मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|भक्त लीलामृत|

भक्त लीलामृत - अध्याय ३३

महिपतिबोवांच्या वाचेला सिद्धी होती, म्हणूनच हा ग्रंथ जो भक्तिभावाने व एकाग्रतेने वाचील त्याला फलश्रुतीचा अनुभव खचितच येणार.


श्रीगणेशाय नमः ॥

जयजय करुणासिंधु जगजेठी । तूं भक्‍तासि पाहसी कृपा दृष्टीं ।

त्या संसाराची पाडोनि तुटी । तोडिसी फांसाटी भवबंधा ॥१॥

सगुण कांता देतां तयातें । तेथें भक्‍ताची बैसेल प्रीत ।

यास्तव कर्कशेची संगत । देशीं निश्चित त्यालागीं ॥२॥

सत्पुत्र भक्‍तासि देतां । तरी संसारीं गुंतेल त्याची आस्था।

म्हणोनि बापलेंकांत उभयतां । विघड अवचितां पाडिसी तूं ॥३॥

धन धान्य भक्तासि देतां फार । तरी सुखें करितील ते संसार ।

मग माझ्या भजनीं पडेल कीं विसर । म्हणोनि थोडेंच अन्नवस्त्र दे त्यासी ॥४॥

तुझी करणी पंढरीराया । बरी चिंत्तीं बिंबली माझिया ।

कृपा दृष्टीनें पाहासी जया । त्याची माया निवारिसी ॥५॥

दुर्जनांसि घालोनि अनिवार भ्रांति । भक्‍तांसि छळविसी तयां हातीं ।

मग आपलें चरित्र नाना रीतीं । श्रीरुक्मिणीपती दाविसी तूं ॥६॥

विष्णुसहस्त्र नामांत जाण । तुझें नाम ठेविलें द्वैपायनें ।

कीं तूं भयकृतद्भयनाशन । तें सत्यच दिसोन मज आलें ॥७॥

एवं तूंचि अवघा सत्ताधारी । हालविसी प्राचीनाची दोरी ।

निमित्त ठेवूनि मजवरी । जड मूढ वैखरी वदविसी ॥८॥

मागिले अध्यायीं चरित्र सुरस । तस्कर घेऊनि जातां म्हैस ।

ते सोडवोनि हृषीकेशे । कौतुक जनास दाखविलें ॥९॥

काल हरिदिनीं व्रत थोर । चारी प्रहर जाहला जागर ।

मग ओवाळूनि रुक्मिणीवर । वैष्णववीर काय करी ॥१०॥

इंद्रायणी तीरा जाऊन । केलें तुकयानें प्रातःस्नान ।

मग पांडुरंगाचें करीत अर्चन । निजप्रीतींनें आपुल्या ॥११॥

अवलीस सकळ लोक सांगती । तुझी म्हैस तस्करें नेली रातीं ।

मग विठोबानें दाखवोनि प्रतीती । आणविली मागुतीं माघारीं ॥१२॥

ऐसा चमत्कार ऐकोनि तेथें । विस्मित जाहली आपुल्या चित्तें ।

तुकयासि बैसविलें भोजनातें । अति हर्षातें मानूनियां ॥१३॥

शिजविली होती भात भाकरी । तयासि भाजी वाढिली तिसरी ।

मग दूध आणिलें वाटीभरी । तेव्हां आश्चर्य करी विष्णुदास ॥१४॥

मग अवलीसि तुका बोले उत्तर । आपुलें शुद्ध करोनि अंतर ।

दूध देशील तांब्याभर । तरी देवासि सत्वर पाजीन मी ॥१५॥

मग पितळेचें पात्र उठोनि हातें । दूध भरोनि दीधलें त्यांत ।

देउळीं जाऊनि प्रेमळभक्‍त । मूर्तीसि पाजित तेधवां ॥१६॥

आतां पाषाण मूर्ति दिसती लोकां । तिसीं नित्य दूध पाजितसे तुका ।

जो वश्य नव्हेचि ब्रह्मादिकां । तो होतसे भाविकां स्वाधीन ॥१७॥

ऐसें लोटतांचि दिवस फार । अवलीस विकल्प पातला थोर ।

म्हणे नित्य दूध नेतो तांब्याभर । कैसा विचार कळेना ॥१८॥

घरीं पोरवडा खावयासि साजणी । कैसें होईल ताकपाणी ।

संसार चालेल कैसेनी । निघतें लोणी किंचित ॥१९॥

मग तान्ही कन्या भागीरथी । देउळीं नित्य जात सांगा तीं ।

जिजायी पुसे तीस एकांतीं । गोंजारुनि प्रीतीं निज लोभ ॥२०॥

म्हणे दूध मागूनियां मजला । देउळी नेतो तुझा व्याला ।

तें सत्यचि पीत असतो काळा । ऐसें मजला सांगावें ॥२१॥

ऐकोनि म्हणे भागीरथी । सत्यचि दूध पीतसे मूर्ती ।

उरलें शेष तें वडील घेती । मजही देती किंचित ॥२२॥

ऐकोनि लेंकुराची वाणी । आश्चर्य करीत आपुलें मनीं ।

मग तुकयासि म्हणे एके दिनीं । दूध पाजोनि मी येतें ॥२३॥

अवश्य म्हणतां प्रेमळ भक्त । अवली जातसे देऊळांत ।

संकटीं पडिले पंढरीनाथ । म्हणे कैसी मात करावी ॥२४॥

दूध प्यावें जरी ये समयीं । तरी सप्रेम इचा भावार्थ नाहीं ।

आणि चमत्कार न दाखवितां कांहीं । तुकयासि गृहीं गांजील हे ॥२५॥

ऐसें म्हणोनि रुक्मिणीकांत । उगेच राहिले मग निवांत ।

अवलीचें भय वाटलें बहुत । विरोध चपल वित म्हणोनि ॥२६॥

दूध प्यावें कीं न प्यावें येथें । ऐसे कल्पीत पंढरीनाथ ।

भक्तासाठीं सगुण होत । येर्‍हवीं गुणातीत जगादात्मा ॥२७॥

जो क्षीराब्धिवासी देवाधिदेव । त्याचाही दुग्धांत पडिला जीव ।

तरी नायके आकळिला शिव । नवल अपूर्व मज वाटे ॥२८॥

अंधारें कोंडिला वासरमणी । कीं चंद्रकांत तो हिवें करुन ।

काळासि भय वाटलें मनीं । येतो ऐकोनि बागुल ॥२९॥

प्रभंजन कोंडला पिंजर्‍यांत । आकाश आडकलें घागरींत ।

नक्षत्र जें आदित्य लोपत । हें तो अघटित दिसतसे ॥३०॥

अविनाश निश्चळ परब्रह्म मूर्ती । ज्यासि योगी हृदयीं ध्याती ।

तो चिंताक्रांत जाहला चित्तीं । सप्रेम भक्तीचेनि बळें ॥३१॥

मग दूध घेवोनि तांब्याभर । अवली देउळासि आली सत्वर ।

चित्ती नसेचि प्रेमादर । शुद्ध अंतर मग कैचें ॥३२॥

दूध उष्ण होतें फार । बैसोनि निववावें क्षणभर ।

हा आवलीस न कळेचि विस्तार । दावेदार म्हणे देवा ॥३३॥

म्हणे वेडा करोनि घरधनी । यानें लाविला आपुलें भजनीं ।

यास्तव विरोध चालवी मनीं । मग चक्रपाणी करी काय ॥३४॥

उष्ण तांब्या लाविला होटी । तेणेंचि पोळला जगजेठी ।

मान वांकडी करितां दिठी । अवली पोटीं विस्मित ॥३५॥

म्हणे काळा पाषाण दिसतो नयनीं । परी जीव आहे या लागुनि ।

दूध पाजितो नित्य घरधनी । असत्य करणी हे नोहे ॥३६॥

अवली निहाळूनि पाहें कोडें । उगीच विलोकी देवाकडे ।

तों होंटासि आला असे फोड । म्हणे नवल रोकडें हे दिसे ॥३७॥

ऐसा चमत्कार देखोनि पाहीं । घरा आली जिजाबायी ।

तों तुक्याचें ध्यानीं शेषशायी । येऊनि काय सांगतसे ॥३८॥

तुवां आळस धरोनि चित्तीं । दूध पाठविलें अवली हातीं ।

तिनें उष्ण तांब्या लाविअल होंटीं । विचार पोटीं न केला ॥३९॥

तुवां टाकिला संसार । यास्तव मजसीं चालवी वैर ।

नांव ठेविलें दावेदार । माया अणुमात्र असेना ॥४०॥

ऐसें सांगतां हृषीकेश । तुका जाहला कासाविस ।

कांतेसि म्हणे उष्ण कैसे । दूध देवास पाजिलें ॥४१॥

मग अवली बोले प्रतिवचन । तूं नित्य देउळीं गातोसि गाणें ।

कीं द्वादश गांवें गिळिला अग्न । तुझ्या श्रीकृष्णें गोकुळीं ॥४२॥

आणि माझें दूध किंचित उष्ण । यास्तव वांकडी केली मान ।

होटासि फोड आला तरतरोन । पाहे जाऊन देऊळीं ॥४३॥

जरी मागील सत्य असती लीला । तरी दूध पितां कैसा पोळला ।

ऐकोनि अवलीच्या बोला । तुका जाहला सद्गदित ॥४४॥

मग जावोनि धांवत धांवत । देउळीं जाऊनि मूर्ति पाहत ।

तों मान आंखडली पंढरीनाथें । फोड दिसत होंटासी ॥४५॥

मग तुकयाचें सप्रेम मन । अश्रुपातें भरले लोचन ।

जैसें बाळक पोळतां देखोन । कांसाविस मन होय मातेचें ॥४६॥

तैशाच परी प्रेमळ तुकया । गंहिवरे कंठ दाटोनियां ।

म्हणे तूं पोळलासि पंढरीराया । अनाथ सखया जगद्‌गुरु ॥४७॥

स्तुति स्तोत्रें गातां पाहीं । फोड तो जिरला ते समयीं ।

परी मान वांकडी राहिली कांहीं । ते पाहती सर्वही अद्यापि ॥४८॥

पुढें पाहावया चमत्कार । साक्ष ठेवीत रुक्मिणीवर ।

आपुल्या दासाची कीर्ति थोर । करुणाकर वाढवीतसे ॥४९॥

एकदा चाकणाच्या रानांत । तुकया जातसे पंथें ।

तंव डांस येऊनि अगणित । झोंबले बहुत शरीरासी ॥५०॥

हें देखोनियां वैष्णवभक्‍त । त्याचें दुःख न मानी किंचित ।

म्हणे परोपकारीं देह लागत । म्हणवोनि निवांत बैसला ॥५१॥

आपण शरीर रक्षावें जाण । तरी इतुक्या जीवांचें दुखावेल मन ।

नश्वर देह जाईल जाण । अनुतापें पूर्ण ओळखिलें ॥५२॥

डांस डसती नाना रीतीं । शरीरासि बहु यातना होती ।

परी तो दुःख न मानोनि चित्तीं । भजन प्रीतीं करीतसे ॥५३॥

तों वाटसर्‍याचें रुपें निश्चिती । सत्वर पावले रुक्मिणीपती ।

सिंदीचा फड घेतला हातीं । डांस झोंबती म्हणोनियां ॥५४॥

आणिकही पांतस्थ आले कोणी । त्यांनीं तुकयासि देखिलें नयनीं ।

परी आपल्या जिवाच्या भयें करोनि । नुढविती कोणी सर्वथा ॥५५॥

तान्हयाचा कळवळा पाहें । माते वांचूनि कोणासि न नये ।

तैसी कृपाळु विठ्ठल माये । येतसे लवलाहे तुकया जवळी ॥५६॥

डांस उडवोनि आपुल्या करीं । निजकरें कुरवाळीत श्रीहरी ।

तेणेंचि सुख जाहलें शरीरीं । मग तुका सत्वर चालिला ॥५७॥

अस्तमानासि जातां दिनकर । तुका पावला देहू क्षेत्र ।

मग राउळासि जातां सत्वर । रुक्मिणीवर पाहिला ॥५८॥

जैसी दंड काठी पडे खालतीं । उठावें हें नेणे चित्तीं ।

दंडवत घातलें तयारीतीं । सप्रेम गती करोनी ॥५९॥

रात्री समय होतांचि सत्वरी । कीर्तन मांडिलें ते अवसरीं ।

जय पतीतपावना श्रीहरी । भवसागरीं तारावें ॥६०॥

खावया न मिळो अन्न । पुढें न वाढो संतान ।

परी तुझी कृपा इच्छितो जाण । विचार आन नसे कीं ॥६१॥

शरीर विटंबो नानारीतीं । संसारीं होवोत कां विपत्ती ।

परी तुझी कृपा इच्छितों चित्तीं । नलगे श्रीपती आन कांहीं ॥६२॥

जैसी माझी वाचा मजसी । नित्य स्वमुखें उपदेशी ।

आणिक कोणी पुसती त्यासी । याची मार्गासी लावीन ॥६३॥

ऐसें म्हणवोनि वैष्णव भक्‍त । सप्रेम भावें भजन करित ।

रामकृष्णादि नामगात । ऐकवित जनासी ॥६४॥

तीन प्रहर लोटतां रात्रीं । मग उजळिली मंगळारती ।

ओवाळुनि श्रीरुक्मिणीपती । दंडवत प्रीतीं घातलें ॥६५॥

घरासि गेले श्रोते सज्जन । मग तुकयानें घातलें आसन ।

नामरुपीं लावोनि मन । सप्रेम भजन करितसे ॥६६॥

ऐसे लोटतां कांहीं दिवस । तोंच चरित्र वर्तलें अति सुरस ।

दोघे पुत्र असती तुकयासी । नामें तयांस कोणती ॥६७॥

वडील कुमर तो महादेव जाण । विठोबा धाकटयाचें नामाभिधान ।

तंव ज्येष्ठ पुत्रा कारणें । व्यथा दारुण जाहली ॥६८॥

मूत खडा लागला असे । तेणें होतसे कासाविस ।

अवली उपाय बहुवस करीतसे तेधवां ॥६९॥

जें जें औषध सांगती कोणी । तें तें मेळवूनि आणीत नाना प्रयत्‍नीं ।

पथ्य करवीत तया कडोनी । झुरें निशिदिनीं पुत्र प्रलोभें ॥७०॥

वैद्य वाणी केलें फार । परी गुण न येचि अणुमात्र ।

कुलदैवताचे अंगारे । आणुनि साचार लावितसे ॥७१॥

पंचाक्षरी काढिती समंधा । त्यांच्या घरासि जातसे सदा ।

ते म्हणती जाहली भूतबाधा । आमुच्या शब्दा सत्य मानी ॥७२॥

गंडे भालदोर्‍या आपुले हातीं । मुलांच्या गळ्यांत आणूनि बाधिती ।

सांडणीं टाकिलीं नाना रीतीं । ममता चित्तीं अनिवार ॥७३॥

ऐसे उपाय केले फार । परी गुण न येचि अणुमात्र ।

यास्तव अवली चिंतातुर। म्हणे कैसा विचार करुं आतां ॥७४॥

रोगें मुलास व्यापिलें फार । अन्न न खाय अणुमात्र ।

यास्तव अवली चिंतातुर । म्हणे बरवा विचार दिसेना ॥७५॥

भ्रतार जाहला देवपिसा । लेंकरासी तों ऐसी दशा ।

भरंवसा नाहीं वाचेल ऐसा । म्हणवोनि उसासा टाकीतसे ॥७६॥

मुलासि लघवी करितां देखा । सर्वांगासि उठती तिडका ।

तेणें उदास होऊनि तुका । एकांत सुखा जातसे ॥७७॥

अवली तळमळीतसे मनीं । पाणवटा सांगतसे गार्‍हाणीं ।

लेंकरुं पीडिलें व्यथेनें । काय साजणी करुं आतां ॥७८॥

देवदेव्हारे केले बहुत । औषधासि तों नाहीं गणित ।

अंगारे वाहतां दिवस रात । जीव बहुत निर्बुजला ॥७९॥

मुलाच्या सुखाची करोनि मोरी । ओखदें दीधलीं नानापरी ।

परी दिवसंदिवस अधिकोत्तरी । व्यथा शरीरीं थोरावे ॥८०॥

भ्रतार आधींच देवपिसा । त्यानें टाकिली संसार आशा ।

माझ्या जीवाचा होतो वळसा । विचार कैसा सुचेना ॥८१॥

ऐसें ऐकोनि शेजारिणी । घरीं पाहावयासि आल्या कोणी ।

मुलाची अवस्था देखोनी । अशुभ वाणी वदती त्या ॥८२॥

मुलासि दृष्टीनें जंव पाहत । तों हात पाय झाले काष्ठवत ।

म्हणती औषधें देऊनियां नित्य । कासया व्यर्थ शिणसी तूं ॥८३॥

तुझ्या भ्रताराने निश्चिती । हृदयीं धरिला रुक्मिणीपती ।

यास्तव विघ्नें नानारीतीं । अवचित उद्भवती संसारीं ॥८४॥

श्रीहरीचें भजन करितां । प्रथमचि मेलीं पुत्रकांता ।

हृदयीं धरितां पंढरीनाथा । तैंहूनि अटता काळ आला ॥८५॥

ऐकोनि शेजारिणीचें वचन । हृदयीं धडकला क्रोधाग्न ।

मर्कटासि पाजिलें मदिरापान । वृश्चिकें ताडण मग केलें ॥८६॥

मग तें छंद नानारीतीं । करितां नाकळे कोणाप्रती ।

अवलीस जाहली तैसीच रीती । दांत खाती करकरा ॥८७॥

आधींच देवद्रोह होता मनीं । वरी साह्य झाल्या शेजारिणी ।

दुर्योधनासि जैसा शकुनी । कुबुद्धि कानीं सांगतसे ॥८८॥

हिरण्याक्षासि साह्य देखा । हिरण्यकशिपु पाठिराखा ।

प्रीति लावोनि एकमेकां । वैकुंठनायका निंदिती ॥८९॥

नातरी विष्णुद्रोही दशानन । तयासि साह्य कुंभकर्ण ।

बुद्धिभ्रंश होऊनि रावणें । सीताहरण पैं केलें ॥९०॥

नातरी ताटिका राक्षसिणी । श्रीराम द्वेष वागवीत मनीं ।

तीस शूर्पणखा भेटली वनीं । दुर्बुद्धी कानीं सांगावया ॥९१॥

तैशाच रीतीं जिजाबायी । देवद्रोह वागवीतसे जीवीं ।

आणि शेजारिणी सांगतीं सर्वही । विठोबा जिवीं न धरावा ॥९२॥

त्याच्या भजनीं लागतां निश्चित । संसार जाहला वाताहत ।

मुलासि व्यथा जाहली अद्भुत । हें नाहीं वांचत सर्वथा ॥९३॥

ऐसें बोलोनि ये क्षणीं । घरासि गेल्या शेजारिणी ।

अवली तळमळ करीतसे मनीं । दृष्टीसी पाहुनी पुत्रासी ॥९४॥

तों सायंकाळ होतांचि निश्चित । मुलाचें निःशेष कोंडलें मूत ।

मृदंगाऐसें पोट फुगत । न हालवित हातपाय ॥९५॥

माता पुसतां न बोले उत्तर । हात पाय तों पडलें गार ।

अवली म्हणे न दिसे बरें । कैसा विचार करुं आतां ॥९६॥

म्हणे पोर तो मरतसे निर्धारीं । हें सर्वथा न चुके ये अवसरीं ।

तरी आतां देउळांत जाऊनि सत्वरी । काळ्यावरी आपटावें ॥९७॥

ज्याणें मोडोनि संसार । ध्यानि लाविला निज भ्रतार ।

तरी मरो घातला आहे कुमर । हा त्यावर आपटावा ॥९८॥

होणार तें न चुकें निर्धारीं । परी निमित्त घालावें तयावरी ।

ऐसें म्हणवोनि ते अवसरीं । महादेव करी ओढिला ॥९९॥

फरफरा ओढीत साचा । मार्ग धरी देउळाचा ।

मग एके हातीं घेतला मोचा । सूड देवाचा घेईन म्हणे ॥१००॥

ऐसें बोलोनि जिजाबायी । देउळासि आली ते समयीं ।

हें जाणोनि शेषशाई । विस्मित जीवीं होतसे ॥१॥

मनांत म्हणतसे रुक्मिणीपती । आतां कोणती करावी युक्ती ।

अवली मारितां मजप्रती । होईल अपकीर्ती जनांत ॥२॥

ऐसें म्हणवोनि परब्रह्म रुपडें । पाहे रुक्मिणीच्या मुखाकडे ।

आतां हें कसें निरसेल सांकडें । तेंच रोकडें विचारी ॥३॥

ऐसें ऐकोनि आदिमाया । जी परब्रह्म आंगीची छाया ।

ते म्हणतसे जी पंढरीराया । चिंता कासया करीतसां ॥४॥

तुमच्या इच्छामात्रें निश्चिती । अनंत सृष्टि मोडती घडती ।

प्रकाशमान करावया क्षिति । वृथा गभस्ती चिंतातुर ॥५॥

अवर्षण पडिलें कीं तत्त्वतां । जीवन सर्वथा न मिळे आतां ।

हे उदधीसि कासया पाहिजे चिंता । अनाथनाथा श्रीविठ्ठला ॥६॥

उष्णकाळीं होतो उबारा । यास्तव पाहिजे विंजण वारा ।

ही चित्ता कासया रोहिणीवरा । ऐसें विचार अंतरीं ॥७॥

तुम्हीं कृपादृष्टीं जयाकडे । पाहातसां निज निवाडें ।

तरी पाषाण गोटे आणि खडे । परीस रोकडे होतील कीं ॥८॥

तुझ्या दासाचें ऐसें सामर्थ्य । कीं मृतप्रेत होईल जिवंत ।

ऐसें रुक्मिणी बोलोनि मात । मग निवांत राहिली ॥९॥

तों इकडे अवलीनें फरफर । देउळीं ओढित आणिलें पोर ।

म्हणे यासि आपटोनि काळ्यावर । मग मोच्यावर मारीन मी ॥११०॥

ऐसा निकर धरुनि मानसीं । संमुख आली देवापासी ।

पोर उचलिलें आपटावयासी । तों रुक्मिणी तिजसी बोलत ॥११॥

दुसरें देउळी नसतांचि कोणी । मूर्ति आडोनि उमटली ध्वनी ।

आतां आरोग्य केलें याज लागोनी । जाय तूं सदनीं आपुलिया ॥१२॥

अवली चित्तीं विस्मित होय । म्हणे पाषाणमूर्ती बोलती काय ।

सवेंचि लेंकुराकडे पाहे । तों मूत लवलाहें सूटलें ॥१३॥

देउळांत चिखल होईल फार । मग लेंकरुं घेऊनि आली बाहेर ।

घागरीस चोंच पडली थोर । तैसा कुमर मुततसे ॥१४॥

नाना कुपथ्य होतें उदरीं । ते बाहेर पडिलें इंद्रियद्वारीं ।

मातेचि म्हणे ते अवसरीं । क्षुधा उदरीं मज वाटे ॥१५॥

मग विस्मित होऊनि निज अंतरा । म्हणे भय वाटलें रुक्मिणीवरा ।

यास्तव आरोग्य केलें कुमरा । मग निज मंदिरांत ते गेली ॥१६॥

मुलासि क्षुधा लागली बहुत । मग जेवावया बैसविलें त्यातें ।

हा तुकयासि कळतां वृत्तांत । म्हणे पंढरीनाथ शिणविला ॥१७॥

प्राणांत व्यथा होती मुला । एकाएकींच अरोगी झाला ।

नकळे ईश्वराची लीला । त्याची कळा तो जाणे ॥१८॥

मग भोजन करोनि वैष्णवभक्‍त । सत्वर जातसे देउळांत ।

चार घटिका लोटतां रात । प्रारंभ करीत कीर्तनासी ॥१९॥

कीर्तन करितां वैष्णव जन । तुकयासि ध्रुपदी होते कोण ।

त्यांची ऐका नामाभिधानें । प्रेम जयांचेनी दुणावे ॥१२०॥

गंगाधर मवाळ साचार । कडुसांत होता द्विजवर ।

तो तुकयाचा लेखक निरंतर । प्रसादिक उत्तर लिहितसे ॥२१॥

दुसरा संताजी तेली जाण । उपनांव जगनाडे याकारणें ।

चाकणांत होता बहुत दिन । तुकयासि शरण मग आला ॥२२॥

ऐसे दोघे उभयतां । सद्भावें शरण वैष्णव भक्‍ता ।

सोडोनि संसाराची आस्था । लिहिती कविता निजांगें ॥२३॥

हरि कीर्तन करितां नित्य । तुकया मागें धरिती धृपद ।

तेणें रंग ओढवे अद्भुत । सप्रेम नृत्य करिताती ॥२४॥

दुराशा सांडोनि निश्चिती । धरिली त्यांणीं सत्संगती ।

कीर्तनामाजी धृपद धरिती । सप्रेम गती करोनियां ॥२५॥

जैसी पांथस्थाची मनोवृत्ती । जाणोनि रथ चालवीत सारथी ।

कीं उपचार भोग इच्छितां पती । तेथें अनुकूळ असती पतिव्रतां ॥२६॥

कां हाडपी विडा देतसे राया । सेवेसि झिजवी आपुली काया ।

परी उपकार न दावीच तया । स्वहिता आपुलीया लागोनी ॥२७॥

तैशाचपरी ते दोघेजण । गंगाजी मवाळ ब्राह्मण ।

दुजा संताजी तेली जाण । जीवें प्राणें अनुसरले ॥२८॥

टाळ विणा घेऊनि हातीं । कीर्तनामाजी धृवपद धरिती ।

मंजुळ स्वर मागूनि देती । सप्रेम गती करोनियां ॥२९॥

असो चार घटिका लोटतां रात । कीर्तन आरंभीत वैष्णवभक्‍त ।

करुणारसें पंढरीनाथ । गीतीं आळवित निजप्रीतीं ॥१३०॥

ध्यानांत आणूनि रुक्मिणीवर । म्हणे करिसी कीं न करिसी अंगिकार ।

हाचि मज पडिला विचार । दिवस रात्र झुरतसें ॥३१॥

पायांचें दर्शन देसी कीं नाहीं । यास्तव झुरतसे आपुले जीवीं ।

बोलसी कीं न बोलसी वचन कांहीं । तळमळ देहीं वाटतसे ॥३२॥

होईल कीं न होईल आठव माझा । हाच संदेह गरुडध्वजा ।

तूजवांचूनि केशवराजा । साह्य तो दुजा नसे कीं ॥३३॥

मीतरी कर्माचा हीन । यास्तव जीवीं वाटतो शीण ।

तूं अनाथबंधू करुणाघन । तें साच वचन करी आतां ॥३४॥

तुम्हां पडेल भीड फार । तरी मी नांवाचा नसें थोर ।

सर्वप्रकारें सेवाचोर । साक्ष अंतर मज माझें ॥३५॥

नाहीं याति शुद्ध कुळकर्म । नेणें ठायीं पडेल वर्म ।

सर्वथा नेणें भक्‍तिप्रेम । तूं पुरुषोत्तम जाणसी ॥३६॥

तपोनिधि दान धर्मशीळ । आंगीं नसे एकही बळ ।

भूमीभार मी जाहलों केवळ । हें तूं कृपाळू जाणसी ॥३७॥

ऐशी करुणा भाकोनि प्रीतीं । देहींच तुका विदेह स्थिती ।

हृदयीं आविर्भवली पांडुरंगमूर्ती । सप्रेम भक्‍तीचेनि बळें ॥३८॥

कीर्तनीं नाचे प्रेमें करुन । क्षणक्षणां घाली लोटांगण ।

तुकयासि नाटवे भक्‍तपण । विसरला देवपण विठोबा ॥३९॥

हें जाणोनि सांरगधर । मनांत जाहले चिंतातुर ।

म्हणे तुका समरसीं मिळाला जर । तरी कोणासी उत्तर बोलावें ॥१४०॥

संकट पडतां आळवील कोण । मग मी कोणाचें करुं धावण ।

ब्रह्मरुप काया केली यानें । नामसंकीर्तन करुनियां ॥४१॥

ऐसें म्हणवोनियां देखा । आलिंगूनि हृदयीं धरिला तुका ।

मग देहभावासि येतां निका । करुणा अनेका भाकीतसे ॥४२॥

म्हणे दीनदयाळा पंढरीनाथा । तूंचि माझी मातापिता ।

बहीण बंधु इष्टमित्र चुलता । नसे अनंता तुजविण ॥४३॥

विठोबा तूंचि माझा सद्गुरु थोर । निजांगें उतरी भवसागर ।

नाम गायीन निरंतर । ऐसा वर मज देयी ॥४४॥

कीर्तन करोनि ऐशा रीतीं । मग उजळिली मंगळारती ।

ओंवाळूनि श्रीरुक्मिणीपती । दंडवत प्रीतीं घातलें ॥४५॥

यावरी म्हणे सारंगधर । तुका नामयाचा अवतार ।

सगुणीं प्रेमा साचा थोर । यास्तव साकार मी झालों ॥४६॥

अद्वैत शास्त्र नावडे यासी । यास्तव शरण जाय सद्गुरुसी ।

पुढें वाट पडेल ऐसी । गुरुभक्‍तीसी अवरोध ॥४७॥

एक श्रेष्ठ आचरला जैसें । जन पाहूनि वर्तती तैसें ।

तरी आपण धरुनि विप्रवेष । द्यावा तुकयास अनुग्रह ॥४८॥

तंव रुक्मिणी म्हणे पंढरीनाथा । माझी विनंति परिसा आतां ।

तुम्ही जयासि अनुग्रह देतां । तरी अमर तत्वतां तो होय ॥४९॥

याचविषयीं तुम्हाकारणें । गोष्टीं सांगतें पुरातन ।

ब्रह्मशापें यादव संपूर्ण निमाले । तेथें उद्धव आपण रक्षिला ॥१५०॥

तुम्हीं अनुग्रह करितांचि पाहीं । ब्रह्मशापाचें न चले कांहीं ।

उद्धव वांचविला ते समयीं । भागवत सर्वही सांगोनी ॥५१॥

राम अवतारीं बिभीषणभक्‍त । दुसरा अंजनीसुत हनुमंत ।

ज्याच्या मस्तकीं ठेवितां हस्त । अमर होत देह त्याचा ॥५२॥

आतां तुकयाचें मस्तकीं ठेवितां कर । तरी याचें शरीर होईल अमर ।

ऐकूनि रुक्मिणीचें उत्तर । सारंगधर हांसले ॥५३॥

म्हणे यथार्थ बोलसी वाचा । तुका जिवलग प्राण आमुचा ।

यासि घात नलगे काळाचा । तो मंत्र साचा देईन मी ॥५४॥

ऐसें म्हणवोनि करुणाघन । शुभमुहूर्त पाहिला सुदिन ।

माघ शुद्ध दशमी जाण । गुरुवार पूर्ण ते दिवशीं ॥५५॥

ध्यानांत आणूनि पांडुरंगमूर्ती । तुका निद्रित असतां राती ।

स्वप्न देखिलें कैशा रीतीं । तें सादर संतीं परिसिजे ॥५६॥

इंद्रायणीसि करोनि स्नान । देउळासि जात वैष्णव जन ।

हातीं असती तुळसी पानें । तों मार्गी ब्राह्मण देखिला ॥५७॥

तुकयाची ऐसी असे रीत । ब्राह्मण देखिला अथवा संत ।

तयासि साष्टांग दंडवत । सर्वथा घालित निजप्रेमें ॥५८॥

जैसा का जागृतीचा मोळा । तरी स्वप्नही तैसेंचि दिसे डोळा ।

हा तों अनुभव असे सकळां । वैष्णवी लीला मायेची ॥५९॥

असोत आतां हीं भाषणें । तुक्यानें मार्गी देखतां ब्राह्मण ।

तयासि वाहोनि तुळसीपान। साष्टांग नमन पैं केलें ॥१६०॥

मग संतुष्ट होऊनि द्विजवर । तुकयाचें मस्तकीं ठेविला कर ।

रामकृष्णनाम सांगीतला मंत्र । जगदूद्धार होय जेणें ॥६१॥

गुरुपरंपरा ते अवसरीं । निजसुखें सांगें तेव्हां श्रीहरी ।

ते सादर होऊनि श्रवण द्वारी । श्रोतीं चतुरीं परीसिजे ॥६२॥

राघव चैतन्य भक्‍त वैष्णव । तयासि शरण चैतन्य केशव ।

बाबा चैतन्य माझे नांव । तुकयासि देव बोलिले ॥६३॥

श्रीपांडुरंगाचें उपासन । नको सोडू तयाचें चरण ।

मग तुका संतुष्ट होऊनि मनें । सद्गुरुकारणें विनवित ॥६४॥

स्वामी घरासि येऊनि सत्वर । माझा आश्रम करा पवित्र ।

स्वयंपाक करोनि आपल्या करे । जेवा पोटभर त्या ठायीं ॥६५॥

ऐकोनि तयाची वचनोक्‍ती । काय म्हणतसे रुक्मिणीपती ।

पावशेर तूप देशी प्रीतीं । तरी सदनाप्रती मी येतों ॥६६॥

ऐकोनि द्विजवराची मात । अवश्य म्हणे वैष्णवभक्‍त ।

मग ब्राह्मणाचा धरोनि हात । तुका येत निज मंदिरीं ॥६७॥

मग कांतेसि म्हणे भक्‍तवैष्णव । आपुल्या मंदिरासि आले देव ।

यांसि साहित्य देऊनि सर्व । घृत द्यावें मागती तें ॥६८॥

ऐसें तुका बोलतां वचन । कांता जाहली क्रोधायमान ।

म्हणे कोठोनि आला मेला ब्राह्मण । पावशेर तूप कोठून देऊं ॥६९॥

कोणे जातीचा द्विजवर । घरीं आणितो निरंतर ।

भांडी जाळोनि केलीं खापर । करुं संसार कैशापरी ॥१७०॥

ऐसा कलह वाढतां थोर । तो सद्गुरु तेथूनि गेले सत्वर ।

ऐसें स्वप्न वैष्णववीर । देखिलें साचार ते दिवशीं ॥७१॥

जागृत अवस्थे येऊनि देखा । चित्तीं पस्तावे वैष्णव तुका ।

म्हणे मज भेटोनि सद्गुरु सखा । भवसागर देख उतरिला ॥७२॥

भोजनासि तूप पावशेर । निजमुखें मागती साचार ।

घरीं कलह वाढला थोर । यास्तव सत्वर देव गेले ॥७३॥

केशव चैतन्य राघव चैतन्य । बाबाजी आपुलें सांगितलें नामाभिधन ।

रामकृष्ण हरिमंत्र जाण । मजकारणें सांगितला ॥७४॥

माघशुद्ध दशमी साचार । सुदिन पाहोनि गुरुवार ।

माझा करोनि अंगिकार । गेले सत्वर सद्गुरु ॥७५॥

ऐसे तीन अभंग सप्रेमें । निजमुखें वदले तुकाराम ।

ते सर्वदा गाईल जरी प्रेमें । त्यासि भवश्रम बाधीना ॥७६॥

सद्गुरुकृपा ऐशा रीतीं । तुकयासि स्वप्नीं झाली निश्चिती ।

भाविक प्रेमळ अनुभवें जाणती । चरित्र ऐकती हरिकीर्तनीं ॥७७॥

पुढें परंपरा ऐसी चालत । जयासि तुकयाची अत्यंत प्रीत ।

तयासि स्वप्नीं अनुग्रह देत । अद्यापि चालत चमत्कार हा ॥७८॥

पुढील अध्यायीं रस अद्गुत । वदविता श्रीरुक्मिणीकांत ।

ते सादर ऐका प्रेमळभक्‍त । एकाग्र चित्त करोनियां ॥७९॥

आपुल्या दासाची सत्कीर्त । प्रगट व्हावया जनांत ।

यास्तव भक्‍तलीलामृत । पंढरीनाथ वदवितो ॥८०॥

लीलाविग्रही रुक्मिणीवर । त्याचे हातीं असे सूत्र ।

निमित्त दीधले मजवर । हाही विचार तो जाणें ॥८१॥

दोन्ही कर ठेवूनि जघनीं । विटेवरी उभा चक्रपाणी ।

महिपति त्याचा वरदानी । सद्गुण कीर्तनीं गातसे ॥८२॥

स्वस्ति श्रीभक्‍तलीलामृत ग्रंथ । श्रवणेंचि पुरती मनोरथ ।

प्रेमळ परिसोत भाविक भक्त । तेहेतिसावा अध्याय रसाळ हा ॥१८३॥३३ अध्याय ॥ओव्या १८३॥

N/A

References : N/A
Last Updated : September 03, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP