार घालीतसे ॥५४॥

सांवळा सुकुमार कैवल्यदानी । पाहतांचि संतोष पावे मनीं ।

मस्तक ठेवूनियां चरणीं । स्वरूप ध्यानीं सांठवित ॥५५॥

एकादशीस उपोषण सार । रात्रीं करीतसे हरिजागर ।

कीर्तन ऎकतां चारी प्रहर । सप्रेम अंतर तयाचें ॥५६॥

साधुसंत वैष्णव जन । तयांसि सद्भावें करीत नमन ।

वाचेसि सर्वदा नामस्मरण । एकही क्षण न राहे ॥५७॥

अनुष्ठान करितां ऎशारितीं । मनकामना धरिली चित्तीं ।

कीं सद्गुरु भेटावा मजप्रती । आणिक आर्ती असेना ॥५८॥

कांहीं दिवस लोटतां निश्चित । सात्विक पुण्य सांचलें बहुत ।

सद्भक्ति देखोनि पंढरीनाथ । स्वप्नीं सांगत येऊनियां ॥५९॥

विप्रवेषें रुक्मिणीकांत । दृष्टांतीं तयासि काय बोलत ।

कृष्णदास आहे वडगांवांत । शरण तयातें जा वेगीं ॥१६०॥

सद्भावें करितां त्याची भक्ती । तेणेंचि होईल माझी प्राप्ती ।

ऎसा दृष्टांत होताचि रातीं । जयराम जागृती येतसे ॥६१॥

देखोनि स्वप्नींचा चमत्कारु । चित्तीं उल्हास वाटला थोरु ।

म्हणे श्रीपांडुरंगें दाखविला तारु । पाहीन सद्गुरु दृष्टीसीं ॥६२॥

ऎसा संतोष मानूनि मनें । मग चंद्रभागेसि केलें स्नान ।

घेऊनि विठोबाचें दर्शन । सद्भावे चरण वंदिले ॥६३॥

म्हणे देवाधिदेवा रुक्मिणीकांता । आतां असोदें लोभ ममता ।

योगक्षेम तुझिया माथा । निर्विघ्न आतां तूं नेयीं ॥६४॥

ऎसें म्हणवोनि ते अवसरीं । प्रेमें अश्रुपात आले नेत्रीं ।

पुनः पुन्हा दंडवत करी । महाद्वारीं येतसे ॥६५॥

सव्य घेऊनि क्षेत्रपंढरी । पंथ क्रमीत ते अवसरीं ।

वडगांवासि येऊनि सत्वरी । सद्गुरु मंदिरीं प्रवेशत ॥६६॥

कृष्णदासासु देखोनि नयनीं । साष्टांग नमस्कार घातला धरणीं ।

परम उल्हास वाटला मनीं । दृष्टांत कानीं अवधारा ॥६७॥

जैसा श्रीहरि प्राप्तीस्तव निश्चित । ध्रुवबाळ रुसोनि जात ।

तों ब्राह्मणसुत भेटला अकस्मात । मग आनंद होत तयासी ॥६८॥

कां संशयीं पडतां द्वैपायन । तों जाहलें नारदाचें दर्शन ।

तैसाचि उल्हास धरोनि मनें । सद्गुरुकारणें भेटतसे ॥६९॥

वृत्तांत सांगें निजप्रीतीसी । म्यां अनुष्ठान केलें पंढरीसी ।

देवे आज्ञा केली मजसी । कीं शरण स्वामीसी जाय आतां ॥१७०॥

तरी मस्तकीं ठेवूनि अभयपाणी । अनुग्रह द्यावा मजलागुनी ।

ऎकोनि जयरामाची वाणी । कृष्णदास मनीं विस्मित ॥७१॥

म्हणे हे उपाधि पंढरीनाथें । व्यर्थ कासया पाठविली येथें ।

ऎसें म्हणवोनि चित्तांत । उत्तर देत काय तया ॥७२॥

म्हणे निजकर्मे करोनि तत्त्वतां । यातिभ्रष्ट जाहलों आतां ।

देहांत प्रायश्चित विप्र सांगतां । धरिली ममता शरीराची ॥७३॥

यास्तव राग धरोनि निश्चित । ब्राह्मणीं घातलें असे वाळींत ।

वेगळी गुंफा बांधोनि येथ । भजन करीत बैसलों ॥७४॥

कुळवंत गुरु पाहोनि ब्राह्मण । तयासि तुवां जावे शरण ।

मज बहिष्कार पडला असे जाण । यातिवर्ण तो नाहीं ॥७५॥

ऎकोनी कृष्णदासाची वाणीं । जयरामें मिठी घातली चरणीं ।

म्हणे बाळकांसि उपेक्षितां जननीं । तरी अपंगिता कोणी नसे कीं ॥७६॥

काया वाचा आणि मनें । तन मन धनेसि आलों शरण ।

आतां कृपादृष्टीं विलोकून । करावें पावन मज स्वामी ॥७७॥

सद्भावें ओळखोनियां मनीं । मस्तकीं ठेविला अभयपाणी ।

मग दीक्षा अनुग्रह देखोनि । श्रीकृष्ण भजनीं लाविला ॥७८॥

काया वाचा मनें निश्चित । सद्गुरुची सेवा करीत ।

अनन्यभावें लाविली प्रीत । कल्पना द्वैत टाकोनीं ॥७९॥

परस्परें गांवांत जाहलें श्रुत । ऎकोनि ब्राह्मण निर्भर्स्सित ।

म्हणती नापिकाचा उपदेश घेतला निश्चित । तरी विपरीतार्थ हा दिसे ॥१८०॥

आणिक सद्गुरु ज्ञानी चतुर । उदंड आहेत पृथ्वीवर ।

तयासि टाकूनि साचार । भ्रष्टास शरण कां गेला ॥८१॥

नासल्या उदकासि मिळतां पाणी । तरी तें पवित्र होईल कैसेनी ।

तयासि न सेविती कोणी । तैसीच करणी ही दिसे ॥८२॥

पवित्र ब्राह्मणाचा नंदन । आणि नापिकाचा उपदेश घेतला याणें ।

तयासी भाषण न करणें । ऎसें ब्राह्मण बोलती ॥८३॥

परी जयराम स्वामीचा दृढभाव । कीं सद्गुरु हाचि देवाधिदेव ।

सेवा करीतसे अति अपूर्व । द्वैतभाव टाकोनियां ॥८४॥

विप्रीं घातलें वाळींत । आप्तवर्गी सांडिलें निश्चित ।

परी चित्तीं बाणला आत्मस्वार्थ । यास्तव क्षीत न मानी ॥८५॥

त्रिकाळस्वामींचे दर्शन । घेऊनि शुश्रुषा करीतसे जाण ।

मंदिरीं सडासंमार्जन । निजप्रीतीनें घालितसे ॥८६॥

प्रातःकाळीं करोनि स्नान । सोज्ज्वळ धूतसे उपकरण ।

अनसुट उदकपात्रीं भरोन । स्वामीस जाण ठेवित ॥८७॥

स्नान घालोनि आपुल्या हातें । देवपूजेचें साहित्य देत ।

कोठें न्यून न पडे किंचित । सप्रेम भावार्थ तयाचा ॥८८॥

योगियाच्या मतें निश्चिती । जैसी बोलिली सद्गुरु भक्ती ।

सेवा करीत तैशा रीतीं । अनन्य प्रीती लावोनियां ॥८९॥

आपुल्या स्वामींचे चरणतीर्थ । आवडी करोनि नित्य सेवित ।

तेणें कविताशक्ति जाहली निश्चित । कीर्तनीं गात गुणनाम ॥१९०॥

कृष्णदास जयराम म्हणवोनी । अभंगीं बोलत तयेक्षणीं ।

ऎकोनि तयाची सप्रेम वाणी । श्रोतयासि मनीं आनंद ॥९१॥

भोळे भाविक भक्तप्रेमळ । ते तरी वंदिती सर्वकाळ ।

सांडोनि चित्ताची तळमळ । कीर्तन रसाळ ऎकती ॥९२॥

वैदिकशास्त्रज्ञ पंडित जन । ते तयाचें न घेती दर्शन ।

तों अघटित चरित्र वर्तलें गहन । तें ऎका सज्जन भाविकहो ॥९३॥

शंकराचार्य एके दिनीं । अकस्मात आले त्या ठिकाणीं ।

मग सकळ ब्राह्मण मिळोनि । दर्शना लागोनी ते गेले ॥९४॥

करोनियां साष्टांग नमन । गांवांत आणिलें प्रीतीकरून ।

पूजाअर्चा जाहलिया जाण । मग भोजनें सारिली ॥९५॥

स्वस्थानीं बैसतांचि महंत । मग सकळ ब्राह्मण मिळोनि येत ।

म्हणती स्वामी एक अनुचित । जाहलें निश्चित ये ठायीं ॥९६॥

ब्राह्मण पुत्र एक जयराम असे । याणें घेतला नापिकाचा उपदेश ।

सेवा करीत रात्रंदिवस । प्रीती उल्हास धरोनियां ॥९७॥

धर्माधिकारी सांगतां ऎसें । क्रोध पातला आचार्यांस ।

म्हणती धरोनि आणारे तयास । गुरुशिष्यांस उभयतां ॥९८॥

स्वामींची आज्ञा होतांचि ऎसी । संतोष वाटला ब्राह्मणांसी ।

म्हणती बहुत प्रतिष्ठा वाढली त्यासी । शिक्षा अनायासीं होईल ॥९९॥

मग कृष्णदासाच्या मठांत । पातले शंकराचार्याचे भृत्य ।

जयरामासि ओढुनि त्वरित । सत्वर आणित तेधवां ॥२००॥

आचार्य क्षोभोनियां निश्चिती । काय म्हणती तयाप्रती ।

तुवां नापिकांचा अनुग्रह प्रीतीं । कैशा रीतीं घेतला ॥२०१॥

सकळ वर्णाम्त श्रेष्ठ जाण । ते सर्वज्ञ टाकोनि ब्राह्मण ।

त्या भ्रष्टासि गेलासी शरण । तरी तुजकारणें शिक्षा करूं ॥२॥

ऎसी ऎकोनियां वचनोक्ती । सद्भावें नमस्कार घातला प्रीतीं ।

सद्गुरु माझा श्रीकृष्णमूर्ती । जाणोनि निश्चिती शरण गेलों ॥३॥

स्वामींनी कृपा करोनि जाण । ते स्थळीं पाहावें येऊन ।

जरी तो नापिक असला जाण । तरी शिक्षा करणें मजलागीं ॥४॥

ऎसी ऎकोनियां वाणी । महंत विस्मित होतसे मनीं ।

म्हणती कैसा श्रीकृष्ण पाहूं नयनीं । मग तेथूनियां ऊठिले ॥५॥

कृष्णदासाच्या मठांत । शंकराचार्य प्रवेशत ।

तंव ते स्नान सारोनि त्वरित । अर्चन करीत विष्णूचें ॥६॥

जयरामाची देखोनि भक्ती । कृष्णरूप धरीत सद्गुरुमूर्ती ।

जैसा चतुर्भुज वैकुंठपती । आचार्य पाहती तेधवा ॥७॥

मग अष्टही भाव दाटोनि जाण । निज प्रीतीनें करीत नमन ।

देखोनि आश्चर्य करिती ब्राह्मण । तयांसि हें खूण कळेना ॥८॥

जयरामासि शंकराचार्य बोलती । धन्य तुझी सप्रेम भक्ती ।

कृष्णदास हा पांडुरंग मूर्ती । आम्हांसि निश्चितीं दिसतसे ॥९॥

आतां काया वाचा आणि मने । सुखें करावें याचें सेवन ।

बहिष्कार घालोनि गेले ब्राह्मण । तो आज पासोन मुक्त असे ॥२१०॥

ऎकोनि स्वामींची वचनोक्ती । सकळ ब्राह्मण मान्य करिती ।

तेणें प्रतिष्ठा वाढली महंती । अद्भुत सत्कीर्ती प्रगटली ॥११॥

पुढीलें अध्यायीं आरुषवाणी । ग्रंथ वदविला कैवल्यदानी ।

महीपती त्याचा आश्रय करोनी । प्रसादवाणी बोलत ॥१२॥

स्वस्ति श्रीभक्तलीलामृत ग्रंथ । श्रवणेचि पुरती मनोरथ ।

प्रेमळ परिसोत भाविक भक्त । पन्नासावा अध्याय रसाळ हा ॥२१३॥ अध्याय ॥५०॥ ओव्या ॥२१३॥ अभंग ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : September 03, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP