मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|भक्त लीलामृत|

भक्त लीलामृत - अध्याय १३

महिपतिबोवांच्या वाचेला सिद्धी होती, म्हणूनच हा ग्रंथ जो भक्तिभावाने व एकाग्रतेने वाचील त्याला फलश्रुतीचा अनुभव खचितच येणार.


श्रीगणेशाय नमः ।

जय जय अनाथबंधु रुक्मिणीवरा । भक्तवत्सला कृपासागरा ।

करुणासिंधु दीनोद्धारा। सर्वेश्वरा पांडुरंगा ॥१॥

सकळ मंगळ मंगळाधीशा । अमंगळातीत हृषीकेशा ।

विश्वोद्धारा पूर्णपरेशा । अभंगवेषा जगद्गुरु ॥२॥

जय चित्त चालका चैतन्यघना । अंतर्ज्योती मधुसूदना ।

मायातीता गुणनिधाना । निर्गुणसगुणा सुखाब्धी ॥३॥

भक्तकार्याची आवड मोठी । निजांगें पावसी संकटीं ।

लाघव दाविसी जनदृष्टीं । सत्कीर्ति गोमटी ते होय ॥४॥

तुझा भरंवसा धरोनि चित्तांत । आरंभिलें भक्तलीलामृत ।

सिद्धीस न्यावा संपूर्ण ग्रंथ । नाना आघात चुकवोनी ॥५॥

तरी बुद्धिहीन मंदमती । अर्थ अन्वय नकळे चित्तीं ।

कैसीं अक्षरें ल्याहवीं ग्रंथीं । हें मजप्रती कळेना ॥६॥

समर्थे हातीं धरीलियावर । मग कोण करी याचा अव्हेर ।

कां लोहासि परीस लागलियावर । तरी मोल फार होय त्याचें ॥७॥

तेवीं तुझ्या कृपेनें रुक्मिणीपती । आर्ष वचनें होतील सरती ।

येर्‍हवीं मी पामर मूढमती । लोक जाणती सर्वत्र ॥८॥

तुझा तूं सूत्रधारी खरा । ऐसें पूर्ण कळों येतसे अंतरां ।

आतां मज देऊनि अभयवरा । भक्तचरित्र वदवावें ॥९॥

मागिले अध्यायीं कथा सुंदर । राम उपासक भक्त कबीर ।

आणि कृष्ण उपासक रोहिदास थोर । संवाद साचार त्यांसीं जाहला ॥१०॥

आतां श्रीएकनाथ पैठणीं । विष्णु अवतार प्रगटला जनीं ।

त्याचें चरित्र रसाळ वाणी । सादर सज्जनीं परिसिजे ॥११॥

श्रीभानुदास भक्त शिरोमणी । पांडुरंग मूर्ती आणिली त्यांणी ।

त्याचा पुत्र सुलक्षणी । चक्रपाणी नांव त्यांचें ॥१२॥

त्याचा पुत्र सूर्यनारायण । जो ज्ञानप्रकाशें देदीप्ययान ।

त्याची कांता सुलक्षण । नाम रुक्मिणी तिजलागीं ॥१३॥

त्या रुक्मिणीचें उदरीं निश्चित । परब्रह्मरुप एकनाथ ।

जो जगद्गुरु मूर्तिमंत । विश्वहितार्थ कलियुगीं ॥१४॥

त्या एकनाथाचि बाळपणीं । मातापिता क्रमिलीं दोन्ही ।

परी पितामह चक्रपाणी । तया लागोनी प्रतिपाळी ॥१५॥

आजा आजी असतां देख । तेच करिती कोड कौतुक ।

बाळ बहुत सुलक्षणिक । देखोनि सुख उभयतां ॥१६॥

बाळपणीचे खेळ निश्चितीं । एकनाथासि नावडती ।

गोटे मांडोनि देव करिती । पुष्पें वाहती त्यांलागीं ॥१७॥

खांद्यावरी पळी घेवोनि जाणा । त्याचा करितसे ब्रह्मविणा ।

बोबडया शब्दे करोनि जाणा । वैकुंठ राणा आळवित ॥१८॥

कोणी हरिदास गाती कीर्तनीं । त्याचे शब्द ऐकोनि कानीं ।

तेच म्हणतसे पडताळुनी । सप्रेम होउनी नाचत ॥१९॥

देखोनि तयाचा आर्षभाव । खडयामध्येंच प्रगटे देव ।

भक्‍तीचा भुकेला रमाधव । वस्तीसि ठाव तो केला ॥२०॥

रामकृष्ण हरिगोविंदा । अच्युतानंत आनंदकंदा ।

हीं नामें उच्चारीत सदा । श्रीगोविंदा जगद्गुरु ॥२१॥

काडुक घेऊनियां करीं । जीर्ण वस्त्राची पताका करी ।

ते खांद्यावरी घेऊनि सत्वरी । म्हणे पंढरीसि सत्वरी मी जातों ॥२२॥

ऐसीं बाळपणींचीं सगुण चिन्हें । देखोनि वडिलांसि समाधान ।

रामराम सर्वदा उच्चारण । एकही क्षण न राहे ॥२३॥

इतर लेंकरें जैशा रीतीं । नसतीच आळ सर्वदा घेती ।

एकनाथाची तैसी स्थिती । नसे निश्चितीं सर्वथा ॥२४॥

जेव्हां जें जैसें भातुकें देती । तितक्यानें संतोष मानी चित्तीं ।

जैशी पुढील होणार रीती । चिन्हें दिसती तैसीच ॥२५॥

चक्रपाणी म्हणे कांतेप्रती । भानुदास आमुचा पिता निश्चितीं ।

त्याणें आराधिली पांडुरंगमूर्ती । मग प्रसन्न श्रीपती त्यासि झाला ॥२६॥

विठोबा म्हणे ते समयीं । भानुदासा वर माग कांहीं ।

म्हणे तूं माझ्यावंशीं अवतार घेयी । इच्छा नाहीं आणिक मज ॥२७॥

ऐसी ऐकोनियां मात । अवश्य म्हणे रुक्मिणीकांत ।

तोचि हा अवतरला एकनाथ । मजला भासत ऐशा रीतीं ॥२८॥

कांता म्हणे यथार्थ वचन । मानवी नव्हे हा बाळ सगुण ।

मातापिता असती जाण । तरी निवती लोचन देखतां ॥२९॥

ऐसें म्हणवोनि ते वेळां । निज पुत्राचा आठव जाहला ।

सद्गदित होवोनियां गळां । आसुवें डोळा वाहती ॥३०॥

सवेंचि धीर धरी सुंदर । म्हणे येव्हढा झीड वांचला जर ।

होईल वंशासि उद्धार । पावतील परत्र आपणांसि ॥३१॥

ऐसें करोनियां समाधान । करी पौत्राचें लालन ।

साहवे वर्षीं व्रतबंधन । निजप्रीतीनें ते करिती ॥३२॥

जैसी कुळगुरु आज्ञा करीत । तैसाचि वर्ते एकनाथ ।

त्रिकाळ संध्या असे करित । विधियुक्‍त सर्वदा ॥३३॥

शौचासि जावोनि आपण । मृत्तिकापाद प्रक्षाळण ।

स्नाना विरहित न सेवी जीवन । न बोले वचन जेवितां ॥३४॥

अध्ययन कांहीं ब्राह्मण सांगत । पवमानाची घेतसे सांत ।

पाठांतर व्हावया निश्चित । क्लेश न लागत तयासी ॥३५॥

पितामह आपुलें गृहीं । पिशाच लीप सांगतसे पाहीं ।

तेही विद्या आली सर्वही । आयास कांहीं न करितां ॥३६॥

एकनाथाची अघटित चर्या । प्रपंच मात नावडेचि तया ।

वैष्णव कुळीं जन्मोजया । तैशीच क्रिया आचरे ॥३७॥

सद्वंशींच उपजे सुशीळ । तयासि वंदिती सकळ ।

वंद्य तयासि अनुकूळ काळ । स्वप्नींही हळहळ असेना ॥३८॥

हळहळ न करी जो चित्तांत । तोचि जाणावा विष्णुभक्‍त ।

भक्‍ति तेथेंचि राबत । सिद्धि समस्त आंदण्या ॥३९॥

असोत हीं भाषणें निश्चितीं । एकनाथाची अनुपम स्थिती ।

श्रीराम भजनीं लागली प्रीतीं । आश्चर्य करिती जन लोक ॥४०॥

म्हणती वय तों याचें असे लहान । परी सर्वदा विरक्‍त असे मन ।

हास्य विनोद नायिकेची जाण । पुराण श्रवण करितसे ॥४१॥

श्लोक बोलतां अर्थांतर । सांगतां कांहीं न पडे अंतर ।

तरी आपण सांगती तया सत्वर । ऐकतां द्विजवर सुखावती ॥४२॥

म्हणती हा योगभ्रष्ट जाण । वेदांतज्ञानी असे निपुण ।

जगदुद्धार करावया पूर्ण । मनुष्यपणें अवतरला ॥४३॥

एकनाथ एकांत समयीं जाण । पंडितासि कांहीं पुसे प्रश्न ।

ऐकोनि कुंठित होय ब्राह्मण । म्हणे शिकविलें ज्ञान आमचें ॥४४॥

उदर निमित्तार्थ निश्चितीं । आम्हीं शिकलों पुराण व्युत्पत्ती ।

हे अनुभवाचे उद्गार नव्हेती। तुझी प्रश्नोक्‍ती अनुपम ॥४५॥

थिल्लर तोंवरी दिसतें थोर । जों देखिला नाहीं रत्‍नाकर ।

तेवीं आमुचें ज्ञान तुझ्या समोर । गौण साचार एकनाथा ॥४६॥

दीपका पुढें खद्योत तेज । सत्वर लपोनि जाय सहज ।

तेवी तुझा प्रश्न ऐकोनि मज । चित्तीं उमज न पडेची ॥४७॥

तोंवरीच उडूगण शोभिवंत । जंव उदयासि न ये रोहिणीकांत ।

तेवी तुझिया प्रश्नापुढें निश्चित । न चले स्फूर्त आमुची ॥४८॥

कां ओषधीचा चमत्कार आगळा पाहीं । जंव सुधारस दृष्टीसि देखिला नाहीं ।

तेवीं तुझा प्रश्न ऐकतांचि कांहीं । युक्ति सर्वही कुंठित ॥४९॥

नातरी उदयासि येतां भास्कर । जेव्हां अभ्रासारिखा दिसतो चंद्र ।

तैशीच तुझ्या ज्ञाना समोर । आमुचीं उत्तरें दीसती॥५०॥

ऐसी पुराणिकें करितां स्तुत । मग एकनाथ नमस्कारी त्यातें ।

म्हणे मज बाळकाचें वचन निश्चित । राग चित्तांत न धरावा ॥५१॥

पुराणिकें सत्वर उठोन । हात उतरी मुखावरुन ।

म्हणे तुझ्या गुणांवरुन । निंब लोण करावें ॥५२॥

दिससी परब्रह्मींचा पुतळा । आणि आम्हांसि दाविसी बाळलीला ।

दैवें करोनि देखिलासि डोळां । सफळ जाहला संसार ॥५३॥

एकनाथ म्हणती ते अवसरीं । कांहीं संशय वाटला जरी ।

तरी कोणासि पुसावें निर्धारीं । हें मज सत्वर सांगिजे ॥५४॥

पंडित सांगे ते अवसरा । संसारी सद्गुरु असावा सोयरा ।

तरीच भवपाश तुटेल खरा । जन्म मृत्यु वेरझारा चूकती ॥५५॥

ऐसें ऐकतांचि वचन । एकनाथाचें वेधलें मन ।

म्हणे आतां अनन्यभावें करुन । जावें शरण सद्गुरुसी ॥५६॥

गुरु तों व्यापक ब्रह्मांडभुवनीं । रितें स्थळ न दिसे त्याजवांचोनी ।

परी सगुण स्वरुप पाहोनि नयनीं । सेवा निशिदिनीं करावीं ॥५७॥

ऐसा हेत धरिला पोटीं । परी स्वामी कधीं पडती दृष्टी ।

रात्रंदिवस चिंता मोठी । आणिक गोष्टी नावडे ॥५८॥

तंव एके दिवसीं एकनाथ । गेले असती शिवालयांत ।

प्रहर रात्रीं एकांत । भजन करीत निजप्रेमें ॥५९॥

दृष्टीस पडावे सद्गुरुनाथ । ऐसा चित्तीं पूर्ण हेत ।

तों देववाणी प्रगटोनि तेथ । काय सांगत तयासी ॥६०॥

देवगिरि गडावरी जाण । जनार्दनपंत नामाभिधान ।

श्रीदत्त अनुग्रह त्याजकारण । तरी त्याचें दर्शन तूं घेई ॥६१॥

ऐसी अशरीरिणी उमटतां । मग संतोष जाहला एकनाथा ।

आजा आजासि न पुसतां । होय निघता एकटा ॥६२॥

जैसा उष्णकाळीं तृषाक्रांत । धुंडीत जातसे जीवनांत ।

तेवीं सद्गुरु भेटीचें लागलें आर्त । देहभान किंचित असेना ॥६३॥

नातरी बाळक क्षुधित होतां । तें धुंडीत जाय आपुली माता ।

तैसेंचि आर्त एकनाथा । म्हणे जनार्दनपंता भेटावें ॥६४॥

पैठणींहूनि देवगिरी । पांच योजनें असे दुरी ।

तितुका पंथ क्रमोनि सत्वरी । पातले घरीं सद्गुरुच्या ॥६५॥

परी द्वारपाळ तेथें अडथळा करिती । भीतरीं जाऊं न देती ।

जनार्दनासि जावोनि सांगती । शागिर्द म्हणती एक आला ॥६६॥

तो तुमचें दर्शन इच्छितो जाण । एकोबा त्याचें नामाभिधान ।

जनार्दनासि कळली खूण । म्हणती उत्तम शकुन आज होती ॥६७॥

आजि आमुचा उजवा लवतो नयन । घडिघडी बाहु करी स्फुरण ।

भेटीसि कोण सज्जन । यास्तव त्वरेनें ऊठिले ॥६८॥

द्वारापासीं येतांची सत्वर । तों दृष्टीसि देखिला वैष्णववीर ।

आंग टाकिलें खांदियावर । सजळ नेत्र जाहले ॥६९॥

सद्गुरुसि देखतां सत्वर । साष्टांग घातला नमस्कार ।

म्हणे सेवेसि असों द्या निरंतर । अभय वर देखोनियां ॥७०॥

हात जोडोनि काय म्हणे । तूं सद्‌गुरु चैतन्यघन ।

बिरुदावळी करी जतन । अनन्य शरण मी आलों ॥७१॥

आशा तृष्णा कल्पना फार । देहीं वाढल्या अनिवार ।

षड्‌वैरीयांणीं गांजिलें फार । करी उद्धार जीवाचा ॥७२॥

अनुतापयुक्‍त वोळखूनि चिन्ह । सद्गुरुचें संतोष पावलें मन ।

एकनाथासि हृदयीं धरुन । प्रीती करुन भेटले ॥७३॥

म्हणे तुमच्या संगती करोनि देख । देहाचें होईल सार्थक ।

एकनाथासि वाटला हरीख । सप्रेम सुख पावला ॥७४॥

जैसा ध्‍रुव बालक रुसोनि । एकटा फिरत होता वनीं ।

तयासि भेटतां नारदमुनी । संतोष मनीं पातला ॥७५॥

श्री जनार्दनाची भेट होतां । तैसेचि जाहले एकनाथा ।

सांडोनि देह गेह ममता । आनंद चित्तां होतसे ॥७६॥

मग सद्गुरुनें धरुनि करीं । घेवोनि गेले निजमंदिरीं ।

एकनाथासि ते अवसरीं । भोजन सत्वरी घातलें ॥७७॥

जनार्दन म्हणती चित्तांत । हा ईश्वरी अवतार साक्षात ।

मानवी नव्हे हा एकनाथ । भाग्य अद्भुत पैं माझें ॥७८॥

सद्‌गुरु सेवेची धरोनि आर्त । सेवा करीत एकनाथ।

उच्चनीच कार्य करी समस्त । न्यून किंचित पडेना ॥७९॥

आत्मदृष्टि चराचरभूतीं । ऐसी तयाची जाहली स्थिती।

सद्‌गुरुसेवेची वर्तणूक दाविती । कैशारीतीं ते ऐका ॥८०॥

चार घटीका उरतां यामिनी । तेव्हां उठती प्रातःस्मरणीं ।

शौच आचमन सर्व करोनि । वास्तुपूजनीं प्रारंभ ॥८१॥

केरसुणी घेऊनियां करें सत्वर । अपुल्या हातें झाडीत मंदीर ।

केर भरोनि टाकिती दूर । उल्हास थोर धरोनी ॥८२॥

दास दासी निद्रित असती । तों सडा संमार्जन करोनि निश्चित ।

उपकरण पात्रें उठोनि ठेविती । सोज्वळ करिती स्वहस्तें ॥८३॥

जनार्दन जाहलिल्या जागृत । शौचासि पाणी नेवोनि ठेवित ।

पादप्रक्षाळण करीती जेथें । तेथें पाट ठेवित आणोनियां ॥८४॥

मृत्तिका आणि दांतवणें । उष्ण पाणी करोनि देणें ।

शीतलोदक आचमना घालणें । किंचित उणें पडेना ॥८५॥

देवपूजेचें साहित्य । पुष्प तुळसी आणोनि ठेवित ।

मग आम्ही स्नान करोनि त्वरीत । धोत्रें चुणित स्वहस्तें ॥८६॥

मग जनार्दनपंतां लागोनी । एकनाथ स्नानासि देतसे पाणी ।

धोत्रें अंगवस्त्रें हातीं घेऊनी । संन्निध ते क्षणीं तिष्ठत ॥८७॥

आंग पुसावयासि वस्त्रें । पिळोनि देतसे निजकरें ।

पादुका पुढें ठेवित त्वरें । प्रीति पडिभारें आपुल्या ॥८८॥

सद्‌गुरुसि उदंड असती सेवक । परी आपणासि म्हणवी एकलता एक ।

कार्य सारीतसे सकळिक । सप्रेम हरिखें करोनियां ॥८९॥

विष्णुपूजनासि स्वामी बैसती । तेव्हां गंध उगाळूनि देतसे प्रीतीं ।

नैवेद्य धूप दीपां पंचारती । आणोनि ठेविती संन्निध ॥९०॥

ध्यानस्थ सद्‌गुरु बैसतां पाहें । इकडे सच्छिष्य करितसे काय ।

स्वहस्तें झाडोनि निद्रेचा ठाय । मंचक लवलाहें घालीतसे ॥९१॥

सेज पसरोनियां निगुती । विडा करोनि तबकीं ठेविती ।

पिकदाणी धुवोनि प्रीतीं । सन्नीध मांडिती ते ठायीं ॥९२॥

सद्‌गुरु भोजनासि बैसती जोंवर । मक्षिका उडविती निजकरें ।

मग आपण उच्छिष्ट पात्रावर । प्रीति पडिभारें जेवितसे ॥९३॥

म्हणे फार अन्न भक्षिलें जर । तरी सुस्त होईल कीं शरीर ।

मग स्वामी सेवेंत पडेल अंतर । यास्तव आहार अल्प करी ।

मग स्वहस्तें स्वामीस विडा देऊन । सन्निध तिष्ठे कर जोडुन ।

त्याणीं मंचकी करितां शयन । मग चरण संवाहन करावें ॥९५॥

ठायीं ठायीं असें सादर । कोणे विषयीं न पडे अंतर ।

मास अयनें लोटतां फार । परी उबग साचार न मानी ॥९६॥

एकनाथाच्या उल्हास अंतरीं । सद्‌गुरु सेवेचा मी अधिकारी ।

कोणीच नसावा वांटेकरी । जन्मवरी साचार ॥९७॥

घरिचा हिशोब लिहित दफतर । कोण्या विषयींच न पडे अंतर ।

वय तो लहान साचार । परी प्रज्ञा थोर तयाची ॥९८॥

विनटोनि सद्‌गुरु सेवेला । प्रपंच परमार्थ एक केला ।

पूज्य पूजकत्वें आपण जाहला । भेद उडाला निःशेष ॥९९॥

तंव जनार्दन पुसती तयासी । टाकोनि माता पितयांसी ।

येथें राहिलासि आम्हांपासीं । तरी गति कैसी तयांची ॥१००॥

एकनाथ म्हणतसे तये क्षणीं । माता पिता क्रमिलीं तीं दोन्ही ।

आजा आजी आहेत पैठणीं । तयांसि टाकोनि मी आलों ॥१॥

स्वामीचे सेवेपरता कांहीं । आणिक धर्म विशेष नाहीं ।

मागील आठवण न करीच जीवीं । सप्रेमभावें विनटला ॥२॥

सद्‌गुरुसेवा तोचि जप । सद्‌गुरुसेवा तेंची तप ।

येथें विकल्प वाढला अमूप । तरी तेंचि पाप जाणावें ॥३॥

एकनाथ प्रेमळ भक्‍त । सद्‌गुरु प्रसादाचें आर्त ।

जनार्दन कफ पीक जें थुंकित । तें नित्य सेवित प्रीतीनें ॥४॥

सद्‌गुरुचा तांबूल सेवुनि । ब्रह्म रसही गौण मानी ।

परी जीवींची खूण तये क्षणीं । कोणालागोन सांगती ॥५॥

अमृतानुभव ज्ञानेश्वरी जाण । जनार्दन करिती पारायण ।

नाथजी आवडीनें करिती श्रवण । एकाग्र मन करोनियां ॥६॥

ऐसा नित्य नेम सारोनि जाणा । जनार्दन जाती राजदर्शना ।

काम करभार करोनि नाना । मागुती सदना येतसे ॥७॥

तंव एके दिवशीं साचार । दिवस आला घटिका चार ।

तों देवगिरी घ्यावया सत्वर । परचक्र थोर पातलें ॥८॥

यजमानाचा शत्रु कोणी । तो पातला सैन्य घेउनी ।

वार्तिक सांगती येउनि । भयभीत मनीं ते झाले ॥९॥

तों जनार्दनपंताचिये घरीं । वेत्रपाणी आले सत्वरी ।

म्हणती परचक्र आलेंसे भारी । या अवसरीं चलावें ॥११०॥

स्नान संध्या करोनि जाण । ध्यानस्थ बैसले जनार्दन ।

तयांसि सांगतां वर्तमान । अमर्यादा तेणें होतसे ॥११॥

एकनाथ लीलावतारी । लाघव करीत ते अवसरीं ।

आपण जनार्दनाचें रुप धरी । परी न कळे बाहेरी कोणातें ॥१२॥

स्वामिचीं वस्त्रें लेऊनि सत्वर । रुप नटले तदाकार ।

हातीं घेवोनि कटार । शिबिकेंत साचार बैसले ॥१३॥

बोलणें चालणें तया ऐसें । भिन्नभेद कांहींच न दिसे ।

मग जावोनि राजसभेस । वृत्तांत ध्यानांत आणिला ॥१४॥

यजमान जाहला चिंतातुर । म्हणे परचक्र पातलें थोर ।

आतां कोण करावा विचार । ऐकोनि उत्तर बोलती ॥१५॥

तुमच्या पुण्यप्रतापें करुन । शत्रूसि जिंतीन न लगतां क्षण ।

मग सैनिकांसि आज्ञा केली त्याणें । आतां सिद्ध होणें सत्वर ॥१६॥

ऐसें वदतांचि सत्वरी । त्याणीं तत्काळ ठोकिल्या भेरी ।

रणतुरे वाजती नाना परी । नगरा बाहेरी चालिले ॥१७॥

लीलावतारी एकनाथ । लाघव दाखवितसे शत्रूतें ।

थोडेंच सैन्य याचें होतें । परी दिसतें बहुत त्यालागीं ॥१८॥

बाण सुटती सणसणा । शस्त्रें वाजती खणखणा ।

वीररस माजला जाणा । युद्ध कंदना मिसळले ॥१९॥

धुंद जाहलें घटिका चार । धुळीने कोंदून गेलें अंबर ।

तरी नाटोपेचि वैष्णववीर । परसैन्य समग्र पळालें ॥१२०॥

शत्रुसि भय उपजलें पोटीं । म्हणे आतां उत्तम न दिसे गोष्टी ।

मग शिष्टाईस दिवाण पाठवी संकटीं । म्हणतसे येतों भेटी तुमच्या ॥२१॥

ऐसी त्याणीं लाविता बोली । तों सद्‌गुरु भक्तासि कृपा आली ।

निग्रह न करिती कदाकाळीं । खेळीमेळी भेटतसे ॥२२॥

शत्रूसि आणोनि नगरांत । यजमानासि भेटवित ।

वस्त्रें भूषणें देवोनि त्यातें । म्हणे स्वस्थानातें जा आतां ॥२३॥

ऐसें यश तये क्षणीं । घेऊनि एकनाथ आले सदनीं ।

पुढती रुप पालटोनी । सेवे लागोनी सादर ॥२४॥

जनार्दन एकातींचे अवसरीं । ध्यानस्थ असतां देवघरीं ।

मानसपूजा होतां सत्वरी । देहावरी मग आले ॥२५॥

बाहेर जाहला जो वृत्तांत । तो तरी सर्वथा नसेचि श्रुत ।

नैवेद्य वैश्वदेव करुनि त्वरित । भोजना सारित मग तेव्हां ॥२६॥

निद्रा करुनि घटिका चार । मग शिबिका आणविली सत्वर ।

जनार्दनपंत साचार । सदरेसि त्वरें येतसे ॥२७॥

दृष्टीसीं देखोनि यजमान । प्रीतीनें देतसे अभ्युत्थान ।

आपल्या समीप बैसवून । बोलतसे वचन काय तेव्हां ॥२८॥

आज परचक्र आलें होतें थोर । आपण गेलें तयावर ।

शत्रूसि जिंतूनि साचार । यश बरें संपादिलें ॥२९॥

यजमान नावाजितांचि देख । तैसेंचि बोलती सभानायक ।

मग नूतन वस्त्रें आणिक । तात्काळिक आणविलीं ॥१३०॥

तेव्हां आपुल्या हातें करुनी । जनार्दनपंतासि देतसे धनी ।

म्हणती थोडेचि सैन्य सवें नेउनी । यश घेवोनी आलेती ॥३१॥

धन्यधन्य लोक बोलती समस्त । आणि भाटही बिरुदावळी पढत ।

जनार्दन विस्मित चित्तांत । नवल वाटत तयासी ॥३२॥

आम्ही तों ध्यानस्थ होतों मंदिरीं । हे वर्तणूक जाहली कैशापरी ।

मग सवेंचि समजले चित्तांतरीं । म्हणे लीलावतारी एकनाथ ॥३३॥

आमुचें रुप धरोनि तत्त्वतां । त्यानेंच कार्य साधिलें आतां ।

परी प्रगट बोलों नये वार्ता । जधन्य आतां होईल ॥३४॥

ऐसें समजोनि आपुल्या मनीं । मग जनार्दनपंत आले सदनीं ।

एकनाथासि एकांतीं नेवोनी । प्रेमें करोनी भेटले ॥३५॥

पाठीवरोनि उतरोनि हात । म्हणती धन्य तूं सद्‌गुरुभक्‍त ।

चरित्र दाखविलें अत्यद्भुत । हें समजलें चित्तांत आमुच्या ॥३६॥

ऐसें ऐकतांचि अमृतवाणी । एकनाथ सद्भावें लागें चरणीं ।

म्हणे स्वामी सूत्रधारी असती जनीं । करणी माझेनी न होय ॥३७॥

ऐसे दिवस लोटतां पाहे । तों जनार्दन आज्ञा करीतसे काय ।

त्वां हिशोब दफ्‌तरीं लिहिला आहे । तो आणोनि लवलाहें दाखवी ॥३८॥

अवश्य म्हणवोनि सद्‌गुरुभक्‍त । एकांतीं जावोनि ताळा पाहत ।

तंव एक अधेला चुकला त्यांत । काळजी चित्तांत लागली ॥३९॥

मग दिव्यासि भरण घालोनी । अवघाचि हिशोब ध्यानासि आणी ।

अडीच प्रहर लोटली यामिनी । निद्रा जिंतोनी सावध ॥१४०॥

गुरुचें न व्हावें अहित । यास्तव अधेला शोधोनि पाहत ।

तों अकस्मात कागदीं ताळा पडत । मग संतोष चित्तांत वाटला ॥४१॥

तेव्हां करुनि हास्यवदन । आपली माडी पिटीत आपण ।

तों जनार्दन मागुती पाहती येऊन । म्हणती लाभ कोण देखिला ॥४२॥

कशाचा आनंद वाटला मनीं । यास्तव हांसिलासि ये क्षणीं ।

ऐकोनि सद्‌गुरुची वाणी । मस्तक चरणीं ठेविला ॥४३॥

म्हणे हिशोब पाहतांचि समस्त । तों एक अधेला चुकला त्यांत ।

तो सांपडतांचि निश्चित । आनंद चित्तांत वाटला ॥४४॥

मग जनार्दन तेव्हां आज्ञा करित । ऐसेंचि कृष्णीं लावावें चित्त ।

तरीच संसारीं होईल स्वहित । इतुका वचनार्थ बोलिले ॥४५॥

मग सद्‌गुरुपायीं ठेवोनि लेखणी । म्हणे हेंचि इच्छिलें होतें मनीं ।

आतां आज्ञापिलें स्वमींनीं । तरी वाउगी वाणी न वेंचीं ॥४६॥

तेव्हां स्वमुखें अभंग बोलिले एक । तोही ऐका भक्त भाविक ।

अनुभवाचे शब्द रसिक । लिहितसें सुखें या ग्रंथीं ॥४७॥

अभंग ॥ त्रैलोक्याचा स्वामी जनार्दन । व्यापार झाला त्यापासुन ॥१॥

मोठा लागला व्यापार । रामनामीं निरंतर ॥२॥

सोहं खुद खत दीधलें । तें म्यां मस्तकीं वंदिले ॥३॥

प्रेमाची लुगडी दीधलीं । निजमुक्तीचीं पानें प्राप्त झालीं ॥४॥

कैवल्य पुरीं बांधिलीं त्वरेनें । चैतन्य हुडा बैसलों जाऊन ॥५॥

स्वानुभवाची तहसील करुन । रसद स्वामीस पाठवीन ॥६॥

संतसंगें वसूल बाकी । भक्ति हुजत नेटकी ॥७॥

ऐसा व्यापार पूर्वपुण्यें लाधला । एका जनार्दनी पूर्ण घाला ॥८॥

ऐसें बोलोनि ते अवसरीं । पिशाच लीप ठेविली दुरी ।

परी सद्भावें गुरुची सेवा करी । कैशापरी ते ऐका ॥४८॥

जनार्दन शौचासि बैसती जेथें । निजांगें स्थळ शुद्ध करी तें ।

सडासंमार्जन करोनि तेथें । रांगोळी घालीत ते ठायीं ॥४९॥

कांहीं दिवस लोटोनि जात । मग सद्‌गुरु पुसती तयातें ।

शेतखान्यांत कोण झाडित । हें त्वरित मज सांगिजे ॥१५०॥

संमार्जन करोनि ते ठायीं । नित्य रांगोळी होतसे पाही ।

हें हरामखोर तो न करी कांहीं । संशय जीवीं मज वाटे ॥५१॥

एकनाथ देती उत्तर । मी काय आहे हरामखोर ।

स्वामिकार्यासि अर्पिलें शरीर । सेवागार सर्वस्वें ॥५२॥

ऐसें ऐकोनि ते समयीं । जनार्दनपंत विस्मित जीवीं ।

म्हणती आजपासूनि सेवा न ध्यावी । नव्हे मानवी एकनाथ ॥५३॥

श्रीजगद्‌गुरु दत्तात्रेय जाण । त्याचे यासि करावें दर्शन ।

कैसी प्रज्ञा पहातील आपण । विचार मनें हा केला ॥५४॥

जनार्दनाचा यजमान नृपती । आज्ञापी सकळ लेखकाप्रती ।

भृगु वासरीं आमुच्या दर्शनाप्रती । तुम्ही समतीं न यावें ॥५५॥

राजयाच्या आज्ञे करोनी । सदरेसी न जाती तयेदिनीं ।

ऐसी पद्धती घातली त्यांनी । महत्कार्य जाणोनी आपलें ॥५६॥

पर्वताच्या मस्तकीं साचार । असे एक विशाळ सरोवर ।

बहुत निर्मळ तेथिचें नीर । दुजयाचा पायरव तेथें नसे ॥५७॥

पुष्पी फळीं शोभायमान । वृक्ष लागले असती सधन ।

देखतीं विश्रांति पावे मन । न जावें उठोन हे वाटे ॥५८॥

तये प्रांतीं धुंडितां सकळ । ऐसें रमणीय नसेचि स्थळ ।

स्वच्छ निर्मळ पाहतां जळ । विश्रांति तत्काळ होय जीवां ॥५९॥

श्रीदत्तात्रेयाचें आगमन । तये स्थळीं होतसे जाण ।

जरी पुण्यवंत करी अनुष्ठान । होतसे दर्शन त्यालागीं ॥१६०॥

जनार्दनपंत भृगुवासरीं । जातसे तया पर्वतावरी ।

स्नान सारोनी सरोवरीं । नित्यनेम करी आपुला ॥६१॥

पार्थिव लिंगें सहस्त्र करोन । यथाविधि करिती अर्चन ।

पूजा विसर्जन झालिया पूर्णं । श्रीदत्त दर्शन त्यासि देती ॥६२॥

परस्परें झालिया भेटी । उभयतांसि संतोष पोटीं ।

आत्मसुखाच्या बोलती गोष्टी । आनंद वृष्टी होतसे ॥६३॥

एके दिवसीं जनार्दनपंत । विचार करिती मनांत ।

म्हणती एकनाथ हा सद्गुरु भक्त । सेवा बहुत करितसे ॥६४॥

श्रीदत्तात्रेयाचें दर्शन । आतां यासि करावें आपण ।

त्याची प्रज्ञा ध्यानासि आणून । मग देतील वरदान निजकृपें ॥६५॥

ऐसा विचार करोनि चित्तीं । भृगवारीं पर्वतासि जाती ।

नाथासि बोलिले वचनोक्ती । आमुच्या संगतीं चाल आतां ॥६६॥

आज्ञा होतांचि तये वेळे । हर्षे वंदिलें चरण कमळ ।

आसन गवाळें घेऊनि जवळ । एकनाथ तत्काळ निघतसे ॥६७॥

जैसा पिता भोजनासि जाय सत्वर । तो बाळकासि बोलावीत बरोबर ।

परम उल्हासे त्याचें अंतर । तैसाचि विचार तो झाला ॥६८॥

श्रीजनार्दन धरोनि हातीं । पर्वतावरी तयासि नेती ।

एकांतीं तयासि शिकवण देती । श्रीदत्त येती या ठायां ॥६९॥

मायावेष धरुनि प्रीतीं । भलत्याचि रुपें दर्शन देती ।

तरी तुवां देखोनि तया प्रती । विकल्प चित्तीं न धरावा ॥१७०॥

तया वांचोनि साचार । आणिक कोणी मानवी नर ।

आतां न ये या पर्वतावर । इतुकें उत्तर बोलिले ॥७१॥

मग सरोवराच्या उदकीं जाण । जनार्दनपंतीं केलें स्नान ।

नित्य नेम संध्या तर्पण । सारोनि लिंगार्चन मांडिलें ॥७२॥

मृत्तिका मेळवूनि एकनाथ । तयापासी आणोनि देत ।

सहस्त्र लिंगें करोनि पूजित । विधियुक्त ते समयीं ॥७३॥

पूजा विसर्जन करोनि समस्त । मग जगद्गुरु तें ध्यानासि आणित ।

तंव तेथें पातले अनुसूया सुत । परी वेष दिसत मलंगाचा ॥७४॥

चर्में सर्वांग वेष्टिलें जाण । विशाळ आरक्त दिसती नयन ।

स्वहस्तें तसबी फिरवून । करिती ध्यान निर्गुणाचें ॥७५॥

कामधेनु घेतली बरोबरी । ती दृष्टी पुढें दिसती कुतरी ।

हें जनार्दना कळलें अंतरीं । मग नमस्कार करी सद्भावें ॥७६॥

जैसें कां सगुण निर्गुण । दोहोंत नाहीं भेदभान ।

तैसें दत्तात्रेय आणि जनार्दन । निजप्रीतीनें भेटले ॥७७॥

नातरी तेज आणि गभस्ति । एकमेकांत संलग्न असती ।

कां पुष्प मकरंद भिन्न नसती । तैसीच प्रीती दोघांची ॥७८॥

नातरी वाद्य आणि नाद । यांत सर्वथा नसेचि भेद ।

अमृत आणि त्याचा स्वाद । असे अभेद ज्या परी ॥७९॥

कां क्षेत्र क्षेत्रज्ञा निश्चित । एकमेकांची प्रीति बहुत ।

तेंवीं जनार्दन आणि अवधूत । जाहले एकत्र ते समयीं ॥१८०॥

मग बैसोनि उभयतां निकटीं । आत्मसुखाच्या बोलती गोष्टी ।

एकनाथ ऐकोनि कर्णसंपुटी । संतोष पोटीं मानित ॥८१॥

मग मृत्तिका पात्र काढोनि पाहें । जनार्दनासि आज्ञापी दत्तात्रेय ।

पैल ती कुतरी बैसली आहे । तरी दुग्ध लवलाहें काढावें ॥८२॥

ऐसी आज्ञा होतांचि निश्चितीं । जनार्दनें साहनक घेतली हातीं ।

कुतरी दोहोनि सत्वर गती । दुग्ध काढिती पात्रभर ॥८३॥

स्वस्थानीं बैसले अवधूत । तयांपुढें आणोनि ठेवित ।

वाळले कुटके काढोनि त्वरित । त्यामाजी चुरित स्वहस्तें ॥८४॥

तें तरी दिव्य अन्न निर्धारीं । परी दृष्टीसि दिसती शिळ्या भाकरी ।

जेवीं कां हिंडोनि घरोघरीं । माधोकरी मेळविली ॥८५॥

भक्ताचा भाव पहावयासी । कौतुक दाखविलें दृष्टीसी ।

परी हें समजलें एकनाथासी । तया मानसीं विकल्प ॥८६॥

तंव अवधूत म्हणती जनार्दना । आमच्या सवें बैस भोजना ।

ऐसी आज्ञा होताचि जाणा । उल्हास मना येतसे ॥८७॥

जनार्दन आणि दत्तात्रेयमूर्ती । उभयतां एके पात्रीं जेविती ।

स्वानंद रसीं जाहली तृप्ती । कर शुद्धी करिती तेधवां ॥८८॥

मृत्तिका पात्रांत धुवोनि हात । मुख प्रक्षाळीत स्वहस्तें ।

मुख शुद्धि विडे घेवोनि त्वरित । स्वस्थानीं बैसत तेधवां ॥८९॥

मग एकनाथासि आज्ञापित । तुवां सरोवरीं जावोनि निश्चित ।

पात्र धुवोनि आणि त्वरित । अवश्य म्हणत तयासि ॥१९०॥

मग सरोवराच्या षाळीं आपण । बैसोनि विचार करी मनें ।

महाप्रसाद लावला पूर्ण । तरी करावा प्राशन निजप्रीतीं ॥९१॥

सद्‌गुरुचें उच्छिष्ट निश्चितीं । तरी हेंचि गंगाभागीरथी ।

सकळ साधनें यांत येती । उद्धारगती होय जीवा ॥९२॥

ऐसें कल्पोनि तये क्षणीं । मृत्तिका पात्र लाविलें वदनीं ।

म्हणे मज ऐसा सभाग्य कोणी । त्रिभुवनीही असेना ॥९३॥

ऐसी चर्या देखोनियां । जनार्दन विनविती दत्तात्रेया ।

या सेवकासि जवळ बोलावोनियां । दर्शन तयासी द्या स्वामी ॥९४॥

मंगल रुप धरिलें आपण । यास्तव केलें नाहीं नमन ।

तरी आपुलें निजरुप प्रगट दावणें । म्हणवोनि चरण धरियेले ॥९५॥

तेव्हां दत्तात्रेय बोलती उत्तर। तयासि म्हणों नये किशोर ।

झाला विठ्ठलाचा अवतार । विश्वोद्धार करावया ॥९६॥

याचें कीर्तन ऐकतां जाण । भक्तीसि लागती बहुत जन ।

वाग्विलास कवित्व लेखन । प्रासादिक वचन बोलेल हा ॥९७॥

वेद शास्त्राचें निज मथित । व्यासें केलें श्रीभागवत ।

त्याचा अर्थ प्रांजळ बहुत । वदेल निश्चित स्वमुखें ॥९८॥

वाल्मीकिकृत रामायण । त्यावरी करी प्राकृत लेखन ।

त्याची कविता वाचिता पूर्ण । साक्षात्कार तेणें होय जीवां ॥९९॥

आणि कीर्तनामाजी साचार । पदपदांतरें वदेल फार ।

यावच्चंद्र दिवाकर । सत्कीर्ति तोंवर असे याची ॥२००॥

ऐसी बोलोनि वरदवाणी । स्वरुप पालटलें तये क्षणीं ।

जवळीं निजली होती शुनी । ती कामधेनु नयनीं देखिली ॥१॥

मलंग वेष टाकोनि आपण । रुप धरिलें सांवळें सगुण ।

षड्‌भुजा आकर्ण नयन । श्रीमुखमंडन विश्वाचें ॥२॥

ऐसें रुप प्रगटोनि तत्वतां । जवळी बोलाविलें एकनाथा ।

येरीं चरणीं ठेविला माथा । होय भेटता निजप्रीतीं ॥३॥

साही भुजा पसरोनि जाण । नाथासि दीधलें आलिंगन ।

हात उतरीत मुखावरुन । मग अंतर्धान पावले ॥४॥

जनार्दनाच्या कृपेकरुन । जाहलें श्रीदत्त दर्शन ।

मग नाथासि स्वकरें धरुनि जाण । आले परतोन गृहासी ॥५॥

पुढील कथा रसिक पूर्ण । सादर ऐका भाविकजन ।

जैसा कृपण मोजितां धन । अणुमात्र मन न फांके ॥६॥

जो दीन दयाळू रुक्मिणीपती । आठव देतसे ग्रंथार्थी ।

येर्‍हवीं महीपति मूढमती । एकचि असती रास नांवें ॥७॥

स्वस्ति श्रीभक्तलीलामृतग्रंथ । श्रवणेंचि पुरती मनोरथ ।

प्रेमळ परिसोत भाविकभक्त । त्रयोदशाध्याय रसाळ हा ॥२०८॥॥अ० १३॥६॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : September 03, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP